मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक चार वर्षांच्या विलंबानंतर अखेर सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे आता मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे. तेव्हा हा मिसिंग लिंक प्रकल्प नेमका काय आहे आणि यावरून कोणत्या प्रकारची वाहने धावणार तसेच वेगमर्यादा काय असणार, याचा हा आढावा…

मिसिंग लिंक प्रकल्पाची आवश्यकता का?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज सर्वाधिक वर्दळीचा आणि राज्यातील सर्वात महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. सहा पदरी महामार्गावरून काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवसाला ५५ हजार वाहने धावत होती. पण आता यात मोठी वाढ झाली असून दिवसाला ६५ हजार वाहने धावत आहेत. गर्दीच्या वेळेत, सलग सुट्ट्यांच्या वेळी ही संख्या थेट एक लाखाच्या आसपास जाते. एकूणच या महामार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर भविष्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून हा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे.

कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर कमी झाले आहे. तर हे अंतर आणखी कमी करत प्रवास अधिक सुसाट करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली ते कुसगाव अशी १३.३ किमीची नवीन मार्गिका हाती घेतली. फेब्रुवारी २०१९ मध्ये या कामाला दोन टप्प्यांत सुरुवात करण्यात आली होती. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली ते कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी झाला आहे. तर या नव्या मार्गात दोन बोगदेही बांधण्यात आले आहेत. यातील एक बोगदा १.७५ किमीचा तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे. २१.४२ मीटर रुंदीचा हा बोगदा असून हा देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा असेल, असा दावा केला जात आहे. तर ८.९२ किमीचा बोगदा हा आशियातील सर्वांत रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा ठरणार आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात येत आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारीक विचार करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात येणार असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात आले आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बोगद्यात आहे. ६,६९५.३७ कोटी रुपये खर्च करत बांधण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत आता होणार आहे. तर प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. कारण नव्या मार्गिकेत घाट भाग कमी होणार असल्याने दरडी कोसळण्याची भीती दूर होणार आहे.

प्रकल्पास चार वर्षे विलंब?

मिसिंग लिंकच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनियरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले आहे. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पावसाळ्यात आणि वाऱ्याचा वेग अधिक असताना काम करणे अशक्य होत असल्याने कामास विलंब होत असल्याचेही एमएसआरडीसीकडून सातत्याने सांगितले जाते. त्यामुळेच या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठीच्या अनेक तारखा चुकल्या आहेत. डिसेंबर २०२२, त्यानंतर जून २०२३, त्यानंतर जानेवारी २०२४, मार्च २०२४, डिसेंबर २०२४ अशा तारखा देण्यात आल्या. तर त्यानंतरही २०२५ मधील अनेक तारखा पूर्णत्वासाठी देण्यात आल्या आहेत. आता चार वर्षांच्या विलंबानंतर मात्र ही मार्गिका अखेर सेवेत दाखल झाली आहे.

कोणत्या वाहनांना प्रवेश? वेगमर्यादाही निश्चित?

या मार्गिकेमुळे आता महामार्गावरील घाटातून वाहनांना प्रवास करावा लागणार नसल्याने आणि खोपोली ते कुसगाव थेट मार्गिका तयार झाल्याने प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी झाला आहे. महामार्गावरील प्रवास सुसाट झाला आहे. मात्र सर्व प्रकारच्या वाहनांना हा सुसाट प्रवास करता येणार नाही. कारण एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलिसांनी या मार्गिकेवरील वाहतुकीबाबत काही नियम निश्चित केले आहेत. यासंबंधीची अधिसूचना लोकार्पणाआधी प्रसिद्ध झाली होती. या अधिसूचनेनुसार मिसिंग लिंकवरून हलकी वाहने आणि प्रवासी वाहने, बस, मिनी बस, ट्रक यांनाच प्रवेश आहे. मात्र अवजड मालवाहू वाहनांना सहा महिने प्रवेशबंदी आहे. सहा महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही, यावर निर्णय होणार आहे. तर या मार्गिकेवर चारचाकी वाहनांना ताशी १०० किमी अशी वेगमर्यादा असून प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी अशी वेगमर्यादा आहे.

कोणत्या वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी?

अधिसूचनेनुसार स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना कायमस्वरूपी बंदी असणार आहे. ही वाहने महामार्गावरील घाटातील रस्त्यावरूनच प्रवास करतील. काही दिवसांपूर्वी महामार्गातील बोगद्याजवळ गॅस टँकरला अपघात झाला आणि त्यानंतर वायू गळती झाली होती. या गळतीनंतर महामार्गावर ३२ तासांसाठी वाहतूक कोंडी झाली होती. वायू गळतीचे स्वरूप गंभीर असल्याने आवश्यक ती काळजी घेत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी, अधिकाऱ्यांनी, वाहतूक पोलिसांनी योग्य रित्या परिस्थिती हाताळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मिसिंग लिंकवर स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असणार असल्याने मिसिंग लिंकवरील प्रवास सुरक्षित ठरणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगितले जात आहे. वायू गळती दुर्घटनेमुळे स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आलेला नाही, तर मिसिंग लिंकच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एमएसआरडीसीने याआधीच हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.