पावसाळ्यातही तुम्हाला प्रचंड घाम सुटतोय का? बाहेर पाऊस पडून गेला तरी काही क्षणातच उकडायला सुरुवात होते? जर तुमचं उत्तर हो असेल, तर यामागे केवळ हवामान बदल नसून शहरांमध्ये वेगाने वाढणारा अर्बन हीट आयलँड ((Urban Heat Island – UHI) हा एक प्रमुख घटक आहे.
अर्बन हीट आयलँड म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या परिसरातलं तापमान त्याच्या सभोवतालच्या निमशहरी किंवा ग्रामीण भागाच्या तापमानापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असतं, तेव्हा त्या भागाला ‘अर्बन हीट आयलँड’ असं म्हणतात. उदा., तुम्ही तासंतास गॅस जवळ उभं राहून काम करत असाल. काम झाल्यावर तुम्ही गॅस बंद करून पंख्याखाली बसायला येता. पण जेव्हा तुम्ही पुन्हा स्वयंपाकघरात जाता तेव्हा अक्षरशः तिथे जशी भट्टी तयार झालेली असते. हे असंच काहीसं प्रामुख्याने महानगरांमध्ये पाहायला मिळते.
अर्बन हीट आयलँड तयार कसे होतात?
ग्रामीण भागात झाडे, माती आणि पाण्याचे साठे अधिक असतात. तिथे बाष्पोत्सर्जन (इवॅपोट्रान्स्पिरेशन) ही नैसर्गिक प्रक्रिया घडते. झाडे जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि पानांवाटे ते बाष्प स्वरूपात हवेत सोडतात. ही प्रक्रिया निसर्गाच्या ‘एअर कंडिशनिंग’सारखे काम करते, ज्यामुळे तिथली हवा थंड राहते.
याउलट शहर हे सिमेंट, काँक्रीट आणि डांबराने बनलेले असते. सूर्याची ऊर्जा या घन पदार्थांमध्ये साठवली जाते. दिवसभर शोषलेली ही ऊर्जा रात्रीच्या वेळी बाहेर फेकली जाते, ज्यामुळे शहरांमध्ये रात्रीदेखील थंडावा जाणवत नाही.
बाष्पोत्सर्जनाची प्रक्रिया कशी घडते?
आपल्या घरातल्या एखाद्या रोपट्याचे उदाहरण घेऊन ही प्रक्रिया समजून घेऊया. आपण रोज रोपाला पाणी देतो. ते किती द्यावे याचा अंदाज आपण मातीचा ओलसरपणा बघून करतो. हे पाणी रोपाच्या मुळांशी पोहोचते. ते रोप हे पाणी आपल्या मुळांच्या आधारे त्याच्या गरजेनुसार पुढे खोडाच्या मार्गाने पानांपर्यंत पोहोचवते. खोडात आणि पानांमध्ये ते पाणी जमा करून ठेवले जाते. शेवटी पाण्याचे रूपांतर बाष्पात (vapour) होते, ज्यामुळे आजूबाजूची हवा थंड राहते. हे निसर्गाचे वातानुकूलन यंत्रासारखे (air conditioner) काम करते.
तसेच, ग्रामीण भागात आणि विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात प्रचंड हिरवळ असल्यामुळे तिकडे ही एअर कंडिशनिंगची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे त्या प्रदेशाच्या हवेत अधिक गारठा असतो. याउलट शहरांमध्ये लगोलग बांधलेल्या इमारती, वनसंहार, गाड्या आणि माणसांच्या रहदारीमुळे या परिसरात बाष्पोच्छ्वासाची प्रक्रिया क्वचितच होते.
अर्बन हीट आयलँड तयार होण्याची कारणे?
- अर्बन कॅनियन्स :
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उंच इमारतींमुळे या तापमानात प्रकर्षाने बदल झाला. या संकल्पनेला ‘अर्बन कॅनियन्स’ किंवा ‘शहरी दऱ्या’ असेही म्हणतात. ज्याप्रमाणे दोन मोठ्या डोंगरांमध्ये अरुंद दरी असते, तसेच दोन्ही बाजूंना असलेल्या उंच इमारतींमुळे रस्त्यांचे रूपांतर एका कृत्रिम ‘दरी’त होते. या इमारती एकमेकांच्या इतक्या जवळ बांधलेल्या असतात की, ही उष्णता मोकळ्या आकाशात परत जाण्याऐवजी इमारतींच्या भिंतींमध्येच परावर्तित होत राहते आणि तिथेच अडकून पडते. दाटीवाटीच्या बांधकामामुळे वाऱ्याची हालचालदेखील सीमित राहते. मग त्यामुळे आपल्यालाही अनेकदा गुदमरल्यासारखे होते.
- मानव आणि मानवनिर्मित गोष्टी :
मानव आणि मानवनिर्मित (गाड्या, बस, रेल्वे, परिसरात होणारी बांधकामे, कारखाने, औद्योगिक क्षेत्रे इ.)प्रत्येक गोष्ट ऊर्जा निर्माण करते. इमारतींमधील वातानुकूलन यंत्रे (AC) आतली उष्णता खेचून बाहेर फेकत असतात, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसराचे तापमान काही अंशी वाढते. त्याचबरोबर शहरातील वाहनांची वर्दळ आणि कारखान्यांमधील यंत्रांमधून बाहेर पडणारी उष्णता थेट हवेत मिसळते.
- रंग आणि द्रव्ये:
आपल्याला लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुटीत अनेकदा सांगितले जायचे की, काळ्या रंगाचे कपडे घालू नका किंवा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, कॉटनच्या पातळ आणि फिकट रंगांच्या कपड्यांचा एक गठ्ठा असायचा. उन्हाळ्याच्या दिवसांत शाळेतून येताना आवर्जून आपण टोप्या घालायचो. त्याचे कारण असे की, गडद रंगाच्या वस्तू या अधिक पटकन उष्णता शोषून घेतात. त्यामुळे काळ्या कपड्यांमध्ये जास्त गरम होणे किंवा उन्हात जर आपण चालत असू, तर आपले डोके तापणे हे होणे स्वाभाविक आहे. या काळात आपण शक्यतो सिंथेटिक कपडे घालणे टाळतो. कारण- ते घामामुळे अंगाला चिकटून राहतात आणि त्यामुळे त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात.
त्याचप्रमाणे शहरांमध्ये इमारतीच्या बांधणीत प्रामुख्याने डांबर, स्टील व विटा वापरल्या जातात. यांसारख्या वस्तूचे रंग सहसा गडद असतात. गडद रंगाच्या वस्तू सूर्याची ऊर्जा शोषून घेतात आणि त्याचे रूपांतर उष्णतेत करतात, ज्यामुळे त्या वस्तू गरम होतात.
पर्यावरणावर होणारे परिणाम:
‘अर्बन हीट आयलँड’चा परिणाम पाण्याच्या साठ्यावर झालेला दिसतो. पावसाचे पाणी जेव्हा तापलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांवर आणि इमारतींवर पडते, तेव्हा ते गरम पाणी नाल्यांद्वारे स्थानिक नद्या किंवा अरबी समुद्रात मिसळते. या गरम पाण्यामुळे जलचरांना ‘थर्मल शॉक’ (जेव्हा आपण एका तापमानातून दुसऱ्या तापमानात जातो तेव्हा शरीरावर होणारा परिणाम) बसतो आणि ज्याचा मासे व इतर सागरी जीवांवर वाईट परिणाम होतो. तसेच, आपण मुंबईसारख्या शहरात किनारपट्टीजवळ उभे राहिलो, तर आपल्याला छान गार वारा जाणवतो. मात्र, किनारपट्टीच्या अलीकडे बांधलेल्या मोठमोठ्या इमारतींमुळे समुद्राकडून येणारी हवा तिथल्या तिथे स्थगित होते आणि वाऱ्याचा प्रवाह शहराच्या आतल्या भागापर्यंत पोहोचत नाही.
अर्बन हीट आयलँडचा शरीरावर होणारा परिणाम?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वाढत्या तापमानामुळे शरीरावर होणारे परीणाम सांगितले आहेत –
हीट स्ट्रेस – जेव्हा शरीर स्वतःचे तापमान संतुलित करू शकत नाही, तेव्हा त्याला ‘हीट स्ट्रेस’, असे म्हणतात. या परिस्थितीत थकवा, स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे व खूप घाम सुटणे अशी काही लक्षणे दिसून येतात. या लक्षणांना दुर्लक्ष केले, तर याचे रूपांतर ‘हीट स्ट्रोक’मध्ये होते.
हीट स्ट्रोक – या स्तरावर वैद्यकीय आणीबाणीची गरज असते. या परिस्थितीत शरीराचे तापमान ४०°C (१०४°F) च्या पुढे जाते. या परिस्थितीत चक्कर येणे, अस्पष्ट बोलणे, त्वचा कोरडी पडणे किंवा प्रचंड घाम सुटणे आणि उलट्या होणे (पित्त खवळणे) अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे मेंदू, किडनी आणि हृदयाला गंभीर इजा होऊ शकते.
उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यू आणि परिणामांची आकडेवारी:

पावसाळ्यातही अर्बन हीट आयलँड अस्तित्वात असतात का?
हो, पावसाळ्यातही अर्बन हीट आयलँड अस्तित्वात असतात. सामान्यतः आपल्या सगळ्यांचा असा समाज असतो की पाऊस सुरु झाल्यावर जमिनीने शोषून घेतलेली उष्णता नष्ट होते. आधुनिक हवामानशास्त्र आणि संशोधनानुसार, पावसाळ्यात शहरांमधील उष्णता गायब होत नाही; उलट ती काँक्रीटच्या जंगलांमुळे आणि हवेतील बाष्पामुळे अडकून पडते आणि अधिक धोकादायक ‘दमट उष्णतेच्या’ (Humid Heat) स्वरूपात रुपांतरित होते.
त्यामुळे आता, भारत सरकारने ‘उष्णतेची लाट’ (Heatwaves) आणि ‘वीज पडणे’ या घटनांना अधिकृतपणे ‘राष्ट्रीय आपत्ती’ (Disasters) म्हणून मान्यता दिली आहे, जेणेकरून आपत्ती निवारण निधीतून (Relief Funds) या समस्येशी लढण्यासाठी आणि मदतकार्यासाठी त्वरित निधी उपलब्ध होऊ शकेल.

आर्थिक बदल (economical changes):
वाढत्या उष्म्यामुळे वीज वापरामध्ये प्रचंड वाढ होते. उन्हाळ्यात AC आणि कूलरच्या वापरामुळे वीजबिलं वाढतातच; पण वीज वितरण यंत्रणेवर ताण आल्याने ‘भारनियमन’ची समस्याही उदभवते.
यावर उपाय काय?
अर्बन हीट आयलँडचा प्रभाव कमी करणे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. आपण काही प्रभावी बदलांनी आपल्या शहराचे तापमान कमी करू शकतो:
कूल रूफ: इमारतींच्या छतांवर पांढरा रंग मारणे किंवा उष्णता परावर्तित करणाऱ्या फरशा लावून घेणे.
मियावाकी जंगले: शहरात कमी जागेत घनदाट जंगले (URBAN FORESTS) विकसित करणे.
सच्छिद्र रस्ते: पावसाचे पाणी जमिनीत मुरेल अशा साहित्याचा वापर रस्त्यांसाठी करणे, जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहील. (pervious concrete, porous asphalt, interlocking concrete pavers, grass pavers)
गार्डन पॅचेस (Garden Patches): इमारतींच्या गच्चीत किंवा गॅलरीत झाडे लावणे.
अर्बन हीट आयलँड हे मुंबईकरांच्या वाढत्या त्रासाचे मुख्य कारण आहे. याचा फटका आपल्या आर्थिक नियोजन, आरोग्य आणि पर्यावरण यांना बसत आहे. या वर्षाच्या पावसाळ्यात अर्बन हीट आयलँडने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. विकासाच्या पायऱ्या आपण पार करत असलो तरी निसर्गाचा समतोल राखल्याशिवाय आपण शहरांना भविष्यातील उष्म्याच्या संकटातून वाचवू शकणार नाही. आता शरीरावरुन ओघळणारं पाणी पावसाचं की घामाचं सांगता येत नाही!
