मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकण प्रदेशात मागील आठवड्यापासून काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीसदृश पाऊस नोंदवला गेला. तसेच अनेक भागात चोवीस तासात २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. काही भागात संपूर्ण जुलै महिन्याच्या सरासरी पावसाहून अधिक पाऊस नोंदवला गेला. संपूर्ण कोकण प्रदेशात पावसाचा जोर असला तरीही उत्तर कोकणात म्हणजेच रायगड जिल्ह्यापासून ते पालघर जिल्ह्यापर्यंत मोसमी पावसाचा सर्वाधिक प्रभाव असल्याचे दिसून आले. वसई-विरार परिसरात मागील चार दिवसांपासून पूर परिस्थिती कायम असून येथील जनजीवन विस्कळीत होऊन शहरातील बहुतेक भाग पाण्याखाली गेले आहेत. काही हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे उत्तर कोकण प्रदेशात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला.
जून कोरडा तर जुलैमध्ये अतिवृष्टी कशी?
यंदा मोसमी पाऊस उत्तर कोकणात नेहमीपेक्षा उशिराने दाखल झाला. रायगडमध्ये मोसमी पावसाने २२ जून रोजी वाटचाल केली होती तर मुंबई आणि पालघरमध्ये २३ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. यंदा उत्तर कोकण प्रदेशात वळवाच्या पावसासाठी पोषक स्थिती नसल्याने जूनचा पंधरवडा तर कोरडा गेलाच, तसेच अखेरपर्यंत दिलासादायक पावसाची नोंद झाली नाही. यंदा या प्रदेशात नागरिकांना तीव्र उन्हाळा सहन करावा लागला. निम्मा जून महिना उष्ण आणि दमट वातावरण कायम होते. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे या प्रदेशात जून महिन्यातही तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागला. मात्र, जूनअखेरीस मोसमी पावसाचा जोर काहीसा वाढला आणि काही भागात चांगला पाऊस झाला. तसेच जुलैच्या सुरुवातीलाच या प्रदेशात मोसमी पाऊस सक्रिय झाल्याने अवघ्या पाच दिवसांत ५०० मिमीहून अधिक पाऊस नोंदवला गेला.
हवामान प्रणालीत कोणते बदल झाले?
मोसमी पावसाला बळ मिळण्यास कोणतीही एक प्रणाली पुरेशी नसते. त्यावर इतर अनेक प्रणालींचा प्रभाव असतो. वायव्य बंगालच्या उपसागरात २ जुलैला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. तसेच काही दिवसांतच त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. याचबरोबर सध्या दक्षिण गुजरातपासून ते मध्य केरळ किनारपट्टीपर्यंत ‘ऑफ शोअर ट्रफ’ म्हणजे कमी दाबाचा लांब पट्टा पसरला आहे. तसेच ‘विंड शिअर झोन’ म्हणजे ज्या भागात वाऱ्यांचा वेग किंवा दिशा अचानक बदलते असा पट्टा जेव्हा सक्रिय होतो तेव्हा हवा वरच्या दिशेने उचलली जाऊन ढगांची निर्मिती होते आणि त्यामुळे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वाढते. या सर्व प्रणालींच्या सक्रियतेमुळे उत्तर कोकण प्रदेशातील काही भागात प्रतितास ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने तसेच दक्षिण गुजरातवरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा वेग वाढला. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये बहुतेक भागात मागील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला.
आतापर्यत किती पाऊस?
जुलै महिन्याच्या आठ दिवसांत काही भागात या महिन्याच्या सरासरी पावसाहून अधिक पाऊस झाला, तर काही भागात सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली. यात पालघर जिल्ह्यात सरासरीहून सर्वाधिक पाऊस झाला. या जिल्ह्यात जुलै महिन्यात ८८० मिमी पाऊस अपेक्षित असतो. तेथे १ जुलै ते ८ जुलै दरम्यान ११०४ मिमी म्हणजेच सरासरीहून २९.५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. तसेच हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरीहून १०.२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. याचबरोबर ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ९९ टक्के तर रायगड जिल्यात जुलै महिन्याच्या सरासरीच्या ९८.७२ टक्के पावसाची नोंद आठ दिवसात झाली. तसेच १ जूनपासून ते ८ जुलै पर्यंत पालघर येथे १३२५ मिमी, ठाणे ९९२ मिमी, सांताक्रूझ १५३१ मिमी, कुलाबा १३८३ मिमी तर रायगड येथे १४९९ मिमी पावसाची नोंद झाली.
