Mumbai murder case: गुन्हेगारी तपास म्हटला की दीर्घ चौकशी, वैज्ञानिक पुरावे, फोन रेकॉर्ड, फॉरेन्सिक अहवाल आणि तासन्तास चालणारे जाबजबाब… असेच चित्रं डोळ्यासमोर येते. मात्र मुंबई पोलिसांना एका तपासात खुनाची कबुली पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात नव्हे, तर चक्क महामार्गावरील एका ढाब्यावर मिळाली! तीही योगायोग, मानसिक दबाव आणि अपराधीपणाच्या भीतीमुळे!
ही घटना २०१२ सालातील असून, दक्षिण मुंबईतील हकीम खंबाती यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित आहे. खंबाती हे लॅमिंग्टन रोडवरील एका इमारतीचे मालक होते. २००९ मध्ये ती इमारत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता आणि हा प्रकार शहरभर चर्चेत राहिला. त्यानंतर तीन वर्षांनी, २०१२ मध्ये खंबाती अचानक बेपत्ता झाले.
सुरुवातीला पोलिसांना हे अपहरण आहे की हत्या, हे स्पष्ट होत नव्हते. मात्र खंबाती यांच्या मोबाईल फोनचा शेवटचा सिग्नल वसईजवळील चारोटी नाका येथे आढळला. या तांत्रिक माहितीनंतर पोलिसांनी परिसराची झडती घेतली आणि तेथे कुजलेल्या अवस्थेत खंबाती यांचा मृतदेह सापडला. ओळख पटताच हे स्पष्ट झाले की खंबाती यांची हत्या झाली होती.
संशयाची सुई लवकरच इरफान युनूस नमकवाला याच्याकडे वळली. खंबाती आणि नमकवाला यांच्यात मालमत्तेच्या पुनर्विकासावरून वाद सुरू होता. युसूफ मंझिल या इमारतीच्या पुनर्विकासासाठी अधिकार मिळवणे, हाच वादाचा केंद्रबिंदू होता. मात्र पोलिसांहाती कोणतेही ठोस पुरावे नव्हते, ना प्रत्यक्षदर्शी, ना स्पष्ट फॉरेन्सिक साखळी होती.
तपास रखडत चालल्यावर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मानसिक दबावावर आधारित एक डावपेच आखला. नमकवालाला मृतदेह सापडलेल्या ठिकाणी नेण्याचा निर्णय घेण्यात आला, या आशेने की प्रवासादरम्यान त्याच्या वागण्यात काही बदल दिसेल.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जात असताना पोलिसांनी मध्येच जेवणासाठी अचानक थांबण्याचा निर्णय घेतला. अचानक निर्णय झाल्याने पोलिसांनी भाईंदरजवळच्या ‘किनारा ढाबा’ निवडला आणि तिथे गाडी थांबवली. याच क्षणी पोलिसांसाठी अगदीच अनपेक्षित अशी घटना घडली. ढाब्यावर पोहोचताच नमकवाला घाबरून गेला. त्याचा चेहरा फिकट पडला, देहबोली बदलली… त्याच्यामध्ये अचानक झालेले हे बदल पाहून पोलीस सुरुवातीस चक्रावले आणि लगेचच सावध झाले.
नमकवालाला जे वाटले, ते प्रत्यक्षात चुकीचे होते. त्याला असे वाटले की, पोलिसांना माहिती आहे की खून केल्यानंतर तो आणि त्याचे साथीदार याच ढाब्यावर जेवायला थांबले होते. पोलिसांनी त्याला मुद्दामहून त्याच ठिकाणी जेवणाच्या निमित्ताने थांबवले, असा त्याचा समज झाला. भीती आणि अपराधभावनेच्या ओझ्याखाली नमकवालाने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांकडे दिली. पोलीस तपासातील ‘हुशारी’चे कौतुक करत, त्याने सांगितले की, तीन जणांनी मिळून खंबाती यांची हत्या केली होती.
पोलिसांनी सांगितले की, खरे तर ते प्रत्यक्षात मनोर येथील दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवणार होते, पण सर्वांनाच भूक लागल्याने शेवटच्या क्षणी योजना बदलली. कबुलीनंतर उघड झाले की, खून केल्यानंतर आरोपींनी पॉवर ऑफ अॅटर्नीची बनावट कागदपत्रे तयार केली होती, ज्यायोगे युसूफ मंझिलच्या पुनर्विकासाचे अधिकार असल्याचा बनाव त्यांना रचता आला.
२०१२ मध्ये नमकवालासह मोहम्मद अन्सारी आणि अहमद सोरथिया यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भादंवि कलम ३०२, ३६५, २०१, ४६५, ४२०, ५०६ यांसह गंभीर गुन्हे दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया मात्र दीर्घ काळ चालली. २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने नमकवालाला जामीन दिला. २०१८ मध्ये सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने त्याच्यावर अटक वॉरंट काढण्यात आले. २०१९ मध्ये पुन्हा जामीन मंजूर झाला, मात्र मुंबईबाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयातून सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. खून उघड झाला एका ढाब्यावर, पण न्याय मिळण्याची प्रक्रिया आजही अपूर्ण आहे!
