मुंबईकरांसाठी लोकलचा प्रवास म्हणजे अडथळ्यांनी भरलेला कठीण प्रवास ठरत आहे. वेळेत कामावर पोहोचण्यासाठी ट्रेन पकडण्याची घाई आणि त्यात लोकलचा गोंधळ, यात मुंबईकर पुरता त्रासला आहे. मध्य रेल्वेवरील अलीकडील दोन मोठ्या तांत्रिक बिघाडांमुळे मुंबईकरांची जीवनवाहिनीचे वेळापत्रकच कोलमडले. लोकल तब्बल ९० मिनिटाने उशिराने धावू लागल्याने पुरता गोंधळ उडाला होता, स्थानकांवर प्रवाशांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. काही प्रवाशांना पुढील स्थानक गाठण्यासाठी थेट रेल्वे रूळांवरून चालत जावे लागले. या गोंधळात रूळ ओलांडताना भांडुप आणि घाटकोपर-विक्रोळीदरम्यान घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन प्रवाशांना जीव गमवावा लागला.
ठाणे आणि कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवाशांना लोकल विलंबाचा सर्वाधिक फटका बसला. लोकल अनिश्चित वेळी धावत होत्या, स्थानकांवरील गर्दी वाढत होती आणि नेहमीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास चार तास लागत होते, परिणामी प्रवासी रूळावर उतरले खरे; पण प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.
लोकलसेवा का विस्कळीत झाली?
मध्य रेल्वेवर अवघ्या सात मिनिटांच्या अंतराने दोन तांत्रिक बिघाड झाले. सकाळी ९.२३ च्या सुमारास मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरवर (OHE) एक बाह्य वस्तू पडली, त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील इन्सुलेटरचा स्फोट झाला. त्यानंतर सकाळी ९.३० च्या सुमारास कांजूरमार्ग स्थानकातील सिग्नलिंग रिले रूममध्ये आग लागल्याने जवळपास २४ सिग्नल यंत्रणा बंद पडल्या, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवला.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीला एका वायरपुरती मर्यादित असलेली आग नंतर पसरली. मात्र, रिले रूमला कुलूप होते आणि चाव्या उपलब्ध नव्हत्या, यामुळे आग विझवण्याच्या प्रयत्नांत अडथळे आले. वीजपुरवठ्यात अचानक चढ-उतार झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेनंतर रिले रूममधील तापमान नियंत्रणाच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या खोलीत स्वतंत्र कूलिंग यंत्रणा नव्हती आणि मोजक्याच एक्झॉस्ट फॅन्सच्या मदतीने तापमानावर नियंत्रण ठेवलं जात होतं, असा रेल्वेमधील सूत्रांचा आरोप आहे. या दोन्ही बिघाडांची कारणं काय आणि यामागे रेल्वे यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत होता का? हे तपासण्यासाठी मध्य रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे.
या सर्व घटनांमुळे सिग्रल यंत्रणाही बंद पडलेली होती, परिणामी लोकलची वाहतूक पूर्ववत करणे रेल्वेसाठी मोठे आव्हान ठरत होते. नेमकी आग कशामुळे लागली हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी नमूद केले आहे. “ठिणगी पडल्यामुळे आग लागली असावी, असे प्राथमिक तपासात नमूद करण्यात आले. मात्र, चौकशी अहवाल मिळाल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल,” असे त्यांनी म्हटले. मध्य रेल्वे मार्गावरील हा अभूतपूर्व गोंधळ तर साऱ्या मुंबईकरांनी पाहिलाच, पण हार्बर मार्गावरदेखील पनवेल ते सीएसएमटीदरम्यान लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होत्या, मोटरमनची कमतरता असल्याने हे घडले, असे रेल्वेमधील सूत्रांनी नमूद केले आहे.
सेवा सुरू झाल्या, पण लोकलचा वेग मंदावला
कांजूरमार्ग येथील आगीमुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने विक्रोळी-भांडूप आणि कांजूरमार्ग मार्गावरून विशेष सुरक्षा व्यवस्थेखाली लोकल गाड्या चालवण्यात आल्या. यावेळी नेहमीच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेऐवजी ‘ए-बोर्ड’च्या आधारे आपत्कालीन मॅन्युअल पद्धतीने गाड्या चालवण्यात आल्या. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे लोकलचा वेग मात्र मंदावला. परिणामी, गाड्या ६० ते ९० मिनिटांपर्यंत उशिराने धावत होत्या.
दरम्यान, रेल्वेकडून दुरुस्तीच्या कामासाठी कुर्ला-कल्याण मार्गावर ४८ मिनिटांचा आपत्कालीन पॉवर ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. डाऊन मार्गावरील जलद लोकलसाठी दुपारी ४.१० वाजता, तर अप मार्गावरील जलद लोकलसाठी ४.४६ वाजता मार्ग खुला करण्यात आला. डाऊन मार्गावरील धीमी लोकलसेवा संध्याकाळी ५.३० वाजता, तर अप मार्गावर ६.१८ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली.
लोकल सेवेत अल्प विलंबामुळेही खोळंबा का होतो?
मध्य रेल्वेच्या लोकलचं वेळापत्रक इतकं घट्ट असतं की एका गाडीला विलंब झाल्यास मागून येणाऱ्या अनेक गाड्यांवर त्याचा परिणाम होतो. मध्य रेल्वेत दररोज सुमारे १,८२० लोकल फेऱ्या चालवल्या जातात, ज्यातून सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत सीएसएमटीहून कल्याण, आसनगाव किंवा ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल साधारण दर तीन मिनिटांनी सुटते. गर्दी कमी असलेल्या वेळेतही दोन गाड्यांमधील अंतर केवळ साडेचार मिनिटं असतं.
या कमी अंतरामुळे एखादी लोकल उशिराने धावू लागली की तिच्यामागील गाड्यांचाही खोळंबा होतो. परिणामी, लोकलसेवेतील विलंब वाढत जातो आणि संपूर्ण मार्गावरील वेळापत्रक कोलमडते. “मध्य रेल्वेच्या एकाच मार्गावर एकाच दिशेने जाणाऱ्या सलग गाड्यांमध्ये तीन मिनिटांपेक्षाही कमी अंतर असतं. अशा वेळी एकावेळी ७० गाड्या उशिराने धावू लागल्या, तर वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी फारसा अवधीच उरत नाही,” असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडाचा परिणामही असाच संपूर्ण जोडलेल्या रेल्वे नेटवर्कवर झाला. मूळ बिघाड दुरुस्त झाल्यानंतरही लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी अनेक तास लोटले. यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्येही मध्य रेल्वेची सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. मात्र, त्यावेळी तांत्रिक बिघाड नव्हे तर मुसळधार पावसामुळे लोकलसेवेचा खोळंबा झाला होता. रूळांवर पाणी साचले होते, परिणामी मुख्य मार्गावरील लोकल सेवा कित्येक तासांसाठी बंद ठेवावी लागली होती.
