Arun Gawli Dawood Ibrahim Rivalry: मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा इतिहास दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यातील रक्तरंजित संघर्षाशिवाय अपूर्ण आहे. दाऊदच्या हुकमतीला थेट आव्हान देत भायखळ्याच्या दगडी चाळीतून स्वतःची टोळी उभारणारा आणि नंतर ‘हिंदू डॉन’ म्हणून ओळखला गेलेला अरुण गवळी नेमका कसा घडला? रमा नाईकच्या हत्येनंतर सुरू झालेला हा वैराचा प्रवास कोणती वळणे घेत पुढे गेला, जाणून घ्या या विशेष भागात.

करीम लाला- हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार या त्रिकुटाची मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर पकड होती. परंतु वाढते टोळीयुद्ध पाहून करीम लाला- हाजी मस्तानने दूर राहणे पसंत केले. त्यावेळी गुन्हेगारी जगताची सूत्रे आपल्याकडे घेणाऱ्या दाऊद इब्राहिमची हुकमत वरदाभाईने मान्य केली. दाऊदने एकहाती टोळी उभी केली. दक्षिण मुंबईत रमा नाईक, मध्य मुंबईत वरदाभाई, पूर्व उपनगरात छोटा राजन, पश्चिम उपनगरात शरद शेट्टी, वसई-विरारमध्ये भाई ठाकूर, उल्हासनगरात पप्पू कलानी हे दाऊदचे विश्वासू हस्तक होते. परंतु रमा नाईक काही कारणामुळे फुटला. रमा नाईकनंतर टोळीची सूत्रे आपल्याकडे घेणाऱ्या अरुण गवळीनेही दाऊदशी कायम वैरच धरले. कदाचित त्यामुळेच तो ‘हिंदू डॅान’ म्हणून ओळखू जाऊ लागला.

रमाला दाऊदने दुबईत बोलावले

दुबईत राहून संघटित गुन्हेगारीची सूत्रे हलविणाऱ्या दाऊद इब्राहिमने वसईतील एका भूखंडाप्रकरणी भाई ठाकूर, शरद शेट्टी आणि रमा नाईकला दुबईत बोलाविले. या प्रकरणात दाऊदने भाई ठाकूर, शरद शेट्टीच्या बाजुने कौल दिला. त्यामुळे संतापलेल्या रमा नाईकने दाऊद टोळीला सोडचिठ्ठी दिली. सातरस्ता लॅाकअपमधील अंगावर शहारे आणणाऱ्या हत्याकांडात बाबू रेशीम ठार झाल्यावर रमाकडे टोळीची सूत्रे आली. रमादेखील दाऊदसाठीच काम करीत होता.

Arun Gavli gangster
अरुण गवळी (Image- Indian Express)

दाऊदनेच रमा नाईकची टीप दिली

महेश ढोलकियाने बाबू रेशीमची हत्या घडवून आणल्याचे सांगून दाऊदने महेश ढोलकियाचा रमाकडून काटा काढला. दगडी चाळीत लहानाचा मोठा झालेला अरुण गवळी तसेच कांजूरमार्गचा अशोक जोशी हेही रमाच्या साथीला होतेच. दाऊदसाठी वाट्टेल ते करण्याची रमाची तयारी होती. परंतु दाऊदने घात केला. रमा आपल्याला भारी पडेल याची कल्पना असलेल्या दाऊदने मग रमा नाईकची पोलिसांना टीप दिली. राजन काटदरे या पोलीस अधिकाऱ्याने रमा नाईकला चकमकीत ठार केल्याची बातमी झळकली.दाखवायला छोटा राजनचा हस्तक अनील परब ऊर्फ वांग्या, साधू शेट्टी घटनास्थळी होते ते बहुधा काटदरेंना रमाची ओळख पटविण्यासाठीच, अशी चर्चाही तेव्हा रंगली होती. ते काहीही असले तरी कट्टर गुंडांचा चकमकीत खात्मा केल्याबद्दल काटदरेंचा वरिष्ठांनी गौरव केला.

गवळी टोळीचा दबदबा

अगदी १९८८ पर्यंत रमा नाईक आणि त्या अनुषंगाने गवळी दाऊदसाठी काम करीत होता. परंतु त्यानंतर जे बिनसले, त्यात दाऊद हा कायम प्रतिस्पर्धीच राहिला. रमा नाईक चकमकीत ठार झाल्यानंतर अरुण गवळीने टोळीची सूत्रे आपल्याकडे घेतली. अशोक जोशी थेट दगडी चाळीत येऊन राहू लागला. गवळी टोळी आपला दबदबा निर्माण करु लागली होती.

पालिका शाळेत गवळीचे शिक्षण

अरुण गवळी म्हणजेच अरुण गुलाब अहिर. १९५५ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात पोहेगाव येथे गवळीचा जन्म झाला. लहान असतानाच त्याचे कुटुंबीय मुंबईत स्थायिक झाले. वडील मिलमध्ये काम करायचे. गवळीला दोन भाऊ आणि दोन बहिणी. दगडी चाळीपासून काही अंतरावर असलेल्या महापालिका शाळेत गवळीचे शिक्षण झाले. रमा नाईकही याच शाळेतला. यानंतर ठाकूरद्वारच्या सिटी हायस्कूलमध्ये गवळीने प्रवेश घेतला. परंतु एसएससी उत्तीर्ण होणे त्याला जमले नाही. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने शिक्षण अर्धवट सोडले व शक्ती मिलमध्ये नोकरी पत्करली. परंतु ती हंगामी स्वरूपाची असल्यामुळे फार काळ टिकली नाही.

सदामामाशी भेट झाली

गोदरेज कंपनीत डाय कास्टिंग विभागात दीड-दोन वर्षे नोकरी केली. परंतु डॉ. दत्ता सामंत यांनी पुकारलेल्या संपाचा फटका बसला व कंपनीला टाळे लागले. क्रॅाम्प्टन ग्रीव्हज या कंपनीतही वर्षभर नोकरी करुन पाहिली. पण त्यांचे मन रमत नव्हते. याच काळाच त्याची ओळख झाली ती सदाशिव पावले म्हणजेच सदामामाशी. शाळेतला वरच्या वर्गातला मित्र रमा नाईकही गवळीला इथेच भेटला. रमा नाईकला त्याच्या रागीट आणि सतत भांडण करण्याच्या स्वभावमुळे सहावीत असतानाच शाळा सोडून द्यावी लागली. पण अरुण गवळी आणि त्याची मैत्री कायम होती. सदा पावलेच्या सहवासात हळूहळू रमा नाईक आणि अरुण गवळी यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच गेली.

गवळीचे मित्रमंडळ तयार झाले

दगडी चाळीत रमा नाईक, अरुण गवळी, अशोक चौधरी ऊर्फ छोटा बाबू, बबल्या सावंत, विलास चौगुले असे मित्रमंडळ तयार झाले होते. हे सर्वजण ‘ओम भायखळा क्लब’मधून कबड्डी खेळत असत. तरुणपणातील मौजमजा करीत हे सर्वजण छोटा बाबूचे वडील मोहन चौधरी याच्या पिऊन चाळीजवळच्या मटक्याच्या अड्ड्याजवळ जमत. छोटा बाबू व रमा नाईक टेहळणीसाठी बाहेर उभे राहत. मोहन सरमळकर टोळीचा त्या काळात दबदबा होता. सर्व मटकाचालक त्याला हप्ता द्यायचे. परंतु मोहनला चौधरीने हप्त्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही गटात वारंवार संघर्ष होत असे.

अरुण गवळीची पहिली केस… पण पोलीस नोंद मात्र नाही

बाबू रेशीमची माझगावमध्ये दहशत होती. रमा नाईक आणि बाबू रेशीम एकत्रित काम करु लागले. रमा नाईकच्या तुरुंगाच्या वाऱ्या सुरु झाल्या. त्याच काळात रमाच्या भावाची कोब्रा टोळीच्या शशी रासम टोळीकडून हत्या झाली. रासमने रमापुढे मदतीचा हात पसरला. परंतु तो धुडकावून लावत रमा नाईकने शशी रासमचीच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर हत्या केली. छोटा बाबूसह अरुण गवळीही त्यावेळी हजर होता. गवळीची ही पहिली केस, असे सांगितले जाते. मात्र या प्रकरणात गवळीचे पोलीस नोंदीत कुठेही नाव आढळून येत नाही.

झुबेदा आशा गवळी झाली

शशी रासमच्या हत्येमुळे रमा नाईकचा दबदबा वाढला. बाबू रेशीम- रमा नाईक हे समीकरण गुन्हेगारी जगतात ओळखले जाऊ लागले. रमा नाईकसोबत छोटा बाबू व अरुण गवळी हे दोघेही असत. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांसह मग गवळीही पोलिसांच्या नोंदीवर आला. १९८० मध्ये पोलिसांनी गवळीला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध केले. परंतु रमा नाईकच्या प्रभावामुळे दोन महिन्यांतच तो दगडी चाळीत परतला. त्याचवेळी चाळीत नातेवाईकांकडे आलेल्या झुबेदा मुजावर या तरुणीवर गवळीचे प्रेम झाले आणि झुबेदा आशा गवळी झाली.

गवळीविरुद्ध खुनाची नोंद झाली ती भावाच्या नोकरीसाठी. भाऊ विजय अहिर याला शिवडीच्या फायरस्टोन कंपनीत नोकरी लावणाऱ्या रज्जाक शेख याला आभार मानण्यासाठी दगडी चाळीत बोलाविले. परंतु रज्जाक आणि तिकिटांचा काळाबाजार करणारा त्याचाच भागीदार श्रीधर शेट्टी यांच्यात भांडण झाले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या गवळीला श्रीधर शेट्टीने मारहाण केली. त्यामुळे चिडून गवळीचा मित्र तारामन भाटकर याने श्रीधरचे चॅापरने तुकडे केले. या प्रकरणात गवळीला अटक झाली.

सतीश राजेची हत्या

पारसनाथ पांडे, श्रीधर शेट्टी, महेश ढोलकिया प्रकरणात गवळीचे नाव गोवले गेले. तरीही गवळीचे नाव गुन्हेगारी जगतात परिचित झाले नव्हते. दाऊदचा विश्वासू साथीदार सतीश राजे याची भायखळ्याच्या ह्यूम हायस्कूलसमोर भरदिवसा हत्या केल्यानंतर गवळीच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. दाऊदची आर्थिक आघाडी सांभाळणाऱ्या राजेच्या मोटारीच्या काचा हातोड्याने फोडून गोळ्या घालून त्याला ठार मारण्यात आले. या हत्याप्रकरणात गवळीसह विजय तांडेल, छोटा बाबू, सदा पावले, गणेश भोसले ऊर्फ वकील, पॅाल पॅट्रिक न्यूटन या सर्वांना अटक झाली. हेच गवळीचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जाऊ लागले.

दाऊद- गवळी संघर्ष वाढला

सतीश राजेचा बदला दाऊदने अवघ्या दहा दिवसांत घेतला. लोणावळ्यात आश्रय घेतलेल्या गवळीला भेटण्यासाठी निघालेल्या अशोक जोशीला त्याच्या पाच साथीदारांसह पनवेलजवळच्या काळोखे गावाजवळ गाठून ठार मारण्यात आले. या हत्याकांडात दाऊद टोळीने स्टेनगनचा वापर केला होता. या हत्याकांडाचा विषय निघाल्यावर आजही गुन्हेगारी टोळ्यांतील रक्तपाताचे अंगावर शहारे आणणारे चित्र समोर येते. गवळी आणि दाऊद टोळीचा संघर्ष त्यानंतर अधिकच तीव्र झाला. गवळीने दाऊदच्या अनेक विश्वासू साथीदारांना टिपले. प्रत्युत्तर म्हणून दाऊदने गवळीचा भाऊ किशोर ऊर्फ पापा गवळी याची माहिमजवळ हत्या केली. सुडाने पेटलेल्या गवळीने मग दाऊदचा हस्तक सुनील सावंत उर्फ सावत्याचा साथीदार मनोज कुलकर्णी याला पोलीस असल्याची बतावणी करुन घरातून ताब्यात घेतले आणि थेट दगडी चाळीत गवळीसमोर उभे करण्यात आले. तासाभरातच मनोज कुलकर्णीचा चॅापरने वार केलेला मृतदेह ताडदेव परिसरातील रस्त्यावर सापडला.

गुन्हे अन्वेषण विभागाकडून गवळीला अटक

दाऊद व गवळी टोळीतील रक्तपात दिवसेंदिवस वाढतच होता. मनोज कुलकर्णीच्या हत्येनंतर गुन्हे अन्वेषण विभागाने गवळीला दगडी चाळीत घुसून स्टेनगनसह अटक केली. राज्याचे माजी महासंचालक अरविंद इनामदार हे तेव्हा नव्याने स्थापन झालेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त होते. त्यानंतर गवळी विविध गुन्ह्यांखाली तब्बल सहा वर्षे तुरुंगात होता. तरीही या काळात गवळी टोळी अधिक मजबूत झाली. छोटा बाबू, सदा पावले, विजय तांडेल आदींनी दगडी चाळीचा कारभार चालविला. मुंबई, ठाणे, पुण्यात गवळी टोळीने हातपाय पसरले होते. बांधकाम कंत्राटदारांपासून बार मालकांपर्यंत सर्वत्र लाखो रुपयांची खंडणी बिनबोभाट गोळा होत होती.

हिंदू डॉन

दगडी चाळ अधिक मजबूत झाली. दगडी चाळीचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाय योजण्यात आले. आजूबाजूच्या इमारतीही गवळी टोळीने ताब्यात घेतल्या. रमा नाईकच्या हत्येनंतर दाऊदने म्हणे दूरध्वनी करून गवळीला दुबईत येण्याचे आमंत्रण दिले. पण गवळीने ते धुडकावून लावले. अशोक जोशींच्या हत्येनंतर त्यांच्यातील संघर्ष अधिक वाढला. दाऊदचा विश्वासू साथीदार महेंद्र चोरडिया याचे गवळी टोळीने अपहरण केल्यानंतर दाऊदने गवळीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हा संपर्क झाला नाही आणि गवळी टोळीने चोरडियाची निर्घृण हत्या केली. त्याचा सूड म्हणून दाऊदने गवळीचा भाऊ पापा गवळी याला ठार केले. दोन वर्षांनंतर गवळीने दाऊदचा मेव्हणा इब्राहिम इस्माईल पारकर याची हत्या करुन सूड उगवला. शेवटपर्यंत गवळीने दाऊद टोळीशी संघर्ष केला. गवळीला ‘हिंदू डॅान’ म्हटले जावू लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीर सभेत म्हटले होते की, तुमचा (काँग्रेसचा) दाऊद तर आमचा गवळी…!!!

साथीदारांच्या कुटुंबीयांची काळजी

गवळीने टोळीची घडी अगदी एका लिमिटेड कंपनीसारखी बसविली होती. टोळीतल्या अगदी जुन्या साथीदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दरमहा रक्कम पोहोचविली जायची. बाबू रेशीम, अशोक जोशी, रमा नाईक या तिघांच्या कुटुंबीयांचेही नेहमीच स्मरण ठेवले गेले. गुन्ह्यांत अटक झालेल्या साथीदारांच्या जेवणाची, वकिलाची काळजीही घेतली जात होती.

रिअल इस्टेटकडे मोर्चा वळवला

पोलीस आणि कायद्याच्या सापळ्यात न अडकता ३०० ते ४०० जणांची टोळी चालविणाऱ्या गवळीने अखिल भारतीय सेना हा पक्ष काढला. आपली ताकद दाखविण्यासाठी तेव्हा गवळीने अभा सेनेचा मोर्चा काढला. त्यानंतर पोलीस हात धुवून गवळी टोळीच्या मागे लागले. त्यातूनच दगडी चाळीत घुसून पोलिसांनी तिघांना ठार केले. त्यानंतर गणेश भोसले ऊर्फ वकील, सदामामा, विजय तांडेल चकमकीत ठार झाले. तरीही गवळी टोळी टिकून राहिली. याचे कारण म्हणजे गवळीने काळाची गरज ओळखून रिअल इस्टेट क्षेत्रात लक्ष वळविले. अनेक वर्षे रखडलेल्या मालमत्ता मिळविल्या आणि त्या विकून बक्कळ पैसा मिळविला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वेच्छा उत्पन्न घोषणा योजनेतही त्याने काही लाखांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते.

अरुण गवळी डॅडी झाला

गुन्हेगारीतून कमावलेला पैसा गवळीने हुशारीने वापरला. दगडी चाळीत दरबार भरवायला सुरुवात केली. गुन्हेगार ते ‘डॅडी’ या प्रवासाची सुरुवात झाली. बाजारात एखाद्या वस्तूचे भाव आकाशाला भिडले की, गवळी त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करुन लोकांना कमी किंमतीत देत असे, असेही सांगितले जाते. गवळीकडे मदतीकडे येणाऱ्या कोणालाही कधी रिकामी हाती जावे लागले नाही. अशा कितीतरी कथा गवळीच्या उदारपणाबाबत सांगितल्या जातात. २००४ मध्ये गवळीने स्वत :च विधानसभा निवडणूक लढायचे ठरवले. या निवडणुकीत अखिल भारतीय सेनेने शंभरहून अधिक उमेदवार उभे केले. मात्र फक्त अरुण गवळीलाच विजय मिळाला. मुंबईच्या चिंचपोकळी मतदारसंघातून अरुण गवळी आमदार झाला. आमदार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच त्याच्यावर काही गुन्हे दाखल झाले. अटकही झाली आणि जामिनही मिळाला.

मुंबई पोलिसांना भीती

गवळी आमदार झाल्यानंतर मात्र मुंबई पोलिसांना वेगळीच भीती सतावत होती. याच पद्धतीने जर गवळीला राजकीय यश मिळत गेले, तर एक दिवस तो मंत्रीही होईल आणि आपल्याला ‘सॅल्यूट’ ठोकावा लागेल की काय , अशी भीती मुंबई पोलिसांत पसरली होती.

डोक्यावर टोपी, पांढरा सदरा व लेंगा

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात मे २००८ मध्ये गवळीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत खटला भरला. मकोका न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून तब्बल १६-१७ वर्षे तो तुरुंगात होता. शिक्षेविरुद्ध प्रलंबित असलेले अपील व वय लक्षात घेता सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची सशर्त जामीनावर सुटका केली आहे. आजही डोक्यावर टोपी, पांढरा सदरा व लेंगा असा पेहराव असलेल्या गवळीची सर्वच गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली आहे. जामसंडेकर प्रकरणात तो अपीलाची वाट पाहतो आहे. एक मात्र नक्की गवळीने दाऊदशी कायम संघर्ष केला. दाऊदसारखा पोबारा केला नाही.
(पुढील भागात : बॉम्बस्फोटानंतरच छोटा राजन फुटला की आणखी काय कारण होते?)
(संदर्भ : पंचनामा : श्रीकांत पाटील आणि तत्कालीन गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी)