देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यग्र अशी मुंबई विमानतळाची ओळख आहे. दररोज सुमारे १ हजार विमानांच्या माध्यमातून पावणे दोन लाख प्रवासी ये-जा करतात. आता याचे स्थलांतर नवी मुंबईकडे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबई विमानतळाकडून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यास तात्कालिक अडचण काय?

धोकादायक असलेल्या मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या पुर्नविकासाचे काम जानेवारी २०२७ पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील २६५ आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे २५ ऑक्टोबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय मुंबई विमानतळ प्राधिकरणाने घेतला. मात्र नवी मुंबई विमानतळापर्यत ये-जा करण्यासाठी सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचा अभाव आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या निर्णयाला विमान कंपन्या आणि प्रवाशांनी विरोध केला. त्यामुळे तुर्तास मुंबई विमानतळावरील २६५ विमानांचा प्रवास नवी मुंबई विमानतळाकडे थांबला आहे.

टर्मिनल १ चा पुर्नविकास का?

टर्मिनल १ ची इमारत खूप जुनी (काही भाग ६० तर काही भाग ८४ वर्षे जुना) आहे. २० एप्रिल रोजी टर्मिनल १ला आग लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुर्नविकासाचा निर्णय़ घेण्यात आला. पुर्नविकासासाठी येत्या जानेवारी महिन्यापासून टर्मिनल १च्या काही भागाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे ३३ टक्के विमान वाहतूक नवी मुंबईकडे वळविण्याचे नियोजन आहे.

विमानांच्या स्थलांतराला विरोध का?

टर्मिनल १वरील २६५ साप्ताहिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विमान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने विरोध केला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने विमान कंपन्यांशी योग्य चर्चा न करता हा ‘सक्तीचा स्थलांतर’ निर्णय घेतल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने केला आहे. विमान कंपन्यांचे हिवाळी वेळापत्रक आधीच ठरलेले व अंतिम झाले आहे. ऐनवेळी उड्डाणे बदलणे अशक्य असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. नवी मुंबई विमानतळावर लांब पल्ल्याच्या विमानांसाठी आवश्यक केटरिंग सुविधा, देखभाल प्रमाणपत्रे आणि इतर पुरेशा ऑपरेशनल तयारीची कमतरता असल्याचे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे म्हणणे आहे.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची मध्यस्थी कशी?

विमान कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावर विमान सेवा स्थलांतरित करण्यास नाराजी दर्शविल्याने काही दिवसांपूर्वी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, विमानतळ चालक आणि विमान कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्या आणि विमानतळ चालकांना २० ऑक्टोबर पर्यंत विमान वाहतूकीसंदर्भात योजना सादर करण्यास सांगितले. त्यामुळे तुर्तास तरी विमानांचे नवी मुंबई विमानतळाकडील स्थलांतर लांबणीवर पडले आहे.

मंत्रालयाचे काय म्हणणे आहे?

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमानांचे स्थलांतर काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुंबई विमानतळावरून ५० लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नवी मुंबईत स्थलांतरित करण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासह पुढील सल्लामसलत बैठक १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर अंतिम योजनेवर चर्चा करण्यासाठी २० तारखेपर्यंत आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत विमानांचे स्थलांतर नवी मुंबई विमानतळाकडे होणार की लांबणीवर पडणार याबाबतचा अंतिम निर्णय होईल.

नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हीटीवर भर

नवी मुंबई विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतूक आणि वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येत आहे. एसटीची ई-शिवाई इलेक्ट्रिक बसही ७ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.‘चलो बसच्या दररोज २१ फेऱ्या विमानतळाला अंधेरी पूर्व-मरोळ, वांद्रे, दादर आणि कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरशी जोडणार आहेत. एनएमएमटीकडून ए-१ ते ए-७ अशा सात समर्पित विमानतळ बसमार्गांद्वारे खारकोपर, तरघर, बेलापूर, नेरुळ, पनवेल, खांदेश्वर आणि एअरपोर्ट प्रोजेक्ट ऑफिसशी जोडली आहे. उबर गो, उबर प्रीमियर आणि उबर ऑटोची सेवा उपलब्ध होणार आहे. याशिवाय प्रीपेड टॅक्सी, प्रीपेड रिक्षा आणि कार रेंटलची सुविधाही असेल. भारत टॅक्सीची सेवा १०ऑक्टोबरपासून ४० वाहनांच्या ताफ्यासह सुरू होणार आहे.

नवी मुंबईत वाहतूक कोंडीची संभाव्य समस्या कितपत मोठी?

विमान स्थलांतर झाल्यास नवी मुंबईतील रस्त्यांवर दररोज सुमारे ५० ते ५३ हजार वाहनांची (छोट्या) अतिरिक्त भर पडण्याचा अंदाज आहे. विमानतळावरील वाहतूक केवळ विमानतळाच्या आजूबाजूच्या रस्त्यांपुरती मर्यादित राहणार नाही. विमानतळाकडे ये-जा करणारी वाहने शहरातील आधीपासूनच असलेल्या प्रवासी वाहतुकीत समाविष्ट झाल्याने महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात उरण फाटा, गव्हाण फाटा,कळंबोलीचा समावेश आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून आणि इतर मार्गांनी विमानतळाकडे येणाऱ्या वाहनांसाठी पळस्पे फाटा देखील महत्त्वाचा ठरणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही परिणाम जाणवू शकतो. या रस्त्यावरून ऐरोली, राबळे, घणसोली, महापे, कोपरखैराणे, तुर्भे आणि बेलापूरमार्गे आधीच मोठी प्रवासी आणि औद्योगिक वाहतूक होते.

surekh.chopade@expressindia.com