मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका सेवेत असून ३ एप्रिलपासून आणखी दोन नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत. मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १, मानखुर्द आणि मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ चे लोकार्पण होणार आहे. तेव्हा हे दोन्ही टप्पे नेमके कसे आहेत आणि त्याचा फायदा प्रवाशांना कसा होणार याचा हा आढावा…
चार मेट्रो मार्गिका कार्यान्वित
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १४ मेट्रो मार्गिकांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या १४ मार्गिकांपैकी चार मेट्रो मार्गिकांची कामे पूर्ण होऊन त्या सेवेत दाखल आहेत. या मेट्रो मार्गिकांना प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. वर्सोवा-घाटकोपर मेट्रो १ ही मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका असून ती २०१४ मध्ये सेवेत दाखल झाली. त्यानंतर पुढील मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागला.
२०२२ मध्ये मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेतील पहिला टप्पा सेवेत दाखल झाला. त्यानंतर २०२३ मध्ये या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. या दोन मार्गिकांनंतर मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका अर्थात मेट्रो ३ (आरे ते कफ परेड) सेवेत दाखल झाली. २०२४ मध्ये या मार्गिकेतील आरे ते बीकेसी, त्यानंतर मे २०२५ मध्ये बीकेसी ते आचार्य अत्रे चौक आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्पा सेवेत दाखल झाला. आज ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावत आहे. एमएमआरडीएकडून आजच्या घडीला सात ते आठ मार्गिकांची कामे सुरू असून आता नवीन दोन मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत.
मेट्रो २ ब, मेट्रो ९ मार्गिकेतील पहिला टप्पा कसा?
गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ चा विस्तार मेट्रो ९ मार्गिकेच्या माध्यमातून दहिसर ते मिरा-भाईंदर असा करण्यात येत आहे. त्यासाठी दहिसर ते मिरा-भाईंदर असा १३.५ किमीचा मेट्रो मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गिकेचे टप्प्याटप्प्याने काम करण्यात येत असून यातील दहिसर ते काशीगाव टप्पा १ पूर्ण झाला आहे. हा पहिला टप्पा ४.५ किमी लांबीचा असून यात दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशीगाव अशा चार मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. तर दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ चा विस्तार मेट्रो २ ब च्या माध्यमातून करण्यात येत आहे. अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मार्गिका २३ किमीची असून या मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ चे काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा ५.६ किमी लांबीचा असून यात मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन अशी स्थानके आहेत. मेट्रो २ ब चा टप्पा १ आणि मेट्रो ९ चा टप्पा १ चे काम पूर्ण होऊनही प्रवाशांना या मार्गिकेतून प्रवास करता येत नव्हता.
लोकार्पण का रखडले?
डायमंड गार्डन ते मंडाले टप्प्याचे काम सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्येच पूर्ण झाले आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर २०२५ मध्ये या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र ऑक्टोबर अखेरीस मिळाले, त्यानंतर पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि या टप्प्याचे लोकार्पण रखडले. तर दुसरीकडे दहिसर ते काशीगाव या मार्गिकेचे कामही २०२५ अखेरीस पूर्ण झाले. या टप्प्याला जानेवारी २०२६ मध्ये सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे म्हणजे मेट्रो सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणे – मेट्रो संचालनाचा हा अंतिम टप्पा आहे. त्यानुसार दोन्ही मार्गिकांना सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त असतानाही या मार्गिका सेवेत दाखल करण्यात येत नव्हत्या. केवळ लोकार्पणासाठी मुहूर्त न मिळाल्याने प्रवाशांना हा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे या दोन्ही टप्प्यांचे लोकार्पण रखडल्याने प्रवासाची प्रतीक्षा लांबली होती.
ठाणे जिल्ह्यातली पहिली मेट्रो
दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ च्या लोकार्पणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. लोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवार, ३ एप्रिलची वेळ दिली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी या दोन्ही टप्प्यांचे लोकार्पण होईल आणि त्यानंतर हे टप्पे सेवेत दाखल होतील. मुंबईतील कार्यान्वित मेट्रो मार्गिकांची संख्या सहावर पोहोचेल. मात्र त्याच वेळी महत्त्वाचे म्हणजे ठाणे जिल्ह्याला पहिली मेट्रो मार्गिका दहिसर ते काशीगाव टप्पा १ च्या रूपाने मिळेल. दहिसर ते काशीगाव प्रवास आता अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. तर काशीगाववरून पुढे मेट्रो ७ ने गुंदवली, अंधेरीपर्यंत प्रवास करता येणार आहे. त्यामुळेही ही मार्गिका प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
दुसरीकडे डायमंड गार्डन ते मंडाले असा प्रवास आता प्रवाशांना करता येणार असून पूर्व उपनगरातील ही पहिली सेवेत दाखल होणारी मेट्रो ठरणार आहे. दरम्यान, या मार्गिकेचा वापर अधिकाधिक प्रवाशांना करता यावा यासाठी येत्या दोन-तीन महिन्यांत या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील चेंबूर स्थानकही सेवेत दाखल केले जाणार आहे. त्यामुळे चेंबूर ते मंडाले अशा मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. तर मेट्रो २ ब मार्गिकेला मोनोरेलशीही जोडले जाणार आहे. मोनोरेल मार्गिकेतील व्हिएनपी-आरसी मार्ग जंक्शन स्थानक चेंबूर मेट्रो स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे. त्यामुळे मोनोरेल आणि मेट्रोचेही प्रवासी वाढतील अशी अपेक्षा एमएमआरडीएला आहे. तेव्हा आता दोन नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार असून त्यांना मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
