Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौरपदावर विराजमान झालेल्या रितू तावडे अवघ्या सहा महिन्यांतच वादात अडकल्या आहेत. महापौरांवर नेहमीच विरोधकांकडून टीका होते आणि महापौर त्याला प्रत्युत्तरही देतात. मात्र, तावडेंच्या बाबतीत चित्र काहीसं वेगळं आहे. विरोधकांसोबतच मुंबई महापालिका प्रशासन, स्वपक्षातील नेते आणि सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांशीही त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

महापौर हे महापालिका सभागृहाचे अध्यक्ष आणि शहराचे प्रतिनिधी असतात. मात्र, तावडेंनी या पदाची भूमिका केवळ औपचारिक ठेवण्याऐवजी शहरातील नागरी प्रश्नांमध्ये थेट हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली, त्यामुळे त्या महापालिकेच्या राजकीय व्यवस्थेतील एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आल्या आहेत.

नगरसेवकापासून महापौरपदापर्यंतचा प्रवास

रितू तावडेंचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला. २०१२ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि घाटकोपरमध्ये आपली राजकीय पकड घट्ट केली. घाटकोपरच्या प्रभाग क्र. १३२ मधून त्या दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. ईशान्य मुंबईतील भाजपाचं एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे, तर आता मुंबई महापालिकेच्या राजकारणात स्पष्टवक्त्या आणि आक्रमक नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. जानेवारीत महापालिका निवडणूक पार पडली, यामध्ये त्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या. मुंबईच्या महापौरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीला मुंबईच्या राजकारणात विशेष महत्त्व होतं. कारण तब्बल चार दशकांहून अधिक काळानंतर मुंबईच्या महापौरपदावर भाजपाच्या नेत्या विराजमान झाल्या. बीएमसीवरील शिवसेनेच्या दीर्घकाळाच्या वर्चस्वानंतर महापौरपद भाजपाकडे आलं, त्यामुळे तावडे या केवळ महापौर नाही तर मुंबईच्या बदललेल्या राजकीय सत्तासमीकरणाचं प्रतीकही ठरल्या.

महापौरपद स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरतं मर्यादित न राहता नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदा स्थलांतर यांसारखे मुद्दे थेट हाताळण्याची भूमिका त्यांनी घेतली. मात्र, याच आक्रमक शैलीमुळे पुढे त्यांच्याभोवती अनेक वाद निर्माण झाले.

लक्झरी घड्याळापासून ‘फ्लॅशर’पर्यंत

महापौरपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर काहीच दिवसांत तावडे एका महागड्या घड्याळाच्या वादात सापडल्या. सोशल मीडियावर त्यांच्या हातात एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचं रोलेक्स घड्याळ असल्याचा दावा करण्यात आला, तावडेंनी हा दावा फेटाळला. ते घड्याळ रोलेक्स नसून त्यांच्या मुलांनी भेट दिलेलं मायकेल कॉर्सचं घड्याळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मार्चमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या अधिकृत वाहनामुळे वाद निर्माण झाला. महापौरांच्या गाडीवर आणि एस्कॉर्ट वाहनावर लाल आणि निळे फ्लॅशर दिवे लावण्यात आले होते, त्याचे फोटो समोर आल्यानंतर टीका झाली. सरकारी वाहनांवर अशा प्रकारचे दिवे वापरण्यावर नियमांनुसार निर्बंध असल्याने महापालिकेने हे दिवे काढून टाकले.

एप्रिलमध्ये बोरिवलीतील महावीर जयंती कार्यक्रमातील तावडेंच्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला. जैन धार्मिक नेत्याच्या प्रार्थना आणि आशीर्वादामुळे दीर्घकाळाच्या घशाच्या आजारातून बरे झाल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे त्यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याची टीका झाली. त्यानंतर तावडेंनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला अशी सारवासारव केली.

यासोबतच तावडेंच्या काही वादग्रस्त कृती केली नसली तरी काही वाद त्यांच्या नावाशी जोडले गेले. गेल्या आठवड्यात एका फोटोग्राफीच्या शिक्षकाला महापौरांचा पती असल्याचं दाखवणारे यूट्यूब व्हिडीओ समोर आले, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महापौरांच्या बंगल्याभोवतीचा वाद

ऑगस्टमध्ये महापौरांच्या कार्यालयाशी संबंधित खर्चावरून मोठा वाद झाला. भायखळा प्राणिसंग्रहालय परिसरातील महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाभोवतीच्या परिसरात पायाभूत सुविधा आणि इतर कामांसाठी सुमारे २.९ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने मांडला. या प्रस्तावामुळे महापौरांवर सडकून टीका करण्यात आली. कारण काही महिन्यांपूर्वीच महापौरांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी सुमारे २.४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

मात्र, तावडेंनी या प्रस्तावावरील वादापासून स्वतःला दूर ठेवले. आपण ही कामं मागितलेली नाहीत आणि महापालिका प्रशासनाला त्याबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव बंगल्याच्या नूतनीकरणासाठी मांडण्यात आलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेला हा निविदा प्रस्ताव मागे घेण्यास सांगितलं. अखेर ही निविदा रद्द करण्यात आली. कोणतीही माहिती न देता माझ्या नावाचा वापर करून प्रस्ताव आणले जात असल्याचा आरोप तावडेंनी केला.

प्रशासनाशी थेट संघर्ष

तावडे आणि महापालिका प्रशासनातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया सेवेशी संबंधित २५.१२ लाख रुपयांचा प्रस्ताव वादाचा विषय ठरत आहे.

महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाची सेवा आणखी एक वर्ष सुरू ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचं प्रस्तावात नमूद करण्यात आलं होतं, त्यामुळे विरोधकांनीही या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केले.

तावडेंनी सुरुवातीला या निविदेबाबत आपल्याला माहिती नसल्याचं नमूद केलं. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलं. त्यांच्या नावाने येणारे प्रस्ताव आधी महापौर कार्यालयामार्फत पाठवावेत, अशी मागणी तावडेंनी केली. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तावडेंच्या समर्थकांचा दावा आहे की, काही महापालिका अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून त्यांचं नाव वापरून त्यांना वादात ओढण्याचा प्रयत्न केला.

हा विषय पुढे थेट राज्य सरकारपर्यंत पोहोचला. तावडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महापालिकेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. या विभागाच्या कामकाजासाठी केवळ जनसंपर्क अधिकाऱ्याऐवजी सहाय्यक महापालिका आयुक्ताची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली. या घटनेमुळे तावडे आणि महापालिका प्रशासनातील संघर्ष आणखी स्पष्ट झाला.

परंपरेनुसार महापौरांची भूमिका प्रामुख्याने राजकीय आणि औपचारिक स्वरूपाची असते, तर कामकाज आयुक्तांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय यंत्रणा सांभाळते. मात्र, तावडेंची काम करण्याची पद्धत अधिक सक्रिय आहे, त्यामुळे महापौरांचे राजकीय अधिकार आणि आयुक्तांचे प्रशासकीय अधिकार नेमके कोणते होते यावरून मतभेद निर्माण होत आहेत.

भाजपामध्येही मतभेद?

केवळ विरोधक किंवा प्रशासनामुळे तावडेंभोवती वाद निर्माण झालेला नाही, तर त्यांचे सत्ताधारी गटातील नेत्यांशीही मतभेद असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात तावडेंनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीला महापालिका सभागृह नेते गणेश खणकर आणि विविध समित्यांचे अध्यक्षही उपस्थित होते. या बैठकीत तावडे आणि भाजपाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यात कथित हस्तक्षेपावरून जोरदार वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौर कार्यालय शिक्षण समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप शिरवाडकर यांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, भाजपा नेत्यांनी या वादाला कमी लेखले आहे. पक्ष एकसंध असून नेत्यांमधील मतभेदांना वेगळं स्वरूप देऊ नये, अशी भूमिका भाजपाकडून मांडण्यात आली आहे.

महापौरांच्या पावसाळ्यापूर्वीच्या पाहणीदरम्यान महायुतीतील मतभेद पुन्हा समोर आले. शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितलं होतं की आपण तावडेंच्या नाले पाहणीबाबत अनभिज्ञ होतो.

तावडेंची आक्रमक शैलीच वादाचं कारण?

तावडेंभोवती निर्माण होणाऱ्या वादांकडे दोन दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यांच्या समर्थकांच्या मते, अनेक वर्षांपासून औपचारिक मानल्या जाणाऱ्या महापौरपदाला तावडे अधिक सक्रिय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या नागरी प्रश्नांमध्ये थेट लक्ष घालत आहेत.

मात्र, रितू तावडे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहेत असे विरोधकांचे मत आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, सोशल मीडिया आणि बदललेल्या राजकीय वातावरणामुळे तावडेंभोवती वाद निर्माण झाले आहेत. महापालिकेतील प्रत्येक निर्णय आता सोशल मीडियावर चर्चेत येतो. काही वेळा नसलेल्या मुद्द्यांनाही मोठं केलं जातं असं त्यांनी सांगितलं.

तावडेंनी मात्र त्यांच्यावर होणारी टीका फेटाळली आहे. मुंबईचं महापौरपद अनेक दशकांनंतर शिवसेनेकडून भाजपाकडे गेल्यामुळेच विरोधक आपल्याला लक्ष्य करत असल्याचा त्यांचा दावा आहे. तावडेंनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं की, “जवळपास तीन दशकं शिवसेनेचा महापौर होता. आता पहिल्यांदाच ते विरोधी बाकांवर आहेत. महापौरपद गमावल्यामुळेच माझ्यावर पक्षपातीपणे टीका केली जात आहे.”

महापालिका प्रशासनातील काही अधिकारी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूने असल्याचा तावडेंचा आरोप आहे. आपल्या कामात अडथळे आणण्यासाठी महापौरांच्या नावाचा वापर करून काही प्रस्ताव पुढे आणले जात असल्याचं त्या नमूद करतात. भाजपाने मुंबईचं महापौरपद पुन्हा मिळवल्यानंतर तावडे या बदललेल्या सत्तासमीकरणाचा चेहरा बनल्या आहेत. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच त्यांचा विरोधक, महापालिका प्रशासन, पक्षातील सहकारी आणि महायुतीतील नेते यांच्याशी संघर्ष निर्माण झाला आहे, त्यामुळे तावडेंची आक्रमक कार्यशैली पुढे मुंबईच्या राजकारणाला कोणती दिशा देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.