Zinc Phosphide Mumbai Watermelon Case: मुंबईतील ‘कलिंगड प्रकरणा’चा गुंता अखेर ११ दिवसांच्या तपासानंतर आणि ५४ वेगवेगळ्या चाचण्यांनंतर सुटला आहे. कोणत्याही नैसर्गिक आजारामुळे नव्हे, तर ‘झिंक फॉस्फाइड’ या उंदीर मारण्याच्या अत्यंत विषारी औषधामुळेच डोकाडिया कुटुंबाचा बळी गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या भीषण दुर्घटनेत अब्दुल्ला डोकाडिया (४४), त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि त्यांच्या दोन मुली आयेशा (१६) व झैनब (१२) या चौघांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने झिंक फॉस्फाइड या विषारी घटकाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
न्यायवैद्यक तज्ज्ञांनी (Forensic Experts) दिलेल्या माहितीनुसार, त्या रात्री कुटुंबाने जे कलिंगड खाल्ले होते, त्यामध्ये हे उंदीर मारण्याचे विष मिसळले गेले होते. या विषाचा संपर्क येताच शरीरात एक जीवघेणा वायू तयार होतो. या वायुमुळे काही तासांतच माणसाचा मृत्यू होतो. याच प्राणघातक वायूमुळे डोकाडिया कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.
झिंक फॉस्फाइड म्हणजे काय आणि ते प्राणघातक का ठरते?
झिंक फॉस्फाइडचे स्वरूप:
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, झिंक फॉस्फाइड हे फॉस्फरस आणि झिंक यांच्या संयोगातून तयार झालेले एक ‘कृत्रिम संयुग’ (Inorganic compound) आहे. याचा मुख्य वापर उंदीर मारण्यासाठी अत्यंत प्रभावी विष म्हणून केला जातो, हे रसायन कमालीचे विषारी असते.
हे विष शरीरावर कसा परिणाम करते?
झिंक फॉस्फाइड शरीरात (पोटात) गेल्यावर त्याची पोटातील नैसर्गिक आम्लाशी (Stomach Acid) रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेतून ‘फॉस्फीन’ नावाचा अत्यंत विषारी वायू उत्सर्जित होतो. हा वायू इतका घातक असतो की तो काही वेळातच संपूर्ण शरीरात पसरतो.
पेशींवर होणारा हल्ला
हा विषारी वायू शरीरातील पेशींमध्ये शिरकाव करतो आणि त्यांच्या ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया (Cellular Respiration) पूर्णपणे रोखून धरतो. परिणामी, पेशी मरू लागतात आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खाली येते. शरीराची अंतर्गत यंत्रणा कोलमडल्यामुळे मृत्यू ओढवतो.
वेळेचे महत्त्व
न्यायवैद्यक तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, झिंक फॉस्फाइडचा अगदी छोटासा अंशही माणसाचा जीव घेण्यासाठी पुरेसा असतो. अशा प्रकारच्या विषबाधेतून वाचण्याची शक्यता केवळ एका गोष्टीवर अवलंबून असते, ती म्हणजे वेळ. बाधित व्यक्तीला विषबाधेनंतर एका तासाच्या आत तातडीने रुग्णालयात पोहोचवले, तरच जीव वाचण्याची शक्यता असते. एकदा का वेळ निघून गेली, तर प्रगत वैद्यकीय उपचारही अपुरे पडू शकतात. या विषातून निर्माण होणारा वायू फुफ्फुसांचे कधीही भरून न येणारे नुकसान करू शकतो.

“हा विषारी वायू थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खाली आणतो,” अशी माहिती एका न्यायवैद्यक (Forensic) अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. त्यांच्या अंदाजानुसार, धाकट्या मुलीचा मृत्यू कदाचित सर्वांत आधी झाला असावा, कारण तिचे शरीर या विषाचा दाहक परिणाम सहन करू शकले नाही.
डॉक्टरांनी अधिक स्पष्ट करताना सांगितले की, हे विष शरीरात गेल्यावर अत्यंत वेगाने पसरते. अवघ्या ३० मिनिटांपासून एका तासाच्या आत त्याची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये प्रामुख्याने उलट्या होणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे आणि शरीराला झटके येणे यांसारखे त्रास होतात. विषबाधेचे स्वरूप गंभीर असल्यास यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) निकामी होऊ शकतात, तसेच व्यक्ती भ्रमिष्ट अवस्थेत जाऊन कोमातही जाऊ शकते.
उपचार करणे इतके कठीण का असते?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या विषबाधेमध्ये ‘वेळ’ हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. Internal Medicine Expert डॉ. हेमलता अरोरा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना संगितले की, ‘गॅस्ट्रिक लॅव्हेज’ म्हणजेच पोट धुण्याची प्रक्रिया विष शरीरात गेल्यानंतर साधारण एका तासाच्या आत केली, तरच ती यशस्वी ठरू शकते. त्या म्हणतात, “एकदा का विष पचून पोट रिकामे झाले आणि रक्ताभिसरणात मिसळले, की त्यानंतर बाहेर काढण्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही.”
प्रयत्नांची शर्थ पण…
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सर जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पोट धुण्यासह सर्व प्रकारचे अतिदक्ष उपचार केले, मात्र तरीही डोकाडिया कुटुंबाचा जीव वाचवता आला नाही. झिंक फॉस्फाइडचे अगदी अल्प प्रमाणही माणसाला मृत्यूच्या दारात नेण्यास पुरेसे असते. हे विष बाजारात सहज उपलब्ध असल्याने, त्याचे सेवन अपघाताने झाले की कुणी जाणीवपूर्वक केले, या दोन्ही शक्यतांवर पोलीस तपास करत आहेत.
तज्ज्ञांचे मत
एफएसएलच्या (FSL) माजी संचालिका डॉ. रुक्मणी कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, झिंक फॉस्फाइडची अत्यंत कमी मात्राही प्राणघातक (Lethal Dose) ठरते. “हे विष सहजासहजी मिळण्यासारखे आहे. त्यामुळे हे सेवन स्वतःहून केले गेले असावे किंवा कुणीतरी अन्नातून ते दिले असावे, या दोन्ही बाजूंचा विचार होणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कुटुंबाचे शेवटचे जेवण: बिर्याणी आणि कलिंगड
२६ एप्रिलच्या रात्री डोकाडिया कुटुंबाने आपल्या नातेवाईकांसाठी घरी चिकन पुलावाचा बेत आखला होता. पाहुणे गेल्यानंतर, पहाटे साधारण १.३० च्या सुमारास कुटुंबातील या चौघांनी मिळून कलिंगड खाल्ले. मात्र, हे फळ खाल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांची प्रकृती वेगाने खालावली. उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण मृत्यूने एकापाठोपाठ एक सर्वांनाच गाठले. सकाळी १० च्या सुमारास सर्वांत आधी झैनबचा मृत्यू झाला, तर रात्री १० वाजेपर्यंत अब्दुल्ला यांनीही प्राण सोडले.
तपासातील गुंता कायम
हे संपूर्ण प्रकरण हत्या आहे, अपघाती मृत्यू की आत्महत्या, यावर पोलीस आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळा (FSL) दोन्ही यंत्रणा अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. पोलिसांच्या तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे, डोकाडिया यांच्या घरात उंदीर मारण्याचे कोणतेही विष किंवा त्या औषधाची पाकिटे आढळल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे हे विष कलिंगडात आले कसे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
