Connection of Mumbai Police and Mahim Dargah: दरवर्षी, माहीमच्या हजरत मखदूम अली माहिमी दर्ग्यात उरुसाला सुरुवात होताच मुंबई पोलिसांचे बँड पथक, त्यामागे गणवेशातील पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी हिरवी चादर डोक्यावर घेऊन ६०० वर्षे जुन्या दर्ग्याकडे जाताना दिसतात… ही परंपरा माहीत नसलेल्या अनेकांच्या भुवया अशा वेळी उंचावल्या जातात. या संदर्भातील इतिहास काय सांगतो, जाणून घेऊ!

मुंबईमधील माहीमचा दर्गा मुस्लिम बांधवांबरोबरच इतर अनेक धर्मियांसाठीही श्रद्धेचा विषय आहे. या स्थळाशी संबंधित एक परंपरा ब्रिटिश कालखंडापासून अखंड सुरु आहे. या परंपरेचा थेट संबंध हा मुंबई पोलिसांशी आहे. दरवर्षी सूफी संत हजरत मखदूम अली माहिमी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त माहीम येथे जत्रा भरते. याकाळात निघणाऱ्या उरुसामध्ये मुंबई पोलीस चादर शरीफ डोक्यावर घेऊन दर्ग्याकडे जाताना दिसतात. चादर शरीफ म्हणजे दरगाह, दर्गा किंवा मुस्लिम सुफी संतांच्या मजाऱ्यावर (कबर/ समाधी) अर्पण केली जाणारी पवित्र चादर. माहीमच्या दर्ग्यावर निघणाऱ्या उरुसाच्या परंपरेची अधिकृत नोंद १९०९ ते १९१६ या कालखंडात केली गेली आणि आजही ही परंपरा एका स्वतंत्र ट्रस्टच्या अंतर्गत सुरू आहे. परंतु, मुंबई पोलिसांचा संबंध या परंपरेशी कधी आला हे जाणून घेणं गरजेचं आहे.

धर्माच्या पलीकडे जाऊन, ही प्रथा मुंबईतील पोलिसांचे समाजाशी असलेले नाते, जुन्या पोलीस चौक्यांची दर्ग्याच्या परिसराशी असलेली जवळीक आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान लोकांमध्ये सद्भाव टिकवण्यासाठीचे प्रयत्न यांचे प्रतीक मानली जाते.

मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दरवर्षी दर्ग्यात चादर घेऊन का जातात?

या परंपरेची पाळेमुळे खूप जुनी आहेत. याचा उगम वसाहतकालीन बॉम्बेमधील मोठ्या सार्वजनिक जत्रांवरील गर्दी नियंत्रण, तसेच शहराचा सूफी संतांशी असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधा यामध्ये आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक सरकारी विभागांनी ब्रिटिशकालीन धार्मिक- समारंभाशी संबंधित प्रथा हळूहळू सोडून दिल्या. मात्र काही अपवाद टिकून राहिले. विशेषतः महिम दर्गा आणि डोंगरीतील रहमान शाह बाबा दर्ग्यासारख्या स्थानांशी जोडलेल्या पोलीस परंपरा आजही सुरू आहेत.

माहीम दर्ग्याचा वारसा

हजरत मखदूम अली माहिमी यांचा माहीम दर्गा हा मुंबईतील सर्वात प्राचीन इस्लामिक स्थळांपैकी एक आहे. याची परंपरा तब्बल सहाशे वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. मुंबई महानगर म्हणून विकसित होण्याच्या खूप आधी, हा समुद्रकिनारी असलेला दर्गा पश्चिम किनाऱ्यावरचे खलाशी, व्यापारी, विद्वान आणि विविध समाजसमूहांसाठी एक आध्यात्मिक आधार होता.

स्वतः संत माहिमी हे अरब वंशाचे होते. त्यांच्या पूर्वजांनी अंदाजे इसवी सनाच्या ८ व्या (AH 252) शतकाच्या सुमारास बसराचा शक्तिशाली आणि भीतीदायक गव्हर्नर हज्जाज इब्न युसुफ याच्या छळापासून बचाव करण्यासाठी भारतात आश्रय घेतल्याचे मानले जाते. त्यानंतर सुमारे पाचशे वर्षांनी भारतात जन्मलेल्या मखदूम अली माहिमी यांनी इस्लामिक कायदा आणि धर्मशास्त्राचे प्रशिक्षण घेतले आणि पुढे माहिममधील मुस्लिम समाजासाठी फकीह म्हणजेच कायदा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

इ.स. १४३१ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक समुदायाने त्यांच्या सन्मानार्थ एक मशिद आणि दर्गा बांधला. पुढील शतकांमध्ये हा दर्गा प्रसिद्ध होत गेला आणि तो मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक यात्रास्थळांपैकी एक ठरला.

मुंबई पोलिसांचा दर्ग्याशी असलेला संबंध

मुंबई पोलिसांचा माहिम दर्ग्याशी असलेला संबंध हा आधुनिक पोलीस दल स्थापन होण्यापूर्वीचा आहे. औपचारिक पोलिस व्यवस्थेच्या अगोदर, बॉम्बेच्या बेटांवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम भंडारी मिलिशिया नावाच्या स्थानिक दलाकडे होते. हे दल मुख्यतः महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भंडारी समाजातील लोकांपासून तयार झाले होते. तेच या प्रदेशातील सुरुवातीचे पोलीस, सुरक्षा रक्षक आणि रात्रपाळीचे पहारेकरी होते. या भंडारी मिलिशियांचा माहीम दर्ग्याशी असलेला जवळचा संबंध पुढे ब्रिटिश काळातही टिकून राहिल्याचे दिसते. या संबंधाची नेमकी सुरुवात कशी झाली याची अधिकृत नोंद नाही. प्रचलित मिथकांनुसार पोलीस चौक्या दर्ग्याजवळ असल्याने हा संबंध आला असावा. काही दंतकथांमध्ये असेही सांगितले जाते की, त्या काळातील हे पहारेकरी आणि कायदा राखणारे अधिकारी गुन्हेगार व तस्करांवर कारवाई करताना कधी-कधी एखाद्या अदृश्य शक्तीने त्यांना मदत केल्यासारखे त्यांना वाटे किंवा तशी त्यांना अनुभूती येत असे.

माहीम दर्ग्यातील उरुसामध्ये पोलिसांचा सहभाग असलेल्या सर्वात जुन्या लिखित नोंदी एस. एम. एडवर्डस यांच्या काळातील आहेत. एडवर्डस हे १९०९ ते १९१६ या काळात बॉम्बेचे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या नोंदींमध्ये त्यांनी उरुसाचे वर्णन केले आहे आणि त्यात पोलिसांचा सक्रिय सहभाग स्पष्टपणे नमूद केला आहे.

एडवर्डस लिहितात:

  • “या जत्रेतील तीन प्रमुख मिरवणुका अशा आहेत;
  • पहिली, बॉम्बे पोलिसांची मिरवणूक जी जत्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी बारा वाजता निघते;
  • दुसरी, जंजिऱ्याया नवाबांची मिरवणूक जी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता निघते;
  • आणि शेवटी, दर्ग्याची मुख्य मिरवणूक जी त्याच रात्री बारा वाजता निघते.”

The Gazetteer of Bombay City and Island (1910) मध्ये देखील या विधींमध्ये पोलिसांची भूमिका नोंदवली आहे. त्यात लिहिले आहे:

“माहीम पोलीस-चौकीतून सुरू होणाऱ्या पोलिसांच्या मिरवणुकीत, सुन्नी मुस्लिम अधिकारी विविध थाळ्या अर्पण करतात. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेले काही सिपाई लांब तलवारीवर कसरती करतात आणि चालता चालता एकमेकांशी तलवारबाजीचे प्रदर्शन करतात.”

ही परंपरा आजपर्यंत टिकून आहे. सध्या मुंबई पोलिसांत एक स्वतंत्र ट्रस्ट या चादर चढवण्याच्या विधीचे निरीक्षण करत असतो. उरुसा करिता आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी २५ रुपये देऊन योगदान देतो.

मुंबई पोलिसांचा इतर दर्ग्यांशी संबंध

माहीम दर्गाच असे एकमेव स्थळ नाही जिथे मुंबई पोलीस समारंभाशी संबंधित विधींमध्ये सहभागी होतात. अशाच प्रकारची परंपरा डोंगरी येथील हाजी रहमान शाह बाबा दर्ग्यातही आहे. अब्दुल रहमान शाह बाबा हे देखील सुफी संत होते.
मान्यता अशी आहे की, हे फकीर मूळच्या मद्रास प्रेसिडेन्सीतील सालेम येथे जन्मले होते आणि नंतर 19व्या शतकात बॉम्बेला (मुंबईला) आले. त्यांच्या विषयी वेगवेगळ्या कथा सापडतात. काही परंपरा त्यांचे वर्णन कायदा अधिकारी म्हणून करतात, तर इतर त्यांना हाफिज-ए-कुरआन (कुरआन पूर्णपणे मुखोद्गत करणारे) म्हणून दर्शवतात.

डोंगरीमध्ये ते एक भटके सूफी फकीर म्हणून राहत होते, आणि त्यांच्या विषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध कथा अशी आहे की, स्थानिक रहिवाशांनी अनेक तक्रारी केल्यानंतरही पोलिसांना त्यांना ताब्यात घेता आले नाही. या कथांना लेखी पुरावा नसला तरी, असा समज आहे की, 1915 साली त्यांच्या निधनानंतर त्या परिसरातील लोकांवर असलेल्या त्यांच्या प्रभावाच्या मान्यतेस्वरूप तेव्हाच्या बॉम्बे पोलिसांनी त्यांना सन्मान देण्याची परंपरा सुरू केली.

ही प्रथा आधुनिक काळातही कायम आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी दरवर्षी होणाऱ्या ‘संदल’ समारंभात नियमितपणे सहभागी होतात. यंदा ऑक्टोबरमध्ये तर मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी स्वतः रहमान शाह बाबा दर्ग्यातील विधींचे नेतृत्व केले आणि संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने चादर अर्पण केली.

या सहभागाचे कारण काय?

मुंबई पोलिसांची शहरातील दर्ग्यांमधील उपस्थिती ही धर्माशी कमी आणि मुंबईच्या ऐतिहासिक विकासाशी अधिक जोडलेली आहे. अनेक दशकांपर्यंत माहीम, हाजी अली आणि डोंगरीतील रहमान शाह बाबा यांसारखे दर्गे मुंबईतील सर्वात मोठी सार्वजनिक स्थळे होती. दरवर्षीच्या उरुसादरम्यान येथे हजारो खलाशी, व्यापारी आणि स्थलांतरित मजूर एकत्र जमत. या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन म्हणजे वाहतूक नियंत्रण, चोरी, भांडणे, चेंगराचेंगरीचा धोका, समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा.. अशा प्रत्येक बाबतीत पोलीस नेहमीच मैदानात तैनात असत. कालांतराने या सततच्या समन्वयातून, दर्गा समित्यांशी पोलिसांचे नाते अधिक दृढ झाले आणि हाच कार्यसंबंध पुढे जाऊन एका परंपरेमध्ये परिवर्तित झाला.

स्थानिकांचा दर्ग्याशी असलेला जवळचा संबंध या परंपरेला अधिक बळकटी देणारा ठरला. माहीम आणि डोंगरी येथील जुन्या पोलीस चौक्या दर्ग्यांच्या अगदी शेजारीच होत्या, त्यामुळे उरुस किंवा जत्रेदरम्यान कोणताही प्रसंग उद्भवल्यास सर्वप्रथम स्थानिक पोलीस दलच प्रतिसाद देत असे.

ब्रिटिश काळातही अशा प्रकारचे स्नेहसंकेत प्रोत्साहित केले जात. कारण त्या काळात मुंबईत डॉकयार्डमधील तणाव आणि सामुदायिक वाद वारंवार पेटत असत. अशा परिस्थितीत स्थानिक प्रभावशाली धार्मिक किंवा सामाजिक संस्थांशी सलोखा राखणे हे शांतता टिकवण्याचे प्रभावी साधन मानले जात असे.