BJP mayor Mumbai history: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर भाजपा मोठी राजकीय ताकद म्हणून पुढे आल्याने, मुंबईला आता पक्षाचा ‘पहिला’ महापौर मिळणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र या चर्चेत एका महत्त्वाच्या ऐतिहासिक संदर्भाकडे दुर्लक्ष झाले आहे. मुंबईने ४० वर्षांपूर्वी भाजपाचा पहिला महापौर आधीच पाहिला आहे. फक्त त्यावेळी वेगळी राजकीय परिस्थिति होती, एवढेच. १९८० मध्ये भाजपाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत, डॉ. प्रभाकर संजीव पै यांच्या रूपाने मुंबईला भाजपाचा पहिला महापौर लाभला होता.

भाजपाचा पहिला महापौर होण्याची पार्श्वभूमी

मुंबईत भाजपाचा महापौर कसा झाला, हे समजून घेण्यासाठी १९७५ मधील आणीबाणीनंतरच्या राजकीय घडामोडींचा मागोवा घ्यावा लागतो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर देशभरात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यातूनच १९७७ साली काँग्रेसविरोधी व्यापक आघाडी म्हणून जनता पक्ष उदयास आला. या आघाडीत भारतीय जनसंघाचाही समावेश होता. पुढे हाच जनसंघ भाजपाचा वैचारिक आणि संघटनात्मक पाया ठरला. जनता पक्ष लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, १९७८ साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्याआधी १९७३ साली महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते.

आणीबाणीनंतरचे नवे राजकीय पर्व

काँग्रेसकडे ४५ जागा होत्या तर शिवसेनेकडे ३९ जागा होत्या. मात्र, १९७८ चा निकाल या सगळ्या राजकीय समीकरणांना छेद देणारा ठरला. जनता पक्षाने १४० पैकी ८३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. परिणामी काँग्रेस २५ आणि शिवसेना २१ जागांवर मर्यादित राहिली. या निकालामुळे मुंबई महापालिकेत नवे राजकीय पर्व सुरू झाले आणि महापौरपदावर समाजवादी विचारांच्या नेत्यांचा प्रभाव वाढला. १९८० साली भाजपाची औपचारिक स्थापना झाल्यानंतर, जनता पक्षाबरोबरच्या सत्तावाटपातून भाजपाला महापालिकेतील नेतृत्त्वात स्थान मिळाले. याच पार्श्वभूमीवर १९८२ साली डॉ. प्रभाकर संजीव पै यांची मुंबईचे ५३ वे महापौर म्हणून निवड झाली.

डॉ. प्रभाकर संजीव पै: राजकारणापलीकडील व्यक्तिमत्त्व

डॉ. प्रभाकर संजीव पै यांचा जन्म ९ जून १९३६ रोजी कर्नाटकातील बारकूर गावात झाला. वयाच्या १४व्या वर्षी ते मुंबईत आले. आयुर्वेदाचे शिक्षण आणि डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर त्यांनी वांद्रे (पश्चिम) येथील हिल रोडवर छोट्या क्लिनिकमधून वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १३ वर्षे सेवा केली. १९६८ साली पाली हिल, वांद्रे येथील प्रभाग क्रमांक १०० मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. १९६८ ते १९८४ या काळात त्यांनी सातत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सुरुवातीला काँग्रेसशी संबंधित असलेले डॉ. पै वांद्रे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही होते. १९८० साली भाजपाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

महापौरपद आणि आंतरराष्ट्रीय ओळख

महापौर म्हणून डॉ. पै यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये केले. जपान, तत्कालीन सोव्हिएत संघ, युरोप आणि आग्नेय आशियातील मंचांवर त्यांनी मुंबईची भूमिका मांडली. जपानमधील योकोहामा येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ लोकल गव्हर्नमेंट्समध्ये त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

झुणका-भाकर ट्रस्ट आणि सामाजिक वारसा

डॉ. पै यांच्या कार्यातील महत्त्वाचा ठसा म्हणजे झुणका-भाकर ट्रस्ट. शहरी गरीबांना परवडणाऱ्या दरात अन्न मिळावे, या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आली. पुढे १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर, याच कल्पनेचा आधार घेत झुणका-भाकर योजना सुरू करण्यात आली. रोजंदारीवरील कामगार, स्थलांतरित आणि बेरोजगार तरुणांसाठी केवळ १ रुपयात जेवण देणारी ही योजना मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली.

राजकारणातून माघार

महापौरपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर डॉ. पै हळूहळू सक्रिय राजकारणापासून दूर झाले. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात भाजपाचा विस्तार होत असताना पक्षांतर्गत स्पर्धा आणि गटबाजी वाढली. त्यांच्या संयमी आणि सौम्य राजकीय शैलीला या वातावरणात फारशी जागा राहिली नाही, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राजकारणानंतरचे आयुष्य

राजकारणातून माघार घेतल्यानंतरही डॉ. पै समाजकार्याशी जोडलेले राहिले. वांद्रे (पूर्व) येथे त्यांनी जनता एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत चालणारे पुरुषोत्तम हायस्कूल आजही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. जनता सेवा संघ या संस्थेमार्फत वैद्यकीय मदत, शिक्षण, अन्नसेवा आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत.

मुंबईच्या राजकीय स्मृतीचा महत्त्वाचा भाग

डॉ. प्रभाकर संजीव पै यांचे २०२० मध्ये वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. आज मुंबईत ‘पहिला भाजपा महापौर’ कोण, यावर चर्चा सुरू असताना, डॉ. पै यांचा विसर भाजपालाही पडलेला दिसतो. खरे तर हा केवळ एका पक्षाचा इतिहास नाही, तर मुंबईच्या राजकीय स्मृतीचाही महत्त्वाचा भाग आहे.