मुंबईतीलच नव्हे तर देशातील एकमेव मोनोरेल मार्गिका अशी ओळख असलेली चेंबूर – संत गाडगे महाराज मोनोरेल मार्गिकेवरील सेवा सप्टेंबर २०२५ पासून बंद करण्यात आली. मोनोरेल मार्गिकेत सातत्याने होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे मोनोरेलचे अत्याधुनिकरण करण्यासाठी सेवा बंद करण्याची नामुष्की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) ओढवली. पण आता लवकरच मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल होणार आहे. त्याबाबत एमएमआरडीएकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मोनोरेल नेमकी केव्हा धावणार आणि मोनोरेल सेवा का बंद करावी लागली याबाबत घेतलेला हा आढावा…
मोनोरेल ठरलीय पांढरा हत्ती
मोनोरेल मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून आजपर्यंत अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकलेली नाही. त्यामुळे मोनोरेल तोट्यातच सुरू आहे. २४६० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या मार्गिकेचा २०२२-२३ मधील तोटा तब्बल २५० कोटी रुपयांवर पोहोचला. तर २०२३-२४ मध्ये तोटा ५२९ कोटी रुपयांच्या घरात गेला होता. २०२४-२५ मधील तोट्याची रक्कम उपलब्ध नसली तरी ती बरीच मोठी असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून आठ वर्षांतील कालावधीतील अर्थात २०१४ ते २०२२ दरम्यान उत्पन्न आणि खर्चामधील तफावत पाहता हा प्रकल्प पांढरा हत्ती असल्याचे स्पष्ट होते. या आठ वर्षांत २९.७३ कोटी रुपये महसूल एमएमआरडीएला मिळाला. मात्र त्याचवेळी ३४३ कोटी रुपये इतका खर्च झाला. खर्चाच्या तुलनेत ८.६५ टक्के इतका महसूल मिळाला. या प्रकल्पामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत असतानाही प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएने आणखी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नव्या १० गाड्यांसाठी ५९० कोटी, तर मेट्रो ३ मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक मोनोशी जोडण्यासाठी १५० ते २०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. आर्थिक तोट्यामुळे हा प्रकल्प बंद करण्याची मागणीही वहातूक तज्ज्ञांकडून होत आहे.
दुर्घटनांची मालिका सुरूच
मोनोरेल सेवेत दाखल झाल्यापासून गाड्यांमध्ये बिघाड, वीजपुरवठा खंडीत होणे, गाड्यांचे भाग खराब होऊन तुटणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. मोनोरेलच्या एका डब्याला २०१७ मध्ये आग लागली आणि त्यात डबा जळून खाक झाला. त्यानंतर मोनोरेल सेवा नऊ महिने बंद होती. त्यानंतर पुन्हा सेवेत दाखल झालेल्या मोनोरेलवर अपघात, दुर्घटना घडतच आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये एकाच दिवशी दोन गाड्या अतिवजनामुळे बंद पडल्या. बंद पडलेल्या दोन गाड्यांपैकी एका गाडीतील ५८८ प्रवाशांना दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले. तर दुसरी गाडी ओढत पुढे नेऊन प्रवाशांची सुटका करावी लागली. या घटना ताजा असतानाच १५ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा गाडी बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. मात्र सतत दुर्घटना,अपघात घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे आता एमएमआरडीएने अनिश्चित काळासाठी मोनोची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
मोनोरेल पुन्हा कधी सेवेत?
मोनोरेल सेवा सप्टेंबर २०२५ मध्ये बंद झाली. मोनोरेल प्रकल्प, प्रकल्पातील यंत्रणा आणि प्रणालीचे अत्याधुनिकीकरण करून नव्याने मोनोरेल मार्गिका सेवेत दाखल करण्यासाठी सेवा काही काळासाठी बंद करणे अत्यावश्यक होते. त्यानुसार सप्टेंबर २०२५ पासून मोनोरेल सेवा बंद आहे, तर दुसरीकडे मोनोरेल गाड्यांच्या चाचण्या, जुन्या गाड्यांचे नूतनीकरण, यंत्रणा – प्रणालींचे अत्याधुनिकीकरण सुरू आहे. अत्याधुनिकीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आल्याने आता एमएमआरडीएने मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्यामार्फत सुरक्षा चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी निवृत्त सीएमआरएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मार्चअखेरीस सुरक्षा चाचण्या घेण्यात येण्याची शक्यता आहे. तर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अर्थात मे महिन्यात मोनोरेल सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मोनोरेल धावण्याची चिन्हे आहेत.
मोनोरेल आणि मेट्रोची जोडणी
मे महिन्यात मोनोरेल पुन्हा मुंबईत धावणार आहे. मात्र मोनोरेलची सेवा पुन्हा सुरू करतानाच तिला तोट्यातून कसे बाहेर काढता येईल, मोनोरेलची प्रवासी संख्या कशी वाढेल या विचारातून चेंबूर येथे मोनोरेल आणि मेट्रोला जोडणी देण्यात येणार आहे. त्यानुसार अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक आणि मोनोरेलमधील व्हीएनपी – आरसी मार्ग मोनोरेल स्थानक पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहेत. १३० मीटर लांबीचा आणि १२ ते १५ कोटी रुपये खर्च करून पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. हा पूल कार्यान्वित झाल्यास मेट्रोतून मोनोरेलमध्ये आणि मोनोरेलमधून मेट्रोत अवघ्या काही मिनिटांत जाता येणार आहे. त्यामुळे मोनोरेलवरील प्रवासी संख्येत वाढ होईल अशी एमएमआरडीएला अपेक्षा आहे. परिणामी मेट्रो २ ब मार्गिकेच्या दुसर्या टप्प्यातील एकमेव चेंबूर स्थानक वेगाने पूर्ण करून ते एप्रिलअखेरीस वाहतूक सेवेत दाखल केले जाणार आहे. तेव्हा प्रवासी संख्या वाढविण्याचा एमएमआरडीएचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो का हे येणार्या काळात स्पष्ट होईल.

