Cancer is Genetic Or Lifestyle Disease: कॅन्सरमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी (२४ सप्टेंबर) निधन झाले. अचानक पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्यांना कॅन्सरचे निदान झाले. मुश्ताक खान यांना पाच वर्षांपूर्वीही कॅन्सर झाला होता. उपचारानंतर ते बरे झाले होते; मात्र दोन आठवड्यांपूर्वी हा आजार पुन्हा बळावला आणि त्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी दिल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे. तर दुसऱ्या बाजूला अभिनेता विवेक ओबेरॉयच्या सहारा शाह या २२ वर्षीय दत्तक मुलीने कॅन्सरशी झुंज देत नेपाळी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
ती अडीच वर्षांची असताना तिला सहारा शाह हिला कॅन्सरचे निदान झाले होते. विवेक ओबेरॉयने उपचारांसह तिच्या शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली होती. दुसरी बातमी चांगली असली तरी दोन्ही वृत्तातून आजच्या काळात कॅन्सरची वाढती समस्या अधोरेखित होते. शिवाय, कॅन्सर आनुवंशिक आहे का, हाही प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
कॅन्सरसाठी नेमके काय कारणीभूत?
कॅन्सरचा प्रश्न फक्त भारतापुरता मर्यादित नसून जागतिक पातळीवर या जीवघेण्या आजाराच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ पहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, कॅन्सर हे जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. २०२४ साली जगभरात सुमारे एक कोटी लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. म्हणजेच, जगभरातील दर सहा मृत्यूंपैकी जवळपास एक मृत्यू कॅन्सरमुळे झाला आहे (संदर्भ: WHO-Cancer Fact Sheet-3 July 2026). त्यामुळे कॅन्सर नेमका कशामुळे होतो, हा प्रश्न वारंवार विचारला जातो.
आनुवांशिक की, जीवनशैलीशी संबंधित विकार
विवेक ओबेरॉय याची दत्तक मुलगी सहारा शाह ही अडीच वर्षांची असताना तिला कॅन्सरचे निदान झाले. त्यामुळे एखाद व्यसन किंवा जीवनशैलीशी संबंधित घटकच त्यास कारणीभूत असतात, असे ठाम विधान करता येत नाही. या पार्श्वभूमीवर कॅन्सर आनुवंशिक आहे का, हाही प्रश्न विचारला जातो. त्यामुळे, कॅन्सर आनुवंशिक की याला वाईट जीवनशैली कारणीभूत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्याविषयी संशोधन काय सांगते, याचा घेतलेला हा आढावा.
नव्या अभ्यासात काय समोर आले?
मानवी शरीरात जुन्या पेशींच्या जागी सतत नवीन पेशी तयार होत असतात. मात्र, या प्रक्रियेचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांमध्ये बदल झाल्यास पेशींची अनियंत्रित वाढ होऊन कॅन्सर उद्भवू शकतो. आनुवंशिकता, विशिष्ट विषाणूंचा संसर्ग, तंबाखूचे सेवन आणि जीवनशैलीतील इतर घटकांमुळे हा धोका वाढतो. नव्या संशोधनानुसार, जगभरातील सुमारे ३७ टक्के कॅन्सर प्रकरणे ही योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे टाळणे शक्य असतात. म्हणूनच कॅन्सर हा केवळ आनुवंशिकतेमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे या प्रश्नांचे उत्तर तो दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून उद्भवू शकतो, असे मत तज्ज्ञ मांडतात. सजीव पेशींमध्ये होणारे काही जनुकीय बदल पालकांकडून वारशाने मिळतात, तर काही बदल आयुष्यभरात पेशींचे विभाजन होताना किंवा बाह्य घटकांच्या संपर्कामुळे निर्माण होतात, असे अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
कॅन्सरचे १०० हून अधिक प्रकार
फेब्रुवारी २०२६ मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधन संस्था (IARC) यांनी प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात १८५ देशांमधील ३६ प्रकारच्या कॅन्सरचा अभ्यास करण्यात आला.
कॅन्सरचे वर्गीकरण प्रामुख्याने प्रभावित अवयव आणि पेशींच्या प्रकारानुसार केले जाते. यामध्ये स्तन, फुफ्फुस आणि आतड्यांसारख्या अवयवांमध्ये विकसित होणाऱ्या कॅन्सरबरोबरच रक्त आणि रक्तनिर्मिती करणाऱ्या ऊतींमधील कॅन्सरचाही समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनानुसार ३७% कॅन्सरची प्रकरण टाळता येऊ शकतात.
JAMA Network Open (२०२५) या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, भारतातील ४३ कॅन्सर नोंदणी केंद्रांच्या आकडेवारीवर आधारित संशोधनानुसार, देशातील दर १०० व्यक्तींपैकी सुमारे ११ व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात कधीतरी कॅन्सर होण्याची शक्यता असते. २०२४ साली भारतात अंदाजे १५.६ लाख कॅन्सरचे नवे रुग्ण आढळले, तर सुमारे ८.७४ लाख लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला. यामध्ये पचनसंस्थेच्या कॅन्सरमुळे सर्वाधिक २.१२ लाख मृत्यू झाले. त्याखालोखाल तोंड व घशाच्या कॅन्सरमुळे १.५४ लाख, तर स्तनांच्या कॅन्सरमुळे सुमारे १.०२ लाख महिलांचा मृत्यू झाल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
कॅन्सर आनुवंशिक आहे का?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधनानुसार, पेशींची वाढ आणि विभाजन नियंत्रित करणाऱ्या जनुकांमध्ये बदल झाल्यास वेगळ्याच पेशी तयार होतात. या पेशींची अनियंत्रित वाढ होऊन कॅन्सरच्या गाठी (Tumours) तयार होऊ शकतात. कॅन्सरच्या काही प्रकरणांमध्ये या पेशी रक्तप्रवाह किंवा लसिका प्रणालीद्वारे (Lymphatic System) शरीराच्या इतर भागांत पसरतात. या प्रक्रियेला मेटास्टॅसिस (Metastasis) म्हणतात.
वैद्यकीय संशोधनानुसार, सुमारे ५ ते १० टक्के कॅन्सर आनुवंशिक जनुकीय बदलांशी संबंधित असतात. मात्र, बहुतांश कॅन्सर आयुष्यभरात पेशींमध्ये निर्माण होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे (Acquired Genetic Mutations) विकसित होतात. हे बदल तंबाखूचे सेवन, अतिनील किरणांचा संपर्क, विशिष्ट संसर्ग किंवा पेशींच्या विभाजनादरम्यान होणाऱ्या त्रुटींमुळे निर्माण होऊ शकतात.
आनुवंशिक कॅन्सरविषयीचे संशोधन काय सांगते?
आपल्या शरीरातील जनुके (Genes) आणि आपली दैनंदिन जीवनशैली या दोन्ही गोष्टी कॅन्सरच्या धोक्यावर कसा आणि किती परिणाम करतात, यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी नवा प्रकाश टाकला आहे. जुलै २०२५ मध्ये ‘eBioMedicine’ मध्ये प्रकाशित १७,००० पेक्षा जास्त रुग्णांच्या विश्लेषणातून एंडोमेट्रियल कॅन्सरशी संबंधित शरीरातील ५ नवीन आनुवंशिक ठिकाणे (Genetic Loci) शोधण्यात आली. तसेच, माउंट सिनाईच्या संशोधकांनी एप्रिल २०२५ मध्ये दाखवून दिले की, वारसाहक्काने मिळणारे जनुकीय प्रकार (Inherited Germline Variants) केवळ कॅन्सरचा धोकाच वाढवत नाहीत, तर ट्यूमरच्या जीवशास्त्रीय वर्तनावरही थेट परिणाम करतात. याशिवाय नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने किडनीच्या कॅन्सरची ५० नवीन जनुकीय ठिकाणे शोधली आहेत, आयर्लंडच्या ‘deCODE genetics’ ने ६ दुर्मिळ जनुकीय प्रकार उघड केले आहेत, तर स्टॅनफोर्डच्या संशोधकांनी १३ प्रमुख कॅन्सरमध्ये सुमारे ३८० आनुवांशिक डीएनए प्रकार शोधून काढले आहेत.
कॅन्सरसाठी प्रामुख्याने जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत
दुसऱ्या बाजूला, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकांमुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘शर्लक-लंग स्टडी’नुसार, हवेतील प्रदूषणामुळे आता धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या पेशींमधील डीएनएमध्येही घातक बदल घडून येत असून त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. २०२३ मध्ये ‘BMJ Oncology’ ने नोंदवल्यानुसार, गेल्या तीन दशकांत (१९९०-२०१९) जगभरात ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांत ७९ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. या तरुण वयोगटात स्तनाचा कॅन्सर सर्वाधिक असला, तरी श्वासनलिका आणि प्रोस्टेट कॅन्सर सर्वात वेगाने वाढले आहेत. जनुकीय घटकांचा प्रभाव असला तरीही, अती लाल मांसाचे सेवन, जास्त मीठ, फळे व दुधाचा अभाव, मद्यपान, तंबाखूचे सेवन, लठ्ठपणा आणि शारीरिक निष्क्रियता या गोष्टी तरुणांमधील कॅन्सरसाठी मुख्यत्वे कारणीभूत ठरत आहेत.
कॅन्सरचा धोका वाढण्यास विलंब आणि आजाराचे उशिरा होणारे निदान कारणीभूत
संशोधनाच्या एकंदरीत निष्कर्षांवरून असे स्पष्ट होते की, जनुकीय किंवा आनुवंशिक घटक कॅन्सरच्या केवळ ५ ते २० टक्के प्रकरणांसाठीच जबाबदार असतात, जे मुख्यत्वे वय आणि कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असतात. याउलट, उरलेली ८० ते ९५ टक्के प्रकरणे ही जीवनशैली, अयोग्य आहार, लठ्ठपणा, प्रदूषण आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत असणाऱ्या एचपीव्ही (HPV) सारख्या संसर्गजन्य घटकांमुळे होतात. अनेकदा तपासणीस होणारा विलंब आणि आजाराचे उशिरा होणारे निदान यामुळे मृत्यूचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या पातळीवर प्रदूषण नियंत्रण, धूम्रपानबंदी आणि नियमित तपासणीवर भर देणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी करण्यासाठी मायोकाइन्स जबाबदार
या सर्व धोक्यांवर मात करण्यासाठी आणि कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम हा सर्वात प्रभावी उपाय ठरू शकतो. ऑगस्टमध्ये ‘PubMed’ मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, व्यायामाचे अगदी एकच सत्र (उदा. Resistance Training किंवा HIIT) शरीरात कॅन्सरविरोधी ‘मायोकाइन्स’ची (Anti-cancer myokines) पातळी वाढवू शकते. हे मायोकाइन्स कॅन्सरच्या पेशींची (MDA-MB-231) वाढ मंदावतात, ज्यामुळे आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी होते. थोडक्यात सांगायचे तर, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैलीमुळे शरीरात असे सूक्ष्म पेशीस्तरीय बदल घडून येतात, जे कॅन्सरच्या पेशींचा प्रतिकार करण्यास मदत करतात.
