Nagpur Conversion Rape Case : भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेल्या जवानाच्या २४ वर्षीय पत्नीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली. अय्याज ताज मदारे आणि आमिन शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून महिलेवरील अत्याचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. नागपूरमध्ये घडलेल्या या कथित धर्मांतर प्रकरणाचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
नागपूरमधील धर्मांतर प्रकरण
काही दिवसांपासून नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल केले असून काही आरोपींना अटकही केली आहे. या घटनेचा सविस्तर तपास सुरू असतानाच नागपूरमध्येही धर्मांतर आणि बलात्काराचा संतापजनक प्रकार घडला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आरोपी अयाज हा एका २४ वर्षीय महिलेचा हात धरून तिच्यावर धार्मिक मंत्रांचे पठण करताना दिसून येत आहे. त्याचवेळी पीडिता आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी प्रचंड धडपड करताना दिसत आहे. पीडित महिला ही भारतीय वायूसेनेत कार्यरत असलेल्या जवानाची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे.
पीडित महिलेचा आरोप काय?
पीडितेचा दावा आहे की, या घटनेनंतर तिला धर्मांतरित झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर अंमली पदार्थ (ड्रग्ज) देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. तसेच अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि आरोपींकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्यात आली. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य पुरावा मानला जात आहे, ज्याला पोलिसांनीही अधिकृत दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनेच तिच्या तक्रारीसोबत हा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला आहे. पीडिता ही रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
गुंगीचे औषध देऊन बलात्कार
नागपूरमधील धर्मांतरांचे हे खळबळजनक प्रकरण गेल्या वर्षी घडल्याचे तपासात समोर आले आहे. पीडित महिलेने आपल्या पतीला या संपूर्ण प्रकाराची माहिती दिल्यानंतर आणि त्यांनी १३ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी अय्याज ताज मदारे याने एका प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीशी संपर्क साधला. त्याने तिला नागपूरमधील वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. महिलेने केलेल्या आरोपानुसार, हॉटेलमध्ये तिला पिण्यासाठी ज्यूस देण्यात आला, ज्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. ज्यूस प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्याच अवस्थेत मदारे याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने या कृत्याचे व्हिडिओ आणि फोटोही रेकॉर्ड केले होते. पुढे याच फोटोच्या माध्यमातून त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
ब्लॅकमेल करून खंडणीही उकळली
आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार आणि तिच्याकडून तीन लाखांहून अधिक खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकून पीडितेला विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे. मे २०२५ मध्ये, आरोपीने २४ वर्षीय पीडितेला नागपूरजवळील कळमेश्वर येथे नेले. तिथे तिची ओळख अमीन शेख आणि हजरत मौलाना यांच्याशी करून देण्यात आली. त्यानंतर या तिघांनी तिला कळमेश्वरमधील एका खाजगी आणि शांत ठिकाणी नेले. तिथे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील हजरत मौलाना नावाच्या मौलवीने धार्मिक विधी केले. पीडितेची इच्छा नसतानाही तिला जबरदस्तीने ‘कलमा’ वाचायला लावला आणि “कुबूल है” म्हणण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर मौलवीने ती मुस्लिम झाली असून अयाजबरोबर तिचा कायदेशीर निकाह झाल्याचे घोषित केले.
प्रकरण कसे उघडकीस आले?
पीडितेने असाही आरोप केला आहे की, आरोपी अयाज हा तिला एका प्लास्टिकच्या बाटलीतील द्रव पदार्थ जबरदस्तीने पाजून उर्दूमध्ये काही मंत्र म्हणायचा आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारायचा. या सर्व प्रकारानंतर तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. हा विकृत प्रकार दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे पीडिता प्रचंड अस्वस्थ झाली होती. अखेर पती ड्युटीवरून घरी परतल्यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेला हा सर्व भयानक प्रकार सांगितला. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, बदनामीच्या भीतीने पीडित महिला अनेक दिवसांपासून हा अत्याचार सहन करत होती. मात्र शेवटी तिने पतीला सर्व काही सांगितले. या प्रकरणात अय्याज मदारे आणि अमीन शेख (३०) यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी हजरत मौलाना हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असून तो मध्य प्रदेशातील तामिया येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर बलात्कार, खंडणी, धर्मांतराचा प्रयत्न यांसह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धर्मांतरविरोधी कायदा काय सांगतो?
भारतामध्ये जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारचा स्वतंत्र कायदा नसला, तरी अनेक राज्यांनी आपल्या स्तरावर धर्मस्वातंत्र्य कायदे लागू केले आहेत. सध्या देशातील १२ राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी कायदे कार्यरत असून त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्य सरकारने मार्च २०२६ मध्ये ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ लागू केले होते. या कायद्याचा मुख्य उद्देश बळजबरी, फसवणूक, खोटी माहिती किंवा प्रलोभन देऊन करण्यात येणारे धर्मांतर रोखणे हा आहे. कायद्याच्या सुधारित तरतुदींमध्ये अधिक कठोर शिक्षेची व्यवस्था करण्यात आली असून काही कायदेशीर प्रक्रियांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार, मोफत शिक्षण, नोकरी, रोख रक्कम किंवा इतर कोणतेही लाभ देण्याचे आमिष दाखवून, तसेच फसवणूक किंवा कपटाच्या माध्यमातून एखाद्याचे धर्मांतर करण्यात आल्यास ते बेकायदेशीर मानले जाते.
कायद्याचे उल्लंघन झाल्यास कोणती शिक्षा?
जर एखाद्या व्यक्तीला स्वच्छेने आपला धर्म बदलायचा असल्यास त्याला आणि संबंधित धार्मिक विधी करणाऱ्या धर्मगुरूला त्या विधीपूर्वी ६० दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे लेखी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. या कायद्याचे कोणीही उल्लंघन केल्यास त्याला ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. मात्र, धर्मांतरासाठी लक्ष्य करण्यात आलेली व्यक्ती अल्पवयीन, महिला किंवा अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास शिक्षेची तरतूद अधिक कठोर आहे. अशा प्रकरणांमध्ये सात ते दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे विविध वृत्तांतांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
