हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ हा सध्याच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामातील ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. या हंगामात मुंबईची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही आणि त्याचा फटका संघाला बसला. सर्वच विभागांत चमक दाखवण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईच्या निराशाजनक कामगिरीची प्रमुख कारणे कोणती, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघ कामगिरी का उंचावू शकला नाही. याचा आढावा.

मुंबईचे आव्हान संपुष्टात कसे?

सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या आक्रमक खेळीनंतर सनराजर्स हैदराबाद संघाने लखनऊ सुपर जायंट्सवर १०.२ षटकांत दहा गडी राखून विजय मिळवला. या कामगिरीनंतर हैदराबाद संघ १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. कोलकाता नाइट रायडर्स व राजस्थान रॉयल्स हे संघ १६ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. लखनऊ आणि दिल्ली कॅपिटल्स संघ १४ मे रोजी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. कोणताही एक संघ हा सामन्यात जिंकल्यास त्यांचे १४ गुण होतील. सामना न झाल्यास त्यांना एक-एक गुण विभागून देण्यात येईल. त्यामुळे ते १३ गुणांपर्यंत जाऊ शकतात. मुंबईचे ‘आयपीएल’मधील दोन सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे १२ गुण होतील. ही कामगिरी करून देखील ते ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवण्यासाठीच्या अव्वल चार संघांतून बाहेरच राहतील. या कामगिरीनंतर सहावे जेतेपद मिळवण्यासाठी मुंबईची प्रतीक्षा लांबली आहे. मुंबईने २०१९ व २०२०मध्ये चौथे आणि पाचवे जेतेपद मिळवले होते. यानंतर खेळलेल्या चार हंगामात संघाला केवळ एकदाच ‘प्ले-ऑप’ पर्यंत मजल मारता आली आहे. गेल्या वर्षी मुंबईला ‘क्वॉलीफायर-२’ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावे लागले होते.

हेही वाचा… विश्लेषण: अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा शोर्मा भारतात कुठून आला?

गोंधळलेला हार्दिक…

हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पंड्याला मुंबईने आपल्या चमूत सहभागी करून घेत तोच संघाचे नेतृत्व करेल, याची घोषणा केली. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. हंगाम सुरू झाल्यानंतर मुंबईतील चाहत्यांकडून हार्दिकवर शेरेबाजीही करण्यात आली. कर्णधारपदापासून सुरू झालेल्या वादापासून पंड्या स्थिरावला नाही. तो कुठल्या तरी दडपणाखाली खेळताना दिसला. त्यामुळे त्याचा परिणाम हार्दिकच्या कामगिरीवर पहायला मिळाला. मुंबई इंडियन्स हंगामाच्या सुरुवातीपासूनच अडखळत खेळताना दिसला. मुळात हार्दिकच दबावाखाली असल्यामुळे तो संघाला स्थिर ठेवू शकला नाही. फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले बदल बघता हार्दिकच्या त्रस्त मानसिकतेची कल्पना येते. हार्दिकने सध्याच्या हंगामातील ११ सामन्यांत १९८ धावा केल्या तर, ११ गडी बाद केले. त्यामुळे आगामी हंगामात हार्दिककडेच नेतृत्व राहील का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. मुंबईला हंगामाच्या सुरुवातीलाच तीन सामन्यांत पराभूत व्हावे लागले. यानंतर त्यांनी पुढील चारपैकी तीन सामने जिंकले. मात्र, त्यानंतर सलग चार सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने संघाच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्याच्या शक्यता कमी झाल्या होत्या.

प्रभावहीन गोलंदाजी…

सध्याच्या ‘आयपीएल’मध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराने १२ सामन्यांत १८ बळी मिळवले आणि तो हंगामातील सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. तरीही, मुंबईच्या गोलंदाजीत म्हणावी तशी धार दिसली नाही. संघ सर्वस्वी बुमरावर अवलंबून असलेला पहायला मिळाला व त्याचाच फटका संघाला बसला. बुमरा वगळल्यास दुसरा कोणताही गोलंदाज हा सुरुवातीच्या १५ गोलंदाजांमध्ये नाही. संघातील गेराल्ड कोएट्झी (१३ बळी), हार्दिक पंड्या (११ बळी) यांनाच केवळ दहाहून अधिक बळी मिळवण्यात यश आले. यानंतर पियूष चावलाने ८ गडी बाद केले. अनुभवाच्या बाबतीत संघाकडे बुमरा वगळता कोणताच गोलंदाज नव्हता. चावला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. तसेच, मोहम्मद नबीचीही साथही चावलाला मिळाली नाही. त्यातच नुवान तुषाराला संधी दिली. मात्र, त्याला उशीर झाला. बुमराच एकमेव भरवशाचा गोलंदाज असल्याने त्याला उशिरा गोलंदाजी देण्यात आली व त्याचा फटका संघाला बसला.

हेही वाचा… आणीबाणी, बॉम्बस्फोट आणि तुरुंगातून लढवलेली निवडणूक; जॉर्ज फर्नांडिस कसे जिंकले?

रोहित शर्माचा खराब फॉर्म…

रोहितवर या हंगामात कर्णधारपदाचे दडपण नव्हते. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्यानेही निराशा केली. या हंगामात रोहितने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद १०५ धावांची खेळी केली. त्याआधी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध ३८, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४९ धावा केल्या. मग, त्यान पंजाब किंग्सविरुद्ध ३६ धावांचे योगदान दिले. यानंतच्या पाच सामन्यांत त्याने छाप पाडता आली नाही. त्याच्या खराब लयीमुळे संघाला चांगली सुरुवातही मिळत नव्हती. परिणामी संघाच्या निकालावर त्याचा परिणाम पहायला मिळाला. त्याने १२ सामन्यांत ३३० धावा केल्या. पुढील महिन्यात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोहित संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये रोहितचा प्रयत्न चांगली कामगिरी करून लयीत येण्याचा राहील.

इतर फलंदाजही ढेपाळले…

मुंबईच्या अन्य फलंदाजांनाही या हंगामात पुरेशे योगदान देता आलेले नाही. १२ सामन्यांनंतरही कोणत्याही फलंदाजाला ४०० धावांचा टप्पा पार करण्यात अपयश आले. मुंबईकडून तिलक वर्माने ४२.६६ च्या सरासरीने सर्वाधिक ३८४ धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान तीन अर्धशतक झळकावले. दुखापतीतून सावरल्यानंतर मुंबईच्या चमूत उशीरा सहभागी झालेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या शैलीनुसार संघासाठी धावा केल्या. त्याने ९ सामन्यांत ३३४ धावा केल्या. त्यामध्ये एक शतक व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आपले शतक गेल्याच सामन्यात हैदराबादविरुद्ध झळकावले. इशान किशनने १२ सामन्यांत २६६ धावांची खेळी केली. मात्र, त्याला आपली कामगिरी उंचावता आली नाही. रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी व टीम डेव्हिड यांनाही चमक दाखवली नाही. त्यातच नेहल वधेरा व नमन धीर या युवा फलंदाजांनाही छाप पाडता आली नाही.

हेही वाचा… नोंदणी केलेली नसल्यास विवाह अवैध ठरतो का?

पुढे काय?

हार्दिककडून रोहितकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जावी, अशी मागणी मोठ्या संख्येने चाहते आणि काही माजी खेळाडूही करत आहेत. याची शक्यता कमी आहे. कारण इतक्या मोठ्या जबाबदारीसाठी हार्दिकला गुजरातहून मुंबईत आणले गेले, त्यामुळे केवळ एका हंगामातील कामगिरीवरून त्याची उचलबांगडी होण्याची शक्यता नाही. पण हार्दिकला लवकरच आपण अष्टपैलू म्हणून खेळावे, की निव्वळ फलंदाज म्हणून संघात असावे याविषयी निर्णय घ्यावा लागेल. हे होत नाही तोवर संघाचा समतोल बिघडणार हे नक्की. कारण तंदुरुस्ती नाही आणि धारही नाही या स्थितीत हार्दिकची गोलंदाजी हा कच्चा दुवा ठरतो. वेग वाढवला की पाठदुखी बळावते. वेग कमी केला, की स्विंग आणि वैविध्य कमी असल्यामुळे गोलंदाजी महागडी ठरते. त्याऐवजी निव्वळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे त्याच्या आणि तो खेळत असलेल्या संघाच्या फायद्याचे ठरू शकते.