काही आठवड्यांपूर्वी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठा चिंताजनक पातळीवर घसरल्याने पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मुंबईकरांची तहान भागवणारे सातपैकी चार तलाव काठोकाठ भरले असून एकूण जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. असे असतानाही महापालिकेने समुद्रातील पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या चार हजार कोटी रुपयांच्या मनोरी प्रकल्पाचे काम पुढे सुरूच ठेवले आहे. त्याशिवाय या प्रकल्पाला मुंबईच्या विद्यमान जलवाहिनीशी जोडण्यासाठी सुमारे दोन हजार २४१ कोटी रुपयांचा भूमिगत बोगदा उभारण्याचीही योजना आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात तलाव तुडुंब भरून वाहत असतानाही समुद्राचे पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनविणाऱ्या या प्रकल्पावर सरकार हजारो कोटी रुपये खर्च का करीत आहे? त्याविषयी…
मुंबईतील कोणत्या तलावात किती पाणीसाठा?
मुंबईला भातसा, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी विहार आणि तुळशी वगळता इतर सर्व जलाशय शहराबाहेरील दूरच्या पाणलोट क्षेत्रात आहेत. हे जलाशय जवळपास पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात आणि चांगला पाऊस झाल्यास अतिशय वेगाने भरतात. सध्या पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सातही जलाशयांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या सुमारे ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये वैतरणा धरणातील पाण्याची पातळी सर्वाधिक वाढली आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११३ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे जलपातळीत १.९० मीटरची वाढ झाली आहे. तर अप्पर वैतरणा परिसरात ८० मिमी पाऊस झाल्याने या धरणातील साठा एकूण क्षमतेच्या ७५.७६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या भातसा धरणातील पाणीसाठाही आता ८६.८६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. शहराच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यात भातसाचा मोठा वाटा असल्याने हा साठा पुढील काही महिन्यांसाठी मुंबईच्या पाणी सुरक्षेला मोठा दिलासा देणारा मानला जात आहे.
मुंबईची सर्वात मोठी समस्या कोणती?
सध्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा जमा झाला असला तरी याच साठ्यावर पुढील ८ ते १० महिने (पुढच्या पावसाळ्यापर्यंत) मुंबईची तहान भागवावी लागते आणि खरी अडचण इथेच सुरू होते. मुंबईला दररोज चार हजार ६६५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, सध्याची धरण प्रणाली दररोज केवळ ४,१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करू शकते. म्हणजेच, जलाशय तुडूंब भरले तरी शहराला दररोज ५६५ दशलक्ष लिटर पाण्याची तूट सहन करावी लागते. त्यामुळेच यंदाच्या हंगामातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले असले, तरी पाणीपुरवठा आणि वाढती मागणी यांतील तफावत अद्याप कायम आहे. मुंबईत दरवर्षी २,००० मिमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडतो. मात्र, तरीही शहराची संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा केवळ मान्सून हंगामावरच अवलंबून आहे. त्यातच मोसमी वाऱ्याचे आगमन उशिराने झाल्यास किंवा सलग काही आठवडे पावसाने दडी मारल्यास या सातही धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होतो. यावर्षीच्या सुरुवातीला अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. जलसाठा चिंताजनक पातळीवर घसरल्यानंतर महापालिकेला शहरात पाणी कपातीची घोषणा करावी लागली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थितीत सुधारणा झाली.
मुंबईकरांनी पाणीटंचाईचा सामना कसा केला?
दोन महिन्यांपूर्वी मुंबईच्या सातही जलाशयांमधील उपयुक्त पाणीसाठा केवळ २३.५ टक्क्यांवर आला होता. त्यामुळे महापालिकेने १५ मेपासून संपूर्ण शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली होती. त्यानंतर १६ जूनपर्यंत जलाशयांमधील उपयुक्त साठा आणखी घसरून एकूण क्षमतेच्या केवळ १०.३५ टक्क्यांवर आला. मान्सून लवकर दाखल न झाल्याने महापालिकेने औद्योगिक, व्यावसायिक आणि क्रीडा संस्थांच्या पाणीपुरवठ्यात अतिरिक्त २० टक्के कपात केली होती. तसेच बांधकाम प्रकल्प आणि जलतरण तलावांना होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता. हवामान बदलामुळे मान्सूनवरील हे अवलंबित्व आणखी धोकादायक बनत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मुंबईत दरवर्षी जुलै महिना सर्वाधिक पावसाचा मानला जातो. पूर्वी अनेक आठवड्यांपर्यंत मध्यम आणि मुसळधार पाऊस पडत होता. आता मात्र परिस्थिती बदलली असून अल्प कालावधीत शहरात ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. यंदा तर जुलै महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांतच मुंबईत हंगामाच्या सरासरी ६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाचे स्वरूप अधिक टोकाचे आणि अनिश्चित होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर वाढतोय ताण
मुंबईतील प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्प, व्यावसायिक संकुल आणि पुनर्विकासामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. मात्र, आव्हान केवळ अधिक पाणी उपलब्ध करून देण्याचे नाही, तर अनेक दशकांपूर्वी उभारलेल्या जुन्या जलवाहिनी जाळ्यातून ते कार्यक्षमतेने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचेही आहे. जुन्या पाइपलाइनमधील गळती, बेकायदा जोडण्या आणि कालबाह्य वितरण व्यवस्थेमुळे मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पाइपलाइन गळती आणि अनधिकृत जोडण्यांमुळे दररोज ९०० दशलक्ष लिटर पेक्षा अधिक शुद्ध पाणी वाया जाते. ही मात्रा शहराच्या सध्याच्या पाणीटंचाईपेक्षाही अधिक आहे. मुंबईचा जलस्रोतांवर अवलंबून राहण्याचा इतिहास १६० वर्षांहून अधिक जुना आहे. १८६० मध्ये मिठी नदीवरील विहार जलप्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबईला प्रथमच नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे ७ लाख लोकसंख्येला दररोज ३२ दशलक्ष लिटर पाणी पुरवले जात होते. कालांतराने लोकसंख्या वाढल्यानंतर १८८५ मध्ये तुळशी तलाव विकसित करण्यात आला. त्यानंतर पवई तलाव आणि पुढे १९४८ मध्ये तानसा प्रकल्प उभारण्यात आला. नंतर वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईने तब्बल १७५ किलोमीटर दूर असलेल्या वैतरणा नदीवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली. आजही मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी बरेच पाणी या दूरच्या जलाशयांमधूनच येते.
मनोरीतील जलशुद्धीकरण प्रकल्प का महत्वाचा?
मुंबई महानगरपालिकेने भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. जलाशयांप्रमाणेच अरबी समुद्राचा जलसाठा पावसावर अवलंबून नसतो. त्यामुळे मनोरी येथे उभारण्यात येणारा पाणी शुद्धीकरणाचा मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईकरांना दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल. भविष्यात ही क्षमता ४०० दशलक्ष पर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ४,०७७ कोटी रुपये असून, त्याला शहराच्या जलवाहिनी नेटवर्कशी जोडण्यासाठी २,२४१ कोटी रुपयांचा भूमिगत बोगदा उभारला जाणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प पुढील चार वर्षांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मात्र, जलशुद्धीकरणाची ही प्रक्रिया पारंपरिक धरणाधारित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत अधिक खर्चिक आहे. तसेच समुद्रात पुन्हा सोडल्या जाणाऱ्या खाऱ्या पाण्यामुळे पर्यावरणीय परिणाम होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात जलशुद्धीकरणाचा वापर केला जात आहे. त्यामुळेच मुंबईकरांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून मनोरी येथील कोट्यवधी रुपयांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
