Mumbai Local Train Murder: २३ जून २०२६ रोजी ट्रेनमध्ये झालेल्या त्या हत्येने संपूर्ण लोकलला आणि मुंबईकरांन हादरवून टाकले आहे. एकीकडे गेले अनेक महिने भीषण उष्णतेमुळे तापलेली मुंबई आता मोसमी पावसाची मजा घेत आहे; तर दुसरीकडे पहिल्या दोन दिवसांच्या पावसातच मुंबई तुंबल्याच्या आणि त्या जोडीने पावसाळ्यातल्या अपघातांच्या बातम्या कानांवर कोसळत आहेत. पण, या सगळ्या उलाढालींमध्ये मुंबईतला एक घटक कधीच थांबत नाही ती म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी (लाइफलाईन) समजली जाणारी मुंबईची लोकल ट्रेन सेवा. मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे आर्थिक आणि प्रवासाच्या दृष्टीने सगळ्यात जास्त ‘कम्फर्टेबल’ वाहन आहे. पण, याच लोकलमधला पहिल्या वर्गाचा (First Class) प्रवास एका २२ वर्षांच्या तरुणासाठी अखेरचा ठरेल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. 

नक्की काय झाले ट्रेनमध्ये? 

२३ जून २०२६ च्या रात्री चर्चगेटहून सुटलेल्या ‘चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल’ (ट्रेन क्र. ९०६६३) मध्ये ही भयानक घटना घडली. पश्चिम रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या घटनेचा क्रम खालीलप्रमाणे :

रात्री २२:०५ वा.: ट्रेन चर्चगेट स्टेशनवरून रवाना झाली.

रात्री २२:४२ वा.: ट्रेन अंधेरी स्टेशनवर पोहोचली. २२ वर्षांचा मयंक लोहार (विरारचा रहिवासी, जो अंधेरीतील एका कपड्यांच्या दुकानात काम करायचा) आणि आरोपी रोशन सुवर्णा (वय ३० वर्षे, मिरा रोडचा रहिवासी) हे दोन्ही प्रवासी एकाच फर्स्ट क्लास डब्यात चढले.

अंधेरी ते बोरिवलीदरम्यान: मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद सुरू झाला. पाऊस आत येत असल्याने मयंकने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोशनने त्याला विरोध केला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रोशन सुवर्णाने आपल्या बॅगमधून धारदार सुरा काढला आणि चालत्या ट्रेनमध्ये मयंकच्या छाती व पोटावर सपासप वार केले. मयंक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

रात्री २३:०४ वा.: ट्रेन बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. ६ वर पोहोचली; पण ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपी रोशन सुवर्णा गर्दीचा फायदा घेऊन तिथून पसार झाला.

रात्री २३:०७ वा.: ट्रेन आल्याच्या अवघ्या तीन मिनिटांत जीआरपी (GRP) व आरपीएफ (RPF)चे जवान डब्यात पोहोचले आणि त्यांनी जखमी मयंकला मदत देण्यास सुरुवात केली.

रात्री २३:१० ते २३:१२ वा.: स्ट्रेचर, हमाल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. मयंकला डब्यातून बाहेर काढून तातडीने उपचारांसाठी हलवण्यात आले.

रात्री २३:२२ वा.: मयंकला बोरिवली स्टेशनवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात (EMR) आणले गेले, जिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.

रात्री २३:४२ वा.: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रेल्वे प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका बोलावून मयंकला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवले. आरपीएफ आणि जीआरपीचे जवानही त्याच्यासोबत होते.

रात्री २३:५२ वा.: रुग्णवाहिका शताब्दी रुग्णालयात पोहोचली; मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान मयंकचा मृत्यू झाला.

मध्यरात्री ०१:०० वा.: एडीएमआर मुंबई सेंट्रल आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी स्वतः स्टेशनला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

ही घटना दुर्दैवी असली तरी यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही! कारण मुंबईसारख्या महानगरात एका बाजूला बाहेरून येणाऱ्या लोकांना हक्काचं घर मिळतं, तर दुसऱ्या बाजूला अशा अनेक भीतीदायक घटनाही घडत असतात.

लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशांमधील वाढता ताण आणि छोटी छोटी भांडणे आता मुंबईकरांसाठी नवीन राहिलेली नाहीत. परंतु, एक दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून थेट चाकूने वार करून हत्या करण्यापर्यंत मजल जाणे ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मेट्रो स्टेशनप्रमाणे लोकल ट्रेनच्या स्टेशनवर बॅगेज स्कॅनिंग किंवा मेटल डिटेक्टर्स का नाहीत? एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी चाकू घेऊन निश्चिंत कशी भटकू शकते? फर्स्ट क्लासच्या डब्यातून बिनदिक्कत कसा प्रवास करू शकते? असे अनेकविध प्रश्न मुंबई रेल्वे प्रवासी संघाने उपस्थित केले आहेत.

कोण आहे रोशन सुवर्णा?

या थरारक घटनेनंतर पोलिसांनी जेव्हा आरोपी रोशन सुवर्णाची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा त्याची जी पार्श्वभूमी समोर आली, ती अत्यंत धक्कादायक आहे. एका सामान्य कुटुंबातील सुशिक्षित तरुण अशा थराला कसा जाऊ शकतो?  याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. रोशन सुवर्णाची सविस्तर पार्श्वभूमी खालीलप्रमाणे:

  • ३० वर्षीय रोशन सुवर्णा हा मूळचा कर्नाटकचा असला तरी तो सध्या मुंबईच्या मिरा रोड भागात आपल्या कुटुंबासह राहत होता.
  • रोशन हा गुन्हेगारी जगतातील सराईत गुंड नाही; तो अंधेरी विमानतळाजवळील एका कार्गो कंपनीत (Cargo Handling Facility) काम करीत होता. तिथे तो प्रामुख्याने बारकोड बनवणे आणि लेबलिंगचे (Barcode Making & Labeling) काम करायचा. तो त्याचे वडील आणि मोठ्या भावासोबत याच कार्गो फर्ममध्ये कार्यरत होता. 
  • स्थानिक पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मारामारी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची नोंद नव्हती. शेजारी आणि त्याच्या ओळखीच्या लोकांच्या मते, तो एक शांत आणि आपल्या कामात मग्न राहणारा तरुण म्हणून ओळखला जात होता.
  • घटना घडली त्या दिवशी रोशन हा ऑफिस किंवा वैयक्तिक कामाच्या प्रचंड मानसिक ताणाखाली होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
  • प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मयंकसोबत जेव्हा त्याचा वाद सुरू झाला, तेव्हा रोशनने अत्यंत हिंसक आणि आक्रमक रूप धारण केले होते. एका किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येमध्ये करण्याच्या या मानसिकतेला मानसोपचार तज्ज्ञ ‘सडन रेज’ (तीव्र राग) मानतात, जिथे माणूस क्षणात स्वतःवरील नियंत्रण गमावून बसतो.
  • ही घटना रोशनकडून तीव्र रागाच्या भरात अचानक घडली असली तरी त्यानंतर त्याने अतिशय चलाखीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. बोरिवली स्टेशनवर ट्रेन येताच तो गर्दीत गायब झाला.
  • मुंबईत राहणे सुरक्षित नाही हे समजल्यावर त्याने थेट पनवेल गाठले. तिथून कोकण रेल्वेने किंवा खासगी वाहनाने आपल्या मूळ गावी म्हणजेच कर्नाटकला पळून जाण्याचा त्याचा बेत होता.
  • मात्र, लोकलच्या डब्यात प्रवाशांनी बनवलेला व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील फोटोंच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण (Technical Surveillance) करून, त्याचा माग काढला आणि पनवेलमधून त्याला अटक करण्यात आली.

बॅगेत चाकू का होता?

रोशनच्या पार्श्वभूमीचा तपास करताना पोलिसांसमोर सर्वांत मोठा प्रश्न हा आहे की, जर तो एक सामान्य नोकरदार तरुण होता, तर त्याने बॅगेत इतका धारदार सुरा कशासाठी ठेवला होता?

तो दररोज सुरक्षेसाठी चाकू बाळगायचा की, त्या दिवशी काही विशिष्ट कारणासाठी त्याने तो सोबत ठेवला होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

एका सुशिक्षित आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणाने लोकल ट्रेनमध्ये केलेल्या या कृत्यामुळे आता महानगरांमध्ये राहणाऱ्या तरुणांच्या मानसिक आरोग्याचा आणि वाढत्या हिंसक प्रवृत्तीचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे.

आरोपी अटकेत; पण सोशल मीडियावरील ‘व्हायरल’ व्हिडीओने वाढवली चिंता!

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत, सुमारे ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपी रोशन सुवर्णा याला अवघ्या १५ तासांत पनवेल येथून अटक केली. तो कर्नाटकमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मयंकवर वार केल्यानंतर रोशनने डब्यातील इतर प्रवाशांनाही चाकू दाखवून धमकावले होते.

पण, या सगळ्यात सर्वांत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी बाब म्हणजे घटना घडत असताना डब्यातील प्रवाशांनी ती आपल्या मोबाईलमध्ये शूट केली. ती घटना कोणीतरी शूट केली आणि पोलिसांच्या हाती आरोपीचा थेट चेहरा आणि महत्त्वाचे पुरावे मिळाले, इथपर्यंत ठीक होते. मात्र, आता हाच मयंकच्या हत्येचा आणि रक्ताच्या थारोळ्यातील अत्यंत विदारक व्हिडीओ सोशल मीडियावर (Twitter/X, WhatsApp, Instagram, news channels) इतक्या वेगाने पसरला आहे की, त्यामुळे सर्वसामान्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

‘यावर सेन्सॉरशिप का नाही’ हा प्रश्न आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना विचारण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. एखादा हिंसक व्हिडीओ, ज्यामध्ये एका तरुणाचा जीव जाताना दिसत आहे, तो कोणत्याही फिल्टर किंवा सेन्सॉरशिवाय लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या स्क्रीनवर कसा काय स्क्रोल होऊ शकतो? अशा संवेदनशील आणि हिंसक कंटेन्टवर तंत्रज्ञानाच्या युगातही तातडीने बंदी (Automated Censorship) का आणली जात नाही? एकीकडे पूर्वीच्या काही महिन्यांमध्ये कॉमेडीयन्सच्या काही वक्तव्यांवरून मोठा वाद उभारला गेला होता आणि देशातील तरुणांवर कसे वाईट संस्कार होत आहेत, अशी चिंता देशातील तमाम प्रतिष्ठित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता ही घटना घडून दोन दिवस उलटून गेले तरीही याविषयी फार बोलण्यात आले आहे, असे दिसत नाही.

रोशन सुवर्णासारख्या गुन्हेगाराला कायद्यानुसार शिक्षा होईलच, रेल्वे प्रशासनही सुरक्षेचे नवे दावे करेल, पण या घटनेने मुंबईच्या लोकल प्रवासातील सुरक्षितता आणि आपल्या समाजाची डिजिटल संवेदनशीलता यावर एक कधीही न मिटणारा डाग लागला आहे. मुसळधार पावसाचा आनंद घेणाऱ्या मुंबईला या रात्रीने खऱ्या अर्थाने सुन्न केले आहे.