भारतीय शेअरबाजाराची ताकद आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास याचे महत्त्वाचे मोजमाप मानल्या जाणाऱ्या एमएससीआय उदयोन्मुख बाजार निर्देशांक (ईएम) अर्थात इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये भारताचे वजन (वेटेज) गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात घटले आहे. गेल्या वर्षी सुमारे २१-२२ टक्क्यांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेले भारताचे वजन आता जवळपास १२ टक्क्यांवर घसरले आहे. या नाट्यमय घसरणीमुळे भारत या निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानावर फेकल्या गेला आहे. जागतिक बाजारपेठेत अचानक असे काय घडले की, भारताचा दबदबा कमी झाला? समजून घेऊया या आर्थिक घडामोडींमागील महत्त्वाची कारणे.
एमएससीआय निर्देशांक म्हणजे काय?
एमएससीआय (मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनल) ही जागतिक स्तरावर विविध देशांच्या शेअरबाजारांचे मूल्यांकन करून निर्देशांक तयार करणारी एक अत्यंत नामांकित संस्था आहे. जगभरातील हजारो अब्ज डॉलर्सचे निष्क्रिय निधी (पॅसिव्ह फंड) आणि ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) हे या एमएससीआय निर्देशांकाचे तंतोतंत अनुकरण करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर या निर्देशांकात एखाद्या देशाचे वजन वाढले, तर जागतिक फंड्स त्या देशातील कंपन्यांच्या समभागांमध्ये अधिक पैसा गुंतवतात. याउलट, वजन कमी झाल्यास हे जागतिक फंड्स भारतातून आपला पैसा काढून घेतात. एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स निर्देशांक हा केवळ आकडा नसून जगभरातील शेकडो अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक मानला जातो. या निर्देशांकाचा मागोवा घेणाऱ्या निष्क्रिय फंडांकडे ७०० अब्ज डॉलरहून अधिक मालमत्ता आहे. तर सक्रिय आणि निष्क्रिय मिळून एमएससीआयच्या उदयोन्मुख बाजार निर्देशांकांशी संलग्न मालमत्ता १.८ लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे.
निर्देशांकात भारत कुठे?
एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स (ईएम) निर्देशांकातील भारताच्या सर्वात मोठ्या दोन कंपन्या – रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक हे अलीकडच्या महिन्यांत अनुक्रमे अकराव्या आणि बाराव्या स्थानावर घसरल्या. मार्च २०२६ मध्ये या कंपन्या सातव्या आणि आठव्या क्रमांकावर होत्या. त्यांच्या निर्देशांकातील वैयक्तिक वजनातही घट झाली असून दोन्ही कंपन्यांचा वाटा आता ०.८ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. यामुळे एमएससीआय ईएम निर्देशांकातील भारताचे एकूण वजन १०.८७ टक्क्यांवर घसरले असून हा गेल्या सहा वर्षांतील नीचांकी स्तर आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये भारताने एमएससीआय ईएम इन्व्हेस्टेबल मार्केट निर्देशांकात सर्वात मोठा घटक म्हणून स्थान मिळवले होते. मात्र त्यानंतर चीनने पुन्हा आघाडी घेतली आणि भारताचा वाटा हळूहळू कमी होत गेला.
भारताचे वजन घटण्याची मुख्य कारणे काय?
जागतिक एआय क्रांती आणि देशांतर्गत भांडवली बाजारात त्यासंबंधित कार्य करणाऱ्या दिग्गज कंपन्यांचा अभाव आहे. सध्या जगभरातील गुंतवणूकदारांना कृत्रिम प्रज्ञा आणि सेमीकंडक्टर (चिपमेकिंग) क्षेत्राचे प्रचंड वेड लागले आहे. तैवानमधील टीएसएमसी अर्थात तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स तसेच एसके हायनिक्स यांसारख्या कंपन्यांनी जागतिक स्तरावर अब्जावधी डॉलर्सचे भांडवल स्वतःकडे खेचून घेतले आहे. दुर्दैवाने, भारताकडे सध्या या तोडीची किंवा या तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व करणारी एकही मोठी सूचिबद्ध कंपनी नाही. परिणामी, जागतिक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इतर आशियाई देशांकडे वळवला आहे. तसेच शेअरचे महागडे मूल्यांकन आणि संथ नफावृद्धी हे गतिरोधक ठरत आहेत.
तेजीच्या तुलनेत नफ्याची पीछेहाट
गेल्या दोन वर्षांतील प्रचंड तेजीमुळे भारतीय कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्यांकन कमालीचे महाग झाले होते. परंतु, त्या तुलनेत कंपन्यांच्या निव्वळ नफ्यातील वाढ मात्र मंदावली. जेव्हा शेअर खूप महाग असतात आणि नफा अपेक्षेप्रमाणे वाढत नाही, तेव्हा परदेशी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेतात. हेच भारतातही पाहायला मिळाले. याचाच परिणाम म्हणून जागतिक बाजारातील बदलत्या समीकरणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेतला आहे. चालू वर्षातच आतापर्यंत जवळपास २४ अब्ज डॉलरहून अधिकचा निधी भारतातून बाहेर गेला आहे. या सातत्यपूर्ण विक्रीचा थेट फटका एमएससीआयमधील भारताच्या वेटेजला बसला आहे.
तैवान आणि दक्षिण कोरियाची मुसंडी
एआय आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात तैवानने जबरदस्त कामगिरी केली आहे. एकट्या तैवानचे एमएससीआय उदयोन्मुख बाजार (ईएम) निर्देशांकातील वजन आता २५ टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे. थक्क करणारी बाब म्हणजे, तैवानमधील दिग्गज चिप उत्पादक कंपनी टीएसएमसीचे एकटीचे वजन हे भारताच्या एकूण वजनापेक्षाही जास्त झाले आहे. दक्षिण कोरियानेही आपल्या मेमरी चिप्स आणि एआय उपकरणांच्या जोरावर निर्देशांकात मोठी झेप घेतली आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा की नवी संधी?
अर्थतज्ज्ञांच्या मते, ही घसरण म्हणजे भारताच्या आर्थिक विकासकथेचा अंत मुळीच नाही. भारताची अर्थव्यवस्था अजूनही जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मात्र जागतिक गुंतवणूकदार आता केवळ पारंपारिक आर्थिक वाढ (जीडीपी) पाहत नाहीत, तर संबंधित देश भविष्यातील तंत्रज्ञानात (एआय, सेमीकंडक्टर, प्रगत तंत्रज्ञान) किती आघाडीवर आहे, याला महत्त्व देत आहेत. त्यामुळे भारतासाठी ही एक ‘वेक-अप कॉल’ म्हणजेच धोक्याची घंटा आहे. भारताने जर डेटा सेंटर्स, चिप निर्मिती, आणि एआय परिसंस्था यामध्ये वेगाने पायाभूत सुविधा उभारल्या आणि मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित केले, तर भविष्यात हे चित्र पुन्हा पालटून भारताचे वजन पुन्हा वाढू शकते.
सामान्य गुंतवणूकदारांवर काय परिणाम?
एमएससीआय उदयोन्मुख बाजार निर्देशांकामधील वजन घटल्यामुळे येत्या काळात परदेशी निधीचा ओघ काहीसा मंदावू शकतो, ज्यामुळे भारतीय शेअरबाजारावर तात्पुरता दबाव किंवा चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाच्या एसआयपीच्या माध्यमातून बाजारातील सहभाग अत्यंत मजबूत आहे. तसेच भारताचा पायाभूत सुविधांवरील खर्च वाढत असून तो सातत्याने सुरू आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता, जागतिक बाजारातील या बदलांवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
इतर कारणे काय?
भारताचे एमएससीआय निर्देशांकातील वजन कमी होत असतानाच देशांतर्गत भांडवली बाजारावर आणखी एक दबाव निर्माण झाला आहे. इराण युद्धामुळे वाढलेल्या अनिश्चिततेचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर दिसून येत असून, म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमधील निव्वळ गुंतवणूक ४० टक्क्यांनी घसरून २२,९०८ कोटींवर आली. हा आकडा गेल्या एका वर्षातील सर्वात कमी आहे. स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप फंडांमधील गुंतवणूक अनुक्रमे २८ टक्के, ३३ टक्के आणि ३७ टक्क्यांनी घटली. खनिज तेलाचे दर प्रतिपिंप १०० डॉलरच्या आसपास पोहोचणे हे गुंतवणूकदारांच्या माघारीचे प्रमुख कारण आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे बाजारातील अस्थिरता वाढली असून, त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी इक्विटी बाजारातील गुंतवणुकीबाबत सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, सर्वच प्रकारच्या शेअरआधारित फंडांमधील गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकट चालासानी म्हणाले.
