Mumbai AC Local : मुंबईची जीवनवाहिनी म्हणवल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काही बिघाड झाला की, मुंबईकरांना किती मनस्ताप होतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सोमवारी देखील ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला. गर्दीच्या वेळी एसी लोकलमधील वातानुकूलन (AC) यंत्रणा अचानक बंद पडल्याने डब्यातील वायुविजन बंद झाले आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
नक्की काय घडलं?
सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांची टिटवाळ्याहून सीएसएमटीसाठी निघालेल्या लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा, पंखे आणि दिवे एकाच वेळी बंद पडल्याने पूर्णपणे बंद असलेल्या डब्यांमध्ये घुसमट सुरू झाली.
उकाडा आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. तीन महिला प्रवाशांची प्रकृती बिघडली, तर फहीम अन्सारी नावाच्या प्रवाशाला श्वास घेण्यास गंभीर त्रास झाला, त्याला तातडीने मुलुंड स्थानकातच वैद्यकीय मदत देऊन जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घुसमटीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाला. अखेर प्रवाशांच्या आग्रहानंतर मुलुंड ते कुर्ला दरम्यान मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांनी लोकलचे दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवली, जेणेकरून डब्यांमध्ये हवा खेळती राहील.
त्यानंतर मध्य रेल्वेने ही एसी लोकल कुर्ला स्थानकातच थांबवली. तर पुढील तांत्रिक तपासणी व दुरुस्तीसाठी कुर्ला कारशेडमध्ये पाठवण्यात आली.
एसी लोकलमध्ये नेमकं बिघडलं काय?
एसी लोकलमधील वातानुकूलन (AC) यंत्रणा बंद पडली, फक्त एवढाच बिघाड नव्हता. लोकलची संपूर्ण सहाय्यक वीजपुरवठा (Auxiliary Power Supply) यंत्रणाच अचानक बंद पडली. त्यामुळे एसीसोबतच पंखे आणि डब्यातील दिवेदेखील एकाच वेळी बंद झाले.
एसी लोकलचे डबे पूर्णपणे बंद असतात. त्यामध्ये बाहेरची ताजी हवा येण्यासाठी एसी आणि वायुवीजन (Ventilation) यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागते. मात्र, ही यंत्रणाच बंद पडल्याने डब्यांमधील प्रवाशांना ताजी हवा मिळू शकली नाही.
त्यातच सकाळची गर्दीची वेळ असल्याने डबे प्रवाशांनी खचाखच भरले होते. एसी आणि पंखे बंद पडल्यामुळे काही मिनिटांतच डब्यातील उष्णता आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढू लागले. परिणामी अवघ्या १० ते १५ मिनिटांतच प्रवाशांची घुसमट होऊ लागली. त्यामुळे प्रवाशांमधील गोंधळ वाढला.
संतप्त प्रवाशांनी गाडी थांबवली आणि दरवाजे उघडण्याची मागणी केली. अखेर प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून मुलुंड ते कुर्ला दरम्यान एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवण्यात आली, जेणेकरून डब्यांमध्ये बाहेरची हवा प्रवेश करु शकेल.
मध्य रेल्वेचा तत्काळ प्रतिसाद?
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून मध्य रेल्वेने ही एसी लोकल कुर्ला स्थानकातच थांबवली. पुढील प्रवास रद्द करण्यात आला आणि बिघाड झालेली ‘टिटवाळा १८ डब्ब्यांची’ ही गाडी तांत्रिक तपासणी व दुरुस्तीसाठी थेट कुर्ला कारशेडमध्ये पाठवण्यात आली. तेथे तिच्या विद्युत यंत्रणेची सखोल तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीत तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसादरम्यान एसी लोकलच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परिस्थिती इतकी गंभीर होती की, प्रवाशांना चक्क डब्याच्या आत छत्री उघडून प्रवास करावा लागला होता.
यापूर्वी २६ जूनला दादर आणि चर्चगेटदरम्यान ओव्हरहेड वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्या. त्यामुळे गर्दीच्या वेळेत स्थानकांत प्रवाशांचा खोळंबा झाला होता.
तर २२ मे रोजी मुंबई मेट्रो-३ (अॅक्वा लाईन) सेवेतही मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. जवळपास ५० मिनिटे मेट्रो सेवा ठप्प राहिल्याने अनेक प्रवासी अंधारात आणि वायुवीजन नसलेल्या डब्यांमध्ये अडकून पडले होते.
एसी लोकलमधील बंद डबे किती सुरक्षित?
एसी लोकल आणि मेट्रोचे बंद (Sealed) डबे सामान्य परिस्थितीत अधिक सुरक्षित आणि आरामदायी मानले जातात. बंद दरवाज्यांमुळे अपघाताचा धोका कमी होतो, पाऊस, उकाडा, धूळ आणि आवाजापासून प्रवाशांचे संरक्षण होते. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होतो.
मात्र, एसी किंवा वीजपुरवठा बंद पडल्यास हीच व्यवस्था मोठी अडचण ठरू शकते. एसी लोकलमध्ये ताजी हवा येण्यासाठी संपूर्णपणे वातानुकूलन आणि वायुवीजन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ती बंद पडल्यास काही मिनिटांतच डब्यांमध्ये हव येणं बंद होते आणि प्रवाशांची घुसमट होते.
याशिवाय, मुंबई लोकलमध्ये क्षमतेपेक्षा अनेक पटीने जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने अशा बिघाडाच्या वेळी उष्णता आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे एसी डब्यांतील तांत्रिक बिघाड हा केवळ गैरसोयीचा नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न ठरू शकतो.
रेल्वेची तडजोडीची व्यवस्था?
जगातील अनेक आधुनिक मेट्रो आणि रेल्वे व्यवस्थांमध्येही पूर्णपणे बंद (Sealed) डबे वापरले जातात. मात्र, अशा डब्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली असते.
वीजपुरवठा खंडित झाल्यास प्रवाशांना ताजी हवा मिळावी यासाठी बॅटरीवर चालणारी स्वतंत्र वायुवीजन व्यवस्था (Backup Ventilation) उपलब्ध असते.
गरज पडल्यास प्रवासी स्वतः दरवाजे उघडू शकतील किंवा आपत्कालीन खिडक्यांचा वापर करू शकतील, अशा विशेष यंत्रणाही बसवलेल्या असतात. त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता कमी होते.
