मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (TISS) देवनार कॅम्पसमध्ये शिकणारा २६ वर्षीय विद्यार्थी अचानक वर्गातच बेशुद्ध होऊन पडला. कॅम्पसमध्ये रुग्णवाहिका आणि हृदयाची गती पूर्वरत करणारे ‘डिफिब्रिलेटर’ उपलब्ध नसल्याने सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ एका खाजगी कारमधून नजीकच्या रुग्णालयात नेले; पण उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. पी. जनार्दनन असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो ‘मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन’ या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. जनार्दननला चेंबूर येथील झेन मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करेपर्यंत सुमारे ३० मिनिटे उलटून गेली होती, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

विद्यार्थ्याचे प्राण नेमके कसे वाचू शकले असते?

“टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसपासून रुग्णालय अवघ्या २.५ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तरीही जनार्दननला रुग्णालयात आणण्यात सुमारे ३० मिनिटांचा वेळ गेला. उपचाराच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा वेळ होता. बेशुद्ध होण्यापूर्वी जनार्दनने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती; पण त्याला हृदयविकाराचा झटका नेमका कशामुळे आला हे आम्हाला अद्याप समजले नाही. प्राथामिक माहितीनुसार जनार्दननला यापूर्वी कोणतीही वैद्यकीय समस्या नव्हती. त्यामुळे शवविच्छेदन अहवालातूनच याबाबत स्पष्ट माहिती मिळेल. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील आपत्कालीन वैद्यकीय तयारीतील मोठी कमतरता अधोरेखित होते. जर तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण मिळाले असते आणि कॅम्पसमध्ये ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर तात्काळ उपलब्ध असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती,” असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

महाविद्यालयांमध्ये आपत्कालीन नियमावलीची गरज

डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, विशेषतः मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रथमोपचार आणि सीपीआरचे प्रशिक्षण असणे अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सीपीआर किंवा तातडीचे उपचार देणारे प्रशिक्षित कर्मचारी नेमले पाहिजेत. ज्याप्रमाणे आग विझवण्यासाठी अग्निशामक उपकरणे लावली जातात, त्याच धर्तीवर शैक्षणिक संस्थांमध्ये डिफिब्रिलेटर यंत्रे उपलब्ध असणे अनिवार्य केले पाहिजे. हृदयविकाराच्या रुग्णांच्या वयोगटात मोठा बदल झाला असून ही बाब अत्यंत चिंताजनक बाब आहे. आता ३० वर्षांखालील तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यापैकी काही रुग्णांमध्ये हृदयविकाराशी संबंधित नेहमीचे जोखमीचे घटकही आढळत नाहीत. त्यांच्या मधुमेह, उच्च रक्तदाब अशी कोणतीही लक्षणे नसतात. तसेच ते धूम्रपान किंवा मद्यपानही करत नाहीत. कोणताही जुना आजार नसताना अचानक अशा घटना घडत असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

हार्ट अटॅक आल्यानंतर तरुणाचा कसा वाचला जीव?

अलीकडील एका घटनेचा दाखला देताना डॉक्टर पाटणकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एम-वॉर्ड कार्यालयात मालमत्ता कर भरत असताना एका ३० वर्षीय तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब नव्हता. तसेच तो धूम्रपान किंवा मद्यपान करत नव्हता आणि त्याला यापूर्वी हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता. तो सक्रिय होता, कार्यालयात काम करत होता आणि रोजची सर्व कामे नियमितपणे करत होता. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्याला काही मिनिटांत रुग्णालयात आणण्यात आले आणि डिफिब्रिलेटरच्या शॉकद्वारे त्याचे प्राण वाचवण्यात आले. अँजिओग्राफीमध्ये त्याच्या डाव्या मुख्य कोरोनरी धमनीमध्ये १०० टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळले. त्यानंतर तातडीने त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. कोणतेही व्यसन नसले तरी त्याच्या रक्तवाहिनीतील सॉफ्ट प्लाक अचानक तुटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये नेमका फरक काय?

हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट या दोन वेगवेगळ्या वैद्यकीय स्थिती असल्याचे डॉक्टर सांगतात. हृदयाच्या एखाद्या भागाकडे जाणारा रक्तप्रवाह अचानक खंडित झाल्यास हार्ट अटॅकचा झटका येतो, तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक प्रभावीपणे रक्त पंप करणे बंद करते. हृदयविकाराचा झटका आल्याने कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो; पण या दोन्ही स्थिती एकसारख्या नाहीत. दोन्ही परिस्थितींमध्ये आपत्कालीन स्थिती वेळीच ओळखणे आणि योग्य उपचार तातडीने सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. एकंदरीत हार्ट अटॅक ही प्रामुख्याने हृदयाच्या रक्तपुरवठ्याशी संबंधित समस्या आहे, तर कार्डियाक अरेस्ट (हृदय बंद पडणे) ही हृदयाच्या प्रणालीशी संबंधित समस्या आहे.

तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतोय?

आजकाल फिट दिसणाऱ्या तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामागे धूम्रपान, तंबाखूचे सेवन, उच्च रक्तदाब, शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह, इन्सुलिन रेझिस्टन्स, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप यांसारख्या बाबी कारणीभूत असल्याचे मत डॉक्टर पाटणकर यांनी व्यक्त केले. अनेक तरुण रात्री जेमतेम सहा ते साडेसहा तास झोप घेतात. तसेच ऑफिसच्या वेळेनंतरही कामाशी जोडलेले राहतात. घरून कामाच्या ठिकाणी रोजचा प्रवास आणि दैनंदिन जीवनातील वाढता मानसिक ताण थेट हृदयावर परिणाम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तरुणांनी वयाच्या ४० किंवा ५० व्या वर्षापर्यंत अथवा शरीरात कोणतीही लक्षणे दिसेपर्यंत वाट पाहू नये. नियमित तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येऊन पडणे किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढणे यांसारख्या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.