ठाणे जिल्हा आणि पुढे नाशिकपर्यंतच्या वाहतूकीसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु झाले आहे. राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना अनेक वर्षे छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार होता. या काळात भुजबळ यांनी मुंबई-नाशिक महामार्गाचे रूपच पालटून टाकले होते. ठाण्यापासून नाशिकपर्यंतचा प्रवास ही एकेकाळी सुखाची सफर मानली जायची. हे चित्र गेल्या दशकभरात मात्र पालटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे या महामार्गावरील एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम वेगाने सुरू झाले असले तरी समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुरू होताच माजिवडा ते वडपे या विस्तीर्ण महामार्गाला वाहनांचा अतिरिक्त भार सोसवेल का हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे.

माजिवडा ते वडपे प्रकल्पाचे महत्त्व काय आहे?

मुंबई-नाशिक महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होते. उरण, जेएनपीटी येथून गुजरात, भिवंडी किंवा नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही याच मार्गावरून वाहतूक करावी लागते. तसेच कल्याण, भिवंडी येथून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांचीही वाहतूक या मार्गाने होत असते. महामार्गावरील माजिवडा ते वडपे भागात अनेक ठिकाणी रस्ता अरुंद होतो. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. परंतु प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडू लागतात. अनेकदा या मार्गावर अपघात झाले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा…अमेरिकी शिष्टमंडळाची दलाई लामा भेट चीनला इतकी का झोंबली?

प्रकल्प नेमका कसा आहे?

माजिवडा ते वडपे असा सुमारे २४ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हा मार्ग दुरुस्त करणे शक्य होत नसल्याने २०२१ मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यानुसार, मागील चार वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मुख्य चार पदरी रस्त्याचे रुंदीकरण आठ पदरी मार्गिकेत होणार आहे. तसेच आणखी दोन-दोन पदरी सेवा रस्तादेखील असणार आहे. त्यामुळे सेवा रस्ता आणि मुख्य मार्गिका मिळून एकूण १२ पदरी मार्गिका वाहन चालकांना उपलब्ध होणार आहे. यातील ६० टक्के काम पूर्ण झाले असून वर्षभरात उर्वरित मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे.

प्रकल्प का रखडला?

मुंबई-नाशिक महामार्ग हा मुंब्रा बाह्यवळण, घोडबंदर-माजिवडा मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, भिवंडीतील अंतर्गत रस्त्यांना जोडतो. ठाणे शहरात विविध रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिकांच्या निर्माणाची कामे सुरू होती. या कामांमुळे अनेकदा वाहतूक बदल लागू करावे लागले होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढत होता. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांसाठी लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठी देश आणि राज्यभरातील नेते जिल्ह्यात आले होते. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी करण्यात आलेले वाहतूक बदल तसेच मतदानाच्या दिवशी अनेक कामगार गावी जाणे अशा विविध कामांमुळे हा प्रकल्प रखडला होता.

हेही वाचा…ह्युंदाई मोटर इंडियाचा ‘महा-आयपीओ’ कसा असेल? देशात आजवरचा सर्वांत मोठा ठरणार?

प्रकल्पाच्या व्याप्ती किती आणि अडचणी काय?

प्रकल्पाची कामे ६० टक्के पूर्ण झाले असून नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर ८.४३ किमी लांबीचे काम तर मुंबई नाशिक महामार्गावरील १०.७५ किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. काही काँक्रिटच्या भागातील रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील कोंडीत घट झाली आहे. या मार्गावर येवई, वालशिंद, सोनाळे, सरवली, पिंपळास, ओवळी, दिवे आणि खारेगाव येथे भुयारी मार्गिका आहेत. हे सर्व भुयारी मार्ग सुमारे अर्धा ते एक किलोमीटर अंतराचे आहेत. या मार्गिकांची कामे पुढील वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत. तर खारेगाव पुलाचे ६२ टक्के, साकेत पुलाचे ६९ टक्के, भिवंडी येथील रेल्वे पुलाचे ३० टक्के आणि वडपे उड्डाणपुलाचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहेत. ही कामेदेखील एप्रिल २०२५ पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. यातील साकेत आणि खारेगाव उड्डाणपुलाचा काही भाग खाडीवरून जातो. त्यामुळे या भागात काम करण्याचे मोठे आव्हान महामंडळासमोर आहे.

हेही वाचा…पूनम पांडे, दु:खाचे भांडवल आणि लक्ष वेधण्याचा प्रकार; ‘सॅड फिशिंग’बाबतचे नवे संशोधन काय सांगते?

समृद्धी मार्गिकेवरील वाहनांचा भार पेलणार कसा?

माजिवडा – वडपे या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हाच मार्ग समृद्धी महामार्गाला जोडणारा ठरेल. माजिवडा ते वडपे मार्गिका रुंद होणार असली तरीही पूर्व द्रुतगती महामार्गावरील माजिवडा ते कोपरी आनंदनगर हा मार्ग तुलनेने अरुंद आहे. या मार्गावर घोडबंदर, ठाणे, मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांचा भार येतो. त्यात समृद्धी महामार्गाचा भार वाढल्यास पूर्व द्रुतगती मार्गाच्या वाहनांचा भार पुन्हा माजिवडा, साकेत पूलाच्या भागात येण्याची शक्यता आहे.