अदानी समूहाच्या मालकीच्या मुंबई सांताक्रूझ विमानतळ टर्मिनल १ च्या पाडकामाला पुढील वर्षी १५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या विमानतळावरून उड्डणारी अनेक देशांतर्गत विमाने ही नवी मुंबई विमानतळावरून हळूहळू स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यामुळे जानेवारीपासून मुंबईकरांना देशांतर्गत विमान प्रवासासाठी नवी मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. तसेच टर्मिनल २ वरूनही प्रवाशांना काही मार्गावरील विमानांची सेवा उपलब्ध असणार आहे.

टर्मिनस १ चे पाडकाम का?

टर्मिनस १  हे ८०  वर्ष जुने विमानतळ आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १चे  बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल ऑक्टोबर २०२५मध्ये पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने दिले होते, तर सप्टेंबर २०२८पर्यंत या टर्मिनलची पुनर्बाधणी केली जाणार होती. आयआयटी मुंबईमार्फत टर्मिनल १चे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. यावेळी टर्मिनलच्या बांधकामाला काही ठिकाणी तडे गेल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी गळती व गंज दिसून आला. सुरक्षेच्या कारणास्तव हे टर्मिनल बंद करून पाडकाम केले जाणार आहे. सध्या या टर्मिनलमधून १ कोटी ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नव्याने उभारण्यात येणाऱ्या टर्मिनलमध्ये २ कोटी प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल.

नवी मुंबई विमानतळाचा वापर कसा वाढणार?

मुंबई विमातनळावरून होणारी एक तृतीयांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे १ ऑक्टोबरपासून नवी मुंबई विमानतळाकडे हलवली जाणार आहे. यानंतर, २५  ऑक्टोबरपासून टी १मधील एक तृतीयांश उड्डाणे टी २मध्ये हलवली जाणार आहेत. तर टर्मिनल १ बी च्या उत्तर भागाच्या पाडकामाला १५ जानेवारी २०२७ पासून सुरुवात होणार आहे. अकासा एअरने १  ऑगस्टपासून आपली देशांतर्गत विमानसेवा टी १ वरून टी २वर स्थलांतरित केली आहे. तर मुंबई विमानतळ प्राधिकरणाची काही उड्डाणे टी २ वरून नवी मुंबई विमानतळावर आणि टी १वरून टी  २वर स्थलांतरित करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. विमान कंपन्यांना सुमारे साडेतीन महिने या स्थित्यंतरासाठी मदत केल्यानंतर पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळे अदानी समूहाच्या मालकीची आहेत.

पुढील टप्पा काय असेल?

नवी मुंबई विमानतळ हे टप्याटप्याने बांधले जात आहे. पहिल्या टप्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना सेवा दिली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्यात क्षमता वाढवून ५० दशलक्षांपर्यत नेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यानंतर मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ पुर्णपणे बंद केले जाणार आहे. त्या ठिकाणी पुनर्विकासाला सुरुवात होईल. त्याच जागेवर टर्मिनल १ नव्याने उभारले जाणार आहे. पुर्नविकासानंतर टर्मिनल १ची क्षमता ४२ टक्यांनी वाढणार आहे. टर्मिनल १ सुमारे तीन वर्ष बंद राहणार आहे. नूतनीकरणानंतर नवीन टर्मिनलची प्रवासी क्षमता वाढवली जाणार असून याद्वारे अधिक प्रवाशांना सुविधा मिळणे अपेक्षित आहे. नवीन टर्मिनल १ची रचना, किंमत आणि अंतिम क्षमता यासंबंधीची माहिती समोर आलेली नाही. अदानी समूहाने प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी टर्मिनल २ आणि नवीन टर्मिनल १ ला जोडणारा भूमिगत बोगदा बांधण्याचीही योजना आखली आहे.

टर्मिनल १चा इतिहास काय आहे?

जुन्या मुंबई विमानतळाचे टी १ ए, टी १ बी आणि टी १ सी असे तीन भाग आहेत. यापैकी टी-१ ए या इमारतीचा वापर २००५पर्यंत भारतीय विमान कंपन्यांकडून केला जात होता. त्यानंतर किंगफिशर विमान कंपनीकडूनही याचा वापर सुरू झाला. किंगफिशरची विमानसेवा बंद झाल्यानंतर ही इमारत गो एअर कंपनीला देण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी गो एअर आणि एअर इंडिया या कंपन्यांचे कामकाज टी १ बी आणि टी २  येथून सुरू करण्यात आले. त्यामुळे टी १ ए ही इमारत प्रवाशांसाठी बंद करण्यात आली. २०१७पासून टी १ बी हीच इमारत टी १ म्हणून ओळखली जाते. टी १ ए इमारतीच्या पाडकामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. टी १ ए इमारतीसोबतच येथील उन्नत मार्ग, तात्पुरते छत, इत्यादी बांधकामेही पाडली जाणार आहेत. सहार विमानतळाच्या पाडकामाचा अनुभव असलेल्या कंपनीलाच टी १ ए च्या पाडकामाचे काम दिले आहे.

surekha.chopade@expressindia.com