Chapati Movement 1857 Revolt History: चपाती किंवा पोळी ही भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. या पदार्थाला चपाती म्हणावं की, पोळी असा वाद नेहमीच होताना दिसतो. परंतु, अनेकांना या वादापलीकडे चपातीने इतिहास घडवल्याचे क्वचितच ठाऊक असते. भारताच्या इतिहासातील १८५७ साली झालेला स्वातंत्र्यासाठीचा उठाव हे भारताने स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जाते. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध १० मे १८५७ रोजी मेरठ येथे मोठा उठाव झाला आणि काही दिवसांतच या उठावाचे लोण उत्तर आणि मध्य भारतात पसरले. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि बहादुर शाह झफर यांच्या नेतृत्वाखाली या उठावाने संघर्षाचे स्वरूप धारण केले. या चळवळीने ब्रिटीश सत्तेच्या पायाभरणीला पहिल्यांदाच मोठा धक्का दिला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा दिली. परंतु, या उठावाची किंवा संघर्षाची सुरुवात होण्यापूर्वी ब्रिटीशांना त्याची चाहूल लागली होती. यासाठी कारणीभूत होती एक चपाती.
चपाती चळवळविषयी ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
या चपाती चळवळीचा शोध घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पहावे लागते. डॉ. गिल्बर्ट हॅडो हे ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी सेवेत कार्यरत होते. त्यांनी १८५७ साली मार्च महिन्यात भारतात घडत असलेल्या एका विचित्र घटनेचा उल्लेख ब्रिटनमधील आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात केला होता. ते आपल्या पत्रात लिहितात, “सध्या भारतभर एक विलक्षण आणि गूढ घडामोड सुरू आहे. तिचा नेमका आशय काय, याचा ठावठिकाणा कुणालाही लागत नाही.
या हालचालीची सुरुवात कुठे झाली, ती कोणी केली आणि त्यामागचा उद्देश काय आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. हा प्रकार एखाद्या धार्मिक अनुष्ठानाशी निगडित आहे की एखाद्या गुप्त चळवळीचा भाग आहे, हेही स्पष्ट होत नाही. भारतीय वर्तमानपत्रांचे मथळे या रहस्यमय घटनेविषयी विविध अंदाज, शक्यता आणि तर्कांनी गजबजलेले आहेत. या अनाकलनीय प्रवाहाला ‘चपाती चळवळ’ असे संबोधले जात आहे.” डॉ. हॅडो प्रत्यक्षात देशभर हजारोंच्या संख्येने गावोगाव फिरवण्यात आलेल्या चपात्यांच्या त्या विचित्र आणि अनाकलनीय घटनेचे वर्णन करत होते.

काहीतरी विचित्र घडत असल्याची चाहूल
१८५७ साली ब्रिटिश भारतातील तणाव शिगेला पोहोचला होता. शोषणकारी ब्रिटिश सत्तेला कंटाळलेले आणि असंतुष्ट भारतीय शांतपणे उठावाची तयारी करत होते. त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक विलक्षण घटना घडू लागली. रात्रीच्या वेळी धावपटूंच्या माध्यमातून कोणतेही चिन्ह किंवा ओळख नसलेल्या हजारो चपात्या देशभरातील घरे आणि पोलिस चौक्यांमध्ये पोहोचवण्यात येऊ लागल्या. ज्यांच्याकडून त्या चपात्यांचा स्वीकार करण्यात आला ते शांतपणे आणखी चपात्या तयार करून पुढे पाठवत होते. या कृतीकडे मथुरेचे दंडाधिकारी मार्क थॉर्नहिल यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी या प्रकरणाची आणखी चौकशी केली असता चपात्या दररोज रात्री तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत प्रवास करत असल्याचे समजले. नर्मदेपासून नेपाळच्या सीमेपर्यंत असा प्रदीर्घ प्रवास चपात्या करत होत्या. साध्या, सर्वसामान्य वाटणाऱ्या चपातीचा हा गूढ आणि झपाट्याने होणारा प्रसार पाहून त्यांना खात्री पटली की काहीतरी गंभीर घडत आहे.
त्या गूढ कृतीमागे नेमका अर्थ काय?
या चपात्यांच्या विचित्र प्रवासामागील अर्थ समजून घेण्यासाठी व्यापक चौकशी करण्यात आली; अनेक तर्क मांडले गेले, परंतु ठोस तथ्ये फारशी हाती लागली नाहीत. चपात्यांवर कोणताही शब्द लिहिलेला नव्हता, कोणतेही चिन्ह नव्हते. त्यामुळे चपाती वाहून नेणाऱ्यांना थांबवण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी ठोस कारणच सापडत नसल्याने ब्रिटिश अधिकारी संतप्त झाले होते. विशेष म्हणजे, हे चपाती धावपटू अनेकदा पोलिस चौकीदारच होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नंतर जेव्हा या धावपटूंना एका घरातून दुसऱ्या घरात चपात्या नेण्यामागील उद्देशाबद्दल विचारणा करण्यात आला, तेव्हा त्यांनाही आपल्या कृतीचा नेमका अर्थ माहीत नसल्याचे दिसून आले. चपात्या खऱ्या होत्या, परंतु त्या कशासाठी फिरवल्या जात होत्या, याची खात्री कुणालाच नव्हती. अगदी त्या वाहून नेणाऱ्यांनाही त्याची कल्पना नव्हती. पोलिस चौकीदार सुमारे दोन इंच व्यासाच्या चपात्या भाजून आपल्या सहकाऱ्यांकडे देत होते. ते सहकारी पुन्हा काही चपात्या तयार करून शेजारच्या गावांतील आपल्या समकक्षांकडे पाठवत होते.

ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये घबराट
१८५७ च्या उठावासंबंधी उपलब्ध असलेल्या दुर्मीळ कागदपत्रांनुसार, ५ मार्च १८५७ पर्यंत चपात्यांचा प्रसार अवध आणि रोहिलखंडपासून ते थेट दिल्लीपर्यंत झाला होता. या परिसरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात चपात्या पोहोचल्याचे आणि मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी असल्याचे लक्षात येताच ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. विशेषतः, या चपात्या ब्रिटिश टपाल व्यवस्थेपेक्षाही अधिक वेगाने फिरत असल्याची बाब त्यांना अत्यंत अस्वस्थ करणारी ठरली.
चळवळीचा उगम नेमका कुठे झाला?
या प्रकरणा संबंधी ठोस पुरावे उपलब्ध नसले, तरी गोंधळलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना संशय होता की, या चपात्या एखाद्या गुप्त संकेतासारख्या आहेत. या चळवळीचा उगम नेमका कुठे झाला, याबाबत मात्र मतभेद होते. काहींना वाटत होते ,ती सुरुवात कलकत्ता (आताचे कोलकाता) परिसरातून सुरू झाली, तर काहींच्या मते ती उत्तरेकडील अवधमधून, तर काहींच्या मते मध्य भारतातील इंदूर येथून पसरली.

‘चपाती साखळी’बद्दलच्या अफवा
एकूणच, संपूर्ण ‘चपाती चळवळी’ने ब्रिटिश साम्राज्याला अक्षरशः हादरवून सोडले. अवघ्या सुमारे १ लाख सैनिकांच्या जोरावर ब्रिटिशांनी तब्बल २५ कोटी लोकसंख्येवर सत्ता गाजवली होती. त्यामुळे एखादे गंभीर बंड उसळल्यास आपली संख्या किती अपुरी पडेल, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. या अनाकलनीय ‘चपाती साखळी’बद्दलच्या अफवांमुळे १८५७ साली संपूर्ण देशात अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते. त्याच वर्षी १० मे रोजी मेरठ येथे पहिल्या सशस्त्र उठावाला सुरुवात झाली, तेव्हा चपात्यांचे हे वितरण एखाद्या भूमिगत संघटनेने आखून राबवले असल्याचा व्यापक समज होता.
मानसिक युद्धातील हे एक प्रभावी शस्त्र
काही वर्षांनी प्रकाशित झालेल्या ‘Life During the Indian Mutiny’ या पुस्तकात जे. डब्ल्यू. शेरर यांनी मान्य केले की, जर या योजनेचा उद्देश गूढ आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करणे हा असेल, तर तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला होता. १८५७ मधील या गूढ चपाती वितरणाने ब्रिटिशांना चांगलेच अस्वस्थ केले होते आणि वसाहतवादी सत्तेविरुद्धच्या मानसिक युद्धातील हे एक प्रभावी शस्त्र ठरले.
चपात्या हा प्रमुख आहार
असेही म्हटले जाते की, उठावाच्या काळात तात्या टोपे आणि लक्ष्मीबाई यांच्या सैन्यातही चपात्या हा प्रमुख आहार होता, जेव्हा ते वेगवेगळ्या भागांत हालचाली करत होते. गनिमी युद्धतंत्रातील दिग्गज मानले जाणारे कुंवरसिंगही आपल्या थोड्याशा सैनिकांसह प्रवास करत असत आणि गावे ओलांडताना तेथे थांबून तुपाने माखलेल्या चपात्या, गूळ आणि पाणी आपल्या पिशव्यांत भरून घेत असत.
अलीकडील काही संशोधनानुसार, चपात्यांचा प्रसार हा कॉलऱ्याने बाधित लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता मांडण्यात आली आहे. मात्र त्या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
संदर्भ:
- Hibbert, Christopher. The Great Mutiny: India 1857. London: Penguin, 1978.
- Mukherjee, Rudrangshu. Awadh in Revolt, 1857–58: A Study of Popular Resistance. Delhi: Permanent Black, 2001.
- Sherer, J. W. Life During the Indian Mutiny. London: Chapman & Hall, 1860.
- Dalrymple, William. The Last Mughal: The Fall of a Dynasty, Delhi, 1857. London: Bloomsbury, 2006.
- Wagner, Kim A. The Great Fear of 1857: Rumours, Conspiracies and the Making of the Indian Uprising. Oxford: Peter Lang, 2010.
