मुंबईतून कोकणात अतिजलद आणि सुकर जाण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा मार्चमध्ये सुरू केली. मात्र महागड्या प्रवासामुळे या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही, तर पुढे तांत्रिक बिघाडाचे कारण देत ही सेवा अवघ्या एका महिन्यात बंद केली गेली. हा प्रयोग फसल्यानंतर आता सागरी मंडळाने मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट घातला आहे. हा प्रयोग यशस्वी होणार का, ही सेवा परवडणारी असणार का हे प्रश्न उपस्थित होतात.
मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी ‘रो-रो’चे पर्याय?
मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातही गणेशोत्सवात मुंबईतून मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जातात. रेल्वे, खासगी वाहने आणि एसटी असे पर्याय वापरत प्रवासी कोकणात पोहोचतात. मात्र गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रेल्वे आणि एसटीची अतिरिक्त सेवाही अपुरी पडते. दाटीवाटीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. रस्तेमार्गे जाणाऱ्या खासगी वाहनांची संख्याही प्रचंड मोठी असते. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी असते. तर कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या वाहनांचीही संख्या अधिक असते. मुंबई ते कोकण प्रवास करणाऱ्यासाठी प्रवाशांना १२ ते १४ तास वा त्यापेक्षाही अधिक तास घालवावे लागतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय पुढे आणत मुंबई ते विजयदुर्ग अशी रो-रो सेवा (रोल-ऑन, रोल-ऑफ) सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विजयदुर्ग बंदर येथे जेट्टी बांधून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी रो-रो सेवा सुरू करण्यात आली.
मुंबई-विजयदुर्ग सेवा अयशस्वी का ठरली?
मुंबईतील भाऊचा धक्का येथून १ मार्च २०२६ रोजी सकाळी ६२६ प्रवासी क्षमतेची ‘एम टू एम प्रिन्सेस’ बोट विजयदुर्गच्या दिशेने निघाली आणि मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेचा प्रारंभ झाला. मात्र रो-रो सेवेचे तिकीट भरमसाठ असल्याने या सेवेला प्रतिसादच मिळाला नाही. मुंबई – विजयदुर्ग प्रवासासाठी ३ हजार, ५ हजार, ७ हजार आणि ९ हजार असे प्रवासी तिकीट दर होते. तर दुचाकीसाठी १ हजार, सायकलीसाठी ६०० रुपये आणि चारचाकीसाठी ६ हजार ते ९ हजार रुपये असे दर आकारण्यात आले. विमानसेवा आणि वंदे भारतपेक्षा ही सेवा महागडी असल्याची टीका झाली आणि प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली. त्यामुळेच या सेवेच्या महिन्याभरात १२ फेऱ्या झाल्या आणि या १२ फेऱ्यांद्वारे केवळ ८९४ प्रवाशांनी प्रवास केला. तर केवळ १५४ वाहने यातून नेण्यात आली. या सेवेला प्रतिसाद मिळाला नाहीच, पण त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागला.
महिन्याभरातच सेवा बंद करण्याची वेळ का आली?
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रो-रोची फेरी सुरू असताना बोट अचानक बंद पडली. समुद्रात तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ‘एम टू एम प्रिन्सेस’ या रो-रो बोटीच्या चारपैकी तब्बल तीन इंजिन निकामी झाली आणि त्यानंतर रो-रोच्या फेऱ्या बंद झाल्या. इंजिन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र त्यानंतर अचानक सागरी मंडळाने रो-रो सेवाच अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर या प्रकल्पाचा पुन्हा अभ्यास करून सेवा सुरू करू असे सांगण्यात आले. मात्र आजही मुंबई ते विजयदुर्ग सेवा बंद असून हा प्रयोग फसल्याची, जनतेचा पैसा पाण्यात घातल्याची टीका होत आहे. अशात आता सागरी मंडळाने कोकणासाठी पुन्हा रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवेचा घाट?
मुंबई ते विजयदुर्ग रो-रोचा प्रयोग फसल्यानंतर आता सागरी मंडळाने मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई–वेंगुर्ला अशी रो-रो सुरू करण्यासाठी व्यवहार्यता तपासणी सुरू असून, विजयदुर्ग, मालवण असे थांबे या सेवेत असणार आहेत. तसेच रो-रो सेवेतील चार कंपन्यांनी या मार्गावर सेवा देण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्यानुसार त्यांच्या प्रस्तावावरही विचार सुरू असून, निविदा प्रक्रियेद्वारे कंपन्यांची नियुक्ती करून रो-रो सेवा सुरू केली जाणार आहे. तर रो-रो सेवा सर्वसामान्यांना परवडावी आणि या सेवेला प्रतिसाद मिळावा यासाठी तिकीट दर कमी ठेवण्याचा प्रयत्न असल्याचेही संकेत सागरी मंडळाने दिले आहेत.
मुंबई ते वेंगुर्ला प्रवास सात ते आठ तासांत केव्हापासून?
मुंबई ते वेंगु्ला रो-रो सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने सागरी मंडळाने हालचालींना वेग दिला आहे. त्यानुसार वेंगुर्ला बंदर येथे जेट्टीचे काम सुरू असून आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सेवा प्रस्तावांचा आणि प्रकल्पाच्या व्यवहार्यता तपासणीचा अभ्यास मंडळाकडून सुरू आहे. हा अभ्यास पूर्ण करून याबाबतचा अंतिम निर्णय घेत मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवेची घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कंपनीची नियुक्ती करून रो-रो सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबईत रो-रोने सात ते आठ तासांत जाता येणार आहे. पण हा प्रवास परवडणारा असेल का हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. तर हा प्रवास परवडणारा राहिला तरच ही सेवा यशस्वी होईल आणि अन्यथा मुंबई -विजयदुर्गप्रमाणे हा प्रयोगही फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
mangal.hanwate@expressindia.com
