मुंबईत ३० जून ते ७ जुलै या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल ८९८ मिमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या सरासरी पर्जन्यमानापेक्षाही हा पाऊस अधिक होता. या काळात मुंबई महापालिकेच्या १९ उपसा केंद्रांमधून तब्बल ४ हजार २९०.५ कोटी लीटर पाणी अरबी समुद्र आणि शहरालगतच्या खाड्यांमध्ये सोडण्यात आले. हे प्रमाण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पवई तलावाच्या साठवण क्षमतेपेक्षा आठपट जास्त आहे. त्याद्वारे संपूर्ण शहरातील पाण्याची गरज जवळपास १० दिवस भागवता आली असती. मात्र, हे पाणी समुद्रात सोडण्याशिवाय महापालिकेकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामागचे नेमके कारण काय होते? त्याविषयीचा हा आढावा…
मुंबईतील कोणत्या जलाशयांत किती पाणीसाठा?
मुंबईला भातसा, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी विहार आणि तुळशी वगळता इतर सर्व जलाशय शहराबाहेरील दूरच्या पाणलोट क्षेत्रात आहेत. हे जलाशये जवळपास पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात आणि चांगला पाऊस झाल्यास अतिशय वेगाने भरतात. सध्या पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सातही जलाशयांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या सुमारे ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये वैतरणा धरणातील पाण्याची पातळी सर्वाधिक वाढली आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११३ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे जलपातळीत १.९० मीटरची वाढ झाली आहे. तर अप्पर वैतरणा परिसरात ८० मिमी पाऊस झाल्याने या धरणातील साठा एकूण क्षमतेच्या ७५.७६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या भातसा धरणातील पाणीसाठाही आता ८६.८६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत ही सातही जलाशये पूर्णपणे भरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेला नाईलाजास्तव त्यातील पाणी उपसा केंद्रांद्वारे अरबी समुद्रात सोडावे लागले आहे.
मुंबईतील पाणीपुरवठ्याबाबतची समस्या कोणती?
मुंबईला दररोज चार हजार ३०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, सध्याची धरण प्रणाली दररोज केवळ तीन हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करू शकते. म्हणजेच, जलाशय तुडूंब भरले तरी शहराला दररोज ४०० दशलक्ष लिटर पाण्याची तूट सहन करावी लागते. त्यामुळेच यंदाच्या हंगामातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले असले, तरी पाणीपुरवठा आणि वाढती मागणी यांतील तफावत अद्याप कायम आहे. मुंबईत दरवर्षी २,००० मिमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडतो. मात्र, तरीही शहराची संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा केवळ मान्सून हंगामावरच अवलंबून आहे. त्यातच धरणांची साठवण क्षमता कमी असल्यामुळे महापालिकेला दरवर्षी अतिरिक्त पाणी समुद्रात सोडावे लागते. गेल्या १५० वर्षांच्या कालावधीत मुंबईतील पाणीपुरवठा यंत्रणा टप्प्याटप्प्याने उभारण्यात आली आहे. १८६० मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विहार तलावाची निर्मिती करण्यात आली आणि याच उद्यानात तुलशी तलावही आहे. १८९२ मध्ये सुरू झालेले तानसा धरण, तसेच मोडक सागर आणि १९८२ मध्ये बांधण्यात आलेले भातसा धरण हे ठाणे जिल्ह्यात आहे. २०१२ मध्ये पूर्ण झालेला मिडल वैतरणा प्रकल्प हा या व्यवस्थेतील सर्वांत नवा जलाशय आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही धरणे काठोकाठ भरतात आणि शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीपुरवठा करतात. या धरणांमधील पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून पाईपलाईनद्वारे संपूर्ण शहरात पोहोचवले जाते. मात्र, एवढी मोठी यंत्रणा असूनही मुंबईत दररोज पाण्याचा तुटवडा जाणवतो.
अतिरिक्त पाणी साठवणे इतके अवघड का?
शहरावरील पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा का साठवला जात नाही, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. वैतरणा नदीच्या १५४ किमीच्या पात्रात वेगवेगळ्या उंचीवर तीन धरणे बांधण्यात आली आहेत. त्यातील अप्पर वैतरणा धरणाची क्षमता २.२७ लाख दशलक्ष लिटर, ‘मिडल वैतरणाची १.७३ लाख दशलक्ष लिटर आणि मोडक सागरची क्षमता १.२८ लाख दशलक्ष लिटर आहे. याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले की, अपर वैतरणा धरण भरल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी मिडल वैतरणाच्या पाणलोट क्षेत्रात जमा होते. त्यानंतर ही दोन्ही धरणे भरल्यावर अतिरिक्त पाणी सर्वात खालच्या स्तरावरील मोडक सागरच्या पाणलोट क्षेत्रात पोहोचते. ३१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यंदा अपर वैतरणा धरण ७६.६४ टक्के भरले आहे, तर मिडल वैतरणा धरणात ८९.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील किती पाणी वाहून जाते, याची अधिकृत नोंद पालिकेकडे नाही. मात्र, अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, दरवर्षी वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचे प्रमाण साधारणपणे संबंधित जलाशयाच्या एकूण साठवण क्षमतेएवढेच असते.
अतिरिक्त पाणी साठवण्यासाठीचा नेमका खर्च किती?
अभिजीत बांगर यांच्या मते, हे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी विद्यमान धरणांइतकीच क्षमता असलेली नवी धरणे उभारावी लागतील. मात्र, त्यासाठी प्रचंड आर्थिक खर्च करावा लागेल. शिवाय, दरवर्षी पावसाचे प्रमाण सारखे नसते. अतिरिक्त पाणी मुंबईपर्यंत आणण्यासाठी नव्याने जलवाहिन्यांचे जाळे उभारणे हेदेखील अत्यंत मोठे खर्चिक काम ठरेल. या प्रकल्पांचा आर्थिक हिशोबही या आव्हानाची जाणीव करून देतो. नुकतेच महापालिकेने सुमारे १३० कोटी रुपये खर्चून दादर येथील प्रमोद महाजन उद्यानात तीन कोटी लिटर क्षमतेची भूमिगत टाकी बांधली आहे. या गणितानुसार, अवघे ३०० कोटी लिटर पाणी साठवण्यासाठी किमान २,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल आणि यामध्ये त्याच्या देखभालीचा खर्च वेगळा असेल. यादरम्यान धरणांमधील अतिरिक्त पाणी साठवणे कठीण असले, तरी मुंबई शहरात जिथे पाऊस पडतो तिथेच ते पाणी साठवणे (रेनवॉटर हार्वेस्टिंग) हा अधिक व्यवहार्य आणि दीर्घकालीन उपाय असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबईत किमान २८ वेळा चार तास चाललेल्या अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तसेच २०२१ ते २०२४ या कालावधीत शहरात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेले ६६ दिवस नोंदवले गेले आहेत.
उपसा केंद्रांतून समुद्रात किती पाणी सोडले?
३० जून ते ७ जुलै या कालावधीत समुद्रात सोडण्यात आलेल्या ४,२९०.५ कोटी लिटर पाण्यापैकी सर्वाधिक ७८३.१४ कोटी लिटर पाणी विलेपार्ले येथील इर्ला पंपिंग स्टेशनमधून बाहेर टाकण्यात आले. त्यापाठोपाठ हाजी अली केंद्राने ५९५.४३ कोटी लिटर आणि वरळीतील लव्ह ग्रोव्ह केंद्राने ५३५.६९ कोटी लिटर पाणी समुद्रात टाकले. एकंदरीत या तिन्ही केंद्रांनी मिळून तब्बल १,९१४.२६ कोटी लिटर पाणी समुद्रात सोडले, जे मुंबईची साडेचार दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसे होते. तज्ज्ञांच्या मते, पावसाचे पाणी हे अशुद्ध किंवा निरुपयोगी नसते. ते साठवण टाक्यांमध्ये किंवा नैसर्गिक तलावांमध्ये जमा करून शुद्धीकरणानंतर पिण्यासाठी वापरता येते. तसेच शुद्धीकरण न केलेले पाणीही औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडू शकते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईच्या हद्दीत असलेल्या एकमेव विहार तलावातून अतिरिक्त २०० दशलक्ष पाणी साठवण्याचा प्रकल्प पालिकेने सुरू केला आहे. पावसाळ्यात विहार तलाव (२७,६९८ दशलक्ष लिटर क्षमता) भरल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी मिठी नदीत जाते. त्यामुळे सांताक्रूझ, कालिना, कुर्ला आणि घाटकोपर परिसरात पूरस्थिती निर्माण होते. ही समस्या लक्षात घेऊन ९८ कोटी रुपयांच्या खर्चाने नवीन पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. याबाबत महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, साठवलेले अतिरिक्त पाणी जवळच असलेल्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाईल आणि शुद्धीकरणानंतर हे पाणी घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून देता येईल. हा प्रकल्प २०२७ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी महापालिकेने शहरातील उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये ८०० बायोस्वेल्स (वनस्पतींनी आच्छादित जलशोषक चर) उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. दादर, माटुंगा, सांताक्रूझ, अंधेरी आणि वाकोला या नेहमी पाणी साचणाऱ्या भागांपासून या योजनेची सुरुवात होणार आहे. त्यामुळे दरवर्षी मुंबईकरांवर निर्माण होणारे पाणीटंचाईचे संकट दूर होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
