पावसाळा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरलेले असले तरी यंदा पावसाळापूर्व नालेसफाई काही पूर्ण झालेली नाही. भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीच्या सत्ताकाळातील पहिला पावसाळा येऊन ठेपला असला तरी नालेसफाई नीट झालेली नाही हे आता सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही मान्य करू लागले आहेत. या वर्षी आधीच उशिरा सुरू झालेली नालेसफाई जून महिना उजाडला तरी पूर्ण झालेली नाही. दोन परिमंडळांमध्ये तर मुंबई महापालिकेला नालेसफाईसाठी कंत्राटदारच मिळालेले नाहीत. त्यातच यावर्षी गाळाचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. कंत्राटदार न मिळण्यामागची कारणे काय, नालेसफाई नीट झालेली नाही हे आधीच मान्य करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर का आली याविषयी …

दरवर्षी नालेसफाई कशासाठी?

मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईचा बराचसा भाग हा खोलगट बशीसारखा सखल आहे. यातच मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे हे त्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले आणि १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून हे पावसाचे पाणी समुद्रात जात असते. मात्र नाले, गटारे यामध्ये वर्षभर समुद्रातून येणारा व आजूबाजूच्या वस्त्यांमधून प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान असा वाटेल तो कचरा टाकला जातो. त्यामुळे हे नाले तुंबतात. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी हा गाळ काढणे आवश्यक असते. त्यामुळे पालिका दरवर्षी नदी व नाल्यातील गाळ काढण्यासाठी सुमारे २०० कोटींचे कंत्राट देत असते.

किती गाळ काढला जातो?

मुंबईतील विविध मोठ्या, लहान नाल्यांसह पेटीका नाले तसेच रस्त्यांलगतच्या जलमुखांची साफसफाई या नालेसफाईत अंतर्भूत असते. नदी नाल्यांमधून साचलेला गाळ हा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काढून क्षेपणभूमीवर वाहून नेला जातो. मोठ्या नाल्यातून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूणच जवळपास ८ लाख ८८ हजार मेट्रिक टन गाळ काढून मुंबई बाहेरील क्षेपणभूमीवर नेण्यात येतो. या एकूण गाळापैकी ८० टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो. तर १० टक्के गाळ पावसाळ्यात आणि १० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जातो. यंदा मात्र गाळाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आधीपासूनच नालेसफाई वादात सापडली आहे.

यावेळी नालेसफाईवरून इतकी चर्चा का?

दरवर्षी नालेसफाईवरून टीका होतच असते. पण नेहमी पावसाळ्यात पाणी तुंबले की ही टीका सुरू होत असते. यंदा मात्र नालेसफाईच्या सुरुवातीपासूनच वाद सुरू झाला. यावेळी नालेसफाईच्या कामांना सुरुवातच उशिरा झाली. दोन वर्षांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांपैकी काही कंत्राटदारांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे आयत्या वेळी नव्याने निविदा मागवून कंत्राटदार नेमण्याची वेळ पालिकेवर आली. तरीही कोणीही कंत्राटदार पुढे येत नसल्यामुळे अखेर अनुभवाची अट काढून टाकण्यात आली. कुर्ला, मानखुर्द, देवनार, गोवंडी, चेंबूर या भागातील नालेसफाई मे महिना संपला तरीही झालेली नाही. नव्याने नेमलेल्या कंत्राटदारांनीही काम केले नाही. त्यामुळे अखेर बाजूच्या परिमंडळातील कंत्राटदारांना काम करण्याची विनंती करण्यात आली आहे. या सगळ्याचा परिणाम असा की मुंबईतील नाले गाळाने भरलेलेच दिसत आहेत.

कंत्राटदारांनी नकार का दिला?

गेल्या वर्षी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप भाजपने केले होते. त्या प्रकरणात पालिकेच्या काही कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. काही कंत्राटदारांना अटकही करण्यात आली. त्यामुळे या कंत्राटदारांनी यंदा नालेसफाईच्या कामांना सुरुवातच केली नाही. तर नव्याने नेमलेल्या कंत्राटदारांनाही जुने कंत्राटदार कामच करू देत नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे यंदा काही भागांमध्ये नालेसफाईच्या कामासाठी कंत्राटदारच नसल्याचे चित्र आहे.

सत्ताधाऱ्यांचे म्हणणे काय?

प्रथमच बहुमतात सत्तेत आलेल्या भाजपने यावेळी नालेसफाईवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत जशी कामे होत होती तशी आता चालणार नाहीत असा इशारा सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीला दिला होता. मात्र नालेसफाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनीही सावध उत्तरे दयायला सुरुवात केली आहे. पाणी तुंबणारच नाही असे म्हणता येणार नाही असे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांसमोर मान्य केले. तर स्थायी समितीमध्येही सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी नालेसफाई होत नसल्याचे वारंवार सांगितले आहे. तसेच आधीचे कंत्राटदार नालेसफाई होऊ देत नसल्याचे खापर फोडले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पालिका प्रशासनाबरोबरच सत्ताधाऱ्यांचीही कसोटी आहे.

indrayani.narvekar@expressindia.com-