Mumbai Mayor Ritu Tawde Car Red Light Controversy : मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या नव्या कोऱ्या कारवर लाल व निळ्या रंगाचे दिवे बसवण्यात आल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातलेली असतानाच भाजपाच्या नेत्यांकडूनच या नियमाला बगल देण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली. चौहेबाजूंनी कोंडी झाल्यानंतर महापालिकेने अधिकृत स्पष्टीकरण देताना महापौरांच्या कारवरील दिवे काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणामुळे वाहनांवर लाल-निळे लावण्याच्या नियमांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. नेमके काय आहे यासंदर्भातील नियम? त्याविषयीचा हा आढावा…

वादाचे नेमके कारण काय?

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाच्या युतीने दणदणीत विजय मिळवून बहुमताचा आकडा गाठला. त्यानंतर मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या नगसेविका रितू तावडे यांची निवड करण्यात आली. महापौरपदाचा पदभार स्वीकारताच तावडे यांना प्रशासनाकडून नवी कोरी कार देण्यात आली. या कारवर लाल-निळ्या रंगाचे दिवे असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधी पक्षांच्या काही नगरसेवकांनी भाजपाच्या कारभारावर टीका केली. त्यावरून मोठा वादंग उठल्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने महापौरांच्या कारवरील दिवे हटविण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले.

नेमकी काय आहे नियमावली?

‘लाल दिव्याची गाडी’ हा आजही कित्येकांच्या घरांत होणाऱ्या करिअरच्या चर्चेमध्ये आवर्जून निघणारा विषय असतो. लाल दिव्याची गाडी मिळवणे म्हणजे मोठा सरकारी अधिकारी होणे, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. यापूर्वी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी, पोलीस, न्यायाधीश अशा प्रशासनातील मोठ्या हुद्द्यांवरील अधिकाऱ्यांच्या कारवर वेगवेगळ्या प्रकरणाचे दिवे असल्याचे पाहायला मिळत होते; पण २०१७ मध्ये केंद्र सरकारने या नियमांमध्ये बदल करून देशातील काही सरकारी वाहनांवर लाल-निळे दिवे लावण्यास बंदी घातली. हा बदल १ मे २०१७ पासून लागू झाला. भारतीय रस्त्यांवरील तथाकथित ‘व्हीआयपी संस्कृती’ संपवणे हा त्यामागचा उद्देश होता. सुधारित नियमांनुसार, आता कोणतेही राजकीय नेते, मंत्री किंवा शासकीय अधिकारी त्यांच्या खाजगी किंवा सरकारी वाहनांवर लाल दिव्याचा वापर करू शकत नाहीत.

आणखी वाचा : नोकरीच्या ठिकाणी महिलांवर लग्न किंवा मातृत्वाचे नियोजन लपवण्याची वेळ का येते? कारण काय?

कोणत्या वाहनांना लाल दिव्याची परवानगी?

भारतात सध्या लाल दिव्याचा वापर केवळ आपत्कालीन सेवा किंवा कायदा अंमलबजावणीच्या कामात असलेल्या वाहनांपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित वाहने यांचा समावेश आहे. वाहनांवर लाल दिवा लावण्यामागचा उद्देश इतर वाहनचालकांना सतर्क करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत या वाहनांना जलद मार्ग मिळवून देणे असा असतो. लाल आणि निळ्या रंगाचे दिवे एकत्रितपणे सामान्यतः पोलीस किंवा आपत्कालीन सेवांच्या वाहनांशी संबंधित मानले जातात. त्यामुळे राजकीय पदाधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर अशा लाईट्सचा वापर झाल्यास नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. देशातील सर्व राज्यांमधील वाहतूक प्राधिकरणांनी वारंवार इशारा दिला आहे की, लाल-निळ्या दिव्यांचा अनधिकृत वापर बेकायदा असून मोटार वाहन कायद्याअंतर्गत संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. हे नियम केंद्र सरकारचे असल्यामुळे ते महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांमध्ये लागू आहेत. अधिकृत परवानगीशिवाय खासगी किंवा शासकीय वाहनांवर असे दिवे बसविल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाऊ शकते.

लाल दिव्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

महापौर रितू तावडे यांच्या वाहनावरील लाल दिव्याच्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले. नियम सर्वांसाठी समान असताना अशा प्रकारे नियमांकडे दुर्लक्ष कसे केले जाऊ शकते? असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला. महापौरांच्या कारवर लाल दिवा लावण्याची प्रशासकीय स्तरावरील ही चूक कशी झाली? याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. महापौर रितू तावडे यांच्या कारवरील लाल दिव्याबाबत जी चर्चा होते आहे, त्याची मी माहिती घेतली. लाल दिवा कारवर नव्हे तर बोनेटच्या ठिकाणी लावण्यात आला होता आणि त्यात महापौरांचा दोष नाही. राज्यात कुणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. महापौरांनाही त्याची कल्पना आहे. मला असे वाटते आहे की त्यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे, जे अत्यंत चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : इराणच्या डान्सिंग मिसाईलची अमेरिका-इस्रायलला धडकी? सेज्जिल क्षेपणास्त्र नेमके किती घातक?

कोण आहेत महापौर रितू तावडे?

मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या रितू तावडे घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी सलग तिसऱ्यांदा नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली आहे. ५३ वर्षीय रितू तावडे यांनी २०१२ मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळच्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना हापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तसेच, त्या मुंबई महानगरपालिका उपनगरे स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. रितू तावडे यांनी भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळलेली आहे. ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.