Learn about muscle weakness reasons and benefits of physiotherapy for healthy muscles: “डॉक्टर, माझे स्नायू खूप कमकुवत झाले आहेत. आता पूर्वीसारखं चालताही येत नाही.” फिजिओथेरेपी क्लिनिकमध्ये हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. काहींना जिने चढताना दम लागतो, तर काहींना खुर्चीतून उठण्यासाठी हाताचा आधार घ्यावा लागतो. वय वाढल्यामुळे स्नायूंमध्ये ताकद राहिली नाही असा निष्कर्ष काढण्यापूर्वी स्नायू कमकुवत होण्याची कारणे (muscle weakness reasons) आणि त्यावर फिजिओथेरेपीचे फायदे (benefits of physiotherapy) नेमके काय आहेत, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

कार्यक्षमता कमी होते

अनेकदा उत्तर “होय” असतं, पण तितक्याच वेळा उत्तर वेगळंही असतं. अनेक व्यक्तींमध्ये स्नायू कायमचे कमकुवत झालेले नसतात, तर ते पुरेशा प्रमाणात वापरले जात नसल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. आधुनिक पुनर्वसनशास्त्रात याला डिकंडिशनिंग म्हणजेच शारीरिक निष्क्रियतेमुळे शरीराची क्षमता कमी होणं असं म्हटलं जातं.

यूज इट ऑर लूज इट

आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, यूज इट ऑर लूज इट. ज्या स्नायूंचा नियमित वापर होतो ते अधिक मजबूत आणि कार्यक्षम होतात. उलट ज्या स्नायूंना पुरेसं काम मिळत नाही, त्यांची ताकद, सहनशक्ती आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. याच कारणामुळे हाताला प्लास्टर लावल्यानंतर काही आठवड्यांत त्या हाताचा आकार कमी झालेला दिसतो. दीर्घकाळ बेडरेस्ट, शस्त्रक्रियेनंतरची निष्क्रियता किंवा महिनोनमहिने कमी हालचाल यांचाही स्नायूंवर असाच परिणाम होतो.

Muscle weakness reasons and how to rebuild muscle strength | Benefits of physiotherapy for joint pain and leg weakness | स्नायू कमकुवत होण्याची कारणे आणि उपाय | कंबरदुखी आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी फिजिओथेरेपीचे फायदे
स्नायू कमकुवत होण्याची कारणे आणि फिजिओथेरेपीचे फायदे. (Image- Gemini)

आधुनिक जीवनशैली आणि कमी झालेली हालचाल

आज बहुतेक लोकांचा दिवस खुर्चीवरच जातो. सकाळी ऑफिसला गाडीने जाणं, दिवसभर संगणकासमोर बसणं, घरी परतल्यावर मोबाईल किंवा टीव्ही आणि अगदी एका मजल्यावर जाण्यासाठीही लिफ्टचा वापर या जीवनशैलीमुळे शरीराला पूर्वीसारखी हालचाल मिळत नाही. आपण थकल्यासारखं वाटत असल्यामुळे कमी चालतो; पण अनेकदा कमी चालत असल्यामुळेच जास्त थकायला लागतं, ही गोष्ट लक्षात येत नाही.

वय की निष्क्रियता?

अनेकांना वाटतं की, वय वाढलं म्हणजे स्नायू कमकुवत होणारच. होय, वयानुसार स्नायूंच्या वस्तुमानात आणि ताकदीत काही प्रमाणात घट होऊ शकते, त्याला सारकोपेनीया म्हणतात. मात्र संशोधन असंही सांगतं की, निष्क्रिय जीवनशैलीमुळे होणारा स्नायूंचा ऱ्हास अनेक वेळा वयामुळे होणाऱ्या बदलांपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो. याचं एक साधं उदाहरण म्हणजे ७० वर्षांची नियमित चालणारी आणि व्यायाम करणारी व्यक्ती अनेकदा ४५ वर्षांच्या निष्क्रिय व्यक्तीपेक्षा अधिक सक्षम असू शकते. म्हणूनच वय हा एक घटक असला, तरी हालचालींची सवय हा त्याहून मोठा घटक आहे.

शरीर ऊर्जा वाचवतं

आपलं शरीर अत्यंत कार्यक्षम आहे. ज्या स्नायूंची गरज नाही, त्यांच्यावर ते अनावश्यक ऊर्जा खर्च करत नाही. समजा एखादी व्यक्ती काही महिन्यांपासून जिने चढतच नाही. तर शरीर त्या कामासाठी आवश्यक असलेल्या स्नायूंना पूर्वीसारखं मजबूत ठेवण्याची गरज समजत नाही. परिणामी ते स्नायू हळूहळू कमी कार्यक्षम होऊ लागतात. याचा अर्थ स्नायू `नष्ट’ झालेले नसतात; ते फक्त कमी वापरामुळे निष्क्रिय झालेले असतात.

वेदना आणि निष्क्रियतेचं दुष्टचक्र

समजा एखाद्या व्यक्तीला कंबरदुखी सुरू झाली. ती व्यक्ती चालणं कमी करते, जिने टाळते, वजन उचलणं बंद करते आणि शक्य तितका आराम करते. सुरुवातीला थोडा आराम मिळू शकतो. पण काही आठवड्यांनंतर:

  • स्नायू कमकुवत होतात.
  • सांध्यांची हालचाल कमी होते.
  • सहनशक्ती घटते.
  • साधी कामंही अवघड वाटू लागतात.

मग व्यक्तीला वाटतं की आजार वाढला आहे. प्रत्यक्षात अनेक वेळा मूळ समस्या नसून शरीराची क्षमता कमी झालेली असते.

ताकद आणि कार्यक्षमता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत

फक्त स्नायूंचा आकार पाहून ताकद ठरत नाही. काही लोकांचे स्नायू दिसायला चांगले असतात, पण त्यांना जिने चढताना त्रास होतो. तर काही वृद्ध व्यक्ती दिसायला कृश असल्या तरी सहज चालतात, बसतात आणि उठतात. कारण ताकद म्हणजे केवळ स्नायूंचं वजन नव्हे; तर ते प्रत्यक्ष काम किती कार्यक्षमतेने करतात हे अधिक महत्त्वाचं असतं.

फिजिओथेरेपीमध्ये काय तपासलं जातं?

फिजिओथेरेपिस्ट केवळ स्नायू तपासत नाहीत. ते व्यक्तीची संपूर्ण कार्यक्षमता तपासतात.
उदाहरणार्थ:

  • खुर्चीतून किती सहज उठता येतं?
  • जिने चढताना अडचण येते का?
  • चालण्याचा वेग किती आहे?
  • एका पायावर संतुलन राखता येतं का?
  • कोणते स्नायू कमी काम करत आहेत आणि कोणते जास्त ताण घेत आहेत?
    यामुळे उपचार केवळ एका स्नायूपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण हालचालींच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं जातं.

पुन्हा ताकद वाढू शकते का?

ही या विषयातील सर्वात सकारात्मक गोष्ट आहे. योग्य प्रकारचा व्यायाम, नियमित हालचाल आणि हळूहळू वाढवलेला शारीरिक ताण यामुळे स्नायू पुन्हा मजबूत होऊ शकतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की अगदी ७०–८० वर्षांच्या व्यक्तींमध्येही योग्य स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फंक्शनल एक्सर्साइजमुळे स्नायूंची ताकद, संतुलन, चालण्याचा वेग आणि दैनंदिन काम करण्याची क्षमता सुधारू शकते.
म्हणूनच “आता वय झालंय, काही उपयोग नाही” हा समज चुकीचा आहे.

विश्रांती की योग्य हालचाल?

पूर्वी दुखलं की जास्तीत जास्त विश्रांतीचा सल्ला दिला जायचा. आज आधुनिक फिजिओथेरेपीचा दृष्टिकोन वेगळा आहे. पूर्ण विश्रांतीपेक्षा योग्य प्रमाणात, योग्य प्रकारची आणि व्यक्तीनुसार नियोजित हालचाल अधिक फायदेशीर ठरते. अर्थात, प्रत्येक वेदनेत सारखाच व्यायाम योग्य असतो असं नाही. त्यामुळे व्यायामाची निवड आणि प्रगती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी.

योग्य हालचाल, सातत्यपूर्ण व्यायाम महत्त्वाचा

प्रत्येक वेळी कमी ताकद म्हणजे स्नायू कायमचे कमकुवत झाले आहेत असं नसतं. अनेक वेळा ते फक्त नियमित वापरात नसल्यामुळे कमी कार्यक्षम झालेले असतात. शरीराची एक विलक्षण क्षमता म्हणजे ते सतत बदल स्वीकारत असतं. निष्क्रिय राहिलं तर क्षमता कमी होते; पण योग्य हालचाल, सातत्यपूर्ण व्यायाम आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ती पुन्हा वाढू शकते. लक्षात ठेवा, स्नायूंना सर्वात जास्त गरज औषधांची नसते; त्यांना गरज असते नियमित हालचालीची. कारण शरीर वापरलं तरच ते सक्षम राहतं. आणि जितकं आपण शरीरावर विश्वास ठेवून त्याला योग्य काम देऊ, तितकं ते पुन्हा आपली साथ देऊ लागेल!