इंडियन प्रीमियर लीगचे पाच विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून सध्या सुरू असलेल्या हंगामात मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, हंगामाच्या मध्यावर येईपर्यंत संघाची कामगिरी निराशाजनकच झालेली दिसते. काही सामन्यांतील दमदार विजयांनी आशा निर्माण केली असली, तरी मोठे पराभव आणि सातत्याचा अभाव यामुळे संघाची ‘प्लेऑफ’कडे वाटचाल कठीण बनली आहे. मुंबईच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा.
सलामीच्या जोडीचा तिढा कायम
मुंबईच्या संघाने सलामीला अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र, कोणत्याही जोडीला स्थैर्य लाभले नाही. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईने रायन रिकल्टन (८१) व रोहित शर्मा (७८) या जोडीला संधी दिली. संघाने मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हीच जोडी सलामीला उतरली. मात्र, संघाला फारसे यश मिळाले नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धही ही जोडी अपयशी ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध संघाने याच जोडीवर विश्वास दाखवला. मात्र, रोहितला दुखापत झाल्याने तो फलंदाजी मध्येच सोडून माघारी परतला. रोहित जायबंदी झाल्याने पुढील पंजाबविरुद्धच्या लढतीत रिकल्टनसह क्विन्टन डिकॉक मैदानात उतरला. डिकॉकने या लढतीत शतक झळकावले. पण, संघाचा पराभव त्याला टाळता आला नाही. गुजरात टायटन्सविरुद्ध डिकॉकसह युवा दानिश मालेवारला संधी देण्यात आली. हा प्रयोगही अपयशी ठरला. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही हीच जोडी मैदानात उतरली. मात्र, ते लवकर बाद झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवायचे झाल्यास सलामीचा तिढा लवकरच सोडवावा लागेल. रोहित लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन मैदानात उतरेल, अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाला असेल.
मधल्या फळीत सातत्याचा अभाव
मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीत भारताचा ट्वेन्टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक वर्मासारखे विश्वचषक विजेते खेळाडू असतानाही त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. तिलकची गुजरात टायटन्सविरुद्धची १०१ धावांची नाबाद खेळी वगळता त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. उर्वरित सामन्यांमध्ये तिलकची कामगिरी २०, ०, १४, १, ८ आणि ३७ अशी राहिली आहे. त्याने आतापर्यंत सात सामन्यांत १८१ धावा केल्या आहेत. तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मुंबईकडून सर्वाधिक निराशा सूर्यकुमारने केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची ५१ धावांची खेळी वगळता त्याला योगदान देता आले नाही. आतापर्यंत त्याने १६, ६, ३३, ०, १५ आणी ३५ धावा केल्या आहे. तसेच, तो नेहमी चुकीचा फटका खेळून बाद झालेला आहे. हार्दिक पंड्यालाही सूर गवसलेला नाही. त्याचे फलंदाजीतील योगदान १८, ९, ४०, १४, १५ आणि १ असे आहे. तर, गोलंदाजीत त्याला केवळ तीनच बळी मिळवता आले आहेत. शेर्फेन रुदरफोर्डलाही बंगळूरुविरुद्धची नाबाद ७१ धावांची खेळी वगळता फारशी चमक दाखवता आलेला नाही. मुंबईला यश मिळवायचे झाल्यास या खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे.
गोलंदाजांचे अपयश
मुंबईच्या निराशाजनक कामगिरीचे प्रमुख कारण म्हणजे जसप्रीत बुमराने बळी न मिळवणे हे आहे. ‘पॉवरप्ले’मध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्याचे कसब हे बुमराकडे आहे. मात्र, या हंगामात त्याने निराशा केली. त्याला धावा रोखण्यात यश मिळत असले तरीही, त्याला गडी बाद करता येत नव्हते. सुरुवातीच्या पाच सामन्यांमध्ये त्याला एकही बळी मिळवता आला नाही. गुजरातविरुद्ध त्याने हंगामातील पहिल्या फलंदाजाला बाद केले. आतापर्यंत त्याला केवळ दोनच गडी बाद करता आले आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ दबावाखाली दिसत आहे. यासह दुसऱ्या बाजूने बुमराला म्हणावी तशी साथ मिळत नाही. दीपक चाहर व ट्रेंट बोल्ट यांना आतापर्यंत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. हार्दिकला गोलंदाजीत योगदान देता आलेले नाही. युवा अश्वनी कुमारने गुजरातविरुद्ध हंगामात पहिला सामना खेळताना चार गडी व चेन्नईविरुद्ध दोन गडी बाद केले. घझनफारने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांत आठ बळी मिळवले. मिचेल सँटनरनेही पाच गडी बाद करीत त्याला साथ दिली. मात्र, कामगिरीत सातत्य राखण्यात गोलंदाजांना अपयश येत आहे. शार्दूल ठाकूरनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही. त्यामुळे मुंबईला यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.
हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
रोहित शर्माकडून मुंबईचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे गेल्यानंतर त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या हंगामात मुंबईने ‘प्लेऑफ’मध्ये मजल मारली होती. यंदा मुंबईला सातपैकी केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला आहे. हार्दिकची वैयक्तिक कामगिरी पाहता तो संघासाठी योगदान देण्यातही अपयशी ठरला. तसेच, मैदानावरील त्याच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुंबईच्या संघाने हंगामात मिळवलेले विजय हे केवळ काही खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीमुळे शक्य झाले आहेत. त्यातच सात सामन्यांत अंतिम अकरामध्ये करण्यात आलेले बदलही संघाच्या पथ्यावर पडले नाही. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वगुणांवर टीका होत आहे. मुंबईने उर्वरित सामन्यांमध्ये कामगिरी न उंचावल्यास हार्दिकला त्याचा फटका बसू शकतो.
‘प्लेऑफ’ पात्रता अजूनही शक्य?
मुंबईने कोलकाताविरुद्ध पहिला सामना जिंकत २०१२ नंतर प्रथमच हंगामातील सुरुवातीची लढत जिंकण्याची कामगिरी केली होती. यानंतर सलग चार सामने संघाला गमवावे लागले. मग, गुजरातविरुद्ध मुंबईने ९९ धावांनी मोठा विजय नोंदवला. मात्र, चेन्नईकडून त्यांना १०३ धावांनी पराभूत व्हावे लागले. आता संघाचे सात सामन्यांत चार गुण आहेत. मुंबईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. त्यांना अजून सात सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मुंबईला कमीत कमी सहा सामने जिंकावेच लागणार आहेत. तसे झाल्यास ते १६ गुणांसह ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचतील. तसेच, १४ गुणांसह देखील ते ‘प्लेऑफ’मध्ये स्थान मिळवू शकतात. त्यासाठी मुंबईला निव्वळ धावगती चांगली ठेवावी लागेल. सध्या मुंबईची निव्वळ धावगती -०.७३६ आहे. मुंबईला ही परिस्थिती नवीन नाही. २०१५ मध्ये मुंबईची सात सामन्यांत जवळपास अशीच स्थिती होती. मग, पुढील सात पैकी सहा सामने जिंकत संघाने ‘प्लेऑफ’मध्ये स्थान मिळवले आणि जेतेपद पटकावले. गेल्या हंगामातही संघाचे सात सामन्यांत सहा गुण होते. तरीही मुंबईचा संघ ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचला होता.
