JJ Shootout Gang War: मुंबईतील गुन्हेगारी अर्थात अंडरवर्ल्डच्या इतिहासात १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे ऐन रस्त्यांवर, झोपडपट्ट्यांतच नव्हे तर थेट रुग्णालयात किंवा तुरुंगातही गोळीबार होण्याचा काळ, टोळीयुद्धाचा काळ. त्या काळात सतत पुढे आलेले एक नाव म्हणजे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित शूटर सुभाष सिंह ठाकूर. १९९२ मधील जेजे हत्याकांड प्रकरणानंतर ठाकूर सर्वाधिक चर्चेत आला. त्या प्रकरणातील आरोपी असलेल्या ठाकूरला सरत्या २०२५ या वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात परत आणण्यात आले. या प्रकरणात त्याला सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती; मात्र नंतर ती जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली.

विरारमधील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणात अटक

उत्तर प्रदेशातील कारागृहात एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या सुभाष सिंह ठाकूरला विरारमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी मुंबईत आणण्यात आले असून, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील अंडरवर्ल्डच्या कुख्यात शूटरची चर्चा सुरू झाली आहे. अनेक टोळीयुद्धांतून जिवंत बचावलेला ठाकूर आता साठीत असून, तो स्वतःला ‘बाबा’ म्हणवतो. दाढी वाढलेली, डोक्यावर पांढरा रुमाल या रूपातील त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

खिम बहादूर थापाचा निकटवर्तीय

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी असलेला ठाकूर १९८०च्या दशकाच्या सुरुवातीपासून गुन्हेगारी कारवायांत सक्रिय होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नंतर तो मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या संपर्कात आला. दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेला आणि नंतर शिवसेनेचा नगरसेवक झालेला किम बहादूर थापा याचा तो निकटवर्तीय होता.

अनेक हत्याकांडांमध्ये सहभाग

१९८९ मध्ये अरुण गवळी टोळीतील जवळचा सहकारी पॉल न्यूमन याच्या हत्येतील सहभागामुळे ठाकूर मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात ठळकपणे पुढे आला. जेजे प्रकरणातील अटकेनंतर त्याने मुंबई पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, १९९२ मध्ये जेजे हत्याकांड घडले तेव्हा ठाकूर हा नामचीन गुंडच होता. त्याहीपूर्वी अनेक हत्या प्रकरणांत त्याचा सहभाग होता. त्या काळात तो दिल्लीत अशा व्यक्तीसोबत राहात होता, जी व्यक्ती नंतर उत्तर प्रदेश विधानसभेची आमदार झाली.

जेजे हत्याकांड प्रकरण

सप्टेंबर १९९२ मध्ये सुनील सावंत या गँगस्टरने त्याला मुंबईत बोलावले. जूहू येथील एका फ्लॅटमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. ११ सप्टेंबर रोजी त्याला सांगण्यात आले की, दाऊद इब्राहिमच्या मेहुण्याच्या हत्येप्रकरणातील आरोपी शैलेश हळदणकर जे. जे. रुग्णालयात दाखल आहे आणि त्याला लक्ष्य करायचे आहे. ठाकूरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुनील सावंतचा थेट संपर्क दाऊद इब्राहिमशी होता आणि सर्व व्यवस्था झाल्याचे त्याला कळवण्यात आले होते.

JJ-shootout-gangwar
जेजे हत्याकांडाने त्यावेळेस मुंबई हादरली होती

जेजेतील गोळीबार

योजना अशी होती की, रुग्णालयात प्रवेश करून पोलीस पहारेकऱ्यांना बंदुकीच्या धाकाने निःशस्त्र करायचे, वॉर्डमध्ये घुसून हत्या करायची आणि लगेच पळ काढायचा. रात्री उशिरा रेकी करण्यात आली होती आणि तेथे फक्त एकच पोलीस असल्याची माहिती त्यावेळेस त्यांना मिळाली होती. १२ सप्टेंबरच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास, ठाकूर आणि त्याचे साथीदार दोन गाड्यांतून जेजे रुग्णालयात पोहोचले. ठाकूरकडे ९ मिमी पिस्तूल होते, तर इतरांकडे पिस्तुल, रिव्हॉल्व्हर आणि एके-४७ रायफल्स होत्या. मात्र वॉर्डचे दार बंद झाल्याने योजना फसल्याचे ठाकूरला लक्षात आले आणि त्याने सर्वांना माघारी परतण्यास सांगितले. …त्यानंतर रुग्णालय परिसरात जोरदार चकमक झाली. पोलिसांनी विविध ठिकाणांहून गोळीबार केला आणि त्याला आपल्या साथीदारांनी प्रत्युत्तर दिल्याचा दावा ठाकूरने केला. नंतर त्याच्या एका सहकाऱ्याने वॉर्डमधील सर्वजण मारले गेल्याचे त्याला सांगितले, असे त्याने जबाबात सांगितल्याची पोलिसांची माहिती आहे.

संरक्षणार्थ असलेल्या पोलिसांचाही मृत्यू

वॉर्ड क्रमांक १८ मध्ये झालेल्या या गोळीबारात, बेड्या घालून खाटेला बांधलेल्या हळदणकरसह त्याच्यावर पहारा देणारे हेड कॉन्स्टेबल गजानन जावसेन आणि कॉन्स्टेबल कावळसिंग भानावत यांचाही मृत्यू झाला. काही दिवसांतच ठाकूरने मुंबई सोडली. वसईमार्गे तो दिल्लीला गेला आणि नंतर इतर ठिकाणी स्थलांतरित झाला.

अंडरवर्ल्डमधील कारवाया व अटक

एप्रिल १९९५ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीत अंतर्गत संघर्ष उफाळून आला आणि त्यात खिम बहादूर थापाची हत्या झाली. या हत्येसाठी छोटा राजन टोळीतील सदस्यांवर संशय व्यक्त करण्यात आला. हाच तो टप्पा होता, ज्यानंतर दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील फाटाफूट अधिक तीव्र झाली. पोलीस नोंदीनुसार, संजय रग्गड, दिवाकर चुरी आणि अमर जुकेर हे तिघे थापाच्या हत्येत सहभागी होते आणि नंतर ते बेपत्ता झाले. ठाकूरने थापाच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने या तिघांना नेपाळमधील एका घरात बोलावून घेऊन त्यांची हत्या घडवून आणली. जुलै १९९३ मध्ये दिल्ली पोलिसांनी ठाकूरला अटक केली. गुन्हे शाखेला सशस्त्र गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर विमानतळाजवळ एक वाहन अडवण्यात आले आणि त्यातून ठाकूरसह पाच जणांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली.

शिक्षा, कारावास ते ‘बाबाजी’

२००० साली मुंबईतील टाडा न्यायालयाने जे. जे. रुग्णालय गोळीबार प्रकरणात ठाकूरला फाशीची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा नंतर जन्मठेपेत रूपांतरित केली. मुंबईतील प्रकरणात दोषी ठरूनही ठाकूरने ट्रान्झिट रिमांडच्या माध्यमातून स्वतःला उत्तर प्रदेशात हलवून घेतले. दाऊद इब्राहिमकडून जीवाला धोका असल्याचे सांगत त्याने महाराष्ट्रात परत जाण्यास विरोध केला. तो दहा वर्षांहून अधिक काळ उत्तर प्रदेशातील कारागृहांत राहिला.

उत्तर प्रदेशात तुरुंग व रुग्णालयातून कारवाया

२०१६ मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी त्याचा ताबा घेतला, मात्र नंतर पुन्हा एका प्रकरणात त्याला उत्तर प्रदेशात हलवण्यात आले. त्याने गंभीर मूत्रपिंड विकार असल्याचा दावा करत वाराणसीतील रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी मिळवली. सुमारे पाच वर्षे तो विशेष सवलतींसह रुग्णालयात राहिला. मात्र १२ सदस्यीय वैद्यकीय समितीने त्याला रुग्णालयात ठेवण्याची गरज नसल्याचा अहवाल दिला. जानेवारी २०२५ मध्ये त्याची फतेहगड कारागृहात रवानगी करण्यात आली.

ठाण्यात दहशत

या प्रकरणाचा तपास केलेल्या निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, ठाकूरला उत्तर प्रदेशातच राहणे सोयीचे वाटत होते. तिथूनच तो मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना बोलावून धमकावत, खंडणी वसूल करत असे. या माध्यमातून त्याने ठाणे जिल्ह्यात काही भागांत दहशत निर्माण केली होती. २०२२ मधील वसईतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणात अखेर त्याला महाराष्ट्रात परत आणण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्याने दाढी वाढवली असून एखाद्या आध्यात्मिक गुरुप्रमाणे पांढरा रुमाल डोक्याला गुंडाळत बाबाजी अशी स्वतःची नवीन प्रतिमा तयार केली आहे.