मान्सून आला की मुंबईकरांची पहिली चिंता म्हणजे ठिकठिकाणी झाडे कोसळून होणारे अपघात. मंगळवारी (३० जून २०२६) शाळेच्या बसवर पडलेल्या झाडामुळे ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा वृक्ष दुर्घटनेत मृत्यू झाला. हा विद्यार्थी घाटला गाव, चेंबूर येथील रहिवासी होता. या घटनेत आश्चर्याची बाब म्हणजे त्या परिसरातल्या रहिवाश्यांनी कोसळलेल्या झाडाची वारंवार तक्रार करूनही तिथल्या अधिकाऱ्यांनी त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले, असा आरोप ११ व्या रस्त्याच्या रहिवाशांनी केला आहे. त्या ठिकाणी नेमके काय झाले आणि दर मान्सूनमध्ये झाड कोसळून अपघात का होतात हे जाणून घेऊया.
नेमके काय घडले?
चेंबूरच्या ११ व्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. शाळकरी मुलांची वाहतूक करणारी बस ‘युनिव्हर्सल स्कूल’मधील किमान १२ ते १३ विद्यार्थ्यांना सेवा उपलब्ध करत होती. दुपारी सुमारे साडेतीनच्या दरम्यान ही बस डायमंड उद्यान परिसरातील ११ व्या रोडवरून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेले पिंपळाचे जुने झाड अचानक बसवर कोसळले. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने बसमधील चालक, वाहक आणि अडकलेल्या १३ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बसचा मागचा भाग पूर्णपणे चिरडला गेला, त्यामुळे बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढणे गरजेचे होते.
जखमी विद्यार्थ्यांना चेंबूरमधील झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. दोन जखमी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे ‘सिटी स्कॅन’ करण्यात आले तर उर्वरित दोनपैकी एका विद्यार्थिनीला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. अन्य विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली. मात्र, विहान याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
मान्सूनमध्ये वृक्ष दुर्घटना का होतात?
वर्षभरात प्रदूषणामुळे आणि इतर बाबींमुळे सगळीकडे साचलेली धूळ पावसाळ्यात वाहून निघते. पाऊस पडला म्हणजे पावसाचे पाणी झाडे शोषून घेतात, मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच!
पाऊस पडल्यावर रस्त्यावरची ही मोठमोठी वृक्ष आपल्या मुळांमध्ये पाणी साठवून ठेवतात, त्यामुळे वर्षभर हिरवीगार दिसणारी वृक्ष वर्षभरासाठी गरजेपुरते पाणी साठवून ठेवतात. मात्र, जून-जुलैमधला मुसळधार पाऊस ज्यावेळी सुरू होतो, तेव्हा जमिनीतील आणि झाडाच्या मुळांमधील पाण्याचा हा अतिरेकच वृक्ष कोसळण्यास कारणीभूत ठरतो. याची मुख्य शास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत:
लुसलुशीत झालेली माती : झाडाची मुळे ही त्याचे मुख्य ‘अँकर’ असतात, जी झाडाला जमिनीत घट्ट पकडून ठेवतात. मुसळधार पावसामुळे जेव्हा माती, पाणी पूर्णपणे शोषून घेते (Supersaturated) तेव्हा ती अतिशय मऊ होते. अशा वेळी मातीची झाडाला धरून ठेवण्याची क्षमता संपते आणि मुळे मातीतून घसरू लागतात. अशा स्थितीत जर जोरदार वारा सुटला किंवा झाडाचा वरचा भाग (Canopy) अवाजवी वाढलेला असेल, तर वृक्ष आपला तोल गमावतो आणि मुळासकट उपटून कोसळतो.
मुळे कुजणे : ज्याप्रमाणे झाडा पानांना हवेची गरज असते, तसेच जमिनीत असणाऱ्या मुळांनाही ‘ऑक्सिजन’ची अत्यंत गरज असते. परंतु, सततच्या मुसळधार पावसामुळे जेव्हा मातीत पाणी साचून राहते, तेव्हा मुळांना मिळणारे ऑक्सिजन पूर्णपणे बंद होते. यामुळे झाडाची मुळे जमिनीतच गुदमरून मरू लागतात आणि काळी पडून कुजतात. वरून हिरवागार दिसणारा वृक्ष आतून आणि खालून पूर्णपणे पोकळ झालेला असतो. अशा वेळी किरकोळ वादळात किंवा पावसाच्या सरीनेही ही अजस्र वृक्षे अचानक कोसळतात.
शहरांमधील काँक्रिटीकरण आणि झाडांची छाटणी : मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्यांच्या आणि फुटपाथच्या काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या मुळांना पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. तसेच, अनेकदा रस्त्याच्या बाजूची जुनी झाडे एका बाजूने जास्त झुकलेली असतात. पावसाळ्यात जेव्हा या झाडांवर पाण्याचे वजन वाढते, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे ती कमकुवत झालेली झाडे थेट रस्त्यावर कोसळतात.
परदेशी किंवा अ-स्थानिक झाडांची लागवड : मुंबईत मोठ्या प्रमाणावर गुलमोहर, रेन ट्री (Rain Tree), स्पॅथोडिया (Spathodea) आणि ट्रम्पेट ट्री यांसारखी परदेशी झाडे लावण्यात आली आहेत. येथील हवामान आणि भौगोलिक परिस्थितीशी ही झाडे जुळवून घेऊ शकत नाहीत. पावसाळ्यात मुळांमध्ये जास्त पाणी साचल्यामुळे ही झाडे स्वतःच्या फांद्या आणि खोडांमध्ये पाण्याचे अन्नघटक समान प्रमाणात वाटून घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे ती कमकुवत होऊन लवकर पडतात.
कंत्राटदारांची अशास्त्रीय छाटणी : मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून झाडांची छाटणी करण्यासाठी जे कंत्राटदार नेमले जातात, ते कोणत्याही शास्त्रीय ज्ञानाशिवाय झाडे कापतात. एका बाजूने अवाजवी छाटणी केल्यामुळे झाडाचा मूळ आकार आणि तोल बिघडतो. परिणामी, सोसाट्याचा वारा सुटल्यावर ही झुकलेली झाडे थेट रस्त्यावर कोसळतात.
जाहिरातींचे फलक आणि केबल्सचा ताण : शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या खोडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे बॅनर्स, फलक किंवा केबल्स अडकवल्या जातात. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) च्या आदेशानुसार झाडांचा असा वापर करण्यास सक्त मनाई आहे, तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. हे खिळे झाडाला आतून सडण्यास कारणीभूत ठरतात.
धोक्याची घंटा कशी ओळखावी?
आपल्या परिसरातील एखादा वृक्ष धोकादायक झाला आहे का, हे ओळखण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे:
- झाडाच्या मुळांभोवतीची माती वर उचलली गेली असल्यास (Soil Buckling), याचा अर्थ मुळे आपली पकड सोडत आहेत.
- झाड अचानक एका बाजूला जास्त झुकलेले दिसते.
- झाडाच्या खोडाच्या अगदी खालच्या भागावर बुरशी किंवा छत्रीसारखे भूछत्र (Mushrooms) उगवले असल्यास, ते झाड आतून कुजत असल्याचे लक्षण असते.
उपाय काय?
बुंध्याभोवतीचे काँक्रीट काढणे: झाडाच्या खोडाला किंवा बुंध्याला यंत्रांमुळे कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी झाडाच्या तळाभोवती असलेले काँक्रीट हातानेच काढले पाहिजे.
वाहिन्यांच्या जोडण्या लांब ठेवणे : विविध नागरी सुविधांचे (उदा. केबल्स, गॅस पाईपलाईन) जंक्शन बॉक्सेस आणि जॉइंट्स झाडांपासून काही अंतरावर बसवले पाहिजेत, जेणेकरून तिथे वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे झाडांच्या मुळांना धक्का बसणार नाही.
२x२ मीटरचा झाडाचा कप्पा (Basin) तयार करणे : झाडाला जमिनीत भक्कम पकड मिळावी, तसेच पाणी आणि पोषक घटक जमिनीत नीट मुरावेत यासाठी झाडाच्या बुंध्याभोवती २ बाय २ मीटरचा मातीचा कप्पा तयार केला पाहिजे.
पुरेशी माती असणे : झाडाच्या मुळांना जमिनीमध्ये खोलवर पसरता यावे, यासाठी झाडाच्या कप्प्यामध्ये (Basin) पुरेशी आणि सुपीक माती असणे गरजेचे आहे.
सच्छिद्र काँक्रीटचा वापर : शहरातील रस्त्यांचे खोदकाम किंवा बांधकाम करताना सच्छिद्र काँक्रीटचा वापर केला पाहिजे, जेणेकरून पावसाचे पाणी जमिनीत सहज झिरपू शकेल.
शास्त्रीय पद्धतीने छाटणी : झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतींचा वापर केला पाहिजे आणि या कामासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली पाहिजे.
स्थानिक झाडांची लागवड : मुंबईत अर्जुन, पिंपळ, करंज, पेलटोफोरम, अमलतास (बहावा), आंबा आणि जांभूळ यांसारखी स्थानिक झाडे लावली पाहिजेत, कारण ही झाडे पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा ताण सहज सहन करू शकतात.
चेंबूरमधील विहान श्रीवास्तव या निष्पाप अकरा वर्षांच्या बालकाचा मृत्यू ही केवळ एक नैसर्गिक दुर्घटना नाही, तर ती महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा पुरावा आहे. स्थानिक रहिवाशांनी वारंवार केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हे ‘झाड संवर्धन कायद्याचे’ (Tree Preservation Act) थेट उल्लंघन आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक मुंबईकर आपल्या मालमत्ता करासोबत (Property Tax) तब्बल ०.०५% ‘ट्री सेस’ (वृक्ष कर) भरत असतो. या माध्यमातून महापालिकेच्या ‘ट्री अथॉरिटी’कडे दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा निधी जमा होतो. जर निधी आणि संसाधनांची कमतरता नाही, तर मग शहरातील झाडांच्या देखभालीसाठी हा पैसा का वापरला जात नाही? हा खरा प्रश्न आहे.
पावसाळ्यापूर्वी केवळ नावाला किंवा दाखवण्यापुरतं झाडांची अवाजवी छाटणी करण्याऐवजी, महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील जुन्या, झुकलेल्या आणि अंतर्गत आजारांमुळे कुजलेल्या झाडांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (संरचनात्मक परीक्षण) करणे गरजेचे आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) च्या आदेशानुसार रस्त्यांवरील झाडांभोवतीची १ मीटरची जागा तातडीने काँक्रीटमुक्त करणे आणि केवळ पावसाचा ताण सहन करू शकणारी स्थानिक झाडे लावणे हाच यावर कायमस्वरूपी उपाय आहे. तरच भविष्यात अशा ‘वृक्ष दुर्घटना’ टळू शकतील आणि विहानसारख्या निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी थांबतील. अन्यथा, प्रत्येक मान्सून मुंबईकरांसाठी अशीच एक नवी भीती आणि जीवघेणी चिंता घेऊन येत राहील.
