Amar Naik Mumbai Underworld: १९८० आणि ९० च्या दशकात मुंबई शहर संघटित गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले होते. प्रत्येक दिवसआड रक्तपात ठरलेला. दाऊद, गवळी आणि अमर नाईक या प्रमुख टोळ्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी टिपून स्वत:चे महत्त्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होत्या. दाऊदने दुबईत आसरा घेतला तर गवळी आणि नाईक टोळीतील संघर्ष वाढत चालला होता. टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्षाने दादर ते चिंचपोकळीचा परिसर हादरवून सोडला होता.

गवळीची नजर हा जसा तेव्हा चर्चेचा विषय होता, तसा अमर नाईकच्या क्रूरतेबद्दलही गुन्हेगारी जगतात बोलले जात होते. कदाचित त्यामुळेच अमर नाईकने गुन्हेगारी जगतात ‘रावण’ हे नाव धारण केले असावे.

स्थानिक गुंडांच्या टोळ्या

दाऊदशी दोन हात करण्यात जसा अरुण गवळी आघाडीवर होता, तसे अमर नाईकनेही दादर-परळ विभागात दाऊदला आव्हान निर्माण केले होते. गवळी टोळीशीही त्याची कट्टर दुश्मनी होती. दादर-परळ भागात या दोन टोळ्यांची मक्तेदारी होती. त्यातच स्थानिक गुंडांच्या टोळ्या होत्याच. ॲंटाप हिलमधील पोत्या ठाकूर वा दादरमधील पोत्या ऊर्फ सुहास भाटकर यांच्या तसेच माटुंगा येथील पूर्वीच्या बादल-बिजली-बरखा चित्रपटगृहामागील वस्तीतील वालजी पालजी या बंधूंची टोळी यांची दादागिरीही होती. त्यामुळे तलवारी, चॅापर घेऊन वावरणारे बिनधास्तपणे खुलेआमपणे हप्तेवसुली करीत होते.

प्लाझा परिसरात अमरची भाईगिरी

अमरचे कुटुंबीय दादर पश्चिम येथील न. चिं. केळकर मार्गावरील पाटील हाऊसमध्ये राहत होते व दादर मार्केटमध्ये भाजी विक्री करुन गुजराण करीत होते. अमरचा जन्म साधारण १९६१-६२ मधील. अमरचा मोठा भाऊ अजित हा वडील मारुती नाईक यांना मदत करीत होता. अमर आणि अश्विन हे तेव्हा शिकत होते. अमर प्रचंड रागीट होता. अमर आणि अश्विन या दोघांचे शिक्षण वडिलांना झेपेनासे झाले. त्यातच अश्विन प्रचंड हुशार होता. त्या तुलनेत अमर अभ्यासात साधारण. त्यामुळे अमरला अर्धवट शिक्षण सोडून मोठ्या भावासोबत दादरमधील भाजीच्या गाडीवर काम करावे लागले. भवन्स महाविद्यालयात अमरने आर्टस् मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. भाजी विक्री करीत असतानाच प्लाझा चित्रपटगृह परिसरात अमरची भाईगिरी सुरु होती.

Amar Naik Mumbai Underworld gangster profile photo | Arun Gawli Amar Naik Gang War in Dadar | अमर नाईक मुंबई अंडरवर्ल्ड रावण इतिहास | अरुण गवळी आणि अमर नाईक टोळीयुद्ध मुंबई
मुंबई अंडरवर्ल्डचा कुख्यात गँगस्टर अमर नाईक (Image- Gemini)

अमरविरुद्ध पहिला गुन्हा

१९७० च्या दशकात दादर भागात संतोष ठाकूर ऊर्फ पोत्या ठाकूर टोळीचा दबदबा होता. भाजी मार्केटमध्ये येऊन पोत्याचे गुंड भाजीवाल्यांकडून जबरदस्तीने हफ्ता वसूल करायचे. अमरने भाजी विकायला सुरुवात केली, तेव्हा त्याचे वय अंदाजे १४-१५ वर्षे होते. त्याने हफ्ता द्यायला नकार दिला. सुरुवातीला त्याला गुंडांचा मार खावा लागला. एकदा हफ्ता वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी अजितला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा अमरने भाजी कापण्याच्या सुरीने त्या गुंडांवर हल्ला केला. हाच अमरविरुद्ध पोलीस ठाण्यातील पहिला गुन्हा असावा.

पोत्याच्या विरोधात दंड थोपटले

हफ्ता द्यायला विरोध होऊ लागल्याने पोत्याचा राग अनावर झाला. त्यातच अमरला पोलिसांनीही त्रास द्यायला सुरुवात केली. चौकशीच्या नावाने त्याला पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण करणे, तासनतास बसवून ठेवणे असे प्रकार घडू लागले. अमरने भावावरील अत्याचार रोखण्यासाठी गुंडांवर प्रतिहल्ला केला. पण पोलीस मात्र तोच गुन्हेगार असल्यासारखे त्याला वागवत होते. त्यानंतर अमरने पोत्याला धडा शिकवायचे ठरवले. काही मित्रांना सोबत घेऊन टोळी तयार केली आणि थेट पोत्याच्या विरोधात दंड थोपटले. पोत्याला दादरच्या भाजी मार्केटमधून हफ्ता मिळणे बंद झाले.

अश्विनचे अपहरण

अमरने मार्केटवर दबदबा निर्माण केला. ज्यासाठी पोत्या टोळीशी दोन हात केले होते, तीच पद्धत अमरने अंगीकारली होती. अशा पद्धतीने त्याचा गुन्हेगारी जगतात प्रवेश झाला. पोत्याचा अमरवरील राग अनावर झाला होता. त्यामुळे पोत्याने अमरचा लहान भाऊ अश्विनचे (जो महाविद्यालयात शिकत होता) अपहरण करुन अमरला शरण यायला सागितले. अश्विनचा यात काहीही संबंध नव्हता. ना तो भावांसोबत भाजी विकायचा वा अमरच्या कामाशी त्याचा काही संबंध होता. पण तरीही पोत्या टोळीने त्याचे अपहरण केले.

मटक्याच्या अड्ड्यांवर हल्ले

परंतु प्रसंगावधान राखून अश्विन पोत्याच्या तावडीतून निसटला आणि घरी आला. पण अमरने मात्र पोत्याला धडा शिकविण्याचे ठरविले होते. अमरने बेसावध असलेल्या पोत्या टोळीतील गुंडांवर जोरदार हल्ला केला. ‘मटका’ हा पोत्या टोळीचा प्रमुख आर्थिक स्रोत होता. अमरने मित्रांसोबत पोत्या टोळीच्या मटक्याच्या अड्यांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. त्यामुळे पोत्या टोळीचे आर्थिक गणित बिघडले आणि अमरने बस्तान बसवायला सुरुवात केली.

दादर ते चिंचपोकळी अमरची दहशत

प्रभादेवी परिसरात प्रचंड दहशत असलेल्या वालजी पालजी टोळीसोबत अमरने युती केली. अमरच्या टोळीत किमान दोनशे तरुण होते. मटका, दारु अड्ड्यांवरील वसुलीपलीकडे अमर नाईकने हातपाय पसरले होते. तस्करीचा ऐवज उतरवून घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ अमर पुरवित असे. त्यातून त्याने अमाप पैसा कमावला. गिरगावातील क्रांतीनगरातील कट्टर गुंड दशरथ रहाणे याच्यासोबतही त्याने युती करीत दादर, परळ, वल्लभभाई पटेल रोड परिसरात खंडणीचे जाळे पसरविले. १९८० चे दशक सुरू झाले तोपर्यंत अमर नाईकने गुन्हेगारीत चांगलाच जम बसवला होता. दादरपासून चिंचपोकळीपर्यंत अमरने दहशत पसरवली होती. त्याच्या परवानगीशिवाय, त्याला विचारल्याशिवाय कोणतीही सार्वजनिक कामे होत नव्हती.

पापा गवळी व अमर नाईक त़डजोड

या काळात अमरला तुरुंगवारीही घडली. १९८३ मध्ये पोत्या ठाकूरसमवेत आर्थर रोड तुरुंगात असताना अमरवर अरुण गवळीने ब्लेडने हल्ला केला. हीच त्या दोघांची पहिली झटापट. दाऊद टोळीपासून फारकत घेतल्याने गवळीकडे शस्त्रसाठा नव्हता. शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी सुरुवातीला गवळी टोळीने अमरशी जुळवून घेतले. अरुण गवळीचा भाऊ पापा गवळी आणि अमर नाईकमध्ये तडजोड होऊन परस्परांच्या साथीदारांना न मारणे, एकमेकांच्या हद्दीत वसुली न करणे आणि शस्त्रास्त्र पुरविण्याबाबत एकमत झाले. १९९३ मध्ये गवळी टोळीकडून सुनील घाटीची हत्या झाली आणि संघर्षाची पुन्हा ठिणगी पडली.

सुनीत खटावची हत्या

सूड म्हणून अमर नाईकने कांती नाहरची हत्या केली. त्यापाठोपाठ गवळी टोळीने अश्विन नाईकचे सासरे हरकिशन जेटली व गेंड्या मामाची हत्या केल्यानंतर दोन टोळ्यांमध्ये कमालीचा संघर्ष सुरु झाला. गवळीचा जवळचा साथीदार तान्या कोळीला ठार मारुन अमरने सूड घेतला. गवळीने अमरच्या अब्दुल शेख, सुहास नाईक, बाबुभाई शाह यांना ठार करुन अमरला धक्का दिलाच. पण थेट अश्विनवरच हल्ला करून त्याला अपंग केल्यानंतर अमरने गवळीचा मुख्य आर्थिक आधार खटाव मिलचा मालक सुनीत खटाव याची महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या सिग्नलवर झालेल्या निर्घृण हत्या केली. या हत्येचे पडसाद बराच काळ उमटले होते.

खटावची हत्या हा मोठा धक्का

खटावला मिल बंद झाल्यानंतर ती जागा विकायची होती. पण त्यासाठी कामगार संघटनाकडून परवानगी मिळत नव्हती. त्यावेळी हरिभाऊ नाईक राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष होते. खटावने ही जबाबदारी अरुण गवळीवर सोपवली होती. गवळीने हरिभाऊ नाईक यांच्या जागेवर शंकरराव जाधव यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणले. खटावला हवी तशी परिस्थिती निर्माण केली. मिल कामगारांचे पुनर्वसन बोरिवली येथील जागेत करण्यासाठी कामगारांची संमती मिळविण्याचे कामही गवळी टोळीने फत्ते केले. खटाव मिलची जागा विकली गेली की, त्यातून गवळीला त्या काळात कोट्यवधी रुपये मिळणार होते. त्यामुळे तो अधिक शक्तिशाली बनला असता, याची जाणीव असलेल्या अमरने सुनीत खटावला ठार मारले. खटावची हत्या गवळीसाठी मोठा धक्का होता.

अमरने शिवसेनेसाठी काम सुरू केले

१९८५ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत दादर-चिंचपोकळी भागातून शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात पारशी उमेदवार उभा ठाकला होता. या उमेदवाराला अमर नाईकने पाठिंबा दिला. त्यावेळी या परिसरात शिवसेना उमेदवाराची एकही सभा होऊ शकली नाही वा प्रचारही करता आला नाही, इतकी अमरची दहशत होती. पारशी उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरु होता. त्याने अमरला मोठी रक्कम दिली होती. तरीही त्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार निवडून आला. त्यानंतर अमरने शिवसेनेसाठी काम करायला सुरुवात केली.

आणि अमर ‘रावण’ झाला…

अमरच्या क्रौर्याच्या कहाण्या त्यावेळी ऐकू येत होत्या. डी एन नगरमधील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करुन त्याला तब्बल आठ-दहा दिवस माहिममधील एका झोपडीत ठेवले होते. त्याची चॅापरने वार करुन हत्या करण्यात आली व मृतदेह भायखळ्यातील एस ब्रिजजवळ टाकण्यात आला. खंडणीची सर्व रक्कम अमर स्वत:च ठेवायचा. साथीदारांना तुरळक रक्कम द्यायचा. कुणी आवाज उठवला तर त्याची हत्या करायला मागेपुढे पाहायचा नाही. अशा पद्धतीने अनेक साथीदारांची त्याने हत्या केली. कदाचित त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात ‘रावण’ हे नाव पडले असावे.

पेजरचा वापर

अमर बिनधास्तपणे कुठेही वावरायचा. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. पेजरचा जमाना होता. अमरकडे अर्थात पेजर होता. मात्र सार्वजनिक दूरध्वनी केंद्राचा वापर करुन तो बोलायचा. त्याचा आवाज इतका हळूवार होता की, समोरच्याला तो काय बोलतोय हेही कळायचे नाही. पेजरवर साथीदारांना संदेश यायचे व संदेशाच्या शेवटी लिहिलेले असायचे ‘रावण’. त्याची साथीदारांना भेटण्याची ठिकाणे म्हणजे माहीम, दादर, रुईया कॅालेज, शिवाजी पार्क अशी असायची. प्रत्यक्ष भेटून तो हत्येची सुपारी द्यायचा. अमरने मुंबईतील प्रत्येक परिसरात आपले साथीदार नेमले होते. तो धुमकेतुसारखा उगवायचा आणि तसाच गायब व्हायचा.

एलटीटीईसोबत काम

हुशार व चलाख असलेल्या अमरकडे प्रभू कृष्णानाथ शिंदे, जयवंत हनुमंतराव पायगुडे, अजय बाफना या नावे भारतीय पासपोर्ट होते. छायाचित्र अमरचे, नाव मात्र भलतेच. पोलिसांच्या भाषेत याला मुंडीकट पासपोर्ट म्हटले जायचे. या पासपोर्टद्वारे तो म्हणे सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक, सन फ्रान्सिस्को, वॅाशिंग्टन, शिकागो, न्यूयॅार्क, बोस्टन, फ्रँकफर्ट आदी परदेशातील शहरे फिरला होता. अमेरिकेत तो वर्षभर राहिला होता. अमरने पठाणांशी संबंध वाढवून अमली पदार्थांच्या धंद्यात पाय रोवायला सुरुवात केली. श्रीलंकेतील अतिरेकी संघटना ‘लिबरेशन ॲाफ तमिळ इलम’च्या (एलटीटीई) संपर्कात जाऊन तेथे नेटवर्क तयार केले आणि हत्यारांच्या तस्करीला सुरुवात केली.

कुमार पिल्ले अमरसाठी काम करू लागला

मुंबईत राहून अमर नाईक हा एकाच वेळी अफगाणिस्तानातल्या पठाणांसोबत आणि श्रीलंकेतल्या एलटीटी सोबत काम करत होता. विक्रोळीतील क्लब चालक कृष्णा पिल्ले याने याबाबत अमरला मदत केली. शेवटपर्यंत कृष्णा पिल्ले व नंतर त्यांचा मुलगा कुमार पिल्ले अमरशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. उच्चशिक्षित कुमार वडिलांच्या हत्येमुळे सूडाने पेटला व अमरने त्याला मदत केली. बोरिवलीत नगरसेवक लालसिंग चौहान, झुणझुणवाला महाविद्यालयातील प्रा. अरुण सिंग या हत्या म्हणजे कृष्णा पिल्लेच्या हत्येचा बदला. त्यानंतर कुमार अमरसाठी काम करु लागला.

अत्याधुनिक हत्यारे वापरणारी टोळी

अमर नाईक तमिळ दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्याकडे त्यावेळची आधुनिक हत्यारे असायची. तोपर्यंत दाऊदच्या गुंडांकडे ‘एके ४७’ दिसायला लागली होती. पण अमरकडे त्याही पेक्षा आधुनिक इस्रायली आणि जर्मन बनावटीची रिव्हॉल्वर्स आणि हत्यारे असायची. त्यामुळे १९८० च्या दशकातच अमर नाईक आणि त्याची टोळी ही सर्वात अत्याधुनिक हत्यारे वापरणारी टोळी म्हणून ओळखली जाऊ लागली. १९९० चे दशक सुरु होईपर्यंत अमरकडे मोठ्या प्रमाणात माया गोळा झाली होती. अत्याधुनिक हत्यारांचा वापर करुन अमरने आपल्या टोळीची दहशत निर्माण केली होती.

पोलिसांना चकवा

वेळ पडली तर तो पोलिसांवरही गोळ्या चालवायला कमी करणार नाही, असेच अमरबाबत बोलले जायचे. अमरचा कोणावरही विश्वास नव्हता. टोळीपासून तो स्वतंत्र राहायला लागला. एकट्याने तो नियोजन करीत असे. टोळीतील एक सदस्य पकडला गेला तरी आपण पकडले जाऊ शकतो, अशी भीती त्याला नेहमी वाटत असे. त्यामुळे तो प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पद्धतीने वावरायचा. कधी डोक्यावरील केस कमी करणे वा दाढी वाढवणे वा दाढी मिशी काढून टाकणे असे अनेक प्रकार त्याने केले. प्रत्येक वेळी तो वेगळ्याच वेशात वावरायचा. त्यामुळे काही वेळा त्याने पोलिसांना चकवाही दिला.

मेकओव्हरमध्ये माहीर अमर नाईक

राकेश मारीया हे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त होते तेव्हा अमरला अटक करण्याची संधी चालून आली होती. परंतु संबंधित अधिकांऱ्यांच्या ढिसाळ पद्धतीमुळे तो निसटला व अधिक सतर्क झाला. अमर ज्या खोलीत अधूनमधून येऊन राहायचा, त्या खोलीतील केअरटेकर पोलिसांना मदत करायला तयार होता. त्यामुळे दोन अधिकारी त्या खोलीत अगोदरच होते. त्यावेळी अमर आलाही. परंतु संशय आल्यामुळे तात्काळ निघून गेला. हे दोन्ही पोलीस अधिकारी म्हणे लुंगीवर असल्यामुळे त्यांचा पाठलाग करु शकते नाहीत. राकेश मारीया यांनी कपाळावर हात मारला. त्यानंतर अमर कधीच हाती लागला नाही. अमरने प्लास्टिक सर्जरी केल्याचीही चर्चा होती. परंतु त्यात तथ्य नाही, असे एका निवृत्त गुन्हे अन्वेषण अधिकाऱ्याने सांगितले. मात्र तो मेकओवर करण्यात माहीर होता, हे या अधिकाऱ्यानेही मान्य केले.

चकमकीत ठार

१० ऑगस्ट १९९६ रोजी चकमकफेम पोलिस अधिकारी दिवंगत विजय साळसकर यांनी मुंबई सेंट्रल येथे अमर नाईकला चकमकीत ठार केले. या चकमकीबाबत अनेक आरोप केले गेले. शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत होते. अमर हा तसा शिवसेनेच्या जवळ होता. तरीही तो चकमकीत ठार झाल्याच्या घटनेला वेगळेच वळण मिळाले. सेना-भाजपातील अंतर्गत कलहाचाही तो परिपाक होता, असेही त्यावेळी बोलले जात होते. मात्र अमरच्या चकमकीनंतर गवळीही हादरला होता.

मुली वैमानिक, डॉक्टर आणि व्यावसायिक

पोलीस अधिकारी आपल्यालाही चकमकीत ठार करतील, अशी भीती त्याला सतावत होती. १४४, टेनामेंट हा अमरचा अड्डा तर थोड्या अंतरावर दगडी चाळ. दगडी चाळीसमोर साळसकर यांनी पोलीस चौकीत उभारली होती. अमर ठार झाल्यानंतर काही काळ त्याचा साथीदार जन्या सकपाळने टोळीची सूत्रे सांभाळली. नंतर अश्विन नाईक टोळी सांभाळत होता. अमरला तीन मुली आहेत. त्यांना मात्र अमरने दूर परदेशात ठेवले व त्यापैकी एक वैमानिक, एक डॅाक्टर तर एक व्यावसायिक म्हणून यशस्वी आहे.

दिल्लीमार्गे अश्विन कॅनडात

सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अश्विन नाईक याच्यावर १९९४ मध्ये सत्र न्यायालयात वकिलाच्या वेशात आलेल्या गवळीच्या रवींद्र सावंतने गोळीबार केला. या हल्ल्यानंतर अश्विन नाईक कोमात गेला. त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल २२ महिने उपचार घेतल्यानंतर अश्विनची जामिनावर सुटका झाली. रुग्णालयातूनही त्याला सोडण्यात आले. ना. म. जोशी मार्गावरील १४४ टेनामेंटमधील घरी तो आला. त्याचवेळी अमर नाईकने रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका आणली व त्यातून अश्विनला दिल्लीला नेण्यात आले. दिल्लीत काही दिवस राहिल्यानंतर बनावट पासपोर्टच्या आधारे १९९६ मध्ये अश्विनची कॅनडात रवानगी करण्यात आली. तेथे अमरचा एक हस्तक वास्तव्याला होता. त्याने अश्विनची व्यवस्था केली. परंतु त्याच वर्षात अमर चकमकीत ठार झाल्यानंतर अश्विन पुरता तुटला.

१९९८ च्या सुमारास तो भारतात परतला व दिल्लीत राहून टोळीची सूत्रे हलवू लागला. आपल्यावर हल्ला करण्याची टीप देणाऱ्या रामदास आंबावकरला हस्तकांमार्फत अश्विनने ठार केले व अमर नाईक टोळी सक्रिय असल्याचे दाखवून दिले. कोलकतामार्गे बांगलादेश आणि त्यानंतर बँकॉकमार्गे कायमचे वास्तव्य करण्यासाठी कॅनडा वा अमेरिकेत जाण्याचा त्याचा डाव होता. तेथून मुंबईतील गुन्हेगारी सूत्रे हलविण्याचे त्याने ठरविले होते. परंतु कोलकता येथे भारत-बांगलादेश सीमेवर व्हिलचेअरवरुन जाणाऱ्या अश्विन नाईकला सीमाशुल्क अधिकाऱ्यांना हटकले. तेव्हा त्याच्याकडे डॅालर्स, पौंड आदी लाखो रुपयांचे परकीय चलन आढळले. त्यामुळे आपण भारतीय असल्याची ओळख अश्विनला सांगावी लागली.

अश्विन निर्दोष मुक्त

दिल्लीत असताना श्रीराम नावाच्या मित्राच्या खुनाप्रकरणी अश्विनला ताब्यात घेण्यात आले. १९९९ मध्ये त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर बराच काळ त्याने तुरुंगात काढला. कालांतराने बहुतांश सर्व गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटका झाली. २००९ मध्ये तो १४४ टेनामेंटमधील घरी परतला. अश्विनची पत्नी नीता ही शिवसेनेची नगरसेविका. मात्र तिची २००० मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोपही अश्विनवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी तो तिहार तुरुंगात होता. या हत्येमागे वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात होत्या. परंतु त्यातूनही त्याची निर्दोष सुटका झाली. (पुढील भागात जोगेश्वरीचा ‘चिल्लर’ आबू सालेम कट्टर गुंड कसा झाला?)
(संदर्भः अंडरवर्ल्ड ते सायबर वर्ल्ड – प्रभाकर पवार, गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन अधिकारी)