Mumbai Sea Level Rise UN Report: जागतिक पातळीवर हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम जगातील अनेक देशांतील नागरिकांवर होताना दिसत आहे. अशातच संयुक्त राष्ट्रांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात या शतकाच्या अखेरीस मुंबई शहर कायमचे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली आहे. याबाबत आता मुंबई महानगरपालिकेकडून नव्याने अभ्यास केला जाणार आहे.
विकासाचा परिणाम पर्यावरणावर?
मुंबई शहर हे कायमच विकासाच्या रेट्यात राहिले आहे. मागील काही वर्षात शहरात आणि उपनगरात विकासाचा वेग लक्षणीय वाढला आहे. विविध विकास प्रकल्प शहरात होत असताना त्याचा सर्वाधिक परिणाम येथील पर्यावरणावर होत आहे. सात बेटांपासून मुंबईची निर्मिती झाली हा या शहराचा सर्वांना ज्ञात असणार इतिहास. त्यामुळे हे शहर अगदी त्याच्या निर्मितीपासून पाणथळ जमिनी, कांदळवने आणि मिठागरे या वैशिट्यांच्या आधारे वाढत गेले. ब्रिटिश काळात आधुनिक शहराची पायाभरणी होत असतात समुद्रात होणारे भराव ही नित्याची बाब झाली. तेव्हापासून सुरू झालेली ही प्रक्रिया शहरात अजूनही थांबलेली नाही. मुंबई सागरी किनारा प्रकल्पासाठी समुद्रात साधारणपणे १०० हेक्टर जमिनीवर भराव घालण्यात आला आहे. शहराच्या पूर्व किनारपट्टीवर असणाऱ्या मिठागरांना पर्यावरणीयदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, या जागांवरही विविध विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. वर्सोवा ते भाईंदर किनारा रस्ता प्रकल्पासाठी हजारो खारफुटींची कत्तल केली जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाकडून मुंबई पाण्याखाली जाण्याचा देण्यात आलेला इशारा महत्वपूर्ण असून या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.
संयुक्त राष्ट्रांचा इशारा काय?
संयुक्त राष्ट्रांनी नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२४मध्ये जागतिक स्तरावर समुद्राच्या पातळीत ५.९ मिमी इतकी लक्षणीय वाढ नोंदली गेली. हरित वायूंचे उत्सर्जन कमी केले तरीही २१०० पर्यंत समुद्राची पातळी किमान ०.५ मीटरने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पश्चिम अंटार्क्टिक बर्फाळ प्रदेशात अस्थिरता निर्माण झाल्यास समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढून ती २ मीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील काही भाग कायमचे पाण्याखाली जाऊन कोट्यवधि नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यात मुंबई, कोलकाता आणि ढाका या शहरांना सार्वधिक धोका असल्याचे म्हटले आहे. वेगाने होणारा विकास, वाढते काँक्रीटीकरण, घटते पुरप्रवरण क्षेत्र यांमुळे हा धोका अधिक वाढत आहे, असे मुंबईतील हवामान अभ्यासकांचे मत आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून नव्याने अभ्यास का केला जाणार आहे?
पालिकेकडून हवामान बदलाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन मुंबईच्या १४९ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचे नव्याने आरेखन केले जाणार आहे. तसेच कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे, जमिनीच्या वापरात झालेले बदल, किनारी प्रदेशात होणारा विकास आणि बदलत्या हवामानामुळे शहराला असणाऱ्या धोक्यांमध्ये झालेले बदल अशा सर्व मुद्द्यांचा यात परीक्षण केले जाणार आहे. हा अहवाल पुढच्या वर्षी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०२२मध्ये अशाप्रकारचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामुळे मागील पाच वर्षात पालिकेकडून मुंबईला असणाऱ्या संभाव्य धोक्यांवर हा दुसरा अभ्यास असणार आहे.
पालिकेचा २०२२चा अहवाल काय सांगतो?
महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या ‘मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन’मध्ये (एमसीएपी) किनारी प्रदेशातील पूरपरिस्थिती, वाढते प्रदूषण, हरित क्षेत्रात होणारी घट तसेच शहरात वाढणारी उष्णता आदी मुंबई शहारासाठी हवामान विषयक धोके असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालानुसार, २०५०पर्यंत मुंबई शहराचा तब्बल ८० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेच अहवालात गेल्या दोन दशकांत अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात सातत्याने वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.
मुंबईची भौगोलिक वैशिष्ट्ये जपणे का महत्वाचे ?
मुंबईच्या भौगोलिक स्थानाचा विचार करता हे शहर कायमच हवामान बदलाच्या दृष्टीने असुरक्षित राहिले आहे. पाणथळ जमिनी, मिठागरे आणि कांदळवळ ही मुंबईची भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. शहरावर होणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता काहीशी कमी करण्यासाठी याच वैशिष्ट्यांचे संवर्धन करण्याची गरज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. खारफुटी प्रदेश आणि पाणथळ जमिनी यामुळे पुराचे पाणी आणि जोरदार वादळी वाऱ्यांपासून शहराचे संरक्षण होते. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही टप्प्याटप्य्याने होणारी घटना आहे. पाण्याची पातळी वाढल्याने भरतीच्या वेळी अधिकाधिक भरतीचे पाणी उंच लाटांद्वारे आत येण्याचा धोका वाढत जाण्याची शक्यता अधिक. अशा वेळी मुंबईची भौगोलिक वैशिष्ट्ये जपण्याची गरज अधिकच अधोरेखित होत आहे. मात्र, ही वैशिष्ट्ये पायदळी तुडवून विकास होत राहिल्यास तसेच सध्याच्या पावसाच्या पद्धतीचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या इशाऱ्याचा विचार करता मुंबईत हवामान बदलाची तीव्रता जाणवण्यास अधिक वर्षे लागणार नाहीत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
siddharth.mhatre@expressindia.com
