Chhota Rajan Dawood Ibrahim split history: मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा इतिहास (Mumbai Underworld History) अभ्यासताना छोटा राजन (Chhota Rajan) आणि दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) यांच्यातील संघर्षाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर छोटा राजनने ‘हिंदू डॉन’ अशी स्वतःची प्रतिमा तयार करत दाऊदशी फारकत घेतली, असा सर्वसामान्य समज आहे; परंतु गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते या दोघांमधील दुरावा बॉम्बस्फोटांआधीच सुरू झाला होता.
प्रत्यक्ष गुन्ह्यांत सहभाग
करीम लाला- हाजी मस्तान- वरदराजन मुदलियार या त्रिकुटाने मुंबईतील गुन्हेगारी जगतावर राज्य केलेले असले तरी त्यांच्यात एक सुप्त करार होता. काही केल्या एकमेकांच्या हद्दीत शिरायचे नाही. पण दाऊदने ते पाळले नाही. दाऊदला थेट टक्कर दिली ती अरुण गवळीने. दाऊद कधीही प्रत्यक्षात गुन्ह्यांत सहभागी झाला नाही. गवळी काय किंवा छोटा राजन या दोघांनीही सुरुवातीला प्रत्यक्ष गुन्ह्यांत सहभाग घेतला होता.
गुन्हेगारी जगतात अभूतपूर्व रक्तपात
अरुण गवळीने दाऊदशी फारकत घेतल्यानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये प्रचंड संघर्ष सुरु झाला. दाऊदची आर्थिक आघाडी सांभाळणाऱ्या सतीश राजेची गवळीने हत्या केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून दाऊदने गवळीचा भाऊ किशोर ऊर्फ पापा गवळीची हत्या घडवून आणली. त्यानंतर गुन्हेगारी जगताने अभूतपूर्व असा रक्तपात अनुभवला. गवळी- दाऊद संघर्षात नामचीन गुंड ठार होत होते. परंतु त्याचवेळी या टोळ्यांची दहशतही वाढत होती. दुबईत राहून मुंबईच्या गुन्हेगारीवर वर्चस्व गाजवणाऱ्या दाऊदचा छोटा राजन म्हणजेच राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ नाना हा खास व विश्वासू हस्तक. पूर्व उपनगरात विशेषत: टिळकनगर परिसरात छोटा राजनची कमालीची दहशत होती.

दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या
सुरुवातीला छोट्या-मोठ्या मारामाऱ्या, हप्तेवसुली आणि चेंबूरच्या सहकार व अशोक सिनेमागृहाजवळ तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या छोटा राजनला तसे फारसे कुणी ओळखत नव्हते. कारण छोटा राजन हा बडा राजन म्हणजेच राजन नायरसाठी काम करीत होता. बडा राजन हा वरदाभाईसाठी व पर्यायाने दाऊदसाठी काम करीत होता. जेव्हा दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या झाली तेव्हा दाऊदसाठी काही तरी करता येईल असे वाटल्याने बडा राजनने अमीरजादाला न्यायालयात ठार मारण्याचा कट डेव्हिड परदेशी या नेमबाजामार्फत अंमलात आणला.
बडा राजनच्या हत्येचा कट
पठाण टोळीनेही या हत्येचा बदला बडा राजनला ठार करुन घेतला. बडा राजन व अब्दुल कुंजू यांच्यातील वैमनस्याचा फायदा उठवत पठाण टोळीवे बडा राजनच्या हत्येचा कट रचला. घाटकोपर परिसरात बडा राजनची दादागिरी होती. शेल कॅालनीत अब्दुल कुंजूची चालायची. मात्र एका महिलेला छळल्याप्रकरणी बडा राजनने कुंजूला बेदम मारहाण केली होती. तेव्हापासून कुंजूने पण केला होता बडा राजनला ठार मारण्याचा. बडा राजनला मारण्याची सुपारी त्याने महेश ढोलकियाकडून स्वीकारली.
सत्र न्यायालयातच गोळ्या झाडल्या
ढोलकीयाच्या खारच्या सीझर पॅलेस हॅाटेलमध्ये हा कट शिजला. अब्दुल कुंजूने शेजारी राहत असलेल्या व बहिणीच्या लग्नासाठी पैशाची गरज असलेल्या चंद्रशेखर सफालिगा या रिक्षा चालकाला हेरले. रिक्षा युनियनमधील बडा राजनच्या दादागिरीचा फटका सफालिगा यालाही बसला होता. गुन्हेगारी जगतात नवशिका असला तरी बहिणीच्या लग्नासाठी त्याने ही सुपारी स्वीकारली. सफालिगाला काल्या ॲंथनी, रमेश पुजारी, मंगेश मोरे या तिघा नेमबाजांनी विक्रोळी येथे १५ दिवस रिव्हॅाल्व्हर चालविण्याचे प्रशिक्षण दिले. बडा राजनला सुनावणीसाठी सत्र न्यायालयात आणले तेव्हाच नौदलाच्या वेशात असलेल्या सफालिगाने पुस्तकाच्या आड लपविलेल्या रिव्हॅाल्व्हरमधून बडा राजनवर गोळीबार केला. बडा राजन जागीच ठार झाला. अब्दुल कुंजू हा देखील हत्येच्या वेळी हजर होता. सफालिगा पकडला गेला. परंतु ठाणे तुरुंगात नेले जात असताना तो पळाला. पुढे प्रतिस्पर्धी टोळीने त्याची हत्या केली.
छोटा राजनची दहशत वाढली
बडा राजन ठार झाल्यावर टोळीची सूत्रे आपसूकच छोटा राजनकडे आली. आमीरजादाच्या हत्येनंतर बडा राजन दाऊदच्या खास मर्जीत गेला होता. त्यामुळे आपसूकच छोटा राजनही दाऊदसाठी काम करु लागला. दाऊद टोळीची दहशत छोटा राजनमुळे होती असे म्हटले तर वावगे ठरु नये. छोटा राजनने बडा राजनच्या हत्येचा बदला म्हणून संजय रग्गड, नरेश झुकर (दिवाकर चुरी कंपनी) या खतरनाक नेमबाजांकडून अब्दुल कुंजूची हत्या घडवून घेतला. क्रिकेट हा कुंजूचा आवडता खेळ. क्रिकेट टुर्नामेंट सुरु असतानाच छोटा राजन टोळीने मैदानात जाऊन गोळ्या घातल्या. अंगावर शहारे आणणाऱ्या या हत्येने छोटा राजनजी दहशत आणखी वाढली. खंडणीसाठी त्याचा हैदोस सुरु झाला. बांधकाम व्यावसायिक, हॉटेल मालक आदींना खंडणीचे फोन जाऊ लागले.
छोटा राजनवर पहिला गुन्हा
पाच फूट चार इंच उंचीचा छोटा राजन ६/१९२ टिळकनगर या म्हाडा कॅालनीत राहायचा. शालेय शिक्षण सोडून दिलेल्या छोटा राजनने गुंगासोबत सुरुवातीला किरकोळ गुन्हे करण्यास सुरुवात केली. मात्र सहकार सिनेमा तिकिटांच्या काळा बाजारात तो चांगलाच रमला. त्या ठिकाणी यशवंत जाधव या गुंडांची दहशत होती. बडा राजन व यशवंत जाधव यांच्यात सतत संघर्ष होत असे. टिळकनगर परिसरात कोणत्याही क्षणी एकमेकांवर सोडा वॅाटर बाटल्या, ट्यूबलाईटस् फेकणे, लोखंडी सळयांनी मारामारी हे नेहमीचेच झाले होते. पोलीस यशवंत जाधवला अनुकूल आहेत, असा आरोप करीत छोटा राजनने पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. हाच छोटा राजनवरील पहिला गुन्हा.
छोटा राजनही दुबईत
यशवंत जाधवला टक्कर देणारा कुणीतरी आहे, असे वाटून बडा राजनने वकील पुरवून छोटा राजन व त्याच्या इतर साथीदारांची जामीनावर सुटका केली. तेव्हापासून छोटा राजन बडा राजनसाठी काम करु लागला. बडा राजन वरदाभाई आणि वरदाभाई दाऊदसाठी काम करीत असल्यामुळे छोटा राजनही दाऊदच्या संपर्कात आला. १९८८ मध्ये मुंबईत टोळीयुद्धाचा कहर झाल्यानंतर छोटा राजनही दाऊदप्रमाणे दुबईला पळून गेला व तेथून गुन्हेगारी सूत्रे हलवू लागला.
छोटा राजनच्या बालेकिल्ल्यात साथीदाराची हत्या
रमा नाईक चकमकीत ठार मारला गेला तेव्हा म्हणे दाऊद, छोटा राजन, शरद शेट्टी आदींनी दुबईत ओली पार्टी केली होती. त्यावेळचे छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले होते. रमा नाईकच्या हत्येनंतर सूडाने पेटलेल्या गवळीने छोटा राजनच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यावेळी महेंद्र पाटीलची हत्या केली होती. छोटा राजनच्या परिसरात घुसून गवळीने केलेली ही हत्या फारच चर्चेचा विषय ठरली होती. त्यातच छोटा शकील (मोहम्मद शकील बाबू मियाँ शेख) हा दाऊदचा कट्टर साथीदार बनला होता. मॅच फिक्सिंग, बेटिंग आणि हवाला शरद शेट्टी सांभाळत होता तर छोटा राजन मुंबईतील गुन्हेगारी कारवाया घडवून आणत होता.
बॉम्बस्फोटाच्या आधीपासूनच दाऊदपासून दुरावा
१२ मार्च १९९३ च्या बॅाम्बस्फोटानंतर छोटा राजनने मात्र दाऊदशी फारकत घेतली. बॅाम्बस्फोटाशी संबंधित आरोपींची तो हत्या घडवून आणू लागला. त्यानेही ‘हिंदू डॅान’ म्हणून आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु एका निवृत्त गुन्हे अन्वेषण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बॅाम्बस्फोट झाल्यानंतर छोटा राजनने दाऊदशी फारकत घेतली हे खरे नाही. त्याआधीपासूनच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. भांडुप येथील शिवसेना नगरसेवक खिमबहादूर थापा याची हत्या छोटा राजनने दाऊदच्या परवानगीविना घडवून आणली होती. त्यामुळे दाऊद प्रचंड संतापला होता. तेव्हापासूनच त्यांच्यात बिनसले होते.
दाऊदला आव्हान
सुनील सावंत ऊर्फ सावत्या, सुभाषसिंग ठाकूर यांनाही छोटा राजन खटकत होता. छोटा राजन व्यवहारात गडबड करीत असल्याची कुणकुण दाऊदला लागली होती. दाऊदने त्याला झापलेही होते. परंतु प्रत्येकवेळी माफी मागून तो सुटायचा. छोटा राजनला मारण्याची जबाबदारी दाऊदने छोटा शकीलवर सोपविली होती. दाऊदशी फारकत घेतल्यानंतर तो मलेशियात गेला. तेथून बँकॅाकमध्ये स्थिरावला. १९९३ च्या बॅाम्बस्फोटातील जामीनावर सुटलेल्या व दाऊदशी संबंधित बहुसंख्य आरोपींच्या हत्येचा सपाटा छोटा राजनने लावला. दुबईत सुनील सावंत ऊर्फ सावत्याला ठार मारुन छोटा राजनने दाऊदला प्रचंड आव्हान दिले होते.
छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला
त्यामुळे छोटा राजनला धडा शिकवणे दाऊदला आवश्यक ठरले होते. शरद शेट्टीने छोटा राजनचा ठावठिकाणा शोधून काढला. छोटा शकीलचा जोगेश्वरी येथील नेमबाज मुन्ना झिंगाडा व त्याच्या साथीदारांनी छोटा राजनवर बँकॉकमधील घरात घुसून स्टेनगनने गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा विश्वासू साथीदार रोहित शर्मा व त्याची पत्नी मारली गेला. छोटा राजन मात्र बचावला. गोळीबार होताच पहिल्या मजल्यावरील खोलीतून उडी मारुन तो पळून गेला ते थेट बँकॅाकमधील रुग्णालयात दाखल झाला. त्याही अवस्थेत रुग्णालयातून पळून जाण्यात छोटा राजन यशस्वी ठरला.
बँकॉक ते तेहरान व्हाया कंबोडिया
छोटा राजनला रुग्णालयातून पळवून नेण्यात संतोष शेट्टी, भरत नेपाळी, बंटी पांडे, फरिद तनाशा हे साथीदार यशस्वी ठरले. रुग्णालयाच्या मागील बाजुने छोटा राजनला खाली उतरविण्यासाठी डोंगर चढाईचे साहित्य वापरण्यात आले. ठरल्याप्रमाणे भरत नेपाळीने तेथील सुरक्षा रक्षकांना दारू पाजली व त्यात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले. छोटा राजनला नेण्यासाठी म्हणे कंबोडिया लष्कराची जीप रुग्णालयाच्या मागील बाजूस आली होती. या जीपने छोटा राजनला बँकॅाकच्या सीमेपर्यंत नेण्यात आले. तेथून कंबोडियाच्सा गव्हर्नरने म्हणे हेलिकॅाप्टर पाठवले होते. होलिकॅाप्टरने छोटा राजनला तेहरानमध्ये हलविण्यात आले. यासाठी छोटा राजनने लाखो डॅालर्स खर्च केले.
स्वतःच्या हिमतीवर राजनच्या कारवाया
छोटा राजनला ताब्यात घेण्यासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथकही गेले होते. परंतु त्यांना हात हलवत परत यावे लागले. त्यानंतरही सक्रिय असलेल्या छोटा राजनने आपल्या वास्तव्याची छोटा शकीलला टिप दिल्याचा संशयावरून चेंबूर येथील हॅाटेल मालक विनोद शेट्टीची पनवेल येथे हत्या केली. याशिवाय दाऊदचे दुबईतील इंडिया क्लबमधील व्यवहार सांभाळणाऱ्या शरदची हत्या करुन दाऊदला जबर धक्का दिला. दाऊदच्या पिलू खानची हत्या हा देखील दाऊदला मोठा धक्का होता. बँकॅाकमधील हल्ल्यानंतर छोटा राजनचे कट्टर साथीदार संतोष शेट्टी, रवी पुजारी, हेमंत पुजारी, बंटी पांडे, भरत नेपाळी, गुरु साटम हे एकेक करुन फुटले. तरीही छोटा राजनने आपल्या गुन्हेगारी कारवाया स्वत:च्या हिमतीवर सुरुच ठेवल्या.
छोटा राजनला गुप्तचर यंत्रणेचा पाठिंबा
भारतीय गुप्तचर यंत्रणेचा छोटा राजनला तेव्हापासूनच छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरु झाली. इंडोनेशियातील बाली येथे छोटा राजनला अटक झाली तेव्हा त्याला भारतात पाठवणे व नंतर सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या मुंबई पोलिसांच्या हवाली न करणे व हे सर्व गुन्हे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करणे तसेच तिहार तुरुंगात तो असणे, अनेक गुन्ह्यांत शिक्षा होऊन तिहार तुरुंगातच राहणे आदी घटनांमुळे या थिअरीवर शिक्कामोर्तब होते. छोटा राजनने दाऊदच्या अनेक कट्टर गुंडांची टिप तेव्हा चकमकफेम अधिकाऱ्यांना दिली होती. याशिवाय दाऊदबाबतही तो माहिती पुरवित होता, असे सांगितले जाते. परंतु याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव
टिळकनगर परिसरात त्यावेळी छोटा राजनने सह्याद्री क्रीडा मंडळाच्या माध्यमातून वरदाभाईसारखी जनसेवा सुरु केली होती. सह्याद्री क्रीडा मंडळाचा भव्य गणेशोत्सव देखावा हा संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय होता. छोटा राजनची पत्नी आजही या मंडळाच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे सांगितले जाते. सुजाता निकाळजे ऊर्फ नानी ही आजही चेंबूर येथे दोन मुलींसह राहते. छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे हा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीत आहे. परंतु त्याने निवडणूक लढवू नये, अशीच छोटा राजनची इच्छा होती. परंतु ती त्याने मानली नाही, असे काही त्यावेळचे गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी सांगतात.
७० गुन्ह्यांप्रकरणी खटले सुरूच
पत्रकार जे डे यांची हत्या छोटा राजननेच घडवून आणली होती. जे डेने आपल्या विरोधात अनेक बातम्या केल्या तसेच पुस्तकात आपले गुन्हेगारी साम्राज्य कसे संपत चालले आहे, असे लिहून दाऊदला अनुकूल भूमिका घेतल्याचा राग आल्याने छोटा राजनने काटा काढल्याचा तपास यंत्रणांचा युक्तिवाद न्यायालयानेही मान्य केला आहे. जे डे यांची हत्या करुन आपण अजुनही सक्रिय आहोत हे छोटा राजनला दाखवून द्यायचे होते, अशी थिअरी तपास अधिकाऱ्यांनी मांडली आहे. या हत्या प्रकरणात छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. छोटा राजनवर ७० गुन्ह्यांप्रकरणी खटले सुरु राहणार आहेत. भारतात पाठवल्यानंतर आतापर्यंत सहा प्रकरणात त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा पाहता व आणखी काही गुन्ह्यात प्रलंबित असलेले खटले पाहता बहुधा छोटा राजनला उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावे लागणार आहे. तूर्तास तुरुंग हेच त्याच्यासाठी कदाचित सुरक्षित ठिकाण असावे!
(पुढील भागात : गुन्हेगारी जगतात अमर नाईकला ‘रावण’ का म्हटले जायचे?)
