गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या कित्येक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे समोर येत आहे. त्यात मे महिन्याच्या या भीषण उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे मुंबईकरांच्या डोक्याचे तापमान आणि तक्रारींच्या नोंदी वाढत चालल्या आहेत. मात्र, या वीजपुरवठ्याच्या समस्येदरम्यान मुंबईतल्या काही भागांना इतर भागांपेक्षा लवकर वीजपुरवठा कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे का ?
याचे उत्तर मुंबईच्या खास ‘आयलँडिंग सिस्टीम’ (Islanding System) मध्ये दडले आहे. चला जाणून घेऊया ही सिस्टीम नक्की काय आहे आणि ती मुंबईला अंधारात जाण्यापासून कशी वाचवते!
मुंबईतील पहिली आयलॅंडिंग सिस्टीम कोणती?
मुंबईची आयलँडिंग सिस्टीम ही १९८१ मध्ये ‘टाटा पॉवर’ने (Tata Power) विकसित केली होती. त्यावेळी ही देशातील पहिली आणि जगातील मोजक्या अत्याधुनिक सिस्टीमपैकी एक होती. तेव्हापासून आजवर या सिस्टीमने मुंबईला अनेक मोठ्या संकटांतून वाचवले आहे.
आयलँडिंग सिस्टीमने मुंबईला कसे वाचवले?
जुलै २०१२ मधील ‘नॉर्दर्न ग्रीड फेल्युअर’ ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी वीज खंडित होण्याची (ब्लॅकआउट) घटना घडली, ज्याचा फटका भारतातील २२ राज्यांमधील सुमारे ६२ कोटी लोकांना बसला होता. ३० आणि ३१ जुलै २०१२ रोजी लागोपाठ दोन दिवस कमकुवत आंतर-प्रादेशिक ट्रान्समिशन लाईन्सवर पडलेला अतिरिक्त भार आणि राज्यांकडून मर्यादेपेक्षा जास्त वीज खेचली गेल्यामुळे उत्तर, पूर्व आणि ईशान्येकडील वीज ग्रीड्स एकामागून एक कोलमडल्या. या महा-ब्लॅकआउटमुळे देशातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली, कोळसा खाणींमध्ये शेकडो मजूर अडकले, रुग्णालये आणि पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आणि संपूर्ण पायाभूत सुविधा ठप्प पडल्या; ज्यामुळे शेवटी भारताला आपल्या ऊर्जा क्षेत्रात कठोर ग्रीड शिस्त, प्रगत आयलँडिंग प्रणाली आणि स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान लागू करावे लागले.
मग सध्या वीज का जातेय?
आयलँडिंग सिस्टीम ही प्रामुख्याने ‘बाहेरून’ येणाऱ्या मोठ्या संकटापासून म्हणजेच ग्रीड फेल्युअरपासून (Grid Failure) शहराचा बचाव करते. मात्र, सध्या मुंबईत जे वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत, त्याला स्थानिक ओव्हरलोड (Local Overload) कारणीभूत आहे. मुळात मुंबईची स्वतःची वीज निर्मिती क्षमता सुमारे १८०० ते २००० मेगावॉट इतकीच आहे; परंतु मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे एसी (AC) आणि कुलर्सचा वापर प्रचंड वाढला असून, परिणामी मुंबईची विजेची मागणी ४००० मेगावॉटच्याही पुढे गेली आहे. अशा वेळी जेव्हा एखाद्या विशिष्ट भागातील ट्रान्सफॉर्मर किंवा केबलवर प्रमाणापेक्षा जास्त ताण (लोड) येतो, तेव्हा सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिथली वीज आपोआप ‘ट्रिप’ होते म्हणजेच बंद पडते. थोडक्यात सांगायचे तर सध्याची वीजकपात हे कोणतेही मोठे सिस्टीम फेल्युअर नसून, केवळ विजेच्या वाढलेल्या प्रचंड मागणीमुळे होणारे ‘लोकल बिघाड’ आहेत.
आयलॅंडिंग सिस्टीम काय आहे जाणून घेण्यापूर्वी, मुंबईतील वीजपुरवठ्याची प्रक्रिया कशी घडते हे समजून घेऊया:
मुंबईत वीज कशी येते?
मुंबई ही सर्वाधिक वीज वापरणाऱ्या शहरांपैकी एक असली तरी मुंबईत उपलब्ध होणारी वीज संपूर्णपणे मुंबईत निर्माण केली जात नाही, ती मुख्य दोन स्रोतांकडून निर्माण होते:
- मुंबईचे स्थानिक प्लांट्स: मुंबईच्या आत आणि जवळ असणारे वीज प्रकल्प (जसे की ट्रॉम्बेमधील टाटा पॉवर आणि डहाणूतील अदानी पॉवर) मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर वीज तयार करतात.
- बाहेरून पुरवली जाणारी वीज: मे महिन्याच्या या कडक उन्हाळ्यात मुंबईत विजेची मागणी खूप वाढते. ही वाढीव गरज पूर्ण करण्यासाठी मुंबईबाहेरून, म्हणजेच राष्ट्रीय ग्रिडमधून (National Grid) मोठ्या वाहिन्यांद्वारे वीज आणली जाते.
आपल्या घरापर्यंत वीज कोण पुरवतं?
आपल्या घरापर्यंत पोहोचणारी वीज ही विविध संस्थानांकडून पुरवली जाते:
- BEST: दक्षिण मुंबई (कुलाबा ते माहीम/शीव) भागात वीज पुरवते.
- अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर: मुंबईच्या उपनगरांमध्ये (Suburbs) वीज पुरवतात.
- महावितरण (MSEDCL): भांडुप, मुलुंड आणि ठाण्यापुढील भागात वीज पुरवते.

तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का, अनेकदा इतर भागांपेक्षा काही भागांमध्ये वीज लवकर येते?
आयलॅंडिंग सिस्टीम:
आयलॅंडिंग सिस्टीमची संकल्पना आपल्या लहानपणीच्या खेळातून समजू शकतो:
आपण लहान असताना साखळीचा खेळ खेळायचो. त्या खेळात एक व्यक्ती धावायला सुरू करते आणि दुसऱ्या एका व्यक्तीचा हात पकडून धावत सुटते आणि तेच प्रत्येक पुढची व्यक्ती करत जाते, त्यामुळे एक साखळी तयार होते. मात्र, जेव्हा सगळे धावतात आणि ती साखळी मध्येच तुटते तेव्हा सगळेच कोलमडतात. मात्र, त्या खेळात एकाने जर हात सोडला तर त्याचा त्या साखळीशी संबंध तुटतो आणि ती व्यक्ती स्थिर उभी राहते.
खेळाचे नियम जरी वेगळे असले तरी खेळाची आणि आयलॅंडिंग सिस्टीमची संकल्पना जुळते.
संपूर्ण देशाची वीज यंत्रणा (Grid) आणि मुंबईची आयलँडिंग सिस्टीम नक्की कशी काम करते?
तुम्ही वर वाचलेल्या साखळीच्या खेळाप्रमाणेच संपूर्ण देशाची वीज यंत्रणा (Grid) काम करते. देशाच्या कानाकोपऱ्यातील वीज प्रकल्प आणि शहरे एकमेकांचा हात धरून एका मोठ्या साखळीत उभे आहेत. पण, जर या साखळीत दूरवर कुठेतरी मोठा बिघाड झाला तर संपूर्ण साखळी कोलमडते (Grid Failure). याचा अर्थ देशात कुठेही गडबड झाली, तर संपूर्ण मुंबई एका सेकंदात अंधारात बुडू शकते.
पण, अशा वेळी मुंबईसाठी ‘सुपरहिरो’ ठरते तिची ‘आयलँडिंग सिस्टीम’:
स्वतःला साखळीतून वेगळं करणं (The Auto-Cut): जेव्हा राष्ट्रीय ग्रिडमध्ये मोठा बिघाड होतो किंवा विजेचा ताण अचानक वाढतो, तेव्हा साखळीत कोलमडून पडण्याऐवजी मुंबईची सिस्टीम स्वतःचा ‘हात’ बाजूला काढून घेते. म्हणजेच, मुंबई तात्काळ देशाच्या इतर भागांपासून वेगळी (Disconnect) होते आणि स्वतःचे एक सुरक्षित ‘बेटासारखे’ (Island) नेटवर्क तयार करते.
मुंबईची ‘लाइफलाईन’ जिवंत ठेवणं: साखळीतून वेगळे झाल्यानंतर मुंबईतील स्थानिक वीज प्रकल्प (ट्रॉम्बे आणि डहाणू) संपूर्ण मुंबईला वीज देण्याऐवजी, शहराच्या सर्वात महत्त्वाच्या भागांवर लक्ष केंद्रित करतात; त्यामुळेच लोकल ट्रेन्स, मोठी हॉस्पिटल्स, शेअर बाजार आणि दक्षिण मुंबई (मंत्रालय परिसर) या अत्यंत महत्त्वाच्या जागांचा वीजपुरवठा एका सेकंदासाठीही खंडित होत नाही.
झपाट्याने वीज परत आणणे (Quick Recovery): या सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुंबईतील वीज प्रकल्प पूर्णपणे बंद (Shut down) होत नाहीत, ते बॅकग्राउंडला चालूच असतात, त्यामुळे जेव्हा बाहेरचा बिघाड दुरुस्त होतो, तेव्हा इंजिनिअर्सना पूर्ण यंत्रणा शून्यापासून सुरू करावी लागत नाही. ते एकामागून एक उपनगरांतील भागांना (Suburbs) पुन्हा वीज पुरवठा झटपट जोडू शकतात.
नागरिकांनी कसली काळजी घेतली पाहिजे?
मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने वीजपुरवठा खंडित होणे सहाजिक आहे. या परिस्थितीची दखल मुंबईच्या वीजपुरवठा यंत्रणांनी आधीच घेतली असून त्यावर त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, एक जागरूक नागरिक म्हणून आपणही काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरात विजेचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. इथल्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये विजेवर चालणाऱ्या उपकरणांची संख्या मोठी असते; मात्र त्यांच्या वापराचे नियंत्रण पूर्णपणे आपल्याच हातात असते. आपण काही साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे; जसे की रिकाम्या खोलीतील एसी किंवा पंखे त्वरित बंद करणे. तसेच शक्य असल्यास घरात किंवा कार्यालयात एकाच ठिकाणी बसून काम करणे, जेणेकरून उर्वरित भागातील वीज उपकरणे बंद ठेवता येतील. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या तर विजेची मोठी बचत होईल आणि मुंबईकरांची रात्रीची झोप उडणार नाही, याची खात्री नक्कीच देता येईल.
