Why is Mumbai Seeing Record Rain : जून महिन्यात मुंबईकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार हजेरी लावली. गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. त्यातच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून काही नागरिकांना आपले प्राणही गमावावे लागले. सध्या मुंबईतील सखल भागात प्रचंड पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यादरम्यान देशावर अद्याप अल निनोचे संकट असतानाही मुंबईत इतका मुसळधार नेमका कशामुळे कोसळत आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
मुंबईत आठवड्याभरात किती पाऊस झाला?
एल निनो ही एक नैसर्गिक हवामान विषयक स्थिती असून त्याचा संपूर्ण जगाचे हवामान आणि पावसावर मोठा परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक उष्ण झाल्यास एल निनोची स्थिती उद्भवल्याचे मानले जाते. या हवामान प्रणालीमुळे नैऋत्य मान्सूनच्या आगमनावर परिणाम होऊन तो अनेकदा उशिरा दाखल होतो. सध्या राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत असला तरी देशावर अद्याप एल निनोचा प्रभाव कायम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यादरम्यान मागील सात दिवसांत मुंबईतील कुलाबा वेधशाळेत तब्बल ७९१ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात होणाऱ्या ७६८.५ मिमी या दीर्घकालीन मासिक सरासरीचा विक्रमही यंदाच्या पावसाने मोडीत काढला आहे. याच कालावधीत सांताक्रूझ वेधशाळेत ८७९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून तेथील जुलै महिन्याची सरासरी ९१९.९ मिमी इतकी आहे.
हवामान तज्ज्ञांनी नेमके काय सांगितले?
दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मोसमी वारे दोन आठवडे उशिराने दाखल झाले. मात्र, जूनअखेरीस मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागात अतिवृष्टीची नोंदही करण्यात आलेली आहे. मुंबईत एल निनोचा प्रभाव कायम असतानाही झालेल्या मुसळधार पावसात कोणताही विरोधाभास नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, एल निनोचा परिणाम मान्सूनच्या आगमनाच्या वेळेवर आणि त्याच्या सक्रियतेवर होत असला, तरी जागतिक तापमानवाढीमुळे पावसाच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. एकदा हवामान प्रणाली सक्रिय झाली की, पाऊस अधिक अनियमित आणि अतितीव्र स्वरूपात कोसळत आहे. मुंबईतील अलीकडील मुसळधार पाऊस हा दीर्घकालीन बदलत्या हवामानाच्या प्रवाहाचाच भाग असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. १९८१ ते २००० या कालावधीत मुंबईतील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २,३२५.८ मिमी इतके होते. मात्र, २००१ ते २०२४ या कालावधीत ही सरासरी २,६७२.७ मिमीपर्यंत वाढली असून, त्यात ३४६.९ मिमी, म्हणजेच जवळपास १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबईत इतका विक्रमी पाऊस का पडला?
हवामान तज्ज्ञांच्या मते, उबदार वातावरण आणि वेगाने तापणाऱ्या महासागरांमुळे हवेची ओलावा (बाष्प) धरून ठेवण्याची क्षमता वाढली आहे. परिणामी अत्यंत कमी कालावधीतच अनेक भागात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अशा प्रकारच्या अतिवृष्टीमुळे पाणी निचरा करणाऱ्या यंत्रणा कोलमडतात, अचानक पूरस्थिती निर्माण होते आणि शहरी पायाभूत सुविधांमधील त्रुटी उघड्या पडतात, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या स्थितीवर भाष्य करताना भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रमेश यांनी सांगितले की, एल निनोच्या वर्षांमध्ये पावसाळ्याचे दिवस कमी असतात; पण जागतिक तापमानवाढीमुळे मान्सूनचे स्वरूप कायमस्वरूपी बदलले आहे. आता एल निनो असो वा नसो, पाऊस कमी कालावधीत आणि अत्यंत तीव्र स्वरूपात कोसळण्याची शक्यता वाढली आहे, तर युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचे एमेरिटस प्राध्यापक आणि आयआयटी मुंबईचे माजी प्राध्यापक डॉ. रघू मुर्तुगुडे म्हणाले की, अनेक हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे मुंबईत इतका मुसळधार पाऊस होत आहे.
एल निनोचा हवामानावर किती प्रभाव?
“मुंबईत मान्सून उशिरा दाखल होण्यामागे काही प्रमाणात एल निनो कारणीभूत आहे. मात्र, पश्चिम आशियातील जागतिक तापमानवाढीचा प्रभाव आणि अरबी समुद्रावरील वाऱ्यांमधील बदल यांचाही त्यात मोठा वाटा आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता मान्सून प्रणालीला मिळत आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. या दोन्ही प्रणाली सक्रिय झाल्यावर मान्सूनच्या मुख्य पट्ट्यात मुसळधार पाऊस पडतो आणि त्याच आर्द्रतेचा परिणाम मुंबईवरही होतो. पश्चिम घाटामुळे आर्द्रतेने भरलेली हवा वरच्या दिशेने ढकलली जाते आणि त्यामुळे मुंबईत अतिवृष्टी होते,” असे डॉ. रघू मुर्तुगुडे यांनी स्पष्ट केले. हवामानतज्ज्ञांच्या मते, आता एल निनो या हवामान घटनेकडे जागतिक तापमानवाढीपासून वेगळे पाहता येणार नाही. या दोन्ही घटकांचा परस्पर परिणाम मान्सूनच्या स्वरूपावर आणि पावसाच्या पद्धतीवर अधिकाधिक प्रभाव टाकत असून, त्याचे वर्तन समजून घेण्यासाठी एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.
मुंबईत पावसाचा जोर ओसरणार का?
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत ९४ मिमी, तर कुलाबा वेधशाळेत ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांत दोन्ही वेधशाळांमध्ये पावसाची नोंद शंभर मिमीच्या खाली राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, याच कालावधीत पश्चिम उपनगरांमध्ये ७८ मिमी, पूर्व उपनगरांमध्ये ७७ मिमी, तर दक्षिण मुंबई (आयलंड सिटी) परिसरात ४६ मिमी पाऊस झाला आहे. सध्यातरी मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबईसाठी यलो अलर्ट कायम ठेवला असला, तरी पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार मुंबई आणि शेजारच्या ठाणे जिल्ह्यात आगामी आठवडाभर केवळ हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मुसळधार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. तरीदेखील मुंबईकरांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
