नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग न्यायालयीन लढ्यानंतर मोकळा झाला. जून २०२६मध्ये व्यवस्थापन जीएमआरकडे आले; मात्र जमीन हस्तांतरण, सरकारी मंजुऱ्या आणि राजकीय मतभेदांच्या चर्चेमुळे विकासकामांच्या गतीबाबत प्रश्न कायम आहेत.
नागपूर विमानतळाच्या विकासातील अडथळे कायम का?
जीएमआर एअरोला कंत्राट मिळणे आणि प्रत्यक्ष विकासकामे सुरू होणे, या दोन वेगळ्या बाबी आहेत. जून २०२६मध्ये मिहान इंडिया लिमिटेडकडून व्यवस्थापन हस्तांतरित झाल्याने आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली. मात्र, विस्तारासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जमीन उपलब्ध नसल्याने नियोजन आणि अंमलबजावणीसमोर प्रश्न आहेत. संरक्षण खात्याच्या जमिनीचे हस्तांतरण, शिवणगाव परिसरातील जागेचा ताबा आणि विविध सरकारी मंजुऱ्या या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कंत्राट मिळाल्यानंतरचा पुढचा टप्पा अधिक गुंतागुंतीचा ठरत आहे. व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी कंपनीकडे आली असली, तरी अनेक निर्णय सरकारी यंत्रणांच्या सहकार्यावर अवलंबून आहेत.
कंत्राट वादाचा विकासकामांवर परिणाम?
या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमीही असल्याची चर्चा आहे. जीएमआरला कंत्राट मिळवून देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे केंद्रातील काही नेते नाराज झाल्याचे सांगितले जाते. कंत्राटाला विरोध झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आणि जीएमआरला यश मिळाले. मात्र, राजकीय नाराजीमुळेच पुढील कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जमीन हस्तांतरण आणि मंजुऱ्यांतील विलंब हा त्याचाच परिणाम असल्याचे सांगण्यात आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गंत राजकारणामुळे आणि व्यावसायिक हितसंबंधामुळे मध्य भारतातील कार्गोसाठी अतिशय महत्वाच्या प्रकल्पातील अडथळे निर्माण होत असल्याने स्थानिकांचे नाराजी स्पष्ट दिसून लागली आहे.
संरक्षण खात्याची जमीन आणि शिवणगावचा प्रश्न किती निर्णायक?
विमानतळाचा विस्तार करताना जमिनीची उपलब्धता हा मूलभूत मुद्दा आहे. संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील जमीन हस्तांतरित न झाल्यास संबंधित क्षेत्रातील नियोजित कामे रखडू शकतात. शिवणगाव परिसरातील जागेचा ताबा मिळविण्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. स्थानिक नागरिकांचे प्रश्न, भरपाई आणि पुनर्वसन यांचा विचार करूनच हा विषय मार्गी लावावा लागेल. त्यामुळे प्रशासन, संबंधित सरकारी विभाग, नागरिक आणि जीएमआर यांच्यात समन्वय आवश्यक आहे. यासंदर्भात अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेटदेखील घेतली. जमीन उपलब्ध होण्याची निश्चित कालमर्यादा स्पष्ट झाल्याशिवाय विस्ताराच्या नियोजनाला ठोस दिशा मिळणे कठीण आहे.
टर्मिनल नूतनीकरणाचे काम कधी पूर्ण होणार?
जीएमआरच्या नियोजनानुसार विमानतळाचा विकास टप्प्याटप्प्याने होणार आहे. पहिल्या टप्प्यात टर्मिनल नूतनीकरणाचे काम प्रस्तावित असून, काम सुरू झाल्यानंतर १२ ते १८ महिन्यांत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सुमारे १९ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रातील सुधारणांमुळे प्रवाशांच्या सोयी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक मंजुऱ्या आणि कामासाठी जागेची उपलब्धता महत्त्वाची ठरेल. नूतनीकरणाची मुदत जाहीर करणे पुरेसे नाही; काम सुरू होण्याची तारीख, टप्पानिहाय प्रगती आणि पूर्णत्वाची स्थिती याबाबतही पारदर्शकता आवश्यक आहे.
केंद्रच्या मंजुऱ्यांमुळे प्रकल्पाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे का?
विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी तांत्रिक, प्रशासकीय आणि नियामक मंजुऱ्या आवश्यक असतात. विविध विभागांकडील प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास प्रत्यक्ष कामांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणती मंजुरी प्रलंबित आहे, तिची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, याची स्पष्ट माहिती आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी नियमित आढावा घेऊन कालमर्यादा निश्चित केल्यास अनिश्चितता कमी होऊ शकते. प्रकल्पाला गती देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीइतकाच प्रशासकीय समन्वयही महत्त्वाचा आहे.
विमानतळाच्या विस्तारातून विदर्भाला काय लाभ होईल ?
नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता विमानतळाचा विस्तार हा विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. प्रवासी वाहतुकीबरोबर कार्गो सुविधांचा विकास झाल्यास कृषी उत्पादनांची निर्यात, उद्योग, पर्यटन आणि विमान देखभाल-दुरुस्ती क्षेत्राला चालना मिळू शकते. मात्र, हे लाभ केवळ आराखड्यांमधून साध्य होणार नाहीत. जमीन हस्तांतरण, मंजुऱ्या आणि स्थानिक प्रश्न वेळेत सोडवावे लागतील. जीएमआरकडे व्यवस्थापन हस्तांतरित होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे; पण प्रकल्पाचे यश प्रत्यक्ष कामांच्या गतीवर ठरणार आहे. आता कंत्राटाचा वाद मागे टाकून नागपूरच्या विमानतळाचा विकास निर्धारित वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
rajeshwarthakare@expressindia.com
