Yusuf Patel FSI Scam Mumbai Underworld History: एकेकाळी हाजी मस्तान आणि युसुफ पटेल या तस्करांचे मुंबईतील गुन्हेगारी जगतावर एकछत्री राज्य होते. सोने, चांदी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उघडपणे तस्करी करणाऱ्या या तस्करांच्या वादातून पुढे मुंबईतील पहिल्या रिअल इस्टेट आणि एफएसआय घोटाळ्याचा जन्म झाला.

एकेकाळी हाजी मस्तान व युसुफ पटेल या तस्करांचे मुंबईतील गुन्हेगारी जगतावर राज्य होते. सोने, चांदी, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी भरलेली जहाजे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर हे तस्कर खुलेआम उतरवीत होते. प्रसंगी पोलिसांना टीप देऊन एकमेकांचा मालही पकडून देत होते. व्यावसायिक दुश्मनीतून एकमेकांची सुपारी देणारे हे तस्कर रस्त्यावर एकमेकांच्या समोर आले, रिव्हॉल्व्हरही रिकाम्या झाल्या… परंतु कुणी दगावले मात्र नाही. हाजी मस्तानने युसुफ पटेलची सुपारी करीम लालाला दिली. करीम लालाने अफगाणिस्तानातून चार पठाण युसुफला ठार मारण्यासाठी आणले. परंतु त्यातून युसूफ प्रत्येकवेळी बचावला. तस्करीला रामराम ठोकून मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये स्थिरावला. आणि पलीकडे एफएसआयचे घोटाळे करुन रहिवाशांना रस्त्यावर आणले.

सेलेब्रिटी डॉन म्हणून ओळखला जाणारा हाजी मस्तान सोने, चांदी, विदेशी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खुलेआम तस्करी करुन ऐशोरामाची जिंदगी जगत होता. पूर्व उपनगरात वरदा तर दक्षिण मध्य मुंबईत हाजी मस्तानची चलती होती. करीम लालाला तसा तस्करीत थेट रस नव्हता. परंतु त्याची पठाण टोळी सक्रिय होती. या गुंडांच्या यादीत पोलीस, सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे सारे काही सुरळीत सुरु होते. त्याच काळात म्हणजे १९६३ मध्ये युसुफ ऊर्फ अब्दुल माजीद अब्दुल पटेल हा पायधुनी येथील नाखुडा मोहल्ल्यातील व्हाईट हाऊसमध्ये राहायचा. तसा तो सुखवस्तू होता. शिक्षणही बऱ्यापैकी झाले होते. उत्तम इंग्रजी बोलून समोरच्यावर छाप पाडू शकत होता. त्याच्या याच गुणांवर हाजी मस्तान खुश झाला.

Yusuf Patel FSI Scam Mumbai Underworld | Haji Mastan and Yusuf Patel smuggler to builder | युसुफ पटेल एफएसआय घोटाळा मुंबई अंडरवर्ल्ड | हाजी मस्तान आणि युसुफ पटेल ऐतिहासिक कथा
युसुफ पटेल आणि मुंबईतील पहिला एफएसआय घोटाळा (Image- Gemini)

मस्तानने ठेवलेल्या विश्वासाचा, युसुफने फायदा उठवला

मस्तान आता बऱ्यापैकी स्थिरावला होता. तस्करीत मस्तान हे एक मोठे नाव होते. तस्करीचा सारा धंदा कस्टम, पोलिसांच्या मदतीने व्यवस्थित सुरु होता. क्लबही व्यवस्थित चालला होता. अखिल भारतीय सुरक्षा महासंघाची स्थापना करुन मस्तानचे सामाजिक कार्यही सुरु होते. दुसरीकडे सिनेसृष्टीतही त्याने बऱ्यापैकी जम बसवला होता. काही चित्रपटांना अर्थपुरवठाही केला होता. त्यामुळे तस्करीचा धंदा सांभाळण्यासाठी त्याला युसुफसारखा तरुण हवा होता. जेमतेम विशीतला युसुफ हाजी मस्तानबरोबर काम करु लागला. अल्पावधीतच त्याच्याकडेही पैसा येऊ लागला. मस्तानने ठेवलेल्या विश्वासाचा पुरेपूर फायदा उठवित युसुफने स्वत:चा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गुजरातमधील बडे तस्कर सुकुर नारायण बखिया आणि लालू जोगी हे त्यावेळी जोरात होते. सारे काही व्यवस्थित चालले होते. त्यावेळी देशात चांदीचा प्रतिकिलोचा भाव तीन हजार रुपये होता तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत प्रतिकिलो दहा हजार रुपये होती. त्यामुळे परदेशी कपडे, घड्याळ, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची भारतात तस्करी व्हायची तर चांदी परदेशात पाठवली जायची. युसुफला आता मस्तानसोबत चार वर्षे झाली होती. त्यामुळे मस्तानचा चांगलाच विश्वास बसला होता. १९६७ चा काळ होता. त्यावेळी सुकुर बखियाचा वरदाला फोन आला की, चांदी म्हणून जो माल पाठविण्यात आला आहे त्या निव्वळ काचा आहेत. वरदाने ही बाब हाजी मस्तानला सांगितली. मस्तानला प्रचंड धक्का बसला. तस्करीच्या धंदा केवळ विश्वासावर चालतो, असा मस्तानचा दृढ विश्वास होता. त्यामुळे आपला कारभार पाहणाऱ्या युसुफला त्याने विचारले. हे कसे शक्य आहे, असा प्रतिप्रश्न युसुफनेच केला.

…आणि हाजी मस्तान चिंतेत

परंतु वरदाभाई खोटे बोलणार नाही, याची खात्री असलेल्या मस्तानने यामुळे जे काही नुकसान झाले आहे ते आपल्याला अर्धे-अर्धे सहन करावे लागेल, असे युसुफला ऐकवले. त्यावेळी युसुफ काहीही बोलला नाही. मात्र काही दिवसानंतर युसुफचा मस्तानला फोन आला की, त्याच्या घरी कस्टम अधिकाऱ्यांची धाड पडली आहे. त्याचवेळी मस्तानचे तस्करीतील सोने युसुफच्या घरी ठेवण्यात आले होते. मात्र आपण कस्टम अधिकाऱ्यांची समजूत काढली, असे युसुफने मस्तानला सांगितले. या अधिकाऱ्यांना आपण मोठी बिदागी दिली असून ती आपण अर्धी-अर्धी वाटून घेऊ. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत होती. त्यामुळे आपल्या मागे कोण तरी लागले आहे, या विचाराने मस्तान चिंतेत होता.

मस्तानला पत्त्यांची आवड होती. क्रॉफर्ड मार्केटमधील मुसाफिरखान्यातील त्याच्याच मालकीच्या डायमंड क्लबमध्ये पत्ते खेळणे हा त्याचा आवडीचा छंद होता. मस्तानला भेटण्यासाठी त्यावेळी साध्या वेशातील पोलीस अधिकारीही यायचे. त्यावेळी क्लबमध्ये मस्तानला काही कस्टम अधिकारी भेटले. तेच अधिकारी युसुफच्या घरी धाड टाकायला गेले होते, याची माहिती असल्यामुळे मस्तानने थेट त्यांनाच विचारले. छाप्याची आपल्याला कल्पना तरी द्यायची, असा थेट प्रश्न मस्तानने त्या कस्टम अधिकाऱ्याला केला. कुठला छापा, असा प्रतिप्रश्न कस्टम अधिकाऱ्याने केला. आम्हाला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण होते, असे सांगितल्यानंतर मस्तान चक्रावला. मात्र यामुळे युसुफ पटेलचे बिंग फुटले होते.

मस्तानने युसुफला तत्काळ दूर केले. युसुफने थेट विश्वासाला तडा दिला होता. त्यामुळे मस्तान संतापला होता. मस्तान आपल्याला सोडणार नाही, याची कल्पना असलेल्या युसुफ पटेलने ढोलकिया टोळीतील लॅमिंग्टन रोडवरील गब्बार सुपारीवालाची संगत केली. परंतु तोपर्यंत युसुफही गब्बर झाला होता. युसुफ पटेलने केलेल्या विश्वासघाताची त्यावेळी गुन्हेगारी जगतात जोरदार चर्चा रंगली होती. परंतु युसुफनेही तोपर्यंत आपली टोळी निर्माण केली होती. त्यानेही मस्तानशी दोन हात करण्याची तयारी सुरु केली.

परंतु मस्तानवर थेट हल्ला करणे तितके सोपे नव्हती, याची त्याला कल्पना होती. त्यामुळे मस्तानच्या तस्करीवर गदा आणली तर… असा विचार करुन युसुफने त्याच्या ओळखीतील एका पत्रकाराला हाजी मस्तानच्या तस्करीची इत्यंभूत माहिती पुरविण्यास सुरुवात केली. ‘ब्लिट्स’ या वृत्तपत्रात मस्तानच्या तस्करीविरुद्ध मालिका प्रसिद्ध होऊ लागली. कस्टम व पोलीस यंत्रणा मस्तानच्या मागे हात धुवून लागली. मस्तानला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटकही झाली. तुरुंगात असतानाच मस्तानला कळून चुकले की, त्याच्याविरोधात माहिती देणारा दुसरा-तिसरा कुणी नसून, तो युसुफ पटेलच आहे. त्यामुळे युसुफला ठार मारले तरच आपले तस्करीचे साम्राज्य वाचेल, याची कल्पना असलेल्या मस्तानने युसुफला मारण्याची सुपारी करीम लालाला दिली. दोन फियाट गाड्या आणि दोन लाख रुपये अशी ती सुपारी होती.

युसूफवर हल्ला

हाजी मस्तान व करीम लालाची दोस्ती जगजाहीर होती. करीम लालाने विश्वासातील चार पठाणांवर ही जबाबदारी सोपविली. पहिल्यावेळी युसुफला अपघातात ठार मारण्याचा कट रचला गेला. मशीद मंदिर येथील सिग्नलवर एका ट्रकने युसुफची गाडी समजून तिला जबर ठोकर दिली. परंतु ती गाडी युसुफची नव्हती. त्यामुळे तो वाचला. मग युसुफला गोळ्या घालण्याचे पठाण टोळीने ठरविले. त्यानुसार रमझानच्या काळात पायधुनीतील मिनारा मशीदीजवळच युसुफवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्याचा अंगरक्षक ठार झाला. परंतु युसुफ पुन्हा बचावला. गुन्हेगारी टोळ्यांतील प्रतिस्पर्ध्यांना ठार मारण्याचे सत्र तेव्हा सुरु झाले. हाजी मस्तान व युसुफ पटेल यांच्या वारंवार चकमकी झाल्या. परंतु सुदैवाने कुणी दगावले नाही.

त्याचवेळी दाऊदच्या पाकमोडिया स्ट्रीट येथे छोट्या मोठ्या चोऱ्या सुरु झाल्या होत्या. तस्करीवर पोसले गेलेले गुंड स्वत:ची टोळी तयार करण्यात गुंतले होते. दाऊद सुरुवातीला हाजी मस्तानसाठी काम करीत होता. हाजी मस्तान व युसुफ पटेल यांच्या धुमश्चक्रीत तस्करी पूर्ण थंडावली होती. हे असेच सुरु राहिले तर आपले काही खरे नाही, असे तस्करीचा सर्वाधिक ऐवज खरेदी करणाऱ्या उस्मान इब्राहिम याला वाटू लागले. त्यातून मग हा हाजी मस्तान- युसुफ यांच्यात समझोता झाला. परंतु जेव्हा युसुफने सांगितले की, त्या पत्रकाराकडे आणखीही खूप माहिती आहे. तेव्हा त्या पत्रकाराला ठार मारण्याचा कट आखला गेला. त्यातून मग या पत्रकाराचा कार अपघातात मृत्यू झाल्याची माहिती बाहेर आली. गुन्हेगारी जगताबाबत आणखी जबरदस्त माहिती मिळेल, यासाठी या पत्रकाराला खंडाळ्याचे आमंत्रण दिले गेले. त्यावेळी आजच्या सारखा एक्स्प्रेस वे नव्हता. घाटातून प्रवास करावा लागायचा. एका वळणावर गाडीचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे अपघात झाला आणि त्यात या पत्रकाराचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलीस ठाण्यात झाली.

जयप्रकाश नारायण यांची तस्करांना माफी

हाजी मस्तानबरोबर समझोता झाल्यानंतर युसुफ पटेलने आपली कार्यपद्धती बदलली. त्यातच १९७७ मध्ये जनता दलाचे नेते जयप्रकाश नारायण यांनी सर्व तस्करांना माफी जाहीर केली. पटेल याने या संधीचा पुरेपूर लाभ घेतला आणि गुन्हेगारी जगताला रामराम ठोकला. मात्र पटेल याच्या डोक्यात वेगळेच शिजत होते. त्याने स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली. पायधुनी येथे ऑफिस सुरू करुन हा नवा धंदा सुरु केला. गुन्हेगारी जगतातील ‘डॉन’ जेव्हा पोलिसांशी झुंजण्यात व्यग्र होते, तेव्हा पटेल मात्र अतिरिक्त एफएसआय मिळवण्यात आणि त्यातून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात मग्न होता.

एफएसआय घोटाळा

पैशांच्या जोरावर पटेल राजकारण्यांच्याही जवळ गेला होता. बेकायदा इमारती तसेच एफएसआय मिळविण्यासाठी विभाग कार्यालयांमधील भूखंडाच्या नोंदींमध्ये (लँड रेकॉर्ड्स) मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आल्याची बाब एका प्रामाणिक महापालिका अधिकाऱ्याच्या लक्षात आली. पटेल याने ताडदेव येथे दोन आणि भायखळ्यातील तीन इमारतींमध्ये घोटाळा केल्याचे आढळून आले. पटेल याची आणखी ५० प्रकरणे आढळून आली; हे सर्व प्रकार महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्यच नव्हते. पैशांच्या जोरावर तर काही ठिकाणी दहशतीने पटेल याने हे गैरप्रकार केल्याचे आजही काही निवृत्त पालिका अधिकारी सांगतात. तोच कित्ता दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याने सारा-सहारा व्यापारी संकुल प्रकरणात गिरवला. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी पैशापेक्षाही दाऊदच्या दहशतीमुळे बेकायदा परवानगी दिल्याचे त्यावेळी मान्य केले होते. या प्रकरणात अभियंत्यांना काही वर्षे तुरुंगात काढावी लागली.

वरळीतील कुप्रसिद्ध कॅम्पा कोला कंपाऊंडचा भूखंड हा औद्योगिक असल्यामुळे नियमानुसार फक्त पाच मजल्यांच्या बांधकामास परवानगी होती, परंतु त्याठिकाणी १९८१ ते १९८९ या काळात १७ आणि २० मजली निवासी टॉवर्स बांधण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत मजले जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. नागपाडा जंक्शनवरील के. डी. आर्केड हा मुंबईतील जुन्या चाळीचा पहिला अनधिकृत पुनर्विकास. बेकायदा एफएसआय वापरामुळे तोही चर्चेत आला. आपण अनधिकृत इमारत उभारत आहोत याची कल्पना असलेल्या युसुफ पटेल आणि त्याच्या कंपनीने खरेदीदारांना बाजारातील किमतीच्या जवळपास निम्म्या दरात सदनिका विकल्या. मात्र आता अनेक दशकांनंतर घरमालकांना कायदेशीर कारवाई आणि पाडकामाच्या नोटिसांना सामोरे जावे लागत आहे. तस्करी कमी होऊन संघटित गुन्हेगारी टोळ्या उदयास आल्यानंतर युसुफ पटेल पाठोपाठ हाजी मस्ताननेही निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर मुंबईने अनुभवला तो संघटित गुन्हेगारीचा थरार. (पुढील भागात : दाऊदही तिला मानायचा ‘ती’ मुंबईतील ‘महिला’ माफिया…)