Mughal Empire and Persia Relations: भारताच्या राजकीय आणि कलात्मक क्षेत्रात सुमारे चारशे वर्षांपूर्वी फारसी संस्कृती रूजण्याची सुरूवात झाली होती. भारतात मुघलांची सत्ता आल्यानंतर फारसी संस्कृती व भाषेचा प्रभाव वाढला होता. मुघल बादशाहांनी कला, दरबारातील शिष्टाचार, वास्तुशास्त्र, साहित्य आणि प्रशासकीय कामकाज या क्षेत्रांमध्ये फारसी संस्कृतीतील काही घटकांचा समावेश करून घेतला. मुघल हे मध्य आशियातून भारतात आले, परंतु, कालांतराने त्यांच्यावर पर्शियाच्या (इराण) फारसी संस्कृतीचा प्रभाव पडत गेला. हुमायून, अकबर, जहांगीर, शाह जहान, औरंगजेब यांनी त्यांच्या कार्यकाळात पर्शियन विद्वानांना दरबारी महत्वाचे स्थान दिले होते. मुघलांच्या काळात भारताचे इराणशी कसे संबंध होते जाणून घेऊया.

पर्शियन (इराण) संस्कृतीचा प्रभाव भारतात कसा पडला?

मुघलांच्या घोडदळात पर्शियातून आयात केलेले घोडे मोठ्या प्रमाणात होते. तसेच मुघलांच्या सैन्यासाठी शस्त्रे आयात केली जात. पर्शियातून आलेल्या कारागिरांची संख्या मुघलांच्या काळात वाढली होती. पर्शियातून आयात केलेल्या सतरंज्या, गालीचे राजमहालात तसेच किल्ल्यांमध्ये त्याकाळी अंथरल्या जात. अनेक विद्वान पर्शियातून मुघलांच्या दरबारी दाखल झाले होते. दरम्यान, पर्शियन संस्कृतीचा प्रभाव भारतात फक्त मुघल दरबारीच नव्हता. तर तो वास्तुशास्त्रातही मोठ्या प्रमाणात होता. किल्ले, राज महालांमधील पर्शियन शैलीतील कमानींची रचना, बागांच्या रचनेत वापरली जाणारी चारबाग गार्डन पद्धत, मुघल फर्मानातील फारसी भाषा, घोडदळातील घोडे या स्वरूपात भारताचे तत्कालीन पर्शिया म्हणजेच आजच्या इराणशी असलेले संबंध दिसून येत. याशिवाय भारत व पर्शियात सुका मेवा, मसाले, धातुची भांडी, रेशीम वस्त्रे, पुस्तके यांचा व्यापार तसेच देवाणघेवाण होत असे.

मुघल आणि फारसी भाषा

मध्य आशियातून मुघल भारतात आले होते. परंतु, पर्शियाशी असलेल्या संबंधांमुळे फारसी संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या काळात भारतावर अधिक पडला. भारतीय संस्कृतीत फारसीची सरमिसळ मुघल वारसा स्वरूपात सोडून गेल्याचे काही इतिहासकार सांगतात. मुघलांच्या काळात प्रशासकीय कामकाजात, राजनैतिक संबंधांत, साहित्यात, कर आकारण्यात फारसी भाषा अधिक वापरली जात असे. मुघल फक्त फारसी भाषा बोलत नसत, तर ते फारसी भाषेतूनच विचार करत, असेही काही इतिहासकार सांगतात. दरम्यान, सोळाव्या शतकात मुघलांच्या दरबारात फारसी भाषेतूनच कामकाज होत असे. फारसी भाषेतून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मितीही झाली होती. इतिहासकार मुझफ्फर आलम यांच्या मते, फारसी भाषेच्या बळावर मुघलांनी त्यांचे साम्राज्य वाढवले व टिकवले. इराणमध्ये त्यावेळी सफावीदांचे शासन होते. सफावीद हे इराणमधील (Persia) एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे राजघराणे होते. त्यांनी इराणमध्ये शिया इस्लामला अधिकृत धर्म म्हणून स्थापित केले आणि आधुनिक इराणचा पाया रचला.

भारत-इराण-मध्य आशियातील व्यापाराचे केंद्र कंदहार

अफगाणिस्तानातील कंदहार हे शहर मुघल व इराणमध्ये असलेल्या संबंधांचे साक्षीदार आहे. सोळाव्या व सतराव्या शतकात भारत, इराण व मध्य आशिया दरम्यान होणाऱ्या व्यापाराचे कंदहार हे प्रमुख केंद्र होते. कंदहार हे भारत, इराण व मध्य आशियाला जोडणारे शहर होते. कंदहारमध्ये मोठ्या प्रमाणात घोडे, कापड, महागड्या वस्तू, हस्तलिखिते आणि लष्करी सामग्री यांचा व्यापार होत. त्यामुळे हे शहर ताब्यात घेण्यासाठी सफावीद व मुघल यांच्यात अनेकदा संघर्ष व्हायचा. कंदहार हे भौगोलिक व धोरणात्मकदृष्ट्या एक महत्वाचे शहर होते. त्यावर ज्याची सत्ता तो सामर्थ्यवान असा समज दृढ होता.

अकबर, जहांगीर आणि शाह जहान यांच्या काळात इराणमधून काय आयात केले जात?

हुमायून, अकबर, जहांगीर, शाह जहान आणि औरंगजेब यांनी त्यांच्या कार्यकाळात पर्शियन विद्वानांना महत्वाचे स्थान दिले होते. इराणी विद्वान, प्रशासक, वैद्य, सुलेखनकार (कॅलिग्राफर्स), चित्रकार, धातूकाम करणारे कारागीर आणि धार्मिक गुरू यांनी भारतात येऊन मुघलांच्या दरबारात मानाचे स्थान मिळवले होते. पर्शियातून भारतात झालेल्या या स्थलांतरामुळे फारसी संस्कृतीचा प्रभाव भारतातील विविध क्षेत्रांवर पडला. इराणमधील कोम, इस्फहान आणि ताबरिझ येथून उत्तम रेशीम व लोकरपासून तयार झालेल्या सतरंज्या भारतात आयात केल्या जात असे.

भारत व इराण दरम्यान मोठ्या प्रमाणात वस्तूंची देवाणघेवाण तसेच व्यापार होत असे. पर्शियन विद्वान, सुलेखनकार, चित्रकार, सचिव, धर्मशास्त्रज्ञ, वैद्य आणि साहित्यिक यांनी भारतात प्रवेश केला आणि त्यांना शाही सेवेत राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे भारतात पर्शियन भाषेतील कविता, नीतिशास्त्र, इतिहास, सुफी साहित्य आणि राजकीय व्यवस्थेवरील पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली. त्याचा प्रभाव भारतीय भाषांवर पडला.

भारतातून कापड, मसाले, साखर, नीळ (निळा रंग तयार करण्यासाठी वापरली जाणारी एक वनस्पती) आणि मौल्यवान रत्ने यांची इराणमध्ये निर्यात केली जात असे. त्याबदल्यात इराणमधून भारतात घोडे, धातु, सुका मेवा, रेशीम, महागडी वस्त्रे, काचेचे भांडे, शस्त्रे व सुशोभीकरणाच्या वस्तू आयात केल्या जात. फारसी भाषेतील पुस्तके, कविता, तत्वे, इतिहास, तत्वज्ञान आणि सुफीझमशी संबंधित साहित्य भारतात मोठ्या प्रमाणात आयात केले जात.

इराणी राज्यकर्ता नादिर शाहने दिल्ली लुटली, कोहिनूरही नेला

एम. एथली मेरियाक यांच्या ‘द मुघल एम्पायर’ या पुस्तकातील नोंदीनुसार मुघलांच्या लष्करावर इराण व तुर्कस्थानच्या परंपरेचा प्रभाव होता. इराणमध्ये चिलखत, तलवारी, खंजीर, ढाली आणि लढाईत सुरक्षेसाठी वापरले जाणारे टोप यांची निर्मिती केली जात असे. या शस्त्रांवर सोने, चांदीने काही मजकूर तसेच कोरीव काम देखील केले जात. त्यामुळे सोळाव्या शतकात इराणच्या शस्त्रांचा प्रभाव भारतात होता. मुघलांचे पर्शियाशी कला, संस्कृती, भाषा आणि व्यापारी संबंध रूजले होते. दरम्यान, अठराव्या शतकात इराणी राज्यकर्ता नादिर शाह याने दिल्ली लुटली होती. काही दिवस रक्तपात सुरूच होता. त्याने कोहिनूर हिरा त्याच्या दिल्ली स्वारीत लुटून नेला होता. मुघल काळात पर्शियाशी भारताचा अत्यंत जवळून संबंध आला.