Karim Lala Dawood Ibrahim Story: एक काळ असा होता जेव्हा मुंबईवर करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार या तीन डॉनचा एकछत्री अंमल होता. या काळात नवख्या दाऊद इब्राहिमला करीम लालाने एका क्लबमधील गोंधळामुळे अर्धमेला होईपर्यंत मारहाण केली होती, तर हाजी मस्तानच्या हस्तकांनी त्याला बनावट माल विकण्यावरून पळवून लावले होते. मात्र, याच अपमानाचा बदला घेत दाऊदने मुंबईच्या रस्त्यांवर असा रक्तपात घडवून आणला, ज्याने पठाण टोळीचा पुरता खात्मा केला आणि दाऊदला गुन्हेगारी जगताचा नवा ‘डॉन’ केले.
दाऊदने मुंबई काबीज केली
करीम लाला- हाजी मस्तान यांच्या दहशतीच्या काळात दाऊदने अपमानाचा बदला घेण्याचे ठरविले व ते केलेही. त्यातूनच मुंबईतील रक्तरंजित गुन्हेगारीला सुरुवात झाली आणि हळूहळू दाऊदनेच मुंबईतील गुन्हेगारी जगत काबीज केले. १९६०-७० च्या दशकात मुंबईवर करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलीयार या तीन ‘डॉन’चा दबदबा होता. सामान्यांना त्याची झळ पोहोचत नव्हती. तिघांनी आपापले परिसर वाटून घेतले होते. कुणी लुडबूड करायचे नाही.
करीम लालाने दाऊदला मारले
करीम लालाला मस्तान व वरदा खूप मानायचे. करीम लाला हा पठाण होता. शब्दाचा पक्का होता. एकदा जे सांगितले ते करुन दाखवायचा. त्याच्या शब्दाला गुन्हेगारी जगतात प्रमाण मानले जायचे. त्यामुळे त्यावेळी पोरसवदा असलेला दाऊद टरकून होता. आपल्या परिसरात दाऊद त्याच्या साथीदारांसह क्लबमध्ये गोंधळ घालत असल्याची माहिती करीम लालाला मिळाली. त्याने दाऊदला इतके मारले की, तो अर्धमेला झाला.

दाऊद गायब झाला
मोहम्मद अली रोडवरील तेव्हाच्या गुलशन-ए- इराण या रेस्तराँजवळील पदपथावर दाऊद भारतीय बनावटीचे कपडे जपानमधील असल्याचे भासवून विकायचा. त्यामुळे अशा तस्करीत माहीर असलेला मस्तान संतापला होता. त्याचा हस्तक लल्लुभाईने दाऊदचा चांगलाच दम भरला होता. बनावट माल विकून मार्केटची बदनामी करतो आहेस. पुन्हा दिसला तर हात-पाय तोडून टाकीन, अशी धमकी दिल्यानंतर दाऊद तेथून गायब झाला.
दाऊदने टीम तयार केली
मुंबई पोलीस दलात हवालदार असलेल्या इब्राहिम कासकर याचा दाऊद हा मुलगा. खेडजवळच्या मुमके या गावी जन्मलेला दाऊद सुरुवातीला वरळी पोलीस वसाहतीत राहत होता. नागपाडा येथील अहमद सेलर या उर्दू शाळेत शिकत होता. जेमतेम आठवी उत्तीर्ण झालेला दाऊद शाळेत जायचा नाही. मात्र परीक्षेला डमी बसवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला, असे पोलिसांच्या रेकॉर्डवर आढळते. दाऊदला उर्दू व हिंदीच नव्हे तर मराठी आणि इंग्रजी भाषाही येत होत्या. वडील पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यावर दाऊद आई-वडील व भावांसह डोंगरीतील पाकमोडिया स्ट्रीट येथे राहावयास आला. हाजी मुसाफिरखाना येथे सुरुवातीला पहिल्या मजल्यावर त्याने एक खोली विकत घेतली. याच इमारतीत मग रहिवाशांना हुसकावून आणखी पाच खोल्या त्याने ताब्यात घेतल्या. खलीद पेहलवान, लंबू शकील, अनिस लंबू, रईस फारुखी, अब्दुल्ला नाजीम टॅक्सीवाला, सतीश राजे अशी दाऊदची टीम तयार होत होती.
सिनेक्षेत्रात खंडणीराज
१९८१ मध्ये दाऊदचा मोठा भाऊ शब्बीर हा अमीरजादा आणि आलमजेब या करीम लालाच्या हस्तकांकडून मारला गेला. दाऊदला शब्बीरसह पाच भाऊ आणि पाच बहिणी. मोठी बहिण सईदा ही खेडमधील गावी नदीत बुडून मरण पावली. शब्बीरच्या हत्येनंतर गुन्हेगारी जगताने अभूतपूर्व रक्तपात अनुभवला. दाऊदने संघटित गुन्हेगारीला क्रौर्याचे रुप देताना अजिबात दयामाया दाखविली नाही. बांधकाम तसेच सिनेक्षेत्रात खंडणीराज निर्माण करुन दाऊदने प्रचंड दहशत निर्माण केली. स्वतः १९८६ मध्ये दुबईमध्ये पळून गेलेल्या दाऊदने मुंबईच्या गुन्हेगारी जगतावरील पकड ढिली होऊ दिली नाही.
दाऊद कराचीत?
१२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटमालिकेनंतर दाऊदचे अनेक हिंदू साथीदार त्याला सोडून गेले. तोपर्यंत मध्य-पूर्व आशियात दाऊदने अमली पदार्थ तस्करीत आपले चांगलेच बस्तान बसवले. भारतीय तपास यंत्रणा हात धुवून मागे लागल्यानंतरही दाऊद काही हाती लागला नाही. अमेरिकेने ९/११ च्या हल्ल्यानंतर दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. परंतु तरीही तो भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात येऊ शकलेला नाही. दाऊद आता कुठे आहे? कराचीत आहे, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. परंतु तो नेमका कुठे आहे हे केवळ पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटिलिजन्स (आयएसआय) ही यंत्रणाच सागू शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दाऊद हाजी मस्तानसाठी काम करायचा
दाऊद हा सुरुवातीला हाजी मस्तानसाठी काम करीत होता. पोलिसांत असलेल्या वडिलांच्या नावे तो व्यापाऱ्यांकडून हप्ताही गोळा करायचा. परंतु काही तरी मोठे करायचे यासाठी त्याने डिसेंबर १९७४ मध्ये कर्नाक बंदर येथे एका व्यापाऱ्याला पावणे चार लाख रुपयांना लुटले. या गुन्ह्यात त्याला अटक झाली. दाऊदला या गुन्ह्यात १९७९ मध्ये चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही झाली. परंतु दाऊद जामीनावर सुटला. लुटीच्या पैशाच्या वाटपावरुन दाऊदच्या साथीदारांमध्ये फूट पडली. त्यापैकी दाऊद आणि आलमजेब एकमेकांच्या जीवावर उठले.
इक्बालचे अपहरण आणि हत्या
दुसरीकडे तस्करीवरुन एकमेकांचे दुश्मन झालेले हाजी मस्तान व युसुफ पटेल पुन्हा एकत्र आले. दाऊद व त्याचा भाऊ शब्बीर हेही सक्रिय झाले. त्यावेळी दाऊदने जमा केलेली कोकणी टोळी आणि करीम लालाची पठाण टोळी यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला. करीम लालाचा प्रमुख हस्तक मेहबूब खान ऊर्फ अयुब लाला याच्या गुत्ते, मटका आदी गैरधंद्याची माहिती त्यावेळी ‘राजदार’ या उर्दू साप्ताहिकात प्रसिद्ध होत होती. या साप्ताहिकाचा संपादक इक्बाल नातिक हा दाऊदचा मित्र. त्यामुळे अयुब लालाने इक्बालचे अपहरण केले आणि त्याची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करुन भारतनगर येथील खाडीत टाकून दिले.
मन्या सुर्वेच्या मदतीने हत्या
आलमजेब व अमीरजादाच्या इशाऱ्यावरुन ही हत्या झाल्यामुळे दाऊद सुडाने पेटला. परंतु त्याच काळात १९८१ मध्ये प्रभादेवी येथील पेट्रोल पंपजवळ भाऊ शब्बीर याच्या निर्घृण हत्येने दाऊद हादरला. शब्बीर हा केनेडी ब्रिजजवळच्या कोठ्यावरील एका नर्तिकेच्या प्रेमात पडला होता. तिला घेऊन तो प्रभादेवी येथील पेट्रोल पंपावर येताच आगर बाजारात दहशत असलेल्या मन्या सुर्वेच्या (पोलीस चकमकीत ठार झालेला हा कट्टर गुंड करीम लालासाठी काम करीत होता) मदतीने आलमजेब आणि अमीरजादाने मशीनगनच्या सहाय्याने निर्घृण हत्या घडवून आणली.
देशातील बंदरात दाऊदची मक्तेदारी
त्यावेळी दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘शक्ती’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या अमीरजादाला १९८२ मध्ये अहमदाबाद येथे अटक करण्यात आली. त्यानंतर आलमजेब फरारी झाला. याचा फायदा उठवून दाऊदने मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु केली. भावाच्या हत्येनंतर शांतपणे दाऊदने आपले काळे साम्राज्य वाढविण्यावर भर दिला. देशातील सर्व प्रमुख बंदरात दाऊदची मक्तेदारी सुरु झाली.
कस्टम अधिकाऱ्यांत दाऊदची दहशत
लतीफ खान (अहमदाबाद), ऋषी पठाण (भोपाळ), ठाकूर (वाराणसी), बबलू श्रीवास्तव (दिल्ली व लखनौ), साधू शेट्टी (मंगळुरू) आणि हिदायतुल्ला (कोलकता) हे दाऊदचे साथीदार सक्रिय होते. नेपाळमध्ये तर दाऊदने तेथील मंत्री मिर्झा बेगशी संधान बांधले होते. उत्तर प्रदेशमधील तत्कालीन आमदार अफझल अन्सारी याचेही दाऊदशी थेट संबंध होते. दाऊदची कस्टम अधिकाऱ्यांमध्ये जबरदस्त दहशत होती. त्यामुळे दाऊद तस्करीचा माल कुठल्याही समुद्रकिनारी उतरवून घेऊ शकत होता.
आणि दाऊदचा काळ सुरू झाला…
मुंबईची गोदी मोहमदअली ऊर्फ ममद्या सांभाळीत होता. वाटेत येणाऱ्याचा ममद्या सहज काटा काढायचा. अतिरिक्त कस्टम कलेक्टर एल. डी. अरोरा यांची अहमदाबाद येथे मोहम्मद डोसाच्या इशाऱ्यावरुन बबलु श्रीवास्तवने हत्या केल्यामुळे कस्टम विभाग हादरला होता. दाऊद नावाची दहशत पोरबंदरपासून थेट कोटीपर्यंतच निर्माण झाली होती. मुंबईत दाऊदची दहशत होतीच. परंतु विरार येथे भाई ठाकूर तर उल्हासनगर येथे पप्पू कलानी हे दाऊदचे खंदे हस्तक काम करीत होते. सर्वांनी दाऊदला ‘डॉन’ मानला होता. करीम लाला, हाजी मस्तान, वरदाभाईचा वचक संपला होता. दाऊदचा काळ सुरु झाला होता.
गिरणी कामगारांच्या मुलांनी दाऊद टोळी मजबूत केली
मोठा भाऊ शब्बीरच्या हत्येला दोन वर्षे झाली होती. सुडाची भावना होतीच. परंतु आधी त्याने आर्थिक तटबंदी केली आणि मग भावाच्या हत्येचा बदला घेतला. या काळात दाऊद टोळी मजबूत होत चालली होती. १९८२ च्या गिरणी संपामुळे लालबाग, परळ तसेच उपनगरातील अनेक मराठी तरुणही दाऊदसाठी काम करीत होते. त्याकाळी दाऊदशी संबंधित असलेल्या रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी यांनी गिरणी कामगारांच्या बेरोजगार तरुणांना छोटी-मोठी कामे देऊन दाऊद टोळी मजबूत केली.
न्यायालयातच हत्या
६ सप्टेंबर १९८३. शब्बीरची हत्या करणाऱ्या पठाण टोळीतील आमीरजादाला मुंबई सत्र न्यायालयात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी आणले गेले. पूर्व उपनगरात वर्चस्व असलेल्या राजन नायर ऊर्फ बडा नायरवर दाऊदने आमीरजादाला ठार मारण्याची जबाबदारी सोपविली. बडा राजनने डेव्हिड परदेशी या खतरनाक नेमबाजाची नियुक्ती केली. काही कळायच्या आतच डेव्हिडने आमीरजादाचा वेध घेतला. आमीरजादा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात न्यायालयातच कोसळला.
बडा राजनच्या हत्येचा धक्का
मात्र पळून जात असलेल्या डेव्हिडला तत्कालीन उपनिरीक्षक व निवृत्त सहायक आयुक्त इसाक बागवान यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरचा वापर करुन चपळाईने जायबंदी केले. अगदी चित्रपटात शोभेल असा प्रसंग. न्यायालयातील या गोळीबाराने देशात खळबळ माजली. रस्त्यावरील रक्तपात न्यायालयापर्यंत पोहोचला. मात्र आमीरजादाच्या हत्येचा बदला पठाण टोळीने लगेचच घेतला. बडा राजनलाही न्यायालयातच चंद्रशेखर सफालिगा या भाडोत्री गुंडाने यमसदनी धाडले. सफालिगाला तत्कालीन पोलीस निरीक्षक गुरु यांनी जागेवरच अटक केली. बडा राजनची हत्या हा दाऊदला मोठा धक्का होता. तोवर मुंबईतील रस्त्यावर टोळीयुद्धाची सुरुवात झाली होती.
मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर दाऊदचे वर्चस्व
१९८५ मध्ये गुजरातमध्ये पोलिसांबरोबरच्या चकमकीत आलमजेब ठार झाला. दाऊदच्या मार्गातील सर्व काटे दूर झाले. मुंबईतील गुन्हेगारी जगतावर त्याचे वर्चस्व स्थापन झाले होते. करीम लालाचा भाचा समदखान आणि मलदखान यांची डोंगरी भागातील दहशत दाऊदने मोडून काढली. शब्बीरप्रमाणेच आपल्या प्रेयसीला झव्हेरीबाजार येथे भेटण्यासाठी आलेल्या समद खानचा दाऊदच्या गुंडांनी खातमा केला. त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण करण्यात आली. टोळीयुद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वयंचलित मशीनगनचा वापर करण्यात आला.
करीम लालाची निवृत्ती
मलद खान पोलीस चकमकीत ठार झाल्यावर वाढत्या टोळीयुद्धामुळे करीम लालाने निवृत्ती घेणे पसंत केले. पठाण टोळी संपुष्टात आली. दुसरीकडे हाजी मस्तानही फारसा सक्रिय नव्हता. वरदाभाईनेही दाऊदशी हातमिळविणी केली. दाऊद टोळीची दहशत वाढली. बडा राजनवर, गोळीबार करणाऱ्या अब्दुल कुंजूची १९८५ मध्ये चेंबूर येथे हत्या करण्यात आली. टोळीयुद्ध टीपेला पोहोचले होते. गुंडटोळ्याच प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असल्यामुळे तसा सामान्यांना फटका बसत नव्हता. परंतु पोलिसांच्या इज्जतीचे वाभाडे निघाले होते. स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांची या गुंडटोळ्यांनी झोप उडविली हे मात्र खरे.
टोळीयुद्धाचा कहर
ज्युलिओ रिबेरो, द. शं. सोमण असे दिग्गज त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. सातरस्ता येथील तुरुंगात बाबू रेशीमची हत्या म्हणजे कहरच होता. खार येथील सीझर पॅलेस या हॉटेलचे मालक अरविंद व महेश या ढोलकिया बंधूंची वेगळीच दहशत होती. गुंड टोळ्यांना आपापसात झुंजवत त्यांनी स्वतंत्र ‘ढोलकिया’ टोळी तयार केली होती. दाऊदशी त्यांचे संबंध बिघडले होते. टोळीयुद्धाचा कहर पाहून दाऊदने त्यापासून दूर राहणेच पसंत केले.
दाऊद दुबईत
१९८६ च्या सुमारास एका रात्री दाऊद मुंबईतून पसार झाला तो थेट दुबईत. तेथून गुन्हेगारी सूत्रे हलवू लागला. परंतु दाऊद फक्त स्वत:चा फायदा बघत होता याची अन्य हस्तकांना कल्पना येऊ लागली. दक्षिण मुंबईत दाऊद, मध्य मुंबईत रमा नाईक, वरदाभाई तर पूर्व उपगनरात छोटा राजन, खिमबहादूर थापा, अशोक जोशी तर पश्चिम उपनगरात शरद शेट्टी, वसई-विरार भाई ठाकूर आणि येथे पप्पू कलानी असे दाऊदचे हस्तक सक्रिय होते. मात्र रमा नाईक दाऊद टोळीतून बाहेर पडला आणि नंतर मुंबईत संघटित गुंड टोळ्यांची समीकरणे बदलत गेली.
(पुढील भागात : अरुण गवळीची दाऊदपासून का फारकत?)
(संदर्भ : मुंबई गुन्हेगारीचा एन्सायक्लोपिडिया : प्रभाकर पवार; ‘दुबई ते कराची…’ – एस. हुसैन झैदी; गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन अधिकारी)
