Mumbai Underworld History Karim Lala: मुंबईत संघटित गुन्हेगारीने कधी आणि कसा जन्म घेतला, याचा शोध घेतला की सर्वात आधी नाव येतं ते अब्दुल करीम शेर खान म्हणजेच ‘करीम लाला’चं! स्वप्नाच्या शहरात आपले नशीब अजमावण्यासाठी आलेल्या गुन्हेगारांना मोहमयी मुंबापुरी भावली. पुढे मग विविध संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी मुंबईत कसा धुमाकूळ घातला आणि मुंबई पोलिसांनाही त्यांचा बीमोड केला, हे ज्ञात आहेच. याच संघटित गुन्हेगारीचा आढावा घेणारे सदर दर सोमवारी.
‘त्या’ने भ्रष्टाचाराला विरोध केला होता…
अफगाणिस्तानातील कुनार या प्रांतातून तेव्हाच्या एकसंध भारताच्या वायव्य सीमेवरील पंजाब प्रांतात ‘तो’ आला पोटाची खळगी भरण्यासाठी. तो पठाणच, त्यामुळे देहयष्टी आणि जोश होताच. याच जोरावर त्यावेळच्या ब्रिटिश सैन्यात तो सामील झाला. हे सैन्य युद्धासाठी नव्हते, तर आदिवासी भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. अफगाणिस्तानातून प्रवेश करणाऱ्यांना रेसिडेन्स परमीट देण्याची जबाबदारी या फौजेवर होती. परंतु तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालत होता. त्या भ्रष्टाचाराला त्याने जोरदार विरोध केला. परंतु त्यालाच फौजेबाहेर जावे लागले.
रोजगार मिळेना…
रोजगार शोधण्यासाठी त्याने कोलकता गाठले. परंतु तेथे आधीच त्याची महती पोहोचली होती. त्यामुळे त्याला रोजगार मिळेना. अखेर काहीच होत नसल्याचे निदर्शनास आल्याने १९३६ मध्ये तेव्हाची इम्पिरिअल ट्रेन पकडून तो आला मुंबईत. बॅलार्ड पीअर हे तेव्हा रेल्वे व मोठ्या बोटींचे स्थानक होते. लंडन ते इटलीतील ब्रिंडिसी हा रेल्वेप्रवास आणि इटलीहून बॅलार्ड पीअर बोटीने प्रवास करुन युरोपीयन लोक भारतात यायचे, तो हा काळ.

मुंबईचा पहिला डॉन
बॅलार्ड पीअरला उतरल्यावर तो थेट गेला तो पठाण मंडळी राहत असलेल्या डोंगरीतील तांडेल गल्लीत. मुंबईला पठाण नवखे नव्हते. त्यात आणखी एका पठाणाची म्हणजे अब्दुल करीम शेर खान ऊर्फ करीम लालाची भर पडली. मुंबईत तो रुळला आणि मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा जन्म तेव्हाच झाला. किंबहुना त्याचीच पठाण टोळी मुंबईत दहशत पसरवीत होती. करीम लाला मुंबईतील पहिला ‘डॅान’ ठरला.
करीम गोदीत हमाल झाला…
मशीद बंदरजवळील खडक डोंगरीतील तांडेल स्ट्रीटवर सर्व पठाण एकत्र राहायचे. एक मोठी खोली भाड्याने घेऊन १५ ते २० पठाण एकत्र नांदायचे. जेवणासाठी ते स्वयंपाकी ठेवायचे. स्वत: काम शोधायचे व उदरनिर्वाह चालवायचे. पठाणांची आकर्षक उंची व पीळदार शरीरयष्टीमुळे त्यांना व्यापारी, शेटजी, मिलमालक तसेच इतर उद्योगपतींकडे सहज सुरक्ष रक्षकाचे काम मिळायचे. ज्यांना हे काम मिळत नव्हते, ते तेव्हा अस्तित्त्वात असलेल्या पोर्ट ट्रस्टमध्ये (गोदी) हमालाचे काम करायचे. करीमही या ताफ्यात सामील झाला.
पठाणांना टोळीवाल्यांना हफ्ता द्यावा लागायचा…
गोदीतील वजनसामान उचलू लागला. गोदीतच आपल्याला कायमस्वरूपी रोजगार मिळेल, अशी आशा त्याला वाटत होती. तसे झाले असते तर कदाचित त्याची कथा वेगळी असती. परंतु करीमच्या बाबतीत काही वेगळेच होते. गोदीत जे कंत्राटी कामगार ठेवले जायचे तेथे विशिष्ट टोळीची मक्तेदारी असायची. केरळातील मलबारी आणि राज्यातील माथाडी कामगारांना प्रामुख्याने हमखास काम मिळायचे. पठाणांना काम हवे असेल तर या टोळीवाल्यांना मोठा हप्ता द्यावा लागत असे. हमाली करुन, हातगाडी ओढून जे काही मिळते त्यातही या टोळीला हप्ता द्यायचा, म्हणजे हाती काहीही उरणार नाही, याची करीमला कल्पना होती. परंतु नाईलाज होता.
करीम बेरोजगार झाला
परंतु यामुळे आपल्याला काहीही मिळणार नाही, याची कल्पना एव्हाना करीमला आली होती. अशातच रेल्वेच्या मालगाड्यांवर डल्ला मारुन ऐवज चोरणाऱ्या जुम्मा खानशी त्याचा संबंध आला, त्याच्याशी करीमचे सूत जमले. त्यांचे बरे चालले होते. परंतु १४ एप्रिल १९४४ मधील गोदीतील बॅाम्बस्फोटामुळे सारी गणिते बदलली. रेल्वे मालगाडीतील किमती माल लुटण्याचे प्रकार पोलिसांकडून गंभीरपणे घेण्यात आले. अशातच जुम्मा खान व साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकले गेले. अशा गुन्ह्याची जरब बसावी यासाठी जुम्मा खानला फाशी देण्यात आली. टोळी पुन्हा एकदा विखुरली गेली आणि करीमही पुन्हा एकदा बेरोजगार झाला.
बाबुल खान अफगाणिस्तानला पळून गेला
डोंगरीत जेके तर नळबाजारात बाबुल खान या दोन पठाण टोळ्यांची तेव्हा चलती होती. चरस, गांजा तस्करीत ते माहीर होते. करीमला बाबुल खान राहत असलेल्या जरीवाला बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळाली. बाबुल खानच्या मुलीची एका फेरीवाल्याने छेड काढली आणि त्याने फेरीवाल्याची निर्घृण हत्या केली. बाबुल खानला अटक झाली. या अटकेमुळे करीम बाबुल खानचा प्रतिस्पर्धी जेकेच्या संपर्कात आला. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी असला तरी जेकेने बाबुल खानला पॅरोल मिळावा यासाठी प्रयत्न केले. पॅरोलवर आल्यावर बाबुल खान अफगाणिस्तानला पळून गेला तो कायमचा.
लुटारू साथीदारांना गोळा केले
हे सर्व करीम जवळून पाहत होता. बराच काळ इथे काढल्यानंतर तो पुन्हा गोदीत गेला. मात्र यावेळी त्याच्या डोक्यात काही वेगळेच होते. हमाल म्हणून काम करायचे नाही, हे त्याने पक्के ठरवले होते. एकेकाळी रेल्वेच्या मालगाडीवर हल्ला करुन लुटणाऱ्या साथीदारांना त्याने गोळा केले. आता त्याने आपली पद्धत बदलली. नौकेवरील खलाशी, कस्टम अधिकारी व पोलीस यांच्या संपर्कात तो आला. त्यांच्याशी संगनमत केले आणि रेल्वे मालमाडीतील किमती ऐवज लंपास करण्याची योजना आखली.
एक नवा नेता उदयाला आला
गोदीत प्रवेश मिळविण्यासाठी तो हमाल म्हणूनच वावरला. असेच एकदा कामासाठी प्रतीक्षेत असताना करीम आणि त्याच्या अन्य साथीदारांकडे मलबारी टोळी हप्ता मागू लागली. परंतु या सर्व पठाणांनी हप्ता देण्यास विरोध केला. या पठाणांचे नेतृत्त्व करीम करीत होता. हप्ता दिला नाही तर गोदीत प्रवेश बंद करुन टाकू, असा दम मलबारी देऊ लागला. करीम जागेवरून उठला व म्हणाला, ‘बस्स. हम मेहनत करते है, तूम भी मेहनत करते हो. कोई फरक नही है! हम पैसा नही देगा; अब से वसुली बंद’, अशी खास पठाणी ढंगात गर्जना करीत करीम मलबारीच्या अंगावर धावून गेला. या अनपेक्षित हल्ल्याने मलबारी हादरला आण गोदीत मात्र एक नवा नेता उदयाला आला.
पोलिसांशीही संगनमत
करीम खान पठाणांचा ‘करीम लाला’ झाला. लाला म्हणजे मोठा भाऊ. तेव्हापासून करीम लाला हे नाव गोदीत घुमू लागले. सर्व पठाणांना तो नेता झाला. करीम लालाने मग गोदीची माललुटीची खास योजना तयार केली. खलाशी, कस्टम अधिकारी, पोलीस, लोडर्स आणि चोरीची मालमत्ता विकत घेणारे अशी साखळीच तयार केली. यातून करीम लालाकडे भरपूर माया जमा झाली. त्यानंतर तो स्वत:च पैसे कर्जावर देऊ लागला. पठाणांमध्ये करीम लालाला आदर मिळू लागला. पठाणांनी एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र झाले पाहिजे, अशी भाषा तो बोलू लागला.
पोलीसही करीम लालाची मदत घेत
करीम लालाला कोणीतरी बक्षीस दिलेली बॅटन हातात घेऊन तो आपणच नेता असल्यासारखे वावरू लागला.
अर्थात तो पठाणांचा मसीहा बनला. किंबहुना तसेच तो वावरू लागला व त्याला तशी मान्यताही पठाणांमध्ये आपसूक मिळत गेली. स्रियांबद्दल त्याला प्रचंड आदर होता. त्यांच्यासमोर तो अत्यंत अदबीने पेश यायचा. घटस्फोट वा विभक्त या विरोधात तो होता. वैवाहिक तंटेही तो सोडवत होता. त्याचे हे एक अंग असले तरी दुसऱ्या अंगाने तो तापट व क्रूर होता. चुकेल त्याला दयामाया नव्हती. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत पठाणांची नोंदणी करण्यासाठी पठाण शाखा असा स्वतंत्र कक्ष होता. या ठिकाणीही करीम लालाची ये-जा असायची. पठाणांसोबत बोलण्यासाठी वा एखादी अडचण असल्यास पोलीसही करीम लालाचीच मदत घेत असत. पठाण समाजामध्ये लाला इतका लोकप्रिय झाला होता की, एकप्रकारे तक्रार निवारण दरबारच तो चालवत होता. लोकंही वेगवेगळ्या समस्या घेऊन त्याच्याकडे जात होते आणि तोही प्रश्न सोडवत होता.
करीम लालाचे दुसरे लग्न
मुंबईत येऊन दीड दशक उलटले होते व आता लालाने स्वतंत्र खोली विकत घेतली होती. त्याच्यापेक्षा खूपच कमी वयाच्या फातिमाला तिचा मालक वाट्टेल तसा बोलत होता व मारतही होता. लालाने तिची सुटका केली व नंतर तिच्याशी विवाह केला. तिच्यापासून मुलगा व मुलगी झाली. मुलाचा वयाच्या पाचव्या वर्षीच मृत्यू झाला. मुलगा हवाच, असा मित्रांनी तगादा लावल्याने करीम लालाने दुसरे लग्न केले. त्याची दुसरी बायको फौजिया ही ‘डॅाक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेरबाझ खान याची कन्या. तो मुळात डॅाक्टर नव्हता तर दात ओढून काढण्यात तज्ज्ञ असल्यामुळे त्याला ही पदवी मिळालेली.
अंमली पदार्थांच्या तस्करीत पाय रोवला
या डॅाक्टरचे कर्नाक बंदर, घडियाल घोडी (प्रिन्सेस आणि व्हिक्टोरिया डॉकसाठी असलेला ब्रिटिशकालीन घड्याळ मनोरा), वाडी बंदर, सॅम्युअल स्ट्रीट, शिवडी, कॅामन ग्रीन आणि रे रोड येथे सात दारुचे आणि तीन जुगाराचे अड्डे होते. हे सर्व हाताळणे डॅाक्टरला कठीण जात होते. हुंडा म्हणून डॅाक्टरने करीम लालाला हे सारे देऊन टाकले. त्याने हे फक्त सांभाळले नाहीत, तर त्यात प्रचंड वाढ केली. डॉक्टरलाही त्यातील नफ्याची रक्कम स्वत:हून दिली. दुसरीकडे जेकेसोबत अंमली पदार्थांच्या तस्करीतही पाय रोवला. दारुचे अड्डे, वेश्या आणि जुगार अड्ड्यांशी त्यांचे नाव जुळले गेले.
आणि पोलिसांची नजर करीम लालावर
दुसरीकडे अफगाणिस्तानात राहत असलेल्या आईने करीमला पुन्हा बोलाविण्यासाठी त्याचा भाऊ रहीमला पाठवले. करीमच्या श्रीमंत वडिलांनी संपत्तीत वाटा देऊ केला होता. परंतु करीमने तो नाकारला आणि भावाला आपल्याकडे ठेवून घेतले. डोंगरीतील जेल रोडवर त्याला ‘कॅफे रहीम’ सुरु करुन दिले. याच कॅफेच्या पहिल्या मजल्यावर करीम लालाचे ॲाफिस होते. समोरच्या पदपथावर त्याचा दरबार चालायचा. पठाणी कोट परिधान करुन करीम लाला लोकांचे प्रश्न सोडवायचा. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांकडेही पोलिसांची नजर गेली होती.
पठाण गँगचे मुंबईवर वर्चस्व
अटक करुन आपल्याला अफगाणिस्तानात पाठवून दिले जाऊ शकते. असे वाटून करीम लालाने राजकीय आश्रय शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दिल्लीतील खान गाझी काबुली या पठाणी पत्रकाराने सुरू केलेल्या ‘पख्तून जिरगाह-ए-हिंद’ या संघटनेचा त्याला आसरा मिळाला. या संघटनेच्या मुंबई विभागाचा अध्यक्ष म्हणून करीम लाला निवडून आला. कॅफे रहिमच्याच इमारतीत या संघटनेचे काम सुरु झाले. स्वातंत्र्योत्तर काळात करीम लाला हा चांगलाच स्थिरावला होता. आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत होता. दोन नंबरचा धंदाही सुरु होता. परंतु तो त्याचे अन्य पंटर सांभाळीत होते. एखाद्याची सुपारी असेल तर हीच मुंबईची पठाण गँग सज्ज व्हायची… अगदी ८० च्या दशकापर्यंत पठाण गँगचेच मुंबईवर वर्चस्व राहिले. पुढे हाजी मस्तान व वरदराजन मुदलियार यांच्यात समझोता होऊन त्यांनीच मुंबईवर अधिराज्य गाजवले… (क्रमश:)
- संदर्भ :
- १. व्हेन इट ॲाल बिगॅन … राकेश मारीया, माजी पोलीस आयुक्त मुंबई,
- २. गुन्हे अन्वेषण विभागातील काही निवृत्त अधिकारी)
