Muhammad Ali Jinnah Illness Mumbai Doctors Pakistan Award : भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानने गेल्या आठवड्यात आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. या निमित्ताने मुस्लीम देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना आदरांजली वाहण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून पाकिस्तान सरकारने मुंबईतील दोन दिवंगत पारसी डॉक्टरांना आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’ देण्याची घोषणा केली. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीआधी या दोन्ही डॉक्टरांनी जिना यांच्या आजाराची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली होती. त्यांच्या सतर्कतेमुळेच पुढे पाकिस्तानची निर्मिती झाली असल्याचे तेथील नेत्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संस्थापकांना नेमका कोणता आजार झाला होता? मुंबईतील डॉक्टरांनी तो गुप्त का ठेवला? अखंड भारताच्या फाळणीआधी काय घडले होते? त्याविषयीचा हा आढावा…
अखंड भारताची फाळणी कशी झाली?
ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटीशकालीन भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे तयार झाली. एका ब्रिटीश न्यायाधीशांनी केवळ पाच आठवड्यांत फाळणीची योजना आखली होती. विशेष म्हणजे त्यांनी भारतात कधीही पाऊल ठेवले नव्हते. या फाळणीनंतर रेडक्लिफ रेषा आखली गेली आणि हिंदू व मुस्लीम दोन वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विभागले गेले. या घाईघाईत झालेल्या फाळणीचा परिणाम आजही जाणवतो. जवळपास आठ दशकांनंतरही या प्रदेशातील राजकारणावर त्याची छाप कायम आहे. मोहम्मद अली जिना हे पाकिस्तानच्या निर्मितीचे जनक मानले जातात. भारताच्या फाळणीआधी एका गंभीर आजाराने ग्रासल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यावेळी मुंबईतील आपल्या निवासस्थानी राहणारे जिना हे शहरातील दोन नामवंत पारसी डॉक्टरांकडून उपचार घेत होते. त्यांनीच जिना यांच्या आजाराची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली होती.
पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या पोस्टमध्ये काय?
पाकिस्तानच्या पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि नियोजन, विकास व विशेष उपक्रम मंत्री अहसान इकबाल यांनी १४ ऑगस्ट रोजी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. मुंबईतील दिवंगत फिजिशियन डॉ. जल रतनजी पटेल आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. जल धायभो-कू यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये इकबाल लिहितात की, पुरस्कार समितीचा अध्यक्ष या नात्याने, कायदे-आझम मोहम्मद अली जिना यांच्या प्राणघातक आजाराचे रहस्य अत्यंत निष्ठेने गुपित ठेवणाऱ्या मुंबईतील पारसी समाजातील दोन दिवंगत डॉक्टरांना ‘निशान-ए-इम्तियाज’ या सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकित करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल मला अभिमान आहे. डॉ. रतनजी पटेल आणि डॉ. धायभो यांना पुढील वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार दिला जाईल. या दोन्ही पारसी डॉक्टरांचा गौरव करण्यामागचे कारण स्पष्ट करताना इकबाल यांनी सांगितले की, जिनांचा हा गंभीर आजार केवळ त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांनाच माहिती होता. त्याबाबतची संपूर्ण काळजी दोन्ही डॉक्टरांनी घेतली होती.
जिना यांना नेमका कोणता आजार होता?
फाळणीची प्रक्रिया सुरू असताना मोहम्मद अली जिना यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि ही वस्तुस्थिती त्यावेळी बहुतेकांना माहीतही नव्हती. याबाबत इतिहासकार अकबर अहमद त्यांच्या ‘Jinnah, Pakistan and Islamic Identity: The Search for Saladin’ या पुस्तकात लिहितात की, १९३० पासूनच जिना यांना क्षयरोगाने ग्रासले होते. त्या काळात हा आजार अत्यंत जीवघेणा मानला जात होता आणि त्यावर कोणताही प्रभावी उपचार उपलब्ध नव्हता. १९३८ पासूनच जिना यांच्या मज्जासंस्थेवर आणि शारीरिक ताकदीवर ‘प्रचंड ताण’ येत असल्याच्या तक्रारी सातत्याने सुरू होत्या. त्यानंतर ते वारंवार आजारी पडू लागले होते. मात्र, त्यांचा हा आजार जगापासून पूर्णपणे लपवून ठेवण्यात आला होता. ही माहिती सार्वजनिक होऊ न देण्यात मुंबईतील दोन डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची ठरली. १९४६ मध्ये डॉ. रतनजी पटेल आणि डॉ. धायभो-कू यांनी जिना यांचे एक्स-रे तपासले. तेव्हा क्षयरोग कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बळावला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, हे दोन्ही डॉक्टर जिना यांचे जवळचे मित्रही होते, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी जिना यांची कशी काळजी घेतली?
लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपिएरे यांच्या ‘Freedom at Midnight’ या प्रसिद्ध पुस्तकातील एका संदर्भानुसार, मोहम्मद अली जिना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर डॉ. पटेल यांनी त्यांना आपल्या कार्यालयात नेले. त्यावेळी अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्यांनी आपल्या मित्राला त्यांच्या शरीराला पोखरणाऱ्या या प्राणघातक आजाराची जाणीव करून दिली. डॉ. पटेल यांनी जिना यांना स्पष्ट सांगितले होते की, त्यांची शारीरिक ताकद आता संपत आली आहे. त्यांनी जर आपल्या कामाचा प्रचंड भार कमी केला नाही, तर त्यांच्या हातात जगण्यासाठी जास्तीत जास्त एक किंवा दोन वर्षेच शिल्लक आहेत. आपला मृत्यू अत्यंत जवळ आला आहे हे समजल्यावर सामान्यतः कोणत्याही माणसाचे मनोधैर्य खचले असते; पण जिना यांच्यावर याचा कसलाही परिणाम झाला नाही. इतिहासाच्या या निर्णायक वळणावर भारतातील मुस्लिमांचे नेतृत्व करण्याच्या आपल्या ध्येयापासून जिना यांना प्रत्यक्ष मृत्यूपर्यंत कोणतीही गोष्ट रोखू शकणार नव्हती, असा उल्लेखही या पुस्तकात आढळतो.
जिना यांचा आजार गुप्त का ठेवण्यात आला?
‘Freedom at Midnight’ या पुस्तकातील संदर्भानुसार, जिनांवर उपचार करणाऱ्या दोन्ही वैद्यकीय तज्ज्ञांनी या आजाराची माहिती सार्वजनिक केली नाही. केवळ त्यांच्या निकटवर्तीयांपैकी अत्यंत मोजक्या व्यक्तींनाच या आजाराचे खरे गांभीर्य माहीत होते. जिनांच्या प्रकृतीविषयीची माहिती सार्वजनिक न करण्यामागे महत्त्वाचे राजकीय कारण असल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची आणि फाळणीची प्रक्रिया सुरू असताना जिनांचा गंभीर आजार उघड झाला असता, तर त्याचा परिणाम त्या काळातील राजकीय नेत्यांच्या निर्णयांवर आणि त्यांच्या रणनीतीवर होऊ शकला असता. जिनांकडे फार कमी काळ शिल्लक असल्याची माहिती समोर आली असती, तर फाळणीच्या वाटाघाटी आणि भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित राजकीय गणिते बदलण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या आजाराचे गांभीर्य अत्यंत गुप्त ठेवण्यात आले. याच कारणामुळे मुंबईतील डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभो-कू यांची भूमिका ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
“…तर पाकिस्तान अस्तित्वातच आला नसता”
जिना यांच्या गंभीर आजाराची माहिती १९४७ पूर्वी सार्वजनिक झाली असती, तर भारताच्या फाळणीचा आणि पाकिस्तानच्या निर्मितीचा इतिहासच वेगळा असता, असा दावा केला जातो. फाळणीची संपूर्ण प्रक्रिया हाताळणारे ब्रिटिशकालीन भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनीही त्याबाबतची कबुली दिली होती. “जर मला त्या वेळी या सर्व गोष्टींची (जिनांच्या गंभीर आजाराची) कल्पना असती, तर इतिहासाची दिशा पूर्णपणे वेगळी राहिली असती. मी स्वातंत्र्याची प्रक्रिया काही महिने पुढे ढकलली असती आणि त्यामुळे पाकिस्तान कधी अस्तित्वातच आला नसता,” असे माउंटबॅटन यांनी म्हटल्याचे ‘Freedom at Midnight’ या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. अनेक इतिहासकारही त्यांच्या या मताशी सहमत असल्याचे सांगितले जाते. कारण, माउंटबॅटन यांच्या दृष्टीने हिंदू-ब्रिटिश राजकीय डावपेचांना तसेच मुस्लीम समाजातील अंतर्गत संघर्षांना तोंड देण्याची जिद्द आणि कणखरता जिना यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुस्लीम नेत्यांकडे नव्हती.
फाळणीच्या एका वर्षानंतर जिना यांचे निधन
जिना क्षयरोगाने गंभीर आजारी होते आणि त्यांच्याकडे फार काळ जगण्याची शक्यता नव्हती, ही माहिती सार्वजनिक झाली असती तर फाळणी टाळण्याची शक्यता निर्माण झाली असती, असा दावाही काही इतिहासकारांनी केला आहे. दिवंगत डॉ. रतनजी पटेल आणि डॉ. धायभो-कू यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ देण्यामागील कारण स्पष्ट करताना पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल यांनीही एका मुद्द्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले. अत्यंत निर्णायक काळात या डॉक्टरांनी आपल्या गोपनीयतेचे पूर्णपणे पालन केले. त्यांच्या व्यावसायिक निष्ठेने अनवधानाने पाकिस्तानच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीत महत्त्वाचे योगदान दिले, असे इकबाल यांनी स्पष्ट केले. अखंड भारताच्या फाळणीनंतर आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर ११ सप्टेंबर १९४८ रोजी मोहम्मद अली जिना यांचे फुफ्फुसाच्या क्षयरोगामुळे निधन झाले. त्यांच्या आजाराचे गांभीर्य फाळणीपूर्वी सार्वजनिक झाले असते तर राजकीय समीकरणे बदलली असती का, हा प्रश्न आजही इतिहासकारांसाठी चर्चेचा विषय आहे.
