किती ठिकाणी ‘टोल’?

मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा येथे महामार्ग प्राधिकरणाने टोलवसुली सुरू केली आहे. या मार्गावर प्रवास करताना हलक्या वाहनांसाठी एक वेळच्या प्रवासासाठी ९५ रुपये टोल आकारला जाणार आहे. पळस्पे ते कासू या पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी हा ९५ रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. तर कासू ते इंदापूर या दुसर्‍या टप्प्यातील प्रवासासाठीही लवकरच टोलवसुलीला सुरुवात होणार आहे. यासाठी सुकेळी खिंड ओलांडल्यावर खांब परिसरात टोल नाका उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते झारापदरम्यान एकूण आठ टोल नाके उभारण्यात आले आहेत.

टोलवसुलीला विरोध का?

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या कामाला १५ वर्षांपूर्वी (२०११ मध्ये) सुरुवात झाली होती. तर इंदापूर ते झाराप या दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम २०१४ मध्ये सुरू झाले होते. हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२६ चा मे महिना संपत आला तरी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या १५ वर्षांत रस्त्याच्या रखडपट्टीमुळे कोकणवासीयांना अतोनात हाल सहन करावे लागले, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात झाले. ‘उर्वरित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील,’ अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री

नितीन गडकरी यांनी दिली असली तरी कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोलवसुली- तीही ९५ रुपये- सुरू झाल्याने नाराजी आहे.

महामार्गाच्या कामाची सद्य:स्थिती काय?

पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र नागोठणे, कोलाड येथील पुलांची कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. वडखळ येथील सेवारस्त्याची (स्व्हिहस रोड) कामेही पूर्ण झालेली नाहीत. इंदापूर व माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली आहेत. चिपळूण, संगमेश्वर येथील पुलांची कामे अपूर्ण आहेत. परशुराम घाटात दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. आरवली ते कांटे यादरम्यान काही कामे अजूनही बाकी आहेत. पाली, हातखंबा, निवळी येथील कामेही अद्याप मार्गी लागलेली नाहीत. ही कामे ३१ मेपूर्वी पूर्णत्वास जाणे अशक्य आहे.

बाराशे बळी कशामुळे?

महामार्गावर गेल्या १४ वर्षांत पाच हजार ५८ अपघात झाले. या अपघातांत १,२५९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे ‘आणखी बळी घेऊन टोल वसूल करणार का? त्यापेक्षा रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा’ अशी मागणी केली जात आहे.

राजकीय पक्षांची भूमिका काय?

स्थानिकांमध्ये या टोलवसुलीबाबत नाराजी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी टोलवसुलीविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. जनआक्रोश समितीने टोलवसुलीला हरकत घेतली आहे. महामार्गावर स्थानिक वाहनांना टोलवसुलीतून सूट द्यावी अशी मागणीही केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने खारपाडा टोल नाका येथे आंदोलन करून टोलवसुलीला विरोध दर्शविला. मनसेनेही आंदोलनात सहभागी होऊन टोलला कडाडून विरोध केला. शेतकरी कामगार पक्षानेही टोलवसुलीबाबत नाराजी व्यक्त केली.

कामे अपूर्ण असताना टोलवसुलीची घाई कशाला, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी पक्षही टोलवसुलीविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांनी टोलवसुलीला विरोध दर्शविला आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जोवर महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होत नाहीत तोवर टोलवसुली करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंत्री उदय सामंत यांनी सावध पावित्रा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. टोलबाबत स्थानिकांची नाराजी असेल तर त्या संदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यावर दाद मागता येईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सत्ताधारी भाजपने या टोलवसुलीवर भाष्य करणे टाळले आहे.