उत्तर प्रदेशातील बहुचर्चित ‘ब्लू ड्रम हत्याकांड’ प्रकरणात मेरठच्या सत्र न्यायालयाने आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. या निकालाने देशातील कायदेशीर आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भारतातील न्यायालयांमध्ये अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांवर नियमितपणे सुनावणी होत असते; पण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एखाद्या महिला गुन्हेगाराला थेट फाशीची शिक्षा सुनावणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. यापूर्वीही काही गंभीर गुन्ह्यांमध्ये महिलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मुस्कानला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असली, तरी तिला खरंच फासावर दिले जाईल का? याबाबत कायदेशीर तरतूदी काय? त्याविषयीचा हा आढावा…

मेरठमधील हे हत्याकांड अत्यंत क्रूरतेने आणि थंड डोक्याने करण्यात आले होते, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले. गुन्ह्याची क्रूरता लक्षात घेऊन हा प्रकार मृत्युदंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ कायदेशीर निकषात मोडत असल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केले. २०२४ मध्ये मुस्कानने तिचा प्रियकर साहिलच्या मदतीने पती सौरभ रस्तोगीची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपींनी सौरभचा मृतदेह एका निळ्या रंगाच्या टाकला होता. तसेच त्यात सिमेंट आणि केमिकल ओतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होता होता. सौरभ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. भारतात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एकूण दोषींमध्ये महिलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. १९४७ पासून आतापर्यंत फक्त एकाच महिलेला फाशी देण्यात आली आहे. १९५५ मध्ये रतनाबाई जैन या महिलेला अधिकृतपणे फाशी देण्यात आल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद आहे.

कायदेतज्ज्ञांच्या मते, अनेकदा हाय-प्रोफाइल हत्या प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयांकडून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते; पण त्यानंतरच्या अपील प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ न्यायालयांकडून महिलांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेत बदल करून ती जन्मठेपेत रूपांतरित केली जाते. कायदेशीर संशोधन संस्थांच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरातील तुरुंगांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांपैकी महिला गुन्हेगारांचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षाही कमी आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार १९९० ते १९९६ या काळातील रेणुका शिंदे आणि सीमा गावित या सावत्र बहिणींना १३ मुलांचे अपहरण करून त्यापैकी नऊ मुलांची हत्या केली होती. याप्रकरणी २००१ मध्ये कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दोन्ही बहिणींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच, त्यांच्या दयेच्या याचिकाही फेटाळण्यात आल्या होत्या. मात्र, दयेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास सरकारी यंत्रणांकडून झालेल्या विलंबामुळे उच्च न्यायालयाने अखेर त्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले होते.

२००८ मध्ये उत्तर प्रदेशातील शबनम अली नामक महिलेने आपल्याच कुटुंबातील सात सदस्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या भयानक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. २०१० मध्ये तिला अलाहाबाद उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही शमबनमच्या मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे अलीकडच्या दशकांमध्ये फाशीची शिक्षा होणारी ती भारतातील पहिली महिला ठरण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, या शिक्षेविरोधातील विविध याचिकांवरील सुनावणी व प्रक्रियेमुळे अद्याप फाशीची अंमलबजावणी झालेली नाही. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सध्या भारतीय तुरुंगामध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेले तब्बल ५७१ कैदी आहेत. त्यामध्ये २१ महिलांचा समावेश असून त्यापैकी काहीच्या याचिकांवर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर काही प्रकरणांमध्ये दयेचे अर्ज प्रलंबित आहेत.

भारतीय न्यायव्यवस्थेत मृत्युदंडाची शिक्षा सुनावताना सर्वोच्च न्यायालयाच्या ‘बचन सिंह विरुद्ध पंजाब राज्य’ या ऐतिहासिक खटल्यातील मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेतला जातो. या निकालानुसार, मृत्युदंड हा केवळ ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरणांमध्येच दिला जावा तसेच, दोषीला जन्मठेपेसारखी पर्यायी शिक्षा देणे पुरेसे ठरणार नाही हे न्यायालयाला स्पष्टपणे दिसून आले पाहिजे. महिला आरोपींच्या प्रकरणांमध्ये शिक्षा ठरवताना न्यायालयांकडून मातृत्वाची जबाबदारी, वय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती तसेच आरोपीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता अशा विविध बाबींचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, थंड डोक्याने केलेला कट, टोकाचा क्रूर हिंसाचार आणि गुन्ह्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसणे यांसारख्या बाबीही शिक्षेचा निर्णय घेताना महत्त्वाच्या ठरतात. जसे की मेरठमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मुद्दाम एका ड्रममध्ये लपवून ठेवणे अशा प्रकरणांमध्ये आरोपी महिला आहे म्हणून तिला मृत्युदंडापासून आपोआप संरक्षण मिळत नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नोंदवले आहे.

भारतीय फौजदारी कायद्यानुसार फाशीच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाची मंजुरी अनिवार्य असते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज असे अनेक कायदेशीर टप्पे असतात. आरोपीने अपील केले नाही तरीही सत्र न्यायालयाला हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे पाठवावेच लागते. उच्च न्यायालयाच्या किमान दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची नव्याने तपासणी होते. त्यानंतर न्यायालय ही शिक्षा कायम ठेवू शकते, जन्मठेपेत बदलू शकते किंवा पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तताही करू शकते. उच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवल्यास आरोपीला घटनेच्या कलम १३६ अन्वये ‘विशेष अनुमती याचिका’ दाखल करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गुन्ह्याची पार्श्वभूमी, आरोपीचे वय, मानसिक स्थिती, सुधारणेची शक्यता आणि हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ ठरते का, याची अतिशय सूक्ष्म तपासणी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यास, कैद्याला त्याच न्यायालयाकडे आपल्याच निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती करता येते. न्यायालयीन मार्ग संपल्यानंतर आरोपीकडे कार्यकारी दयेचा घटनात्मक पर्याय उरतो. आरोपी सर्वप्रथम राज्याच्या राज्यपालांकडे दया याचिका सादर करू शकतो. तसेच त्याला राष्ट्रपतींकडेही दयेचा अर्ज करता येतो. त्याच्या अर्जावर राष्ट्रपती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्ल्याने निर्णय घेऊ शकतात आणि फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलू शकतात किंवा दया याचिका फेटाळू शकतात. त्यामुळेच मुस्कानला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असली, तरीही तिच्याकडे वरील कायदेशीर मार्ग आहेत.