कमाल तापमानात वाढ
यंदा मुंबईतून मान्सूनने माघार घेण्याअगोदरच सप्टेंबरच्या अखेरीस उकाडयात वाढ झाली. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबईत तीनदा उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद झाली. सध्या मुंबईत उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम असून शहर आणि उपनगरातील कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी अधिक नोंदले जात आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे सरासरी तापमानाहून ४.९ अंशांनी अधिक होते. कमाल तापमानात आठ वर्षांनी वाढ झाली असून सांताक्रूझ येथील मागील ७५ वर्षांच्या हवामान नोंदींनुसार हे ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान आहे. हवामानात होणारे बदल नेमके कशामुळे होत आहेत, असा प्रश्न सध्या मुंबईकरांना पडला आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उष्णेतच्या लाटा
मुंबई मान्सूनने माघार घेतली की हळूहळू कमाल तापमानात वाढ होते. मात्र, यंदा मान्सूनने माघार घेण्याअगोदरच उकाड्यात वाढ झाली. मुंबईसह निम्म्या राज्यातून ३ ऑक्टोबर रोजी मान्सूनने माघार घेतली. त्याआधी २ ऑक्टोबर रोजी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली जे सरासरी कमाल तापमानाहून ५.६ अंश सेल्सिअसने अधिक होते. त्यामुळे ऑक्टोबरच्या कमाल तापमानात ४८ वर्षांनी वाढ नोंदली गेली तर आठ वर्षांनी कमाल तापमान ३७ अशांवर पोहोचले. तसेच ६ ऑक्टोबर रोजी कुलाबा केंद्रात २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. (सरासरीहून २.७ अंशांनी अधिक) त्यामुळे दशकभराने किमान तापमानात वाढ नोंदली जाऊन मागील ५७ वर्षातील हवामान नोंदीनुसार, हे सर्वाधिक चौथ्या क्रमांकाचे किमान तापमान आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये सरासरीहून अधिक कमाल तापमान राहील, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे.
उष्णतेची तीव्रता वाढण्याचे कारण काय ?
हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार, मुंबईजवळील प्रति-चक्रवात स्थिती आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या समुद्रावरून येणारे थंड वारे शहरात पोहोचण्यास अधिक कालावधी लागत आहे. चक्रीवादळामुळे वादळ आणि मुसळधार पावसाची नोंद होते तर प्रति चक्रवात स्थितीमुळे तसेच निरभ्र आकाश आणि कोरड्या वाऱ्यांमुळे उष्णेतची तीव्रता अधिक जाणवते. मुंबईत ऑक्टोबरमध्ये उकाडा वाढणे ही स्थिती सामान्य असली तरीही कोरडे वारे, दमट आणि उष्ण वातावरणामुळे मुंबईकरांना सध्या तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. शहरात आणि उपनगरात दीर्घकाळ ही स्थिती राहिल्यास नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते.
तीव्र हिवाळ्यातही उकाडा?
मुंबईत यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक जाणवू लागले आहे. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे यंदा तीव्र उन्हाळ्याचा सामना मुंबईकरांना करावा लागला. तसेच दीर्घ काळ उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद होऊन तापमानाचा पारा ४० अशांवर पोहोचला होता. मान्सूनमध्ये नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईत उकाडा लक्षणीय वाढला आहे. सध्या पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता इतिहासातच प्रथमच लक्षणीय वाढली असून समुद्रपृष्ठाचे तापमान ३० अंशावर पोहोचले आहे. जे सरासरीहून ३.४ अंश सेल्सिअसलने अधिक आहे. डिसेंबरपर्यंत ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता आणखीन वाढण्याचा अंदाज असून त्यामुळे यंदा हिवाळ्यात मुंबईसह राज्यातही उकाडा अधिक जाणवेल, असा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत.
siddharth.mhatre@expressindia.com
