मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा येथे टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. या टोल वसुलीला कोकणवासियांकडून व्यापक विरोध सुरू झाला आहे. विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी पक्षांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सार्वत्रिक नाराजीमागील कारणे, मागण्या काय याचा थोडक्यात आढावा….

टोल वसुली कुठे?

मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा येथे महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुली सुरू केली आहे. या मार्गावर प्रवास करतांना हलक्या वाहनांसाठी एक वेळच्या प्रवासासाठी ९५ रुपये टोल आकारला जाणार आहे. पळस्पे ते कासू या पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी हा ९५ रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. तर कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासासाठीही लवकरच टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. यासाठी सुकेळी खिंड ओलांडल्यावर खांब परिसरात टोलनाका उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते झाराप दरम्यान एकूण आठ टोल नाके उभारण्यात आले आहेत.

टोल वसुलीला विरोध का?

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या कामाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. तर इंदापूर ते झाराप या दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम २०१४ मध्ये सुरू झाले होते २ वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२६ चा मे महिना संपत आला तरी महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या पंधरा वर्षाच्या काळात कोकणवासीयांना रस्त्याचा रखडपट्टीमुळे अतोनात हाल सहन करावे लागले, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात झाले. रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. ३१ मे पर्यंत उर्वरित कामे पूर्ण होतील अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असली तरी कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू झाल्याने आणि ९५ रुपयांचा टोल आकारला जात असल्याने नाराजी आहे.

महामार्गाच्या कामाची सद्यःस्थिती काय?

पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र नागोठणे, कोलाड येथील पुलांची कामे अजूनही अपूर्णावस्थेत आहे. वडखळ येथील सर्व्हिस रोडची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडलेली आहे. चिपळूण, संगमेश्वर येथील पुलांची कामे अपूर्ण आहेत. परशुराम घाटात दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. आरवली ते कांटे या दरम्यान काही कामे अजूनही बाकी आहेत. पाली, हातखंबा, निवळी येथील कामेही अद्यापही पूर्णपणे मार्गी लागलेली नाहीत. ही कामे ३१ मे पूर्वी पूर्णत्वास जाणे अशक्य आहे.

महामार्गावर किती अपघात झाले?

महामार्गावर गेल्या १४ वर्षांत ५ हजार ५८ अपघात झाले. या अपघातात १ हजार २५९  हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा अशी मागणी  केली जात आहे. खारपाडा सुरू केलेली टोल वसुली तातडीने बंद करावी, काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू करू नये आणि महामार्गावर स्थानिक वाहनांना टोल वसुलीतून सूट द्यावी अशी मागणीही केली जात आहे.

राजकीय पक्षांची भूमिका काय?

स्थानिकांमध्ये या टोल वसुलीबाबत नाराजी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी टोल वसुली विरोधात आवाज टाकण्यास सुरुवात केली आहे. जनआक्रोश समितीने टोल वसुलीला हरकत घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाने खारपाडा टोलनाका येथे आंदोलन करून टोल वसुलीला विरोध दर्शविला. मनसेनेही आंदोलनात सहभागी होऊन टोलला कडाडून विरोध केला. शेतकरी कामगार पक्षानेही टोल वसुली बाबत नाराजी व्यक्त केली. कामे अपूर्ण असताना टोल वसुलीची घाई कशाला असा सवाल शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी पक्षही टोल वसुली विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांनी टोल वसुलीला विरोध दर्शविला आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जोवर महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होत नाहीत तोवर टोल वसुली करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. मंत्री उदय सामंत यांनी सावध पावित्रा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. टोल बाबत स्थानिकांची नाराजी असेल तर त्यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यावर दाद मागता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सत्ताधारी भाजपने या टोल वसुलीवर भाष्य करणे टाळले आहे.      

harshad.kashalkar@expressindia.com