तब्बल पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे मार्गी लावण्याचा वायदा राज्य आणि केंद्र सरकारने केला आहे. पण महामार्गाची काही कामे शिल्लक असतानाच आता पथकर वसुली नाके कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. महामार्गाच्या कामाच्या सद्यःस्थितीचा थोडक्यात आढावा…

झाले काय?

मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागोठणे, कोलाड येथील पुलांची कामे सोडली तर बहुतांश महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र पुलांची उर्वरित कामे पूर्ण होण्याआधीच पथकर (टोल) नाके कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे. पथकर संकलनासाठी येत्या आठवड्याभरात अधिसूचना जारी केली जाणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच पथकर संकलनाला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पथकर वसुली कुठे होणार?

मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी पथकर संकलन केले जाणार आहे. यासाठी कर्नाळा खिंडीच्या खाली खारपाडा येथे, तर सुकेळी खिंडीच्या खाली खांब येथे टोल नाके उभारण्यात आले आहेत. टोल नाके उभारणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. टोल संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केबिन्स उभारण्यात आल्या आहेत. यंत्रसामग्री बसविण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर लागलीच पथकर संकलनाचे काम सुरू करता येणार आहे.

किती पथकर द्यावा लागणार?

पथकर नाके येत्या आठवड्याभरात कार्यान्वित केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र या टोल नाक्यांवर किती पथकर वसूल केला जाईल याविषयी स्पष्टता नाही. प्रकल्पाचा खर्च, महामार्गावरील वाहनांची दैनदिन संख्या आणि टोल वसुलीची वर्ष विचारात घेऊन ही आकारणी केली जाईल अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

इंदापूर ते झारापमधील पथकर वसुलीचे काय?

इंदापूर ते झाराप दरम्यानच्या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झाली नसली तरी बहुतांश ठिकाणी टोल नाके उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत. पोलादपूर, खेड, लोटे, निवळी, बांदा आणि कारळ येथे टोल नाके उभारण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर टोल नाके सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र स्थानिकांकडून त्यास विरोध झाला होता. यानंतर जोवर उर्वरित कामे पूर्ण होत नाहीत तोवर टोल नाके सुरू करायचे नाहीत असा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे टोल नाके सध्या तरी सुरू करण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

कामाची सद्यःस्थिती काय?

महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम २०११ साली सुरू झाले. पळस्पे ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. नागोठणे आणि कोलाड येथील पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. उर्वरित बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. इंदापूर ते झाराप या टप्प्यातील कामे ही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून केली जात आहेत. यातील रायगड जिल्ह्यात इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे सध्या रखडलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली ते कांटे या टप्प्यातील काम अपूर्ण आहे. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे अद्याप पूर्ण झालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले आहेत.

काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी नुकताच लोकसभेत या महामार्गाच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल २०२६ अखेर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली होती. विधिमंडळ अधिवेशनात प्रविण दरकेर, शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी या महामार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रस्त्याच्या उर्वरित कामांना गती देण्यात आली असून, इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे वगळता उर्वरित कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. तर गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला होता. पण इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांच्या कामात अडथळे कायम आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

harshad.kashalkar@expressindia.com