मुंबईतील एका २५ वर्षीय तरुणीला अचानक पोटदुखी, भूक न लागणे, वजन कमी होणे आणि मासिक पाळीत अनियमितता यांसारख्या समस्या जाणवत होत्या. त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता तिने थेट उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीदरम्यान तरुणीच्या उजव्या अंडाशयात मोठी गाठ आढळली. सुरुवातीला ही गाठ अंडाशयाच्या कर्करोगाची असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पुढील सखोल तपासणीत आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली. अंडाशयात तयार झालेली ही गाठ मूळ कर्करोग नसून दुय्यम असल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात कर्करोगाची सुरुवात तिच्या जठरात (पोटात) झाली होती आणि तो गुप्तपणे अंडाशयापर्यंत पसरला होता. अशाच आणखी एका प्रकरणात ३७ वर्षीय महिला वैद्यकीय तपासणीसाठी गेली असता तिच्याही दोन्ही अंडाशयांमध्ये मोठ्या गाठी आढळल्या.
सुरुवातीला या अंडाशयाच्या कर्करोगाच्या गाठी असल्याचा संशय डॉक्टरांना होता. मात्र, वैद्यकीय चाचणीत या दोन्ही गाठींचा उगम अंडाशयात नसून जठराच्या कर्करोगातून झाल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच, पोटातील कर्करोग अंडाशयापर्यंत पसरल्याने या गाठी निर्माण झाल्या होत्या. ही दोन्ही प्रकरणे कर्करोगाच्या निदानात केवळ गाठीच्या स्थानावरून निष्कर्ष काढणे धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून देतात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये मूळ कर्करोगाचे स्थान शोधण्यासाठी सखोल तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदविलेल्या दोन रुग्णांच्या प्रकरणांमुळे एक महत्त्वाची वैद्यकीय बाब समोर आली. महिलांच्या अंडाशयात आढळणारी प्रत्येक गाठ ही अंडाशयातूनच निर्माण झालेली असेल असे नाही. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये ही गाठ शरीरातील इतर अवयवांमधील, विशेषतः पोटाच्या कर्करोगामुळे पसरलेली असू शकते.
मुंबईतील डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण संशोधन
कर्करोग हा जगातील सर्वात प्राणघातक आजारांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच या आजाराचे नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत जगभरात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. चिंताजनक बाब म्हणजे त्यात तरुण-तरुणींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या आजारावर प्रभावी उपचार पद्धती शोधून काढण्यासाठी ठिकठिकाणी संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाची मूळ सुरुवात शरीरातील कोणत्या अवयावातून झाली हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण उपचारांची दिशा कर्करोग कुठे पसरला यावरून नाही, तर त्याचा मूळ उगमावरूनच ठरते. या संशोधनाचा निष्कर्ष ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिप्रॉडक्शन, कॉन्ट्रासेप्शन, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजी’ या नियतकालिकात ‘A gastrointestinal malignancy presenting as an ovarian mass: a case report of Krukenberg tumours’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आला आहे. कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र विभागातील डॉ. प्रतीक्षा दत्तु खामकर, डॉ. तुषार पालवे आणि डॉ. अनुषा शेट्टी यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे.
क्रुकेनबर्ग ट्यूमर म्हणजे काय?
क्रुकेनबर्ग ट्यूमर हा महिलांच्या अंडाशयातील दुर्मीळ आणि आक्रमक स्वरूपाचा दुय्यम कर्करोग आहे. या प्रकारात कर्करोगाच्या पेशी शरीरातील इतर अवयवांतून अंडाशयात पसरतात. बहुतांश वेळा त्याची सुरुवात पोटातून होते. मात्र, काही प्रकरणांमध्ये मोठे आतडे, अपेंडिक्स, स्वादुपिंड किंवा स्तनातूनही हा कर्करोग अंडाशयापर्यंत पसरू शकतो. क्रुकेनबर्ग ट्यूमर हा अंडाशयातील एकूण कर्करोगांपैकी केवळ १ ते २ टक्के प्रकरणांमध्ये आढळतो. हा आजार प्रामुख्याने प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत असला तरी तो कोणत्याही वयात होऊ शकतो. या कर्करोगाच्या पेशी रक्तप्रवाह किंवा लसिका प्रणालीद्वारे अंडाशयापर्यंत पोहोचतात. निदान होईपर्यंत हा आजार आधीच शरीरात पसरलेला असल्याने मूळ अंडाशयाच्या कर्करोगाच्या तुलनेत त्याची स्थिती अधिकच चिंताजनक मानली जाते.
लक्षणांमुळे निदानात होतो गोंधळ
या आजाराचे निदान करणे अवघड ठरते, कारण त्याची लक्षणे अंडाशयाच्या कर्करोगासह अनेक पचनसंस्था आणि स्त्रीरोगांशी मिळतीजुळती असतात. सुरुवातीला रुग्णांमध्ये पोटदुखी, पोट फुगणे, मासिक पाळीतील अनियमितता, भूक न लागणे, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे, थोडे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे अशी लक्षणे दिसू शकतात. या संशोधनाच्या प्रमुख लेखिका डॉ. प्रतीक्षा दत्तू खामकर यांनी सांगितले की, दोन्ही महिला रुग्णांना पोटात तीव्र वेदना होत होत्या. सुरुवातीला हा अंडाशयाचा कर्करोग असल्याचे वाटत असले तरी, ही प्रकरणे नेहमीपेक्षा वेगळी आणि दुर्मीळ होती. म्हणूनच आम्ही ही प्रकरणे नोंदवण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर या महिलांना अत्यंत दुर्मीळ प्रकारचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. खामकर पुढे म्हणाल्या, अंडाशयात गाठ आढळल्यानंतर सुरुवातीला ओव्हेरियन कर्करोगाचा संशय घेतला जातो. मात्र, डॉक्टरांनी अशा गाठी या पचनसंस्थेतील कर्करोगामुळे अंडाशयात पसरलेल्या असण्याची शक्यताही लक्षात घ्यायला हवी. क्रुकेनबर्ग ट्यूमरचे निदान प्रामुख्याने २५ ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्ये होते. या आजाराची लक्षणे ठराविक नसल्यामुळे आणि पोटातील मूळ कर्करोग बराच काळ कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढत राहिल्यामुळे त्याचे निदान अनेकदा उशिराने होते. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास महिलांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
निदान झाल्यानंतरच ठरते उपचाराची दिशा
अंडाशयातील गाठ शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन यांसारख्या चाचण्या उपयुक्त ठरतात. मात्र, या तपासण्यांवरून कर्करोगाची सुरुवात नेमकी कोणत्या अवयवातून झाली आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे मूळ कर्करोगाचा उगम शोधण्यासाठी डॉक्टरांना एंडोस्कोपी, ऊतींची बायोप्सी आणि विशेष पॅथॉलॉजिकल चाचण्यांची मदत घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाचा उगम नेमका कुठे झाला आहे, हे समजणे उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अंडाशयातील गाठ काढण्यासाठी किंवा रुग्णाची लक्षणे कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र, उपचारांचा मुख्य भर हा मूळ पोटाच्या कर्करोगावरच असतो. अशा रुग्णांना प्रगत अवस्थेतील जठराच्या कर्करोगासाठी वापरली जाणारी केमोथेरपी दिली जाते. तसेच, कर्करोगाच्या आण्विक (मॉलिक्युलर) वैशिष्ट्यांनुसार काही निवडक रुग्णांमध्ये लक्ष्यित उपचार (टार्गेटेड थेरपी) किंवा इम्युनोथेरपीचाही विचार केला जाऊ शकतो.
दोन्ही महिलांवर उपचार कसे करण्यात आले?
मुंबईतील दोन्ही महिलांनी जवळपास २५ दिवस सतत पोटदुखीचा त्रास सहन केल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालय गाठले. दोघींवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. पहिल्या प्रकरणात तपासणीदरम्यान अंडाशयात मोठी गाठ आढळली. त्याचबरोबर जठरात असामान्य जाडी वाढल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या एंडोस्कोपी चाचणीत महिलेला जठराचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच पॅथॉलॉजी तपासणीत अंडाशयातील गाठ ही जठरातील कर्करोगातून पसरल्याचे निश्चित झाले. त्यानंतर संबंधित महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पुढील कर्करोग उपचारांसाठी त्यांना ऑन्कोलॉजी विभागाकडे पाठविण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात महिलेच्या दोन्ही अंडाशयांमध्ये गाठी आढळल्या. त्याचबरोबर जठरातही असामान्य बदल दिसून आले. शस्त्रक्रिया आणि विशेष प्रयोगशाळा चाचण्यांनंतर डॉक्टरांनी हादेखील जठराच्या कर्करोगातून अंडाशयात पसरलेला क्रुकेनबर्ग ट्यूमर असल्याचे निश्चित केले. या महिलेला केमोथेरपीची सहा सत्रे देण्यात आली. उपचारानंतरच्या नियमित तपासण्यांमध्ये तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, मूळ कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपचार सुरू करता येतात. त्यामुळे रुग्णाच्या उपचारांचा परिणाम अधिक चांगला होण्याची शक्यता वाढते.
