मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच आता या मार्गिकेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेटवे ऑफ इंडिया ते आणिक आगार, वडाळा अशी ही दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका असून या मार्गिकेला मेट्रो ११ म्हणून ओळखले जाणार आहे. आता ही मार्गिका गेटवे ऑफ इंडिया ते वांद्रे टर्मिनस अशी असणार आहे. तेव्हा या मार्गिकेचा विस्तार नेमका कसा होणार आहे, विस्ताराची गरज का, विस्ताराचा फायदा नेमका कसा होणार याचा हा आढावा…
मेट्रो ११ मार्गिकेची जबाबदारी एमएमआरसीकडे
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ मेट्रो मार्गिकांचे काम हाती घेतले. यातील आरे ते कफ परेड या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (एमएमआरसी) दिली. त्यानुसार भुयारी मेट्रो ३ मार्गिकेची उभारणी करून पहिली भुयारी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल केली. दरम्यान मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका म्हणून मेट्रो ११ मार्गिका एमएमआरडीएने प्रस्तावित केली होती. या मार्गिकेचा आराखडा एमएमआरडीएने तयार केला होता आणि एमएमआरडीएकडूनच ही मार्गिका मार्गी लावली जाणार होती. मात्र राज्य सरकारने २०२३ मध्ये या मार्गिकेची जबाबदारी एमएमआरसीकडे दिली. भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचा अनुभव एमएमआरसीला असल्याने दुसरी भुयारी मेट्रो मार्गिकेची उभारणीही एमएमआरसीच्या माध्यमातूनच व्हावी, यातून ही जबाबदारी एमएमआरसीकडे आली.
भुयारी मेट्रो ११ मार्गिकेचा मूळ प्रस्ताव
एमएमआरडीएच्या मूळ प्रस्तावानुसार मेट्रो ११ मार्गिका वडाळा ते सीएसएमटीदरम्यान धावणार होती. मात्र एमएमआरसीने यात काहीसा बदल करून ही मार्गिका आणिक आगार, वडाळा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत नेण्याचा निर्णय घेत मार्गिकेचा सुधारित आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार गेटवे ऑफ इंडिया ते आणिक आगार, वडाळा मार्गिका १७.५१ किमीची असणार असून या मार्गिकेत १४ मेट्रो स्थानकांचा समावेश होता. यातील १३ स्थानके भुयारी तर एक स्थानक उन्नत होते. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास यावरून सहा डब्यांच्या मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावतील. तर या मार्गिकेवरून २०३१ मध्ये दिवसाला पाच लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज एमएमआरसीने व्यक्त केला आहे. २०५५ पर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या १० लाख १२ हजारांवर जाईल, असा दावा एमएमआरसीने केला आहे. या मार्गिकेतील कारशेड आणिक आगार आणि प्रतीक्षा नगर आगारातील १६ हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आले आहे. तर या मार्गिकेसाठी अंदाजे १६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. पण आता मात्र या मार्गिकेच्या संरेखनात बदल होणार आहे. कारण आता या मार्गिकेचा विस्तार होणार आहे.
असा असणार विस्तार?
एमएमआरसीने मेट्रो ११ मार्गिकेचा विस्तार आता आणिक आगार, वडाळा येथून थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव एमएमआरसीने राज्य सरकारसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. त्यानुसार राज्य सरकारने अर्थसंकल्पात यासंबंधीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मेट्रो ११ वांद्रे टर्मिनसपर्यंत धावणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या विस्तारामुळे गेटवे ऑफ इंडिया ते आणिक आगार, वडाळा असा १७.५१ किमीची मार्गिका २३.५० किमी लांबीची होणार आहे. मार्गिकेचा ६.९ किमीने विस्तार होणार आहे. तर या मार्गिकेतील १४ मेट्रो स्थानकांची संख्या वाढून ती आता १९ मेट्रो स्थानकांवर गेली आहे. चुनाभट्टी, शीव, धारावी, वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि वांद्रे टर्मिनस अशी ही पाच मेट्रो स्थानके असणार आहेत. आता या सुधारित संरेखनाचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता घेऊन या मार्गिकेचे काम मार्गी लावले जाणार आहे.
धारावी आणि वांद्र्याशी जोडणी का?
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसून धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. धारावीचा कायापालट करताना धारावीतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावरही भर दिला जात आहे. भविष्यात धारावीतील लोकसंख्या वाढणार असून धारावीत कामधंद्यानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तेव्हा या वाढत्या लोकसंख्येच्या सोयीसाठी धारावीचा विकास मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब अर्थात बहुउद्देशीय वाहतूक केंद्र म्हणून केला जाणार आहे. याची जबाबदारी एमएमआरडीएवर टाकण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत धारावीला मेट्रोसह अन्य वाहतुकीच्या पर्यायांशी जोडले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून आता मेट्रो ११ मार्गिका धारावीतून नेली जाणार आहे. मेट्रो ३ मार्गिकेतील एक स्थानक धारावीत असून आता मेट्रो ११ चेही स्थानक धारावीत असणार आहे. तर दुसरीकडे आजच्या घडीला वांद्रे रेल्वे स्थानक आणि वांद्रे टर्मिनस सर्वाधिक वर्दळीचे स्थानक, टर्मिनस आहे. या स्थानकावर आणि टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. स्थानकावर, टर्मिनसवर पोहोचणे वा स्थानकावरून, टर्मिनसवरून इच्छित स्थळी पोहोचणे प्रवाशांसाठी त्रासाचे ठरते. पण यापुढे मात्र प्रवाशांचा हा त्रास दूर होणार आहे. कारण मेट्रो ११ वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि वांद्रे टर्मिनसशी जोडले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणीची गर्दी कमी करून प्रवास सुकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रस्तावाची सद्यःस्थिती काय?
एमएमआरसीने मेट्रो ११ मार्गिकेचा सुधारित आराखडा तयार करून त्यास राज्य सरकारची मान्यता घेतली आहे. तर या प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मेट्रो ११ मार्गिकेसाठी केंद्र सरकारचीही मान्यता लागणार आहे. त्यामुळे मेट्रो ११ मार्गिकेचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. तर आता मार्गिकेचा विस्तार होणार असल्याने विस्तारित मार्गिकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाईल. त्यानंतर प्रस्तावास केंद्र सरकारची मान्यता घेण्यात येईल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून मेट्रो ११ मार्गिकेचा विस्तार वांद्रे टर्मिनसपर्यंत केला जाईल. तेव्हा मेट्रो ११ मार्गिकेचे काम सुरू होण्यासाठी आणि त्यानंतर काम पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
